Jump to content

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सवाई गंधर्व संगीत महोत्सव या पानावरून पुनर्निर्देशित)
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव तथा सवाई गंधर्व महोत्सव हा पुण्यात दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारा संगीत महोत्सव आहे.

याची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व महोत्सव नावाने केली जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असे बदलण्यात आले.

सुरुवात

[संपादन]

हा महोत्सव सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून इ.स. १९५२ मध्ये हा सुरू झाला. भीमसेन जोशी आणि त्यांचे गुरूबंधु पंडित फिरोज दस्तूर आणि गुरूभगिनी गंगुबाई हनगल यांचाही या महोत्सवात पहिल्या वर्षापासून सहभाग होता. हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), डॉ. वसंतराव देशपांडेपु.ल. देशपांडे यांचेही सहकार्य मिळाले.

महोत्सवाचे पुण्यासाठी महत्व

[संपादन]

या महोत्सवात गायन, वादन आणि नृत्य असे संगीताचे तीन वेगवेगळे पैलू सादर केले जातात. येथे आपली कला सादर करणे हा देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान समजला जातो. यासाठी जगभरातील रसिक येथे येतात. या महोत्सवामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वारशात भर घातली गेली आहे.

उत्सवाचे स्थळ

[संपादन]

हा उत्सव सुरुवातीला अप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होत असे. कालांतराने कार्यक्रम रेणुका स्वरूप हायस्कूल, नूमवि प्रशाला येथे भरला व नंतर शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. याला कमी प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा एकदा हा कार्यक्रम रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला.

कलावंत आणि कलाकृती

[संपादन]

महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते. प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती दिली जाते. यामुळे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही तसेच नंतरसुद्धा या माहितीमुळे श्रोत्यांचे संगीताबद्दलचे ज्ञान वाढते. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचे शिष्य या महोत्सवात आपली कला सादर करीत. त्याचप्रमाणे अनेक नवखे कलाकारसुद्धा या महोत्सवामुळे प्रसिद्ध झाले.

महोत्सवाचा कालावधी

[संपादन]

रात्री दहानंतर ध्वनिवर्धकावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पूर्वी तीन रात्री चालणारा हा महोत्सव न्यायालयाच्या आदेशानंतर चार दिवस आणि पाच सत्रांत होऊ लागला आहे.

महोत्सवाच्या सांगतेचे सादरीकरण

[संपादन]

महोत्सवाची सांगता पूर्वी स्वतः पंडीत भीमसेन जोशी यांच्या गायनाने होत असे. वृद्धापकाळामुळे त्यांनी सादरीकरण थांबवल्यानंतर किराणा घराण्याच्या इतर गायकांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. २००५ साली संगमेश्वर गुरव यांच्या गायनाने उत्सवाची सांगता झाली. २००७ पासून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. उत्सवाची अधिकृत सांगता सवाई गंधर्वांच्या आवाजातील राग भैरवी मधील प्रसिद्ध ठुमरी जमुना के तीरची ध्वनिमुद्रिका ऐकवून केली जाते.

भारतातील अन्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत महोत्सव

[संपादन]

हे देखील पहावे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे संकेतस्थळ
  • "हीरक महोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव".[permanent dead link]
  • "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फोटो". 2014-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-14 रोजी पाहिले.