Jump to content

वारणा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वारणा नदी ही सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर समुद्रसपाटीपासून ९१४ मीटर उंचीच्या प्रदेशात होतो. वारणा नदी सुरुवातीला वायव्येकडून आग्नेयेकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

वारणा नदी ही सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सुमारे दीड किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे कृष्णेला मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मीटर रुंद आहे.

कडवी व मोरणा या वारणेच्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सुमारे ७०० मीटर उंचीच्या प्रदेशात होतो.

 कडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. तिला पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे मिळतात. सुमारे ३५ किमी वाहून ती सागावजवळ वारणा नदीस मिळते. कडवी नदी मिळाल्यावर वारणेचा प्रवाह बराच रुंद होतो.  

सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. नदी दक्षिण व आग्नेय या दिशांकडे वाहते. या नदीची लांबी सुमारे २७ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विशाल पानमळे आहेत. शिराळा तालुक्यातील मांगले गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन शाहुवाडी तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.

 वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६४७' उत्तर ते १७१५' उत्तर आणि ७३३०' १५" पूर्व ते ७४३०' पूर्व यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.                    भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशाव्या वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे.
 वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.
 वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर कडवी  प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.
  याशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापुरी बंधारे व काही लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

वारणेच्या उपनद्या व ओढे

[संपादन]
  • अंबार्डी
  • अंवीर (कडवी नदीचा ओढा)
  • आंबरडी (कडवी नदीचा ओढा)
  • कडवी
  • कांद्रा (कडवी नदीचा ओढा)
  • कनसा
  • पोटफुगी (कडवी नदीचा ओढा)
  • मोरणा
  • शार्ली