माणगंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माणगंगा नदी

शूरवीरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या उत्तर सरहद्दीवर शंभुमहादेवाच्या डोंगररांगेतील उंच कड्यावर पौराणिक दंडकारण्यातील श्री सीतामाई चे मंदिर आहे. या सीतामाईच्या मुख्य मंदिराच्या खालीच श्रीशंभूमहादेव_ मंदिर आहे. त्याच्या शेजारीच काळ्या पाषाणाची उभी असणारी सीतामातेची नवीन मूर्ती बसविण्यात आली आहे. समोरच तुलसीवृंदावन असुन पश्चिमाभिमुख श्रीमारूती मंदिर आहे. त्याच्याच मागे पूर्वबाजुला माणगंगा नदीचे उगमस्थान असणारे बारवेच्या प्राकारातील लहानसे कुंड आहे. बाणगंगा व माणगंगा या दोन्ही नद्यांचे उगमस्थान एकमेकांपासुन १००-१२५ फुटांवर आहे.

माणगंगा व बाणगंगा नदीच्‍या उगमाबद्दल जनलोकांत अनेक अाख्‍यायिका आहेत. 

माणदेश पुराणकाळी काळी दंडकारण्‍यात होता. रावणवधानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक झाला. यानंतर थोड्याच अवधीत गरोदर सीतामातेचा श्रीरामांनी त्याग केला तिला पुन्हा वनवास आला. त्यासाठी लक्ष्मण सीतामाईला दंडकारण्यातील या डोंगरावर सोडण्यासाठी आले तिथे थकल्‍यामुळे सीतामाईला तहान लागली. पण त्‍या ओसाड डोंगराळी माळरानाच्‍या भागात पाणी कोठून मिळणार? अखेर, लक्ष्मणाने बाण मारून पाणी काढले. ज्‍या ठिकाणी बाण मारला,त्‍या ठिकाणातून प्रवाह वाहू लागला. त्‍या प्रवाहातून लक्ष्मणाने द्रोण भरून पाणी घेतले आणि तो तहानलेल्‍या सीतामाईकडे आला. परंतु तोपर्यंत तहानेने सीतेला ग्लानी आली होती. ‘झोपलेल्‍या माईं’ना कसे उठवावे म्हणून लक्ष्मणाने त्‍यांना उठताच दिसेल अशा मानेपासून हातभर अंतरावर पाण्‍याने भरलेला द्रोण ठेवला. सीतामार्इंना काही वेळाने जाग आली. त्‍या उठू लागताच मानेचा धक्का द्रोणाला लागला आणि पाणी सांडले - प्रवाह वाहू लागला. तेव्हापासून लक्ष्मणाने बाण मारलेल्‍या प्रवाहास " बाणगंगा" आणि सीतामार्इंच्‍या मानेचा धक्का लागून द्रोणातील सांडलेल्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहास " माणगंगा" असे नाव पडले. ज्‍या ठिकाणी तो प्रसंग घडला त्‍या डोंगराला " सीताबाईचा डोंगर" असे नाव दिले गेले आहे. श्रीक्षेत्र सीताबाई येथुन उगम पावणारी माणगंगा संपूर्ण माणदेशाची जीवनदायिनी असुन ती दक्षिणेकडे कुळकजाई, मलवडी, आंधळी, बिदाल, दहिवडी,म्हसवड, दिघंची अशी वाहत जाऊन पंढरपूर तालुक्यात सरकोली या गावाजवळ भिमा नदीला मिळते.