गणपत लाड
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | इ.स. १९२२ | ||||
|---|---|---|---|---|---|
| |||||
गणपती दादा लाड ऊर्फ जी.डी.बापू लाड (जन्म : कुंडल, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, ४ डिसेंबर, इ.स. १९२२; निधन : पुणे, १४ नोव्हेंबर, इ.स. २०११) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफान दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.[१]
शिक्षण आणि सुरुवातीचे जीवन
[संपादन]बापूंनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडल येथील औंध संस्थानच्या शाळेत पूर्ण केले. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या निपाणी येथील सिक्का बोर्डिंगमध्ये त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण सुरू ठेवले. पुढे औंध बोर्डिंग येथे राहून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला.[१]
स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग
[संपादन]1942 मध्ये आयुर्वेद महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात असतानाच महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. पुण्यातील निषेध मोर्चात बापू सक्रियपणे सहभागी झाले होते, जिथे ब्रिटिश पोलिसांनी निःशस्त्र मोर्चेकऱ्यांवर गोळीबार व लाठीहल्ला केला. त्यावेळी बापू हे नशीब बलवत्तर म्हणून वाचले. देशभक्तीने प्रेरित होऊन, त्यांनी कॉलेज सोडून कुंडलला परतले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले.[१]
स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक संघर्ष
[संपादन]कुंडलमध्ये, बापूंनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुणांना संघटित केले. तासगाव आणि इस्लामपूर मध्ये झालेल्या मोर्च्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. इस्लामपूरच्या कचेरीवर काढलेल्या मोर्चात ब्रिटिश पोलिसांनी चार निशस्त्र आंदोलकांना ठार मारले, बापूंनी इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी स्वातंत्र्य लढा तीव्र करण्याचा संकल्प केला. भारताला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र प्रतिकार करणे आवश्यक आहे असे क्रांतिकारकांना वाटू लागले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संघर्षासाठी, शस्त्रे गोळा करण्यासाठी हिंसक कारवाया केल्या.[१]
प्रतिसरकारची निर्मिती
[संपादन]बापूंनी कुंडल येथे लष्करी प्रशिक्षण केंद्र उभारले आणि दक्षिण सातारा जिल्ह्यातील हजारो तरुणांना सशस्त्र संघर्षाचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे “तुफान सेने” (तुफान दल)ची स्थापना झाली. या तुफान सेनेमार्फत सामाजिक सुधारणा केल्या. गरीब, शेतकरी आणि मजुरांना शोषणातून मुक्त केले आणि जमीनदार, सावकार आणि पोलिसांविरुद्ध त्यांना संरक्षण दिले.[१]
इतिहास
[संपादन]त्यांनी १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या आदेशाला प्रतिसाद देऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. यासाठी त्यांनी पुण्यात आयुर्वेदाचे शिक्षण सोडून दिले. तासगांव येथे युनियन जॅक उतरवून त्याजागी तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. स्वातंत्र्यलढ्याच्या या आंदोलनासाठी लागणारा खर्च व हत्यारे खरेदीसाठी त्यांनी शेणोली व धुळेयेथे रेल्वेगाडी लुटली होती. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळीचे सेनापतिपद त्यांनी सांभाळले. देशात ब्रिटिश सत्तेचा अंमल असताना त्यावेळच्या संयुक्त सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार होते.
तुफानी दल
[संपादन]नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या तुफान दलाचे फील्ड मार्शल जी.डी. लाड होते.या तुफान सेनेचे क्रांतीवीर कॅप्टन आकाराम दादा पवार होते. या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्रपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. नागनाथअण्णा नायकवडी, उत्तमराव पाटील या सहकाऱ्यांसोबत साडेपाच लाखांचा धुळे खजिना लुटणाऱ्या या क्रांतिकारकांचे नेतृत्व बापू लाड यांनी केले. या लुटीवेळी त्यांच्या पोटरीत पोलिसांनी मारलेली गोळी घुसली. ही गोळी घेऊन ते मैलोन्मैल चालले.
बापूंना आणि क्रांतीवीर कॅप्टन आकाराम दादा पवार यांना पकडण्यासाठी सरकारने रोख बक्षीस जाहीर केले होये, पण ते शेवटपर्यंत सापडलेच नाहीत.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर
[संपादन]कष्टकऱ्यांसाठी, जी.डी. बापू यांनी हाच कष्टदायक प्रवास स्वातंत्र्यानंतर सुरू ठेवला.
कष्टकरी, दलित,कामगार, शेतकरी यांच्या लढ्यात सदैव अग्रभागी राहिलेल्या जीडी (बापू) यांचा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत पुढाकार राहिला. पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे बरीच वर्षे काम केले. कष्टकरी, दलित, आदिवासींचे अनेक लढे ते आयुष्यभर लढले. शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधातही ते रस्त्यावर आले.
पुस्तक
[संपादन]- पेटलेले पारतंत्र्य व धुमसते स्वातंत्र्य (जी.डी बापू यांचे आत्मचरित्र, प्रकाशन - ९-८-१९८६)
- लाड फाऊंडेशनतर्फे जी.डी. लाड यांच्या चरित्रावर प्रकाशझोत टाकणाऱ्या "जी.डी. बापू लाड आत्मकथन : एक संघर्ष यात्रा‘ या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूर येथे १७ मे २०१५ रोजी झाले. मुलांसाठी जी.डी. लाड यांच्या विषयी अनेक छोटी छोटी पुस्तके प्रकाशित करण्याचा लाड प्ररातिष्ठानचा मनोदय आहे.
सन्मान
[संपादन]- कोल्हापूर विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात क्रांतिअग्रणी जी. डी. लाड (बापू) यांना सन्माननीय डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली. (१२-३-२०११),
- लाड फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी क्रांतिअग्रणी पुरस्कार दिला जातो. २०१४ सालचा पुरस्कार डॉ. आ.ह. साळुंखे यांना दिला गेला. २०१० साली हा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना, तर २०१२ साली बाबा आढाव यांना प्रदान झाला होता.
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 4 5 "जी डी बापू लाड : एक प्रेरणादायक स्वातंत्र्यसैनिक". DawnBioPedia (इंग्रजी भाषेत). 2025-03-04. 2025-03-08 रोजी पाहिले.[permanent dead link]