आटपाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?आटपाडी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका/तालुका प्रशासकीय स्थान  —

१७° १५′ ००″ N, ७४° ३४′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सांगली
सरपंच
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४१५३०१
• MH 10

आटपाडी (English-Atpadi) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील एक तालुका व तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे.

इतिहास[संपादन]

१६व्या शतकात आटपाडी गाव हे आदिलशाहीचा भाग होते व नंतर पेशवाईच्या काळात आटपाडी औंध संस्थानामधे महाल गाव होते. औंध संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणानंतर आटपाडी खानापूर तालुक्यातील एक गाव व नंतर सांगली जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव झाले आहे.

भूगोल[संपादन]

आटपाडी गाव उत्तर अक्षांश =१७.२५/पूर्व रेखांश= ७४.५७ वर वसलेले आहे. आटपाडीच्या पश्चिमेला पाझर तलाव आहे. येथून आटपाडीच्या पिण्याच्या व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याची व्यवस्था होते. आटपाडी गाव व नवीन आटपाडीची वसाहत ही शुक्र नावाच्या ओढ्याने दक्षिणोत्तर विभागली गेली आहे. येथील जमीन काळी कसदार आहे.

हवामान[संपादन]

आटपाडी तालुका पर्जन्यछायेमध्ये येणारा प्रदेश आहे. येथील मुख्य शेती ही ज्वारी, मका, गहू, काही प्रमाणात ऊसकापूस आणि डाळिंब यांची होते. डाळिंबांमुळे आटपाडीच्या शेती उत्पादनात आमूलाग्र बदल झाला आहे.

शासन व्यवस्था[संपादन]

आटपाडीची शासन व्यवस्था ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत चालते. आटपाडीमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि पोलिस ठाणे आहे.

शिक्षण व्यवस्था[संपादन]

आटपाडीमधे कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, अध्यापन इत्यादी शाखांची महाविद्यालये आहेत. शिक्षण व्यवस्था ही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय इत्यादी पातळीपर्यन्त उपलब्ध आहे.

प्राथमिक शाळा[संपादन]

माध्यमिक शाळा[संपादन]

 • श्री भवानी विद्यालय हायस्कूल
 • श्री राजाराम बापू पाटील हायस्कूल
 • श्री व.दे.दे. गर्ल्स हायस्कूल

उच्च माध्यमिक[संपादन]

 • श्री भवानी विद्यालय ज्युनियर सायन्स कॉलेज
 • आटपाडी कॉलेज, आटपाडी.
 • शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेज आटपाडी

महाविद्यालय[संपादन]

 • आटपाडी कॉलेज, आटपाडी
 • कला विज्ञान महाविद्यालय
 • श्रीराम सोसायटीचे अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय
 • अध्यापक विद्यालय
 • शेती पदविका विद्यालय

उद्योग[संपादन]

माणगंगा सहकारी साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी, डाळिंब प्रक्रिया व पॅकेजिंग प्रकल्प हे येथील प्रमुख उद्योग आहेत.दूध व्यवसायही चालतो.

कला आणि संस्कृती व मनोरंजन[संपादन]

आटपाडीचे नाव कलेच्या क्षेत्रात वाखाणण्यासारखे आहे ते आटपाडीमध्ये जन्मलेल्या १) ग. दि. माडगुळकर, २)व्यंकटेश माडगुळकर, ३) शंकरराव खरात, ४) ना. सं. इनामदार या ४ साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांमुळे

याच बरोबर धनगरी नृत्य आटपाडीच्या संस्कृतीचा मुख्य घटक आहे. कोल्हापुरी फेटा हा मूळचा माणदेशातील लहरी पटका/फ़ेटा आहे.

मंदिरे आणि उत्सव[संपादन]

आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर आहे व आटपाडीची जत्रा उत्तरेश्वराच्या नावाने होते. जत्रा तीन दिवस चालते व याप्रसंगी गावातून उत्तरेश्वराचा रथ ओढण्याची प्रथा आहे. आटपाडीतील आणखी एक जुने मंदिर म्हणजे नाथबाबाचे व कल्लेश्वराचे मंदिर. आटपाडीत एक परमेश्वराचे पण मंदिर आहे. त्या देवळातल्या देवाला परमेश्वर म्हणतात. हे मंदिर शुक्र ओढ्यात आहे. आटपाडीजवळ एक करगणी गाव आहे. तिथे एक प्राचीन शंकराचे देऊळ आहे. हल्ली लोक त्याला रामाचे देवळ म्हणतात. ह्या देवळाची स्थापना राम व लक्ष्मण यांनी केली असे म्हणतात. लक्ष्मणाला शंकराने एक खड्ग व आत्मलिंग दिले ते याच ठिकाणी. लक्ष्मणाने आत्मलिंगाची स्थापना केली. दुसरे आत्मलिंग मंदिर गोकर्ण महाबळेश्वर (कर्नाटक) इथे आहे. करगणीचे जुने नाव खडगणी होते, नंतर ते करगणी झाले. इथे मिळालेला खड्ग लक्ष्मणाने इंद्रजिताला मारण्यासाठी वापरला होता. करगणीजवळ एक शुकाचारी (अपभ्रंश शुक्राचारी, शुक्राचार्य ) नावाचा डोंगर आहे. इथे शुकमुनी यांनी समाधी घेतली. (शुकमुनींचे वडील महाभारतकार व्यास हे होत). शुकमुनींच्या समाधीचा उल्लेख पुराणांतदेखील आहे. ब्रम्हचारी शुक, हे दर्शनाला आलेल्या स्त्रियाना पाहून घोड्यावर बसून गुहेमधील दगडात लुप्त झाले अशी कथा आहे.

आटपाडी तालुक्यातील सर्वांत प्रसिद्ध मंदिर म्हणजे खरसुंडीचे सिद्धनाथ मंदिर. खरसुंडीचे आणखी एक वैशिष्ट्य, इथली जनावरांची यात्रा. जनावरांचा हा देशातील सर्वांत मोठा बाजार आहे.आटपाडीमध्ये साई मंदिर हे भिंगेवाडी रोडला व पोस्ट ऑफिस जवळ विठ्ठल मंदिरही आहे.

आटपाडी तालुक्यात शिवाजीच्या काळातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे (ढोर गल्ली). तसेच मुकुंद महाराज यांची जिवंत समाधी आहे (शके १६५३).

प्रवास आणि मुक्काम[संपादन]

आटपाडी हे गाव रस्त्याने सांगली, सोलापूर, कराड या नगरांबरोबर तसेच इतर प्रमुख गावांशी जोडलेले आहे. आटपाडीपासून मुंबई, पुणे, हैदराबाद या महानगरापर्यंत थेट बस सेवा उपलब्ध आहे. मुख्यतः प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने व खाजगी आराम बसने उपलब्ध आहे.

महान व्यक्तिमत्वे[संपादन]

आटपाडी तालुक्याला फार मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे चार संमेलनाध्यक्ष आटपाडी तालुक्याने दिले आहेत.

 1. गजानन दिगंबर माडगूळकर हे १९७३ मध्ये यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 2. व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे १९८३ मध्ये अंबेजोगाई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 3. शंकरराव खरात हे १९८४ मध्ये जळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 4. नागनाथ संतराम इनामदार हे १९९७ मध्ये अहमदनगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 5. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचे शिक्षण आटपाडीच्या भवानी विद्यालयात झाले आहे.


इतर[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सांगली जिल्ह्यातील तालुके
शिराळा  • वाळवा  • तासगांव  • खानापूर (विटा)  • आटपाडी  • कवठे महांकाळ  • मिरज  • पलूस  • जत  • कडेगांव