जर्मनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| जर्मनी | ||||||
|
Bundesrepublik Deutschland
जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक |
||||||
|
|
||||||
![]() |
||||||
| जागतिक नकाशावरील स्थान | ||||||
| नकाशा | ||||||
| ब्रीदवाक्य | Einigkeit und Recht und Freiheit (अर्थ: एकता, न्याय आणि स्वातंत्र्य) | |||||
| राजधानी | बर्लिन | |||||
| सर्वात मोठे शहर | बर्लिन | |||||
| राष्ट्रप्रमुख | होर्स्ट क्योहलर | |||||
| पंतप्रधान | आंगेला मेर्केल (चॅन्सेलर) | |||||
| राष्ट्रगीत | दास लीड देर दॉइचेन(अर्थ: जर्मनीचे राष्ट्रगीत) | |||||
| स्वातंत्र्यदिवस | ऑक्टोबर ३, १९९० | |||||
| प्रजासत्ताक दिन | मे २३, १९४९ | |||||
| राष्ट्रीय भाषा | जर्मन | |||||
| इतर प्रमुख भाषा | डॅनिश, लो जर्मन, सोर्बियन(Sorbian), फ्रिजियन | |||||
| राष्ट्रीय चलन | युरो (EUR) | |||||
| क्षेत्रफळ एकूण– पाणी– |
६३वा क्रमांक ३,५७,०५० किमी² |
|||||
| लोकसंख्या एकूण– घनता– |
१४वा क्रमांक ८,२४,३८,०००[१] २३०.९ प्रती किमी² |
|||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ(CET) (यूटीसी +१) | |||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +४९ | |||||
| आंतरजाल प्रत्यय | .de | |||||
| वार्षिक सकल उत्पन्न (GDP) |
५वा क्रमांक २.५२२ निखर्व अमेरिकन डॉलर किंवा युरो (EUR) |
|||||
| वार्षिक दरडोई उत्पन्न (GDP per capita) |
१७वा क्रमांक ३०,५७९ अमेरिकन डॉलर किंवा युरो (EUR) |
|||||
जर्मनी (जर्मन: दॉइचलांड (मदत·माहिती), Deutschland)(अधिकृत नाव: जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक , Bundesrepublik_Deutschland, जर्मन: उच्चार (मदत·माहिती), IPA:ˈbʊndəsʁepuˌbliːk ˈdɔʏtʃlant [२]) हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.
अनुक्रमणिका |
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
जर्मानिया हे नाव रोमन लोकांनी र्हाइन नदी ते उरल पर्वतांमधील भूभागाला दिले होते. परंतु 'जर्मनी' हे नाव बहुतकरुन इंग्लिशभाषिक किंवा भूतपूर्व ब्रिटिश वसाहतींमधील देशांत वापरले जाते. खुद्द जर्मनीत जर्मन लोक आपल्या देशाचा उल्लेख 'दॉईचलांड' या नावाने करतात.
प्रागैतिहासिक कालखंड
जर्मनीच्या प्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही. जर्मनीचा ज्ञात इतिहास रोमन साम्राज्याबरोबर सुरु होतो. रोमन साम्राज्याअगोदर जर्मानिक टोळ्यांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. या टोळ्यांचा वावर स्कँडिनेव्हिया, डेन्मार्क, उत्तर जर्मनी व पोलंडच्या भागात होता. रोमन सम्राट ऑगस्टसाच्या नेतृत्वाखाली पब्लियस क्विंक्टिलियस वारसाने जर्मानियाच्या भागात आक्रमणे सुरू केली. साधारणपणे २ र्या शतकात जर्मानिक टोळ्या र्हाइन नदी व डोनाउ नदीच्या खोर्यात वसल्या. ३ र्या शतकात अलमानी, फ्रांक, सॅक्सन, थ्युरिंगी अशा अनेक जर्मन टोळ्यांचा उदय झाला.
पवित्र रोमन साम्राज्य
मुख्य लेख: पवित्र रोमन साम्राज्य, पवित्र रोमन सम्राट
इसवी सनाच्या ९ व्या शतकापासून ते १९ व्या शतकाच्या सु्रुवातीपर्यंत जर्मनी हा पवित्र रोमन साम्राज्याचा भाग होता. याची स्थापना रोमन सम्राट शार्लमेन याने केली होती. हे साम्राज्य इ.स. १८०६ पर्यंत विविध प्रकारे अस्तित्वात होते. उत्तरेस आयडर नदीपासून दक्षिणेस भूमध्य समुद्रापर्यंत भूप्रदेश व्यापलेल्या या साम्राज्यास जर्मन राष्ट्राचे पवित्र रोमन साम्राज्य ("Sacrum Romanum Imperium Nationis Germanicæ") असेदेखील म्हणत.
सम्राट ओटो पहिला याच्या राजवटीत तसेच ओटोनियन कालखंडात (इ.स. ९१९ - इ.स. १०२४) लोरें, सॅक्सनी, फ्रांकोनिया, स्वाबिया, थ्युरिंगिया व बव्हेरिया हे भागदेखील साम्राज्यात विलीन झाले. सम्राट ओटोला या भूप्रदेशांचा पवित्र रोमन सम्राट म्हणून इ.स. ९६२ मध्ये राज्याभिषेक करण्यात आला[३]. त्यानंतर सालियन सम्राटांच्या कालखंडात (इ.स. १०२४ - इ.स. ११२५) उत्तर इटली आणि बुर्गुंडी प्रांत साम्राज्यास जोडले गेले. पुढे पवित्र रोमन सम्राटांचा प्रभाव कमी होत गेला आणि अनेक स्थानिक जर्मन राजांनी आपला प्रभाव वाढवला. याच काळात हॅन्सियाटिक लीगच्या माध्यमातून उत्तरेकडची जर्मन शहरे भरभराटीस येऊ लागली.
इ.स. १३५६ मध्ये गोल्डन बुल नावाचा करार झाला आणि अनेक राज्ये व सरंजामशाहीत विभागलेल्या साम्राज्याला एक संविधान मिळाले. या करारात सात राज्ये मिळून सर्वात शक्तिशाली राजाला सम्राट म्हणून मान्यता देतील व मुख्य बिशपाची निवड होईल असे ठरले. १६ व्या शतकामध्ये साधारणतः ऑस्ट्रियाच्या हाब्सबुर्ग घराण्यानेच या निवडणुकीवर प्रभाव राखला.
यानंतर युरोपात मार्टिन ल्यूथरच्या नावाने एक धार्मिक वादळ आले. त्याने रोमन कॅथलिक चर्चच्या अन्यायी कारभारावर जाहीर टीका केली आणि प्रोस्टेस्टंट चळवळ उदयास आली. सन १५३० नंतर काही जर्मन राज्यांमध्ये प्रोस्टेस्टंट चर्चला अधिकृत चर्च म्हणून मान्यता देण्यात आली. यामुळे जर्मनीत गृहयुद्ध सुरु झाले (इ.स. १६१८ - इ.स. १६४८). वेस्टफालिया शांती करारामुळे हे धार्मिक युद्ध संपुष्टात आले पण साम्राज्याची अनेक राज्ये, संस्थाने यांमध्ये विभागणी झाली. इ.स. १७४० नंतर ऑस्ट्रियन राज्य आणि प्रशियन राज्य या राज्यांची जर्मन राजकारणावर पकड राहिली. इ.स. १८०६ मध्ये नेपोलियनच्या आक्रमणानंतर पवित्र रोमन साम्राज्य संपुष्टात आले.
जर्मन साम्राज्य (सन १८७१ - सन १९१८)
अनेक राज्ये आणि संस्थानांमध्ये विभाजित असलेल्या जर्मनीचे १८७१ मध्ये एकत्रीकरण करण्यात आले. फ्रेंचाना फ्रांको - प्रशियन युद्धात पराभूत करुन जानेवारी १८, १८७१ मध्ये नव्या जर्मन साम्राज्याची स्थापना करण्यात आली. प्रशियन राज्यकर्त्यांचे ह्योहेनत्सोलर्न घराणे साम्राज्याचे राज्यकर्ते बनले व बर्लिन शहर नव्या साम्राज्याची राजधानी झाले. या साम्राज्यात बहुतेक सर्व जर्मनभाषिक भागांचा (ऑस्ट्रिया सोडून) समावेश करण्यात आला. साधारणपणे इ.स. १८८४ मध्ये जर्मनीने आपल्या वसाहती जर्मनीबाहेर वसवण्यास सुरुवात केली. पण इतर युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत जर्मनीला या स्पर्धेत उतरण्यास खूप उशीर झाला होता.
जर्मन साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात सम्राट विल्हेम पहिला याने जागतिक पातळीवर जर्मनीला महासत्ता म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. विल्हेम दुसरा याच्या अधिपत्याखाली जर्मनीने इतर युरोपीय देशांप्रमाणे साम्राज्यवादी धोरण स्वीकारले. साहजिकच जर्मनीचे शेजारी देशांशी खटके उडू लागले. यातच फ्रान्स व ब्रिटनने आपापसात सांमजस्याचा तह (Entente Cordiale) केला तसेच रशियाशीही तह केला. यामुळे हळूहळू जर्मनी युरोपीय राजकारणात एकटा पडू लागला.
जर्मनीचा साम्राज्यवाद आता युरोपाबाहेर पोहोचला. बर्लिन कॉन्फरन्स नंतर युरोपीय देशांनी आफ्रिकेची आपापसात विभागणी करून घेतली. जर्मनीने पूर्व आफ्रिका, टोगो, कॅमेरुन या देशांतील काही भूभाग मिळवून वसाहती स्थापन केल्या. आफ्रिकेत नाक खुपसल्यामुळे इतर साम्राज्यवादी देशांमध्ये जर्मनीविरुद्ध वातावरण तयार झाले. त्याची परिणती पहिल्या महायुद्धात झाली.
जून १९१४ मध्ये ऑस्ट्रियन राजपुत्र फ्रांत्स फेर्डिनांड याची सर्बियन राष्ट्रवाद्यांकडून सारायेवो येथे हत्या झाली आणि युद्धाला तोंड फुटले. एकमेकांशी असलेल्या करारांमुळे अनेक देश या युद्धात सामील झाले आणि पाहता पाहता पहिले महायु्द्ध सुरु झाले. इतिहासातील सर्वाधिक विनाशकारी युद्धांमध्ये या युद्धाची गणना होते. जर्मनीला या महायुद्धात दोस्त राष्ट्रांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. अंतर्गत घडामोडी व उठावांमुळे जर्मनीतील राजेशाही संपुष्टात आली आणि जर्मन सम्राट व इतर राज्यकर्त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. नोव्हेंबर ११, १९१८ रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली. जून १९१९ मधील व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीवर अनेक जाचक व अपमानकारक अटी लादण्यात आल्या; ज्यामुळे पुढील काळात नाझीवाद फोफावण्यास मदत झाली आणि दुसर्या महायुद्धाची बीजे पेरली गेली.
वायमार प्रजासत्ताक (इ.स. १९१९ - इ.स. १९३३)
इ.स. १९१८ च्या जर्मनीतील उठावानंतर ऑगस्ट १९१८ मध्ये जर्मन प्रजासत्ताक स्थापन झाले. राष्ट्रपती फ्रीडरिश एबर्ट यांनी वायमार संविधान ऑगस्ट ११, १९१९ रोजी लागू केले. याच काळात अनेक राजकीय पक्षांचा उदय झाला.
व्हर्सायच्या तहातील जाचक अटींमुळे जर्मनीत आर्थिक मंदीची लाट आली. नव्याने स्थापन झालेल्या प्रजासत्ताकाला राजकीय अस्थिरतेचा शाप होता. त्यातच भर म्हणून अनेक राजेशाही समर्थकांनी लष्करामुळे नव्हे तर अतंर्गत उठावांमुळे पराभव स्वीकारावा लागला असे पसरवले. त्याचा फायदा नाझी पक्षासारख्या पक्षांनी घेतला. त्याचप्रमाणे डाव्यांच्या धोरणांमुळेही राजकीय अनागोंदीत भर पडली. अनेक राजकीय हत्यांमुळे हा काळ गाजला. निमलष्करी दलांनी राजकीय पक्षांच्या प्रेरणेने अनेक ठिकाणी दडपशाही सुरु केली. मंदी आणि राजकीय अस्थिरतेमुळे जागोजागी हिंसाचार माजला. नाझींनी सार्वत्रिक निवडणु्कीत जर्मनीला मंदीतून बाहेर काढण्याचे आणि पहिल्या महायुद्धापूर्वीची समृद्धी आणण्याचे वचन दिल्यामुळे या पक्षाला लोकांनी निवडून दिले. जानेवारी १९३३ मध्ये राष्ट्रपती पाउल फॉन हिंडनबुर्ग यांनी एडॉल्फ हिटलर याची जर्मनीचा चॅन्सेलर म्हणून निवड केली.
नाझी राजवट व दुसरे महायुद्ध (इ.स. १९३३ - इ.स. १९४५)
फेब्रुवारी २७, इ.स. १९३३ रोजी जर्मन संसदेच्या इमारतीला आग लागली. राजकीय अनागोंदीमुळे विरोधकांनी ही आग लावल्याचा आरोप ठेवून हिटलरने स्वत:कडे सर्वाधिकार देण्याचा प्रस्ताव संसदेपुढे ठेवला. या प्रस्तावाला फक्त एस.पी.डी या पक्षाने विरोध केला. कम्युनिस्टांचा विरोध हिटलरने त्यांची रवानगी कारागृहात करुन मोडून काढला. अनेक राजकीय विरोधकांचा काटा या काळात काढण्यात आला. सर्वाधिकार हातात आल्यामुळे हिटलरने सार्वजनिक तसेच खासगी औद्योगिक क्षेत्राभोवती फास आवळला. कारखान्यांना लष्करी माल बनवण्यास भाग पाडले. सुरुवातीला हिटलरच्या धोरणांमुळे देश मंदीतून बाहेर पडण्यास मदत झाली, परंतु हिटलर जर्मनीला युद्धाच्या विनाशकारी गर्तेकडे ओढून नेत होता. इ.स. १९३६ मध्ये हिटलरने र्हाइनलांडमध्ये लष्करी हस्तक्षेप केला. तसे करणे आवश्यक होते असे समर्थन पुढे केले गेले. इ.स. १९३८ पर्यंत चेकोस्लोव्हेकियातील सुडेटेन प्रांतातील हस्तक्षेप आणि मुसोलिनीबरोबरचा मैत्रीचा करार यामुळे युद्धाचे वातावरण तयार होत गेले. यातच खबरदारी म्हणून हिटलरने रशियाबरोबर यु्द्ध न करण्याबाबत समझोता केला (जो त्याने नंतर मोडला).
इ.स. १९३९ मध्ये विविध कारणे पुढे करुन जर्मनीने पोलंडविरुद्ध आणि नंतर काही दिवसांतच ब्रिटन व फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले आणि दुसर्या महायुद्धास तोंड फुटले. हिटलरने थोड्याच दिवसांत पोलंड पादाक्रांत केला तसेच फ्रान्सवर आक्रमण करुन फ्रान्स जिंकला. इ.स. १९४१ पर्यंत युरोपातील बहुतेक भाग हिटलरच्या नियंत्रणाखाली आला.
हिटलरचा काळ दुसरे महायु्द्ध आणि ज्यूंच्या सामूहिक कत्तलींसाठी ओळखला जातो. त्याने ज्यू लोकांचे अटकसत्र सुरु केले व त्यांची रवानगी छळछावण्यांत केली. छळछावण्यांत त्यांचा क्रूरपणे छळ करण्यात आला. जे काम करण्यास सक्षम नाहीत अशांना गॅसचेंबरांमध्ये कोंडून ठार मारण्यात आले. म्युनिकजवळील डखाउ येथे अशी एक छळछावणी आहे. हिटलरने जिंकलेल्या देशांमध्येदेखील छळछावण्या उभारल्या. खासकरुन पोलंडमध्ये केलेल्या कत्तलींमध्ये ३० लाख ज्यू नागरिकांची हत्या करण्यात आली.
जून २२, १९४१ रोजी हिटलरने रशियाबरोबर केलेला युद्धबंदीचा करार मोडीत काढला आणि रशियावर हल्ला चढवला. याच सुमारास जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. जर्मन लष्कराला रशियामध्ये सु्रुवातीला झटपट यश मिळत गेले परंतु स्टालिनग्राडच्या युद्धात नाझी सैन्याला प्रंचड नुकसान सहन करावे लागले आणि युद्धाची चक्रे उलटी फिरू लागली. अमेरिका व ब्रिटनचे सैन्य नॉर्मंडीच्या किनार्यावर उतरले आणि पूर्व व पश्चिम अशा दोन्ही मोर्च्यांवर नाझी फौजांना माघार घ्यावी लागली. सरतेशेवटी मे ८, १९४५ रोजी रशियन फौजा बर्लिनमध्ये घुसल्या व नाझी फौजेचा पाडाव झाला. हिटलरने शरण येउन बंदिवासात राहण्यापेक्षा आत्महत्येचा मार्ग पत्करला आणि युद्ध संपुष्टात आले.
पाहा दुसरे महायुद्ध
फाळणी ते एकीकरण (इ.स. १९४५ - इ.स. १९८९)
दुसर्या महायुद्धात जर्मनीची प्रचंड हानी झाली. युद्धसमाप्तीपर्यंत जर्मनीचा भूभाग ४ देशांनी व्यापला होता. या चार राज्यकर्त्यांनी बर्लिनला चार भागांमध्ये विभागले. त्यांपैकी तीन भाग जे ब्रिटन, फ्रान्स व अमेरिकेच्या ताब्यात होते ते एकत्र करुन मे २३, १९४९ रोजी त्याचे पश्चिम जर्मनी (Federal Republic of Germany - FRG) असे नामकरण करण्यात आले, तर ऑक्टोबर ७, १९४९ रोजी सोविएत संघाच्या ताब्यातील भाग पूर्व जर्मनी (German Democratic Republic - GDR) म्हणून जाहीर करण्यात आला.
पश्चिम जर्मनीने अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सच्या संयुक्त मदतीने महायुद्धानंतर झपाट्याने आर्थिक प्रगती केली, तर पूर्व जर्मनीने सोविएत महासंघाच्या पावलावर पाऊल टाकून आर्थिक व सामाजिक वाटचाल केली. परिणामतः पूर्व आणि पश्चिम जर्मनीदरम्यान ४० वर्षांत खूप मोठा आर्थिक फरक निर्माण झाला. पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत पळून जाणार्यांना रोखण्यासाठी इ.स. १९६१ मध्ये बर्लिनची भिंत उभारण्यात आली. परंतु या भिंतीने इ.स. १९६० व १९७० च्या दशकांत शीतयुद्धादरम्यान अमेरिका आणि सोविएत महासंघातील तेढ वाढवण्याचेच काम केले.
इ.स. १९८० च्या दशकात पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत होणार्या स्थंलातराचा प्रश्न गंभीर झाला. परिस्थिती जरा निवळावी म्हणून पूर्व जर्मनीने इ.स. १९८९ मध्ये स्थलांतरासंदर्भातील निर्बंध कमी केले. परिणामत: जर्मनीच्या एकीकरणाला चालना मिळाली. सरतेशेवटी ऑक्टोबर ३, १९९० रोजी पूर्व व पश्चिम जर्मनी पुन्हा एकत्र झाले. ऑक्टोबर ३ हा दिवस जर्मनीत आता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.
भूगोल
मुख्य लेख: जर्मनीचा भूगोल
चतु:सीमा
जर्मनीच्या उत्तरेला उत्तर समुद्र, डेन्मार्क आणि बाल्टिक समुद्र , पूर्वेला पोलंड आणि चेक प्रजासत्ताक , दक्षिणेला ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड आणि पश्चिमेला फ्रान्स, लक्झेंबर्ग, बेल्जियम आणि नेदरलंड आहे. एकूण भूभागापैकी ५३.५% भूभाग शेती व तत्सम उद्योगांसाठी वापरला जातो. जंगलांनी २९.५% भाग व्यापलेला आहे तर १२.३% भागावर नागरी वस्ती आणि रस्ते आहेत. १.८% भाग पाणथळ जमीन व नद्या आणि उर्वरीत २.४% भाग नापीक, ओसाड आणि मानवी वापरामुळे दूषित झालेल्या जमीनीने व्यापला आहे.
हवामान
मुख्य लेख: जर्मनीचे हवामान
जर्मनीचे हवामान हे सर्वसाधारणपणे पश्चिम युरोपीय हवामान या प्रकारात मोडते. जर्मनीचे हवामान गल्फस्ट्रीम या सागरी प्रवाहामुळे नियंत्रित होते. यामुळे याच अक्षांक्षावरील इतर देशांप्रमाणे (कॅनडा, रशिया इत्यादी) जर्मनीत फार टोकाचे हवामान अनुभवायास मिळत नाही. सततचा पाऊस, ढगाळ आकाश हे येथील हवामानाचे ठळक वैशिष्ट्य.
एका वर्षात साधारणपणे ४ ऋतू अनुभवायला मिळतात. साधारणपणे मार्च ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत वसंत (frühling) भरात असतो. वर्षातील सर्वोतम हवामान या दिवसांत अनुभवायास मिळते. अचानक बदलणारे निर्सगाचे रुप हे या ऋतूचे वैशिष्ट्य. सर्वत्र झाडावर फुलणारी पालवी आणि जमीनीवर आच्छादलेले फुलांचे गालिचे असतात.
मे महिन्याच्या मध्यापासून ऑगस्टपर्यंत सौम्य उन्हाळा असतो. तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत असते. या काळात दिवस अतिशय मोठा म्हणजे साधारणपणे १६ ते १८ तासांपर्यंत असतो.
सप्टेंबर ते नोव्हेंबर हा पानगळीचा (herbst) काळ असतो. प्रथम झाडांच्या पानांचा रंग बदलतो. कालांतराने पाने पूर्ण पिकून गळून पडतात. प्रत्येक झाडावरील पानांची छटा वेगवेगळी असते. या दिवसांत सरासरी तापमान कमी होण्यास सुरूवात होते आणि कडक थंडीची चाहूल लागते.
डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडक हिवाळा असतो. या दिवसांत किमान तापमान -५ ते -७ पर्यंत जाते व कमाल तापमान ३ ते ४ अंश सेल्सियस असते. त्यामुळे दिवसा देखील अत्यंत कडक थंडीचा अनुभव घेता येतो. तापमान अतिशय कमी असल्याने येथील तळी गोठतात. या दिवसात नियमीतपणे बर्फवृष्टी हो्ते. बर्फवृष्टीचे प्रमाण दक्षिण जर्मनीतील बायर्न व बाडेन व्युर्टेनबर्ग या राज्यांत जास्त आहे. आल्प्स पर्वतालगतच्या प्रदेशात सर्वाधिक बर्फवृष्टी होते.
मोठी शहरे
जर्मनीत सुमारे ८० मोठी शहरे अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या १ लाख किंवा जास्त आहे. त्यांपैकी १४ शहरांची लोकसंख्या ५ लाखांपेक्षा जास्त आहे. जर्मनीचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसंख्येची घनता जास्त असूनही इतर प्रगत देशांप्रमाणे किंवा भारत, चीनमधल्या शहरांसारखी प्रचंड लोकवस्तीची शहरे इथे नाहीत. कारण शहरी व ग्रामीण भागात उद्योगधंदे, शिक्षणाच्या सोयी, उत्पन्नच्या सोयी यांचे प्रमाण थोड्याफार फरकाने सारखेच असल्यामुळे जर्मनीची लोकसंख्या मोठी शहरे, छोटी शहरे आणि लहान गावांमध्ये जवळपास सारख्या प्रमाणात विभागली गेली आहे. मोठ्या व छोट्या शहरातील राहणीमानात फारसा फरक नाही. मात्र प्रचंड लोकवस्तीची शहरे कमी जरी असली तरी सर्वसाधारणपणे लोकं मोठ्या शहराजवळच्या छोट्या शहरांत किंवा गावांमध्ये राहणे पसंत करतात; त्यामुळे शहर किंवा जिल्हापरिसराची एकूण लोकसंख्या त्यामानाने बरीच असते. रुहर परिसर हे याचे अतिशय उत्तम उदाहरण आहे.
| शहर | लोकसंख्या | शहर परिसर | शहर परिसराची एकत्रित लोकसंख्या |
| बर्लिन | ३४ लाख | बर्लिन परिसर | ४२ लाख |
| म्युनिक(म्युन्शन) | १८ लाख | म्युनिक परिसर | २६ लाख |
| रुहर | रुहर परिसर | ५८ लाख | |
| हँबर्ग (हांबुर्ग) | हँबर्ग परिसर | २६ लाख | |
| कोलोन (क्योल्न) | १३ लाख | कोलोन परिसर | |
| फ्रँकफुर्ट (फ्रान्कफुर्ट) | १० लाख | फ्रँकफुर्ट परिसर | |
| डॉर्टमुंड | ६.५ लाख | डॉर्टमुंड परिसर | |
| स्टुटगार्ट (श्टुटगार्ट) | ६ लाख | स्टुटगार्ट परिसर | २६ लाख |
जर्मनीतील राज्ये
| क्र | राज्य | राजधानी | लोकसंख्या |
|---|---|---|---|
| १ | बर्लिन | बर्लिन | ३४ लाख |
| २ | बाडेन-व्युर्टेंबर्ग | श्टुटगार्ट | १ कोटी ७ लाख |
| ३ | बायर्न (बव्हेरिया) | म्युनिक | १ कोटी २४ लाख |
| ४ | ब्रांडेनबुर्ग | पोट्सडाम | २५. ६८ लाख |
| ५ | ब्रेमेन | ब्रेमेन | ६.६ लाख |
| ६ | मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न (मेक्लेनबुर्ग-पश्चिम पोमेरेनिया) | श्वेरिन | १७.२ लाख |
| ७ | नोर्डर्हाईन-वेस्टफालन (उत्तर र्हाइन-वेस्टफालिया) | ड्युसेलडॉर्फ | १ कोटी ८० लाख |
| ८ | थ्युरिंगेन (थुरिंगिया) | एरफुर्ट | २३.५ लाख |
| ९ | र्हाइनलांड-फाल्त्स (र्हाइनलांड-फाल्त्स-पालाटिनेट) | माइंत्स | ४०.६ लाख |
| १० | हांबुर्ग | हांबुर्ग | १७.३ लाख |
| ११ | नीडर जाक्सन (लोअर सॅक्सनी) | हानोफर | ८० लाख |
| १२ | जाक्सन (सॅक्सनी) | ड्रेसडेन | ४३ लाख |
| १३ | जाक्सन-आनहाल्ट (सॅक्सनी-आनहाल्ट) | मागदेबुर्ग | २५ लाख |
| १४ | श्लेसविग-होलस्टाइन | कील | २८.२९ लाख |
| १५ | जारलांड (सारलांड) | सारब्र्युकेन | १०.५ लाख |
| १६ | हेसेन | वीजबाडेन | ६१ लाख |
वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था
मुख्य लेख: जर्मनीतील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था
रस्ते
जगातील अत्यंत प्रगत वाहतूक व्यवस्था असलेल्या देशांमध्ये जर्मनीचा समावेश होतो. युरोपातल्या आपल्या मध्यवर्ती स्थानामुळे इतर युरोपीय देशांच्या मानाने जर्मनीत वाहतुकीची घनता बरीच जास्त आहे. जर्मनीत महामार्गांचे अत्यंत दाट जाळे असून रस्त्यांची एकूण लांबी सुमारे ६,५६,१४० किमी आहे. इथल्या खास वेगवान वाहतुकीसाठी बनवलेल्या महामार्गांना ऑटोबान असे म्हणतात. बहुतेक सर्व शहरे ऑटोबानद्वारे जोडलेली आहेत. ऑटोबानचे वैशिष्ट्य म्हणजे जर्मनीत ऑटोबानवरून-काही धोकादायक भाग वगळता-गाडी चालवण्यासाठी कोणतीही कमाल वेगमर्यादा नाही. त्यामुळे बरेचदा इतर देशांतील चालक इथे येऊन आपली भरधाव गाडी चालवण्याची हौस पूर्ण करुन घेतात. वेगमर्यादा नसूनही ऑटोबानवर होणार्या अपघातांचे प्रमाण इतर युरोपीय देशांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे[४]. ऑटोबान वगळता जर्मनीत इतरही अनेक राष्ट्रीय महामार्ग आहेत ज्यांना बुंडेस्ट्रास्सेन Bundesstraßen (Federal road किंवा राष्ट्रीय महामार्ग) असे संबोधले जाते.
लोहमार्ग
जर्मनीत लोहमार्गांचे जाळेदेखील अत्यंत विकसित आहे. लोहमार्ग हा जर्मनीतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक प्रामुख्याने स्थानिक भूमिगत रेल्वेमार्गांनी (यु-बान) तर शहरांदरम्यान वाहतूक उपनगरीय रेल्वेमार्गांनी (एस-बान) होते. लांब पल्ल्याची आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक आय.सी.ई. (इंटरसिटी एक्सप्रेस) द्वारे होते. ही गाडी आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. साधारणपणे ताशी १६० ते ३०० किमी वेगाने पळणार्या या गाडीचा समावेश जगातल्या मोजक्या अतिवेगवान रेल्वेगाड्यांमध्ये होतो.
जर्मनीतल्या रेल्वेमार्गांची एकूण लांबी सुमारे ४०,८२६ किमी आहे. दॉईचबान (Deutsche Bahn - जर्मन रेल्वे) ही जर्मनीतली सर्वात मोठी आणि प्रमुख रेल्वे कंपनी आहे. दॉईचबानबरोबर इतर २८० खाजगी रेल्वे कंपन्या रेल्वेसेवा पुरवतात. रेल्वेसेवेचा दर्जा जर्मनीत अतिशय उत्तम आहे. लहानात लहान गावातही किमान दोन तासांनी एक गाडी असते.
विमानवाहतूक
रस्ते आणि रेल्वे यांच्या कार्यक्षम जाळ्यामुळे जर्मनीत देशांतर्गत विमानप्रवास फारसा होत नाही. विमानव्यवस्थेचा वापर मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी होतो. बहुतेक शहरांमध्ये विमानतळ आहेत जे रेल्वेमार्गांनी जोडलेले आहेत. फ्रॅंन्कफुर्ट विमानतळ हा जर्मनीतला सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असून जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळांमध्ये याचा समावेश होतो. हा विमानतळ युरोपीय आणि अटलांटिकपार (Transe Atlantic) विमानमार्गांवरचे मुख्य केंद्र आहे. लुफ्तान्सा ही जर्मन विमान कंपनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी प्रमुख कंपनी आहे. त्याखालोखाल जर्मन विंग्स, र्हाइन एर या स्थानिक विमान कंपन्या युरोपांतर्गत सेवेसाठी प्रसिद्ध आहेत.
जलमार्ग
जर्मनीत काही प्रमाणात जलमार्गदेखील वाहतुकीसाठी वापरले जातात. जर्मनीतील र्हाइन, एल्बा, डोनाउ (डॅन्यूब), माइन, इ. मोठ्या नद्यांमधून आणि कील, र्हाइन-माइन-डॅन्यूब या कालव्यांमधून जलवाहतुक होते. हांबुर्ग हे युरोपातले दुसर्या क्रमांकाचे आणि जगातील सातव्या क्रमांकावरचे सर्वात मोठे बंदर आहे. आज जलमार्गांचा उपयोग प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी होत असला तरी मध्ययुगात जर्मनीतील वाहतूक मुख्यत्वे याच नद्यांतून होत असे.
सामाजिक
धर्म
ख्रिश्चन धर्म हा जर्मनीत सर्वात मोठा धर्म आहे. सुमारे ५.३ कोटी लोक ख्रिश्चन धर्म पाळतात[५]. दुसरा क्रमांक इस्लामचा असून सुमारे ३३ लाख लोकं मुसलमान आहेत. यात प्रामुख्याने तुर्कस्तानमधून स्थायिक झालेल्यांचा समावेश जास्त आहे. बौद्ध व ज्यू धर्मीयांची संख्या प्रत्येकी २ लाख आहे तर हिंदुंची संख्या ९०,००० असून इतर धर्मांचे मिळून ५० हजारपेक्षा कमी अनुयाची आहेत.
जर्मनी ही प्रोटेस्टंट पंथाची जन्मभूमी आहे. उत्तर जर्मनीत या पंथाचे अनुयायी जास्त आहेत. रोमन कॅथोलिक पंथाचे लोक बहुतकरून नैऋत्य जर्मनीत आहेत. सध्याचे पोप बेनेडिक्ट १६ वे हे जर्मनीचे असून त्यांचा जन्म बव्हेरियामधला आहे[६]. साधारणपणे २.४ कोटी लोकं कोणत्याही धर्माचे अनुयायी नसल्याचे सांगतात. यांपैकी बहुतांशी नास्तिक किंवा ऍगनोस्टिक असून ते पूर्व जर्मनीत बहुसंख्येने आहेत.
शिक्षण
जर्मनी शिक्षणाच्या बाबतीत अतिशय प्रगत राष्ट्र आहे परंतु शिक्षणपद्धत गुंतागुंतीची आहे. बालवाडीपासून ते विद्यापीठापर्यंत शिक्षण मोफत होते. मात्र इ.स. २००६ पासून जर्मन विद्यापीठांनी ५०० युरोपर्यंत सत्रशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
जर्मनीत माध्यमिक स्तरापर्यंत (भारतीय पद्धतीप्रमाणे १२ वी पर्यंत) शिक्षण घेणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास पालकांवर कारवाई होऊ शकते. शिक्षणाचे विविध स्तर, शाळांचे विविध प्रकार यामुळे शिक्षण घेण्याची गुंतागुंत वाढते.
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तर कमीअधिक प्रमाणात सगळीकडे सारखे असतात. त्यनंतर माध्यमिक स्तरात विविध प्रकारच्या शाळा असतात उदा: हाउप्ट शुले, रिआल शुले, जिमनासियम, गेसाम्ट शुले. या शाळांमधील प्रवेश अनेक निकषांवर अवलंबून असतो. ( उदा: घरापासूनचे अंतर).
माध्यमिक शिक्षण सुमारे १२ वर्षे असते. त्यानंतर विद्यार्थ्यांना होकशुले (प्रशाला), अथवा फाकहोकशुले (उच्च माध्यमिक शाळा) यांमध्ये प्रवेश घेता येतो.
हा स्तर साधारणपणे भारतातील कनिष्ठ महाविद्यालय अथवा पदविका (डिप्लोमा कॉलेज) प्रमाणे असतो. या स्तरात व्यावसायिक शिक्षणावर जास्त भर असतो. तसेच माध्यमिक शिक्षणा नंतर विद्यापीठात थेट प्रवेश घेता येतो.
विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा सर्वोच्च मानला जातो. विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रम साधारणपणे ५ वर्षांत पूर्ण करावा लागतो. विद्यापीठांमध्ये संपूर्ण शिक्षण हे जर्मन माध्यमातून मिळत होते, मात्र सध्या बहुतेक सर्व मुख्य विद्यापीठांनी इंग्रजी माध्यमातही शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामु़ळे जर्मनीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. सर्वात जास्त विद्यार्थी हे दक्षिण अमेरिका आणि चीनमधून येतात. भारतीय विद्यार्थ्यांची संख्याही हळूहळू वाढत आहे.
सणवार व उत्सव
जर्मनीची बहुतेक लोकसंख्या ख्रिश्चन असल्यामुळे ख्रिश्चन धर्मातील बहुतेक सण इथे साजरे होतात. मुख्य सण नाताळ अथवा ख्रिसमस असून त्याला जर्मन भाषेत वाइनाख्टन (weinachten ) असे म्हणतात. हा सण २४ डिंसेबर ते ६ जानेवरी या काळात साजरा होतो. ख्रिसमसच्या ३ आठवडे अगोदर लह
