वैनगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वैनगंगा नदी
Old Bridge on Wainganga River in Bhandara City- 2014-06-18 13-50.jpeg
भंडारा शहरातील वैनगंगा नदी
उगम दरकेसा टेकट्या जवळ भाकल येथे उगम पावते तेथून दक्षिणेकडे 300 कि. मी. जाते
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत देश; सिवनी जिल्हा, बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश); गडचिरोली जिल्हा,चंद्रपूर जिल्हा,नागपूर जिल्हा,गोंदिया जिल्हा,भंडारा जिल्हा,यवतमाळ जिल्हा,वर्धा जिल्हा, (महाराष्ट्र])
ह्या नदीस मिळते गोदावरी नदी


वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांत समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे ९८ किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. विदर्भात ती भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, आणि गडचिरोली इतक्या जिल्ह्यांमधून वाहते.

अंधारी, कथणी, कन्हान, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, चुलबंद, चोरखमारा, थानवर, पोटफोडी, फुअर, बोदलकसा, वाघ, बावनथडी, सुर या वैनगंगेच्या उपनद्या आहेत.

मध्य प्रदेशात वैनगंगेच्या खोऱ्यात दाट अरण्ये व काही ठिकाणी सुपीक गाळाचे प्रदेश आहेत, अरुंद दऱ्या आहेत. पात्रात अनेक ठिकाणी काठावर सुमारे ६० मीटर उंचीच्या ग्रॅनाईट खडकाच्या उंच भिंती आढळतात. काही ठिकाणी नदीने पूर मैदानांचीही निर्मिती केली आहे. वैनगंगेचे खोरे तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

वैनगंगा नदी'ला वर्धा नदी मिळाल्यावर तिचे नाव प्राणहिता होते. ही प्राणहिता त्यानंतर, महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात गेलेल्या गोदावरी नदीला मिळते.

मध्य प्रदेश राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक प्रमुख नदी व गोदावरीची उपनदी आहे. तिची लांबी सुमारे ५८० किमी. आहे. महानदी, शोण, नर्मदा, तापी यांसारख्या अनेक नद्यांचे उगमस्थान असलेल्या मध्य भारतातील पूर्व-मध्य उच्चभूमी प्रदेशातच वैनगंगेचाही उगम होतो.

अधिक उंची, डोंगराळ प्रदेश व भरपूर पाऊस ही या प्रदेशाची प्रमुख वैशिष्टे आहेत. मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील महादेव डोंगररांगांत समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर सिवनीच्या पश्चिमेस १८ किमी.वर परताबपूर गावाजवळ वैनगंगा नदी उगम पावते.

पर्वतीय प्रदेशातील खडकांमुळे पहिल्या टप्प्यात तिला अनेक वळणे प्राप्त झाली आहेत. उगमानंतर काही अंतर वाहत गेल्यावर सिवनी जिल्ह्यातून ती पूर्वेकडे वाहते. त्यानंतर एक दीर्घ अर्ध-वर्तुळाकार वळण घेऊन ती दक्षिणेस वळते. तेथे तिला मंडलाकडून वाहत येणारी थानवर नदी मिळते. काही अंतर सिवनी जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहत गेल्यानंतर ती बालाघाटमध्ये प्रवेश करते.

वैनगंगेच्या वरच्या टप्प्याचे सुरुवातीचे काही पात्र खडकाळ असून त्यानंतर सिवनी जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीवर येईपर्यंतच्या तिच्या खोऱ्यात आलटून पालटून सुपीक गाळाचे प्रदेश व अरुंद दऱ्या आढळतात. पात्रात अनेक ठिकाणी द्रुतवाह (?), तसेच काठावर सुमारे ६० मी. उंचीच्या ग्रॅनाइटी खडकांच्या भिंती आढळतात. थानवर नदी मिळण्यापूर्वीचे वैनगंगेचे दहा किमी. लांबीचे खोरे निसर्गसुंदर आहे. मध्य भारतातील अशा अप्रतिम सृष्टिसौंदर्याच्या बाबतीत नर्मदेच्या भेडाघाट घळईनंतर याच खोऱ्याचा क्रमांक लागतो.

मध्य प्रदेश राज्यातून सुमारे २७४ किमी. वाहत आल्यानंतर वैनगंगा मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांच्या सरहद्दीवरून ३२ किमी. नैर्ऋत्य दिशेकडे वाहत येते. त्यानंतर ती भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवर तिला पूर्वेकडून येणारी वाघ नदी मिळते.

भंडारा जिल्ह्यातून वाहताना ती प्रथम भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून व पुढे भंडारा तालुक्यातून नैर्ऋत्येस जाते. पुढे भंडारा-नागपूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस जाऊन भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागातून आग्नेयीस वळून गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून आग्नेयेस वाहत येते.

भंडारा जिल्ह्यातील तिची एकूण लांबी सुमारे २०० किमी. आहे. त्यानंतर ती दक्षिणवाहीनी होऊन चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहू लागते. शेवटी या दोन जिल्ह्यांच्या दक्षिण सरहद्दीवरच (महाराष्ट्र-आंध्रप्रदेश राज्यांच्या सरहद्दीवर) सेवनी गावाजवळ तिला पश्चिमेकडून वाहत येणारी व विदर्भातील दुसरी महत्त्वाची वर्धा नदी मिळते.

वर्धा-वैनगंगा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह पुढे प्राणहिता नावाने ओळखला जातो. प्राणहिता नदी महाराष्ट्र (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्यांच्या सरहद्दीवरून ११३ किमी. अंतर वाहत गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा गावाजवळच्या समद्र सपाटीपासून १०७ मी. उंचीवर पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या गोदावरी नदीला मिळते.

बालाघाट, तुमसर, भंडारा व पौनी ही वैनगंगेच्या काठावरील प्रमुख नगरे आहेत. अंधारी , कथणी, कन्हान, खोब्रागडी, गाढवी, गायमुख, चुलबंद, चोरखमारा, पोटफोडी, फुअर, बावनथरी, बोदलकसा, वाघ, सुर या वैनगंगेच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या आहेत. वैनगंगेचे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांतील एकूण पाणलोट क्षेत्र ६१ हजार चौ. किमी. आहे.

सिवनी व छिंदवाडा जिल्ह्यांच्या विस्तृत प्रदेशातील तसेच नागपूर मैदानाच्या पूर्व भागातील पाणी पेंच व कन्हान नद्यांद्वारे वैनगंगेला मिळते. मध्य प्रदेशातील तिच्या खोऱ्यात दाट अरण्ये आहेत. सिवनी व बालाघाट जिल्ह्यांतील पात्रात बेसाल्टयुक्त खडकांच्या मालिका व खोल डोह आढळतात. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. बालाघाटनंतरचे पात्र सामान्यपणे रुंद व वालुकामय असून त्यात अधूनमधून खडकांच्या मालिका आढळतात.

चंद्रपूर-गडचिरोली दरम्यान तिच्या पात्राची रुंदी ५४५ मीटरपर्यंत वाढते. पावसाळ्यात भरपूर पाणी असताना वाघ नदीच्या संगमापासून गडचिरोलीपर्यंतच्या प्रवाहातून पडाव-वाहतूक चालते. मात्र एक-दोन ठिकाणचे खडकाळ भाग थोडे धोकादायक आहेत. प्रवाहातून लाकूड, धान्य व भाजीपाल्याचीही वाहतूक केली जाते.

नदीने आपल्या खोऱ्यात काहीकाही ठिकाणी पूर-मैदानांचीही निर्मिती केली आहे. वैनगंगेचे खोरे तांदूळ उत्पादनासाठी विशेष महत्त्वाचे आहे. मात्र जलसिंचनासाठी तिचा विशेष उपयोग करून घेतलेला नाही. तिच्या खोऱ्यात लोकवस्ती विरळ आहे.

वैनगंगेच्या पहिल्या टप्प्यातील आश्चर्यकारक अशा दीर्घ अर्धवर्तुळाकार वळणाबद्दल व वेड्यावाकड्या पात्राबद्दल एक हिंदू आख्यायिका प्रचलित आहे.(कोणती?)

पहा: जिल्हावार नद्या