सांगली जिल्हा
सांगली जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | पुणे विभाग |
मुख्यालय | सांगली |
तालुके | शिराळा - वाळवा - तासगांव - खानापूर (विटा) - आटपाडी - कवठे महांकाळ - मिरज - पलूस - जत - कडेगांव |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ८,५७८ चौरस किमी (३,३१२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | २८२०५७५ (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३२८ प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | २४% |
-साक्षरता दर | ८२.६२% |
-लिंग गुणोत्तर | १.०३ ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | सांगली (लोकसभा मतदारसंघ), हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ) |
-विधानसभा मतदारसंघ | इस्लामपूर • खानापूर • जत • तासगाव-कवठे महाकाळ • पलूस-कडेगाव • मिरज • शिराळा • सांगली |
-खासदार | विशाल पाटील, धैर्यशील माने |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | १,२०० मिलीमीटर (४७ इंच) |
संकेतस्थळ |
भूगोल
[संपादन]सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोऱ्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.
सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव
जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.
सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.
निर्मिती
[संपादन]भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४९ मध्ये तत्कालीन सातारा जिल्हयातील [१] तासगाव, खानापूर, वाळवा व शिराळा हे चार तालुके हस्तांतरीत करून तसेच राज्याच्या इतर संलग्न भागातून मिरज व जत हे आणखी दोन तालुके निर्माण करून सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा नावाचा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने औंध, जत, सांगली, कुरुंदवाड, मिरज या संस्थानांचा समावेश होता. जिल्हयाचे दिनांक २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा हे नाव बदलून सांगली असे करण्यात आले. [२] सन १९६५ मध्ये मिरज व खानापूर या तालुक्यांचे विभाजन करून कवठेमहांकाळ व आटपाडी असे आणखी दोन तालुके नव्याने निर्माण करण्यात आले. पुन्हा दिनांक १ जुलै १९९९ रोजी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) खानापूर व तासगाव या तालुक्यांचे विभाजन करून पलूस तालुक्याची [३] आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी पलूस व खानापूर तालुक्याचे विभाजन करून कडेगाव हा जिल्हयाचा १०व्या तालुक्याची निर्मिती केली. [४] सध्या सांगली जिल्हा १० तालुक्यांचा झाला असून, जिल्हयात सांगली मिरज व कुपवाड ही महानगरपालिका तसेच इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, पलूस व जत या सहा नगरपालिका कार्यरत आहेत. तसेच कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, खानापूर या चार नगरपंचायती कार्यरत आहेत
विशेष
[संपादन]येथे विष्णूदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.
औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांचा जन्म येथे झाला. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१चा सहकारी साखर कारखाना आहे.
ऐतिहासिक महत्त्वाचे
[संपादन]प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते.सांगलीच्या आसपासचा परिसर कुंडल चालुक्यांची राजधानी होती. कुंडल हे 1,600 वर्ष जुने प्राचीन गाव आहे. कौंडण्यपूर (कुंडलचे जुने नाव) कर्नाटकचा एक भाग होता. पुलकेशिन मी वाटापी (कर्नाटकातील बदामी) माझी राजधानी म्हणून निवड केली. कुंडल हे क्रांतिसिह नाना पाटील, क्रांतिवीर कॅप्टन आकाराम (दादा) पवार, श्यामराव लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, जी.डी लाड, शंकर जंगम आणि हुसाबाई जंगम या स्वातंत्र्य सैनिकांचे घर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात इ. स. 1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा जंगल सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात.
दळणवळण
[संपादन]राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग सांगली पासून जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ हा रत्नागिरी-सांगली-नागपूर या शहरांना जोडणारा महामार्ग सांगली शहरातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. सांगली हे मोठे शहर असल्याने आपल्याला येण्याची जाण्याची सोय चांगली आहे.
शेती
[संपादन]जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषतः शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोऱ्यांत काळी-कसदार जमीन आढळते.
सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
जिल्ह्यातील प्रमुख पिके- बाजरी, भात (तांदूळ). ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस
राजकीय संरचना
[संपादन]लोकसभा मतदारसंघ
[संपादन]सांगली - मिरज,सांगली,पलूस-कडेगांव,खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर(वाळवा) व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ) मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)
विधानसभा मतदारसंघ
[संपादन]सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- मिरज, सांगली, पलुस-कडेगांव,खानापूर-आटपाडी, तासगांव-कवठे महांकाळ , जत, इस्लामपूर(वाळवा), शिराळा, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.
जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळे
[संपादन]सांगली येथे श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन संस्थानिक यांनी कृष्णा नदी काठी इ.स. १८४५ मध्ये बांधलेले गणेश मंदिर [५] तसेच हरिपूर मार्गालगत बांधलेले बागेतील गणेश मंदिर ही सांगलीच्या जनतेची श्रद्धास्थाने आहेत. तासगांव येथील मराठयांचे दक्षिणेतील सेनानी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तासगांव येथे भव्य गोपूर असलेले गणेश मंदिर इ.स. १७९९ मधे बांधले असून ते अति प्राचीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. सांगली जिल्हयामध्ये चांदोली हे अभयारण्य रत्नागिरी कोल्हापूर व सांगली जिल्हयाच्या सरहद्दीवर व सागरेश्वर अभयारण्य, [६] वाळवा खानापूर व तासगांव तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. मिरज तालुक्यतील ख्वाजा मीरासाहेब दर्गा हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात. श्री क्षेत्र औदुंबर येथील दत्त मंदिर हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले आहे. बहे तालुका वाळवा येथील रामलिंग मंदिर, किल्ले मच्छिंद्र गड येथील नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथाची समाधी,[७] त्याशिवाय मिरज व कवठे महांकाळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या दंडोबा डोंगरावरील शिवमंदिर, ब्रम्हनाळ येथील कृष्णा येरळा नदयांच्या संगमाजवळील महादेव मंदिर, रेणावी तालुका खानापूर येथील रेवणसिद्ध समाधी, भिवघाट नजीक शुकाचार्याची समाधी इ. धार्मिक स्थळे नावाजलेली आहेत. बत्तीस शिराळा येथे दरवर्षी नागपंचमीला जिवंत नागाची पूजा केली जाते. तसेच नागाची मिरवणूक काढून नाग खेळवले जातात दरवर्षी नाग पंचमीस सर्व देशभरातून तसेच परदेशातून हजारो लोक येत असतात.
सागरेश्वर अभयारण्य सांगली
[संपादन]दिशा १०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील सुंदर अभयारण्यांपैकी एक आहे.
कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदवतांची मंदिरं आहेत.
सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे.
सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.
जिल्ह्यातील काही प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- क्रांतिसिंह नाना पाटील
- अण्णा भाऊ साठे
- ग.दि. माडगूळकर
- विष्णूदास भावे
- विष्णू सखाराम खांडेकर
- व्यंकटेश माडगूळकर
- नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व
- गोविंद बल्लाळ देवल
- चिंतामणराव पटवर्धन
- दादासाहेब वेलणकर
- ना.सं. इनामदार
- यशवंतराव चव्हाण
- जी डी बापु लाड
- कॅप्टन आकाराम दादा पवार
- कॅप्टन रामचंद्र भाऊ लाड
- राम नाईक
- वसंतदादा पाटील
- राजारामबापू पाटील
- सहकार तपस्वी गुलाबराव पाटील
- विजय हजारे
- अरुण कांबळे
- आर.आर. पाटील
- मधुकर तोरडमल
- जयंत पाटील
- भाऊसाहेब पडसलगीकर
- पुरुषोत्तम नारायण गाडगीळ
- काकासाहेब चितळे
- भगवान तुकाराम वाघमारे
- क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी
- डॉ. पतंगराव कदम
- डॉ. विश्वजीत कदम
- बापू बिरु वाटेगावकर (बोरगावचा ढाण्या वाघ)
- वि.स. पागे
संगीत वारसा
[संपादन]मंगेशकर कुटुंबीय सुमारे १४ वर्षे सांगलीत वास्तव्यास होते. [८] चित्रपट संगीतदिग्दर्शक बाळ पळसुले ही सांगलीचेच. [९] 'गुरुकुल या नावाने एक वर्षापासून संगीत विद्यालय सुरू झाले आहे विदुषी मंजुषा पाटील यांनी द वि काणबुवा प्रतिष्ठानच्या वतीने हे विद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक , स्टेशन चौक येथे सुरू केले आहे
राजकीय वारसा
[संपादन]सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे महत्त्वाचे निर्णय घेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच होय. वसंतदादांचा जन्म सांगली जवळील पद्माळे या गावचा होय. त्यांनी अनेक वर्षे विधिमंडळात व संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकनेते राजारामबापू पाटील यांचा जन्म वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे झाला. त्यांनी विधीमंडळात तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात उल्लेखनीय कार्य केले आहे.
सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया माजी खासदार सहकार तपस्वी गुलाबराव पाटील साहेब यांनी रोवला. त्यांच्या काळात संपूर्ण जिल्हाच नव्हे, राज्य तसेच देश पातळीवर सहकार क्षेत्रात अविस्मरणीय कार्य केले ते राज्य तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रदिर्घ काळ अध्यक्ष होते. राज्य सभेवर 12 वर्षे खासदार, 4 वर्षे विधानपरिषदेवर आमदार, काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष, केंद्रीय सहकार बोर्डाचे सरचिटणीस अशी विविध पदावर त्यांनी काम केले. सांगलीचे नगराध्यक्ष ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.
उद्योग
[संपादन]जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कडेगांव, जत,कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. उधोगांमध्ये साखरउद्योगा व्यतिरिक्त इतर अनेक व्यवसायांसाठी सांगली प्रसिद्ध आहे. उदा० हळद, मिरची, द्राक्षे, भडंग, आणि असे सांगलीतले बरेचसे उद्योग भारतात प्रसिद्ध आहेत. सांगलीच्या बाजारपेठेमधून महाराष्ट्रात व कर्नाटकात मालाची आवक - जावक आहे. सांगली-कोल्हापूर रोडवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ आणि जुना लोखंड बाजार आहे. या मार्केटमध्ये १७० दुकाने असून हे सांगली लोखंड मार्केट. नावाने ओळखले जाते..
साखर कारखान्यांची यादी
[संपादन]क्र | नाव | गाव,तालुका | संदर्भ |
---|---|---|---|
१ | वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना | सांगली | |
२ | विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना | यशवंतनगर, शिराळा | |
३ | राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना | साखराळे, वाळवा (युनिट ए) | |
४ | हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना | वाळवा, | |
५ | महांकाली सहकारी साखर कारखाना | राजारामबापू नगर, कवठे महांकाळ | |
६ | यशवंत सहकारी साखर कारखाना | नागेवाडी, खानापूर | |
७ | सोनहिरा सहकारी साखर कारखाना | वांगी(कडेगाव), | |
८ | डोंगराई सागरेश्र्वर सहकारी साखर कारखाना | रायगाव, खानापूर, (विटा) | |
९ | माणगंगा सहकारी साखर कारखाना | लोणार सिद्धनगर, आटपाडी | |
१० | तासगाव सहकारी साखर कारखाना | तुरची, तासगांव | |
११ | राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना | तिप्पेहळ्ळी, जत.(युनिट डी) | |
१२ | निनाईदेवी सहकारी साखर कारखाना | कोकरूड, शिराळा | |
१३ | उदगिरी शुगर अँड पॉवर लि. | बामणी-पारे, खानापूर(विटा) | |
१४ | सर्वोदय सहकारी साखर कारखाना लि. | कारंदवाडी,वाळवा.(युनिट सी) |
- १५ - केन अग्रो साखर कारखाना, रायगाव ता: कडेगाव
- १६ - क्रांती साखर कारखाना कुंडल,पलूस जिल्हा- सांगली
- १७ - तासगांव तालुका सहकारी कारखाना (संजय घोडावत ग्रुप)
- १८ - राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना,वाटेगाव-सुरूल, ता. वाळवा - (युनिट बी.)
- १९ - रेणुका साखर कारखाना, आरग,सांगली. (मोहनराव शिंदे)
- २० - सदगुरू श्री श्री साखर कारखाना, राजेवाडी-दिघंची, ता. आटपाडी
- २१ - अमरसिंह नाईक शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, शिराळा
- २२ - विराज केन अँड एनर्जी लिमिटेड, आळसंद-विटा, ता: खानापूर
- २३ - श्री श्री एग्रो ओरगेनिक एंड अलाईड, शेरीकवठे, ता. मिरज
- २४ - शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोकळे, ता. मिरज
- २५ - होनाई शुगर एंड इंन्फ्रा, बस्तवडे, ता. तासगांव
- २६ - धम्मादेवी शुगर एंड पावर लिमिटेड, लवंगी-मोरबग्गी, ता. जत
- २७ - श्रीपती शुगर एंड पावर लिमिटेड, डफळापूर, ता. जत
- २८ - एस्.डी.एम.शुगर प्राइवेट लिमिटेड, रायवाडी, ता. कवठे महांकाळ
- २९ - कृष्णाकाठ एग्रो प्रोसेस, आमणापूर, ता. पलूस
- ३० - शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा
- ३१ - संग्राम केन एग्रो लिमिटेड. भिलवडी,पलूस,सांगली ग्रामीण.
संदर्भ
[संपादन]- ^ "प्रकरण - 1 ले सातारा जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी" (PDF). ir.unishivaji.ac.in (Marathi भाषेत). 17 October 2022. 17 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 17 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "आज सांगली जिल्हा झाला ६० वर्षांचा; आधी होता दक्षिण सातारा". esakal.com (Marathi भाषेत). 21 November 2020. 14 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "SELF-HELP GROUPS IN PALUS TALUKA" (PDF). ir.unishivaji.ac.in (English भाषेत). 17 October 2022. 17 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 17 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "कडेगाव, पलूसच्या विकासाचे शिल्पकार". lokmat.com (English भाषेत). 10 March 2008. 17 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "सांगली गणेश मंदिर". loksatta.com (Marathi भाषेत). 9 September 2016. 14 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "सांगली जिल्ह्यात पर्यटकांना खुणावताहेत निसर्गरम्य स्थळे". esakal.com (Marathi भाषेत). 9 May 2017. 14 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "नदीतीर अन् डोंगररांगा". esakal.com (Marathi भाषेत). 14 August 2018. 17 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे सांगली कनेक्शन; होते खास नाते!". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 6 February 2022. 14 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "बाळ पळसुले". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 4 August 2012. 14 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली (इंग्लिश मजकूर)
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका |