बहादुरगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


धर्मवीरगड
नाव धर्मवीरगड
उंची
प्रकार स्थलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव श्रीगोंदा,पेडगाव
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


बहादुरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

बहादुरगड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी ते अधिकृत नव्हते. किल्ल्याचे कागदोपत्री नाव पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला आहे. गॅझेट मध्येही अशीच नोंद आहे. २५ मे २००८ ला या गडाचे धर्मवीर गड असे नामांतर केले आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

पेडगावचा किल्ला धर्मवीरगड म्हणून प्रसिद्ध आहे. धर्मवीरगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यांमध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिण सीमेवर भीमा नदी वहाते. या भीमा नदीच्या उत्तरतिरावर पेडगावचा हा भुईकोट किल्ला आहे.

कसे जाल?[संपादन]

पेडगावला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. त्याआधी हे समजून घ्या की, पेडगाव दोन आहेत. पहीले थोरले पेेडगाव व दुसरे धाकटे पेडगाव. धाकटे पेडगाव हे दौंड तालुक्यात, पुुणे जिल्ह्यात आहे.

  • दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगरकडून अथवा पुण्यातून श्रीगोंद्याला व तेथून पेडगावला जाता येते.

पाहण्यासारखे[संपादन]

पेडगावचा धर्मवीरगड हा भीमेच्या काठावर आहे. याची दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या धर्मवीरगडाची किल्ल्याला तीन चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेश मार्ग गावाच्या बाजूला आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू आज उद्‌ध्वस्त झालेल्या आहेत. याची तटबंदी मात्र कशीबशी उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे. नदीच्या बाजूच्या तटबंदीमध्ये असलेले बांधकाम पहाण्यासारखे आहे. या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भीमानदीचा देखावा सुंदर दिसतो. किल्ल्यामधे सुबक नक्षीकाम असलेली दोन मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी लक्ष्मीनारायण मंदिर बर्‍या अवस्थेमध्ये आहे. या मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मूर्ती सुंदर आहेत.

११० एकरावर हा किल्ला पसरला असून किल्ल्यावर आजही अनेक अवशेष पाहता येतात. गडावर प्राचीन इ.स. च्या ५ व्या शतकातली चालुक्य शैलीतील मंदिरे, हत्ती मोटा, राजदरबार, वेशी, तटबंदी असे अवशेष आजही भग्न अवस्थेत उभे आहेत.

इतिहास[संपादन]

इतिहास - १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. " पांडे पेडगावचा भुईकोट " असे त्याचे त्यावेळचे नाव होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वेरूळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट मोकास (देखभालीसाठी) होता. त्यानंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. औरंगजेबाचा दुधभाऊ बहादुरखान कोकालताश हा या किल्ल्याचा त्या वेळी किल्लेदार होता. तो स्वतःला दक्षिणेचा शहेनशाह समजत असे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरून काढायला बहादुरखानाने आपण होऊन शिवाजीराजांना संधी दिली. बहादुरखानाने गडामधे एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते. महाराजांच्या हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला होता. महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजाराचे सैन्य बहादुरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले. या सरदाराने आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादुरखान लढाईसाठी तयारी करून मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्यामुळे बहादुरखानाला चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादुरगडावर हल्ला चढवला. गडामध्ये तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केले. बहादुरखान पाठलागावरून परत आला, तेव्हा त्याला मराठ्यांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले होते.

छत्रपती संभाजी राजांना अटक - छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. त्यानंतर याच गडावरून त्यांची उंटावर बसून विदुषकी टोप्या घालून अचकट विचकट वाद्ये वाजवीत धिंड काढली गेली. त्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. राजांसह अटकेत असलेल्या कवी कलश यांना राजांनी काव्य करण्यास सुचवले त्यांनी या प्रसंगी खालील काव्य रचले .

यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग |
लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ||

जो रवी छवी देखतही होत बदरंग |
त्यो तव तेज निहारके तखत त्येजो अवरंग ||

( कवितेचा अर्थ: रावणाच्या सभेत ज्या प्रमाणे हनुमंताला बांधून आणले, त्या प्रमाणे संभाजी राजास औरंगजेबापुढे उपस्थित केले गेले. हनुमंताच्या अंगाला शेदूर शोभून दिसावा असे घनघोर युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे. हे राजन तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे हे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिहासनाचा त्याग करून गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे.)

त्यांना नाना प्रकारे खजिना व किल्ले ताब्यात देण्यास सांगितले त्यांनी त्यास नकार दिला, त्यानंतर मात्र राजांना स्वराज्य हवाली करण्यास सांगितले त्यालाही स्पष्ट शब्दात नकार दिला व ते स्वराज्य धर्मासाठी धर्मवीर झाले. राजांची करारी भेदक नजर बादशाहाला सहन होत नव्हती. त्याने त्यांचे डोळे काढण्याचे सुलतानी फर्मान सोडले. सर्व शिक्षा मात्र अगोदर कवी कलश यांच्यावर केल्या जात होत्या. नंतर त्या राजांना दिल्या जात होत्या. त्यानंतर दोघांचीही जीभ छाटण्यात आली. नंतर त्यांना पेडगावहून हलवून भीमा - इंद्रायणीच्या संगमावरील {तुळापुर} वढूला नेउन त्या दोघांचीही गुढीपाडव्याचा दिवस मुद्दाम पाहून त्याच्या आदल्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा देहाची विटंबना करून त्यांचे अवशेष इतस्ततः टाकण्यात आले. परिसरातील लोकांनी वढू बु।। येथे त्या दोघांचाही अंत्यविधी केला. आजही तिथे धर्मवीर संभाजी राजांची समाधी धर्मासाठी केलेल्या बलिदानाची साक्ष देत उभी आहे.

संदर्भ[संपादन]


बाहय दुवे[संपादन]

https://www.facebook.com/pages/Dharmaveergad-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1/175827532510272