२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कसोटी क्रमांक २४२५ (दोन हजार चारशे पंचवीसावा कसोटी सामना) हा भारत आणि न्यू झीलंड या दोन देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये १८-२३ जून २०२१ दरम्यान खेळवला गेलेला २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होता. हा सामना इंग्लंडच्या साउथहँप्टन मधील रोझ बोल या मैदानावर झाला. सुरुवातीला पाच दिवसांसाठी खेळवला जाणारा सामना पावसाचा व्यत्यत आल्यामुळे वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी राखीव दिवसाचा देखील वापर करण्यात आला. न्यू झीलंड ने अंतिम सामना ८ गडी राखून जिंकत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अवृत्तीचे विजेतेपद पटकावले. विजेत्या न्यू झीलंडला आणि उपविजेत्या भारताला अनुक्रमे १.६ दशलक्ष डॉलर्स आणि ८ लाख डॉलर्सचे रोख पारितोषिक देण्यात आले.

२००० आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी झाल्यानंतर न्यू झीलंडचा हा आयसीसीच्या स्पर्धेतील दुसरे विजेतेपद होते. आयसीसी स्पर्धा जिंकणारा केन विल्यमसन हा स्टीफन फ्लेमिंगनंतरचा न्यू झीलंडचा दुसरा कर्णधार ठरला. अंतिम सामन्यात विजय मिळवताना विल्यमसन म्हणाला की हा एक “अतिशय विशेष प्रसंग व एक विलक्षण भावनेचा” क्षण होता. भारताचा कर्णधार विराट कोहलीने कबूल केले की न्यू झीलंड हा एक चांगला संघ होता. परंतु भविष्यात होणा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा निर्णय घेण्यासाठी तीन पैकी सर्वोत्तम कसोटी सामन्यांच्या मालिकेद्वारे विश्वविजेता ठरविण्यात यावा अशी मागणी कोहलीने केली. सामन्यात ७ गडी मिळवत चांगली कामगिरी केल्याच्या जोरावर न्यू झीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

पार्श्वभूमी[संपादन]

भारत आणि न्यू झीलंड २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणफलकात प्रथम दोन स्थानी राहिल्याने अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. कोरोनाव्हायरस मुळे अनेक मालिका रद्द झाल्याने गुणफलकात संघांची स्थाने निश्चित करण्यासाठी प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार करण्यात आली. २ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑस्ट्रेलियाचा नियोजित दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द झाल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे जाहिर करण्यात आले. हा दौरा रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियापेक्षा न्यू झीलंडच्या गुणांची टक्केवारी जास्त असल्याने न्यू झीलंड अंतिम सामन्यात प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरला. मार्च २०२१ मध्ये इंग्लंडला कसोटी मालिकेत ३-१ ने हरवत भारत देखील अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.

अंतिम सामना ज्या मैदानात होणार (रोझ बोल, साउथहँप्टन) त्याचे छायाचित्र

सुरुवातीला अंतिम सामना लॉर्ड्स येथे होणार होता. पण कोरोनाकाळात साउथहॅंप्टन जवळील हॉटेल्स जैविक वातावरणाच्या दृष्टीने सुरक्षीत असल्याने तथापि, १० मार्च रोजी अंतिम सामना साउथहँप्टनला होईल असे आयसीसीचे स्पष्ट केले. याचे संकेत ८ मार्च रोजी म्हणजेच आयसीसीच्या अधिकृत घोषणेच्या दोन दिवस आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले होते. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामन्याच्या दर दिवशी फक्त ४ हजार प्रेक्षकांना सामना पाहण्यास मैदानात प्रवेश दिला गेला. २०२१ आयपीएलच्या स्थगितीनंतर कोणताही सामना न खेळल्याने भारतीय संघाने अंतिम सामन्याच्या आधी चार-दिवसीय आंतर-संघीय सराव सामना खेळला. तर न्यू झीलंडने इंग्लंडमध्येच इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामने खेळले.

८ जून २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने अंतिम सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गॉफ यांची पंच म्हणून नियुक्ती केली. सामन्याच्या आधी आयसीसीने काही नियम जाहीर केले. जर सामना बरोबरीत सुटला अथवा अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते ठरवण्यात येईल. १४ जून २०२१ रोजी आयसीसीने पारितोषिके जाहीर केली. विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्सचे बक्षिस जाहीर करण्यात आले. तर उपविजेत्या संघाला आठशे हजार डॉलर्सचे पारितोषिक जाहीर केले. तसेच दोन्ही संघ संयुक्त विजेते ठरल्यास बक्षिसाची २.४ दशलक्ष डॉलर्सची रक्कम दोन्ही संघ आपआपसात वाटून घेतील असे नियमावलीत नमूद केले गेले.

मैदान[संपादन]

रोझ बोल मैदान
इंग्लंड
साउथहॅंप्टन
रोझ बाऊल
प्रेक्षक क्षमता: २५,०००

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास[संपादन]

भारतचा ध्वज भारत फेरी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
प्रतिस्पर्धी संघ निकाल लीग फेरी प्रतिस्पर्धी संघ निकाल
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (विदेश दौरा) भारत २-० वेस्ट इंडीज मालिका १ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (विदेश दौरा) न्यू झीलंड १-१ श्रीलंका
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (मायदेशात मालिका) भारत ३-० दक्षिण आफ्रिका मालिका २ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (विदेश दौरा) न्यू झीलंड ०-३ ऑस्ट्रेलिया
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (मायदेशात मालिका) भारत २-० बांगलादेश मालिका ३ भारतचा ध्वज भारत (मायदेशात मालिका) न्यू झीलंड २-० भारत
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (विदेश दौरा) भारत ०-२ न्यू झीलंड मालिका ४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (मायदेशात मालिका) न्यू झीलंड २-० वेस्ट इंडीज
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (विदेश दौरा) भारत २-१ ऑस्ट्रेलिया मालिका ५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (मायदेशात मालिका) न्यू झीलंड २-० पाकिस्तान
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (मायदेशात मालिका) भारत ३-१ इंग्लंड मालिका ६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (विदेश दौरा) मालिका रद्द
लीग फेरी अव्वल स्थान
स्थान संघ खे वि गुण टक्के
भारतचा ध्वज भारत ५२० ७२.२०
खेळल्या गेलेल्या मालिकांच्या संख्येच्या संदर्भात
लीग फेरी गुणफलक लीग फेरी द्वितीय स्थान
स्थान संघ खे वि गुण टक्के
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४२० ७०.००
खेळल्या गेलेल्या मालिकांच्या संख्येच्या संदर्भात

संघ[संपादन]

भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड<

१५ जून २०२१ रोजी न्यू झीलंडने अंतिम सामन्यासाठी १५ खेळाडूंची अंतिम यादी प्रसिद्ध केली. सुरुवातीस संघामध्ये घेतलेले डग ब्रेसवेल, जॅकब डफी, डॅरियेल मिचेल, रचिन रविंद्र आणि मिचेल सँटनर यांना अंतिम संघातून वगळण्यात आले. त्याच दिवशी भारताने देखील आधी जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीतून मयंक अगरवाल, के.एस. भरत, अक्षर पटेल, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांना वगळत अंतिम १५ खेळाडूंचा संघ जाहिर केला.

अंतिम सामना[संपादन]

१८-२३ जून २०२१
(६ दिवसांची कसोटी)
धावफलक
वि
२१७ (९२.१ षटके)
अजिंक्य रहाणे ४९ (११७)
काईल जेमीसन ५/३१ (२२ षटके)
२४९ (९९.२ षटके)
डेव्हन कॉन्वे ५४ (१५३)
मोहम्मद शमी ४/७६ (२६ षटके)
१७० (७३ षटके)
ऋषभ पंत ४१ (८८)
टिम साउदी ४/४८ (१९ षटके)
१४०/२ (४५.५ षटके)
केन विल्यमसन ५२* (८९)
रविचंद्रन अश्विन २/१७ (१० षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: काईल जेमीसन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पहिल्या आणि चौथ्या दिवशी खेळ झाला नाही. तसेच दुसऱ्या दिवशी ३३.२ षटकांचा खेळ होऊ शकला नाही.
  • २३ जून २०२१ हा राखीव दिवशी.
  • न्यू झीलंडचे पुरुषांमधील क्रिकेटमधील पहिले वहिले विश्वविजेतेपद.

सारांश[संपादन]

दिवस पहिला[संपादन]

अंतिम सामन्याचा पहिला दिवस १८ जून २०२१, शुक्रवारी नियोजलेला होता. परंतु सकाळपासून मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. दुपारी उपहारानंतर पाऊस थांबला खरा पण मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सरतेशेवटी पंचांनी ब्रिटिश वेळेनुसार दुपारी ३ वाजता दिवसाचा खेळ थांबवला. पावसामुळे झालेले सहा तासांचे नुकसान भरून काढण्यासाठी राखीव दिवसाचा देखील वापर करावयास लागेल याची पुष्टी आयसीसीने केली.

दिवस दुसरा[संपादन]

पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेल्याने अखेर दुसऱ्या दिवशी निरभ्र वातावरण असल्याने सामना नियोजित वेळेत सुरू झाला. न्यू झीलंडने नाणेफेक प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकताना न्यू झीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने पावसामुळे निर्माण झालेले हवामान आणि वातावरण गोलंदाजांना अनुकुल आहे म्हणून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असे स्पष्ट केले. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी या कठिण परिस्थितीत संयमी फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी ६२ धावांची सलामी भागीदारी केली. गोलंदाजांना अनुकुल वातावरण असूनसुद्धा न्यू झीलंड गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी यांना सुसंगत गोलंदाजी करता येत नव्हती. दुपारच्या जेवणापुर्वी कर्णधार विल्यमसनने काईल जेमीसनमध्ये चेंडू सोपवला. काईलच्या पहिल्याच षटकामध्ये रोहित शर्मा चेंडू टोलावत असताना बॅटची कड लागून चेंडू तिसऱ्या स्लीपमध्ये टिम साउदीच्या हातात गेला आणि भारताचा पहिला गडी बाद झाला. लागलीच नील वॅग्नरच्या गोलंदाजीवर शुभमन गिल देखील बाद झाला. उपहारापर्यंत भारताची धावसंख्या २ गड्यांच्या मोबदल्यात ६९ धावांवर होती.

दुसऱ्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला. पुजाराने त्याची पहिली धाव घेण्याकरता ५० मिनिटे आणि ३० चेंडू इतका वेळ घेतला. पुजाराने त्यानंतर सलग दोन चौकार मारले परंतु अजून १६ निर्धाव चेंडू खेळल्यावर ट्रेंट बोल्टच्या गोलंदावर पुजारा पायचीत बाद झाला. पुजारा बाद झाला तेव्हा भारत ३ गड्यांच्या मोबदल्यात ८८ धावांवर होता. पुजारा बाद होताच उपकर्णधार अजिंक्य रहाणे कर्णधार कोहलीला साथ देण्यास मैदानात उतरला. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात सातत्याने पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरीत दिवसाचा खेळ थांबविण्यात आला. दुसऱ्या दिवसअखेर भारताची धावसंख्या ६४.४ षटकांमध्ये ३ गड्यांच्या मोबदल्यात १४६ धावांवर होती.

दिवस तिसरा[संपादन]

तिसऱ्या दिवशी देखील पाऊस आल्याने सामना १ तास उशीरा सुरू झाला. दिवसाच्या तिसऱ्यास षटकामध्ये काईल जेमीसनने अफलातून चेंडूवर भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. त्यानंतर जेमीसनने लगेचच ऋषभ पंतला टॉम लॅथमकडे झेल देऊन बाद करत भारताला आणखी एक धक्का दिला. अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या पुढे नेत ठेवली. अजिंक्य रहाणे देखील ४९ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर आलेल्या रविचंद्रन अश्विनने पटापट धावा जोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या २७ चेंडूतील २२ धावांच्या खेळीने भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. पण अश्विन फार काळ टिकू शकला नाही. टिम साउदीने अश्विनला स्लीप मध्ये झेल देत बाद केले. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत भारत ७ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावा अश्या स्थितीत होता.

उपहारानंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये काईल जेमीसनने इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना लागोपाठ बाद केले. जेमीसनने हॅट्रीकचा टाकलेला चेंडू मोहम्मद शमीने सीमेपलीकडे धाडत चौकार मारला. जेमीसनला हॅट्रीक घेता आली नाही. पुढील षटकामध्ये बोल्टने जडेजाला बाद करत भारताचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. न्यू झीलंडतर्फे पहिल्या डावात काईल जेमीसनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने २२ षटके गोलंदाजी (त्यातली १२ निर्धाव षटके‌) केली आणि सर्वाधिक ५ गडी बाद केले.

न्यू झीलंडचे सलामी फलंदाजी डेव्हन कॉन्वे आणि टॉम लॅथम यांनी चांगली सुरुवात करत पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी रचली. अश्विनने नंतर लॅथमला बाद केले. भारताच्या खेळाडूंनी अतिशय खराब क्षेत्ररक्षण केले. भारतीय खेळाडूंनी न्यू झीलंडचे अनेक झेल सोडले. सरतेशेवटी दिवसाच्या शेवटाला कॉन्वेला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. त्यानंतर खराब सुर्यप्रकाशामुळे पंचांनी सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसअखेर न्यू झीलंड २ गड्यांच्या मोबदल्यात १०१ धावा अश्या स्थितीत होता.

दिवस चौथा[संपादन]

चौथ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. न्यू झीलंडची धावसंख्या जैसे थे स्थितीत.

दिवस पाचवा[संपादन]

पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे ब्रिटीश वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता सुरू झाला. केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी पहिल्या तासात धिम्यागतीने फलंदाजी करत ११७ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने टेलर, बी.जे. वॅटलिंग आणि हेन्री निकोल्स या तिघांना बाद केले. उपहारापर्यंत न्यू झीलंडची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावा अशी होती.

दुसऱ्या सत्रात कॉलिन दि ग्रँडहॉम आणि विल्यमसन यांनी संयमी फलंदाजी करत न्यू झीलंडची धावसंख्या ८०व्या षटकांत १५० धावांच्या पुढे नेली. मोहम्मद शमीने नवीन चेंडूचा योग्य वापर करत ग्रॅंडहॉमला १३ धावांवर बाद केले. भारतीय गोलंदाजांनी न्यू झीलंडवर असाच दबाव ठेवण्याचे प्रयत्न केले खरे पण न्यू झीलंडच्या तळातल्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी करत आणखी ८२ धावांची भर घालत पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवली. न्यू झीलंडचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला.

रोहित शर्मा आणि गिल यांनी पुन्हा सलामीला उतरत भारताच्या दुसऱ्या डावास सुरुवात केली. गिल आणि रोहित पाठोपाठ बाद झाले. पाचव्या दिवसअखेर भारताची २ गड्यांच्या मोबदल्यात ६४ धावा अशी स्थिती होती. भारताने दुसऱ्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवली.

दिवस सहावा[संपादन]

सहावा दिवस हा अधिकृत राखीव दिवस होता. भारताने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या जोडीच्या मदतीने आदल्या दिवसाच्या ६४ धावांच्या धावसंख्येत भर घालायला सुरुवात केली. केवळ ७ धावांची भर घालत जेमीसनच्या गोलंदाजीवर कोहली आणि पुजारा बाद झाले. नंतर आलेला उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. उपहारापर्यंत ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी भारताला ५ गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावांची मजल मारून दिली. उपहारानंतर लगेचच नील वॅग्नरने जडेजाचा अडथळा दूर केला. ऑफसाईडला अप्रतिम उडी मारत यष्टीरक्षक बी.जे. वॅटलिंग ने जडेजाचा अचूक झेल टिपला. ऋषभ पंत जेव्हा ४१ धावा करून बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ७ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावा अशी होती. तळातल्या फलंदाजांनी १७० धावांपर्यंत भारताची धावसंख्या नेली. भारत दुसऱ्या डावात १७० धावांवर सर्वबाद झाला. न्यू झीलंडला पहिले वहिले कसोटी विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी १३९ धावांचा पाठलाग करायचा होता.

न्यू झीलंडच्या कॉन्वे-लॅथम या सलामी जोडीने दुसऱ्या डावात दणक्यात सुरुवात केली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ३३ धावा जोडल्या परंतु फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने दोघांना बाद करत भारताच्या आशा उंचावत ठेवल्या. न्यू झीलंड २ गड्यांच्या मोबदल्यात ४४ धावांवर होता. त्यानंतर उतरलेल्या विल्यमसन-टेलर जोडीने धावा जोडण्यास सुरुवात केली. भारताने लागोपाठ चार निर्धाव षटके टाकली, न्यू झीलंडला या स्थितीत ३१ षटकांमध्ये अजून ९३ धावांची आवश्यकता होती. २३व्या षटकानंतर विल्यमसन आक्रमक फलंदाजी करायला लागला. ४६व्या षटकात न्यू झीलंडने १३९ धावांचे लक्ष्य पार केले आणि भारताला ८ गडी राखून पराभूत करत पहिले वहिले कसोटी विश्वविजेतेपद मिळवले. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा आयसीसीच्या स्पर्धांमधील बाद फेरी किंवा अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले.

अंतिम सामन्यानंतर न्यू झीलंडच्या बी.जे. वॅटलिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.