Jump to content

अक्षय्य तृतीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अक्षय्यतृतीया या पानावरून पुनर्निर्देशित)

अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.[] कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.[] जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.[][] या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते.[]

ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.[] या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.[]

ज्योतिषशास्त्र

[संपादन]

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे. असे दुःयोग यापूर्वी अनेक अक्षय्य तृतीयांना आले होते, त्यांपैकी हे काही प्रसंग :-[ संदर्भ हवा ]

शुक्रास्त असलेले दिवस : १ मे १९४९, ३ मे १९६५, ५ मे १९७३, ७ मे २००८, ९ मे २०१६.

अस्त झाल्याने आकाशात गुरू दिसत नसलेले दिवस : १६ मे १९५६, १ मे १९७६, २३ एप्रिल २०२३.

महत्त्व

[संपादन]
  • या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.[]
  • नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते.
  • परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.[]
परशुराम अवतार
  • वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.[१०]
  • जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
  • कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हणले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'.
  • या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.[]

जैन धर्मात

[संपादन]
राजा श्रेयांश वृषभदेव यांना उसाचा रस देताना

भगवान वृषभदेव यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते व त्यानंतर ते एकदा ग्रहणासाठी निघाले. परंतु लोकांना आहार दानाचा योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजून पुढील सहा महिने आहार घेता आला नाही. अर्थात त्यांचा वर्षभर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.[११]

सांस्कृतिक महत्त्व

[संपादन]
कैरीचे पेय
चैत्रगौर

महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.[१२]

आख्यायिका

[संपादन]

अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते.[१३] ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.

शेतीसंबंधी प्रथा

[संपादन]

या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.[१४][१५]

धार्मिक आचार

[संपादन]

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.[१६] या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवरद्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात.[१७] असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.[१८]

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे.[१९]

हिंदू धार्मिक व सांस्कृृृृतिक आचार

[संपादन]
  • या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करणे.
  • सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान.
  • ब्राह्मण भोजन घालणे.[२०]
  • या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खाणे.
  • या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे.
सोन्याचे दागिने
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.[२१]

भारताच्या विविध प्रांतांत वा प्रदेशांत

[संपादन]
  • उत्तर भारत - या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो.गंगा नदीमध्ये स्नान करणे,तीर्थयात्रा करणे,यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.
  • ओरिसा -
    रथयात्रा
    या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हणले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही.

प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.देवाच्या नौका विहारासाठी पाच बोटी यानिमित्ताने सुशोभित केल्या जातात.[२२]

  • दक्षिण भारत - महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.[२१]
  • पश्चिम बंगाल - या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.[२१]
  • राजस्थान - राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात.. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.[२३]
  • महाराष्ट्र - महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखाजी” म्हणून संबोधले जाते , खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात.

अन्य धर्मात

[संपादन]

बौद्ध धर्मामध्ये आखाजी या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते. बौद्ध धर्मातील क्षत्रिय परंपरेत या दिवसाचे औचित्य आहे.[२४]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Gupte, B. A. (2000). Folklore of Hindu Festivals and Ceremonials (इंग्रजी भाषेत). Shubhi Publications. ISBN 978-81-87226-48-2.
  2. ^ Das, Sudhir Ranjan (1953). A Study of the Vrata-rites (इंग्रजी भाषेत). S. C. Kar. p. 43.
  3. ^ Dalal, Roshen (2014-04-18). The Religions of India: A Concise Guide to Nine Major Faiths (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 9788184753967.
  4. ^ Jain, Arun Kumar (2009). Faith & Philosophy of Jainism (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178357232.
  5. ^ "Akshaya Tritiya - Indian Worship". Indian Worship (इंग्रजी भाषेत). 2018-06-01 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ J. Gordon Melton (2011). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations. ABC-CLIO. pp. 18–20. ISBN 978-1-59884-206-7.
  7. ^ a b Gordon Melton (2011). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations. ABC-CLIO. pp. 18–20. ISBN 978-1-59884-206-7.भाषा=इंग्लिश
  8. ^ "Badrinath shrine closed for winter". TNN. Dehradun: The Times of India. 18 November 2008. Retrieved 28 April 2014.भाषा =इंग्लिश
  9. ^ The Rough Guide to Rajasthan, Delhi and Agra (इंग्रजी भाषेत). Rough Guides. 2007.
  10. ^ Bharatvarsh, TV9 (2022-05-01). "Akshaya Tritiya 2022: जानें भारत के विभिन्न हिस्सों में कैसे मनाया जाता है अक्षय तृतीया का त्योहार". TV9 Bharatvarsh (हिंदी भाषेत). 2023-04-12 रोजी पाहिले.
  11. ^ Webdunia. "Jain Dharma | Jain Religion | Jain Tirthankar | Jainism | Jainism Religions in India | Jain Muni | जैन धर्म" (इंग्रजी भाषेत). 2018-06-01 रोजी पाहिले.
  12. ^ भारतीय संस्कृती कोश (महादेवशास्त्री जोशी), खंड तिसरा
  13. ^ "हिंदी खबर, Latest News in Hindi, हिंदी समाचार, ताजा खबर". Patrika News (hindi भाषेत). 2021-05-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ http://krishikosh.egranth.ac.in/bitstream/1/63953/1/Krishi%20Mahotsav%20Model.pdf
  15. ^ Muṃśī, Vimalā Kumārī (1993). Kaśmīra, itihāsa, saṃskr̥ti, tathā lokagīta (हिंदी भाषेत). Ārya Buka Ḍipo.
  16. ^ Bharatvarsh, TV9 (2022-04-25). "Akshaya Tritiya 2022 : अक्षय तृतीया पर भगवान विष्णु और पितरों को प्रसन्न करने के लिए इस विधि से करें पूजा". TV9 Bharatvarsh (हिंदी भाषेत). 2023-04-12 रोजी पाहिले.
  17. ^ "अक्षय तृतीया पर जल भरे कलश दान का है महत्व". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2023-04-12 रोजी पाहिले.
  18. ^ Tripathi, Rampratap (1966). Hinduoṃ ke vrata, parva aura tyauhāra: hindūoṃ ke sampūrṇa vratoṃ, parvoṃ aura tyauhāroṃ kī śāstrīya vidhi, māhātmya tathā paurāṇika evaṃ loka-kathāem̐ (हिंदी भाषेत). Loka-Bhāratī Prakāśana.
  19. ^ "हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचे खास महत्व, जाणून घ्या तुम्हाला आहे का ही माहिती ?". Maharashtra Times. 2022-05-03 रोजी पाहिले.
  20. ^ "अक्षय तृतीया: जानिए, क्या करें इस दिन". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2021-05-04 रोजी पाहिले.
  21. ^ a b c वेबदुनिया. "अक्षय तृतीयेचे महत्त्व" (इंग्रजी भाषेत). 2018-06-01 रोजी पाहिले.
  22. ^ "Boat Preparation Begins For Lord Jagannath's Chandan Yatra In Odisha's Puri". odishabytes (इंग्रजी भाषेत). 2023-04-06. 2023-04-12 रोजी पाहिले.
  23. ^ Singh, K. S. (1998). People of India: Rajasthan (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788171547692.
  24. ^ "आखाजी : tpsgnews.com". www.tpsgnews.com (इंग्रजी भाषेत). 2023-04-12 रोजी पाहिले.