Jump to content

परशुराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भगवान परशुराम

कार्तवीर्याशी लढणाऱ्या परशुरामाचे चित्र (मूळ: जयपूर, इ.स. एकोणिसावे शतक)
निवासस्थान कन्नोज
शस्त्र परशु
वडील ऋषी जमदग्नी तर आजोबा सम्राट प्रसेनजित होय.
अन्य नावे/ नामांतरे भार्गव, भार्गवराम, जामदग्न्य
या अवताराची मुख्य देवता विष्णू

प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित राजाचा नातू परशुराम हे ब्राम्हण कुळातील भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.[१] त्यांचा जन्म सम्राट प्रसेनजित राजाचा जावई ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. [२]

कार्य[संपादन]

जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.

त्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना आणि कर्णला त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. या युद्धात कोणाचाही विजय झाला नाही शेवटी भगवान शंकरानी यामधे मध्यस्थी करून युद्धात थांबवले, तरीही भीष्मांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.

राम व परशुरामाची भेट

परशुरामाची मंदिरे[संपादन]

परशुरामाने केलेल्या कोकण प्रदेशाच्या निर्मितीच्या कथा रंजक आहेत. असे मानले जाते की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. [३]सबंध भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.

केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असेही मानले जाते.[३] तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हे अमर्त्य किंवा चिरंजीव मानले गेले आहे. त्यामुळे त्यांचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात.[४]

परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी---

"एकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला."

या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे.

परशुराम मंदिरामध्ये एक सजवलेला पलंग असून, त्यावर सोनेरी चादर व इतर सामान आहे आणि परशुरामांची प्रतिमा आहे. पलंगाच्या चारही बाजूला रॉड लावलेले आहेत. असं म्हणतात की, हा पलंग अतिशय रहस्यमय आहे. कारण रोज सकाळी पलंगावरील चादर चुरगळलेली दिसते.

या मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव आहे. परशुरामांचा जन्म अक्षय्य तृतीयेचा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणाऱ्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे.

महाराष्ट्रात कोकण भागात दापोली तालुक्यातील बुरोंडी गावी परशुरामांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुण्यातील मॉडर्न ऑप्टिशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे.[५]

बुरोंडी येथील परशुराम स्मारक

दापोली तालुक्यात आडे या गावी पेशवेकालीन मंदिर आहे, येथे रेणुकामाता, परशुराम, रामेश्वर, गणपती, वेताळ, मारुती, शनी अशी सात मंदिरे आहेत.

माहूर गडावर, श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर आहे.[६]

उत्तर प्रदेशातील गढवालमधील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे.

परशुराम हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा संहार केला.

शापादपि शरादपि[संपादन]

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम.[७]

चिरंजीव परशुराम[संपादन]

परशुरामांचे अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे सात चिरंजीवांमधील एक आहेत असे समजले जाते. भगवान परशुराम आजही ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्यातल्या परलाखेमुंडी येथील महेंद्रगिरी पर्वतावर वास करतात असे सांगितले जाते.

परशुरामावरील पुस्तके[संपादन]

 • परशुधारी परशुराम (सुधाकर शुक्ल)
 • श्री परशुराम स्थलयात्रा (सौ. गीता आदिनाथ हरवंदे)
 • भगवान परशुराम (बालसाहित्य, लेखक : मोरेश्वर माधव वाळिंबे)
 • भारतीय संस्कृतीचे शिल्पकार युगपुरुष परशुराम (शुभांगी भडभडे)
 • भृगुनंदन (७०० पानी पुस्तक, लेखिका भारती सुदामे)
 • वैदिक (राजीव पुरुषोत्तम पटेल)
 • परशुराम : जोडण्याचे प्रतिक, की तोडण्याचे ? (डॉ. आ. ह. साळुंखे) पृष्ठे : २५६

पहा :जयंत्या

संदर्भ[संपादन]

 1. ^ Bhatt, Shyam Sundar (2018-05-15). Kaljayee Shree Parshuram (हिंदी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-64249-957-5.
 2. ^ Vipāsā (हिंदी भाषेत). Bhāshā evam Saṃskr̥ti Vibhāga. 1992.
 3. ^ a b Dinkar, Ramdhari Singh (1993-01-01). Parsuram Ki Pratiksha (हिंदी भाषेत). Lokbharti Prakashan. ISBN 978-81-85341-13-2.
 4. ^ Kokaṇa vikāsa. Kokaṇa Vikāsa Mahāmaṇḍaḷa. 1993.
 5. ^ दापोली, तालुका (2019-12-06). "परशुराम भूमी, बुरोंडी". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). 2020-09-06 रोजी पाहिले.
 6. ^ GANGASHETTY, RAMESH (2019-10-30). THIRTHA YATRA: A GUIDE TO HOLY TEMPLES AND THIRTHA KSHETRAS IN INDIA (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-68466-134-3.
 7. ^ The Individual and Society (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. 2005-09. ISBN 978-81-317-0417-2. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)