Jump to content

माथेरान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?माथेरान
माथेरान गिरिस्थान
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ५९′ २०″ N, ७३° १६′ १५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ८०३ मी
जिल्हा रायगड
लोकसंख्या ५,१३९ (२००१)
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४१०१०२
• +०२१८४
१९१९ साली बांधले गेलेले रतनबाई पेस्तनजी कापडिया मार्केट

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हणले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंट्सना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती पॉईंट्सची नावे इंग्रजीत आहेत.

माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगर रांग सुरू होते. मलंग गडाला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.

हवामान

[संपादन]

इथलं हवामान अति थंड किंवा उष्ण असे कधीच नसते. उन्हाळ्यात २० ते ३०, तर हिवाळ्यात १५ ते २५ असते. मे महिन्यात संध्याकाळ अल्हाददायक असते. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. नुकताच होऊन गेलेल्या पावसानं माथेरान हिरवंगार झालेलं असतं. ठिकठिकाणी धबधबेही दिसतात. जून ते ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस पडतो. या काळात धुक्याचे साम्राज्य संपूर्ण माथेरानवर असते. सूर्यप्रकाशही फार कमीवेळा दिसतो. अगदी अलिकडेपर्यंत पावसाळ्यात पर्यटक येतच नसत. कारण जून ते सप्टेंबर मध्ये आगगाडी आणि हॉटेल्स बंद असतात. पण आता तरुण आणि प्रेमी युगुलांची या काळातही इथे बऱ्यापैकी गर्दी असते.

वृक्षसंपदा

[संपादन]

माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी वनस्पतीही इथे आहेत. हे जंगल सदाहरित व निमसदाहरित या प्रकारात मोडते. त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे दिसतात. ह्या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉईंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही.

प्राणी व पक्षी

[संपादन]

माथेरानमध्ये आढळणाऱ्या प्राणीवर्गात सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते माकडांचे. माकडांप्रमाणेच रानमांजरे, हरणे, ससे हे प्राणी इथे आहेत. शिवाय खालच्या जंगलातून कधीकधी बिबटे देखिल वर येतात; पण त्यांनी माणसांना त्रास दिल्याचे ऐकिवात नाही. क्वचित कधीतरी गाय, शेळी या बिबट्याने मारली, अशी माहिती जवळच्या आदिवासींकडून ऐकायला मिळते.

येथील पक्षीसृष्टीत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुलबुल, दयाळ, लार्क, तांबट, किंगफिशर, धनेश, रॉबिन, बार्बेट आदि पक्षी आहेत. पॅराडाइज फ्लायकॅचर नावाचा एक पांढराशुभ्र व लांब शेपटी असणारा पक्षी इथे आढळतो.

इतिहास

[संपादन]

इ.स. 1850 मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता. त्यामुळे तो ह्या डोंगराकडे आकर्षित झाला. तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉईंटवरून वर चढला आणि रामबाग पॉईंटवरून खाली उतरला. नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला आणि राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग त्याचा इतर मित्र परिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले.

पर्यटनस्थळे

[संपादन]

शार्लोट लेक

[संपादन]

मार्केटपासून जवळजवळ १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे तळे आहे. माथेरानवरील पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय पुर्णपणे भरून वाहू लागतो. त्या वेळी तयार होणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा जोर ऊरात धडकी भरवल्याशिवाय राहत नाही. बाकी ऋतुंमध्ये संध्याकाळ जर छानपैकी घालवायची असेल तर शार्लोट लेकला दुसरा पर्याय नाही.

पॅनोरमा पॉईंट

[संपादन]

हा पॉईंट उत्तर टोकावर असून त्याच्या पूर्व व पश्चिमेस दरी आहे. पुर्वेला खाली नेरळ दिसते, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो. बहुतेक लोक इथे सूर्योदय पहायला येतात. पण इथून सूर्यास्तही दिसू शकतो, कारण पश्चिमेकडे सन सेट पॉईंट आहे. याशिवाय मंकी पॉईंट, पॉर्क्युपॉईन पॉईंट, मालडुंगा पॉईंट, हार्ट पॉईंट हे सर्व पॅनोरमा पॉईंटच्या पश्चिमेकडे असून, या सर्व पॉईंटवरून सूर्यास्त उत्तम दिसतो.
पहाटे ६ च्या आधी पॅनोरमावर पोहोचल्यास सूर्योदय बघायला मिळतो. पॅनोरमा मार्केटपासून सर्वांत लांब म्हणजे ५.५ कि. मी. अंतरावर आहे. माऊंटबेरीसुद्धा ह्याच्यासारखाच लांब आहे. हाजीमलंग, चंदेरी, पेब ही एकामागोमाग लागलेली डोंगररांग पॅनोरमाला येऊन मिळते. ह्याच्याच खाली ‘पेब’चा किल्ला दिसतो.
पेबकडे तोंड करून उभे राहिल्यास डावीकडे पश्चिमेच्या दरीत गाडेश्वर तलाव दिसतो. पुर्वेला नेरळ तर समोर मुख्य सह्याद्रीच्या रांगेमधला सिद्धगडापासून भीमाशंकर ते खंडाळ्यापर्यंतचा भाग दिसू शकतो.

सनसेट पॉईंट किंवा पॉर्क्युपॉईन

[संपादन]

ह्या पॉईंटच्या समोर जो डोंगर दिसतो, तो प्रबळगड. हा पण जंगलसंपत्तीने नटलेला आहे. परंतु पाण्याचा साठा नसल्याने थंड हवेचे ठिकाण होऊ शकलेला नाही. इंग्रजांच्या राजवटीत इंग्रज लोकांचा प्रबळगडाला हिल स्टेशन बनवायचा प्रयत्न चालला होता, असे समजते.
ह्या प्रबळगडाच्या मुख्य पठाराला लागून एक छोटासा सुळका आहे. ह्या सुळक्याच्या आणि पठाराच्या खिंडीतच बहुतेक वेळा सूर्यास्त होतो. मार्केट अथवा पोस्ट ऑफिस पासून अंतर साधारण ३.५ कि.मी. आहे. सनसेट पॉईंटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते.

लुईझा पॉईंट

[संपादन]

हा पॉईंट माथेरानच्या पश्चिमेकडे आहे. इथूनही समोर प्रबळगडाचा देखावा दिसतो. मार्केटपासून ३.५ कि.मी. अंतरावर हा पॉईंट आहे. लुईझा खेरीज चिनॉय, रुस्तुमजी, मलंग, हनीमून ह्या छोट्या-मोठ्या पॉईंटस् वरून सारखेच दृश्य दिसते. लुईझा ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको, एडवर्ड, किंगजॉर्ज हे पॉईंट लागतात.

एको पॉईंट

[संपादन]

लुईझा पॉईंट ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको पॉईंट आहे. ह्याच्या समोर असलेल्या प्रचंड कातळी भिंतीमुळे आवाज केल्यास प्रतिध्वनी (echo) ऐकू येतो, त्यामुळे हा एको पॉईंट.

चौक पॉईंट

[संपादन]

हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने ओळखला जातो. चौक पॉईंट मार्केटपासून ४ कि.मी. अंतरावर आहे.

वन ट्री हिल पॉईंट

[संपादन]

चौक पॉईंट जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे. इथूनही खाली चौक गाव दिसते. या पॉईंट समोर डोळे गरगरतील अशी भीषण खोल दरी आहे. नीट पाहिल्यास एक छोटीशी पायवाट छोट्या खिंडीतून एका सुळक्याला जाऊन मिळालेली दिसते. हा सुळका मुख्य डोंगरापासून अलग झालेला आहे. ह्याच सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते. हा सुळका म्हणजेच वन ट्री हिल पॉईंट. आता बरीच झुडपे उगवलेली दिसतात. इथूनच ‘शिवाजी लॅडर’ नावाच्या रस्त्याने ‘मॅलेट’ प्रथम माथेरानला आला.
इथून समोर खंडाळा, राजमाची, नागफणी ही मुख्य सह्याद्री रांगेतील टोके दिसतात. तसेच माणिकगड, कर्नाळा, अगदी बाजूला असणारा इरसालगड दिसतो.
मार्कटपासून वन ट्री हिल पॉईंट ३.५ कि.मी. अंतरावर आहे. येथून मार्केटकडे येताना शार्लोट लेक, अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट लागतात. इथूनही साधारणतः एकच दृश्य दिसते.

गार्बट पॉईंट

[संपादन]

माथेरानमधील मोठा, परंतु दुर्लक्षिलेला असा हा पॉईंट आहे. या पॉईंटकडे जाणारा रस्ता फार सुरेख आहे. एका बाजूला दरी व दुसऱ्या बाजूला जंगल असा हा रस्ता आहे. तरीदेखील फारसे लोक इथे येत नाहीत. इथून सूर्योदयसुद्धा चांगला दिसतो. कर्जतवरून येणारा रस्ता गार्बट पॉईंटवरून माथेरानला येतो.
याचे अंतर मार्केटपासून ५ कि. मी. आहे.

दस्तुरी अथवा माऊंटबेरी पॉईंट

[संपादन]

जिथे गाड्या उभ्या करतात तिथे म्हणजे माथेरानच्या प्रवेशद्वारापाशीच हा पॉईंट आहे. ह्या पॉईंटच्या पुढे माथेरान पाहण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून जावे लागते.

रामबाग पॉईंट

[संपादन]

अलेक्झांडर पॉईंट

[संपादन]

माधवजी पॉईंट

[संपादन]

मंकी पॉईंट

[संपादन]

हार्ट पॉईंट

[संपादन]

मालडुंगा पॉईंट

[संपादन]

चिनॉय पॉईंट

[संपादन]

रुस्तुमजी पॉईंट

[संपादन]

मलंग पॉईंट

[संपादन]

एडवर्ड पॉईंट

[संपादन]

किंग जॉर्ज पॉईंट

[संपादन]

लिटल चौक पॉईंट

[संपादन]

राहण्याची सोय

[संपादन]

माथेरान मध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत.
दस्तुरी पॉईंटला लागूनच एम्.टी.डी.सी.ची रेस्ट हाऊसेस आहेत. यांचे बुकिंग मुंबईच्या एम्.टी.डी.सी.च्या कार्यालयातून होते.
इतर देखिल बरीच हॉटेल्स आहेत. कुमार प्लाझा, माणिकलाल टेरेस, रॉयल, प्रेमदीप, सेंट्रल, शिरीन, वुडलॅंडस् ही काही नवीन झालेली हॉटेल्स आहेत; तर दिवाडकर, लक्ष्मी, गिरीविहार, रिगल, लॉर्डस् ही जुनी आणि चांगली हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समध्ये दिवसाला रु. २०० ते रु. २००० असे दर आहेत. नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. त्याचे दर बरेच कमी आहेत. ट्रेकिंग करून येणाऱ्यांसाठी जेवणासाठी सोय दिवाडकर हॉटेल उत्तम आहे.

माथेरान रेल्वे

[संपादन]
नेरळ−माथेरान रेल्वे
नेरळ
जुम्मापट्टी
वॉटर पाईप
अमन लॉज
माथेरान

माथेरानला जी आगगाडी येते ती या ‘पेब’ आणि माथेरानच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून. या पॉईंटला वळसा घालून ती माथेरानमध्ये शिरते. लहानग्यांच्या आवडीची ही झुकझुकगाडी नेरळवरून वर चढते. २१ कि.मी.चे अंतर दोन तासांत पार करते. ह्या छोटेखानी गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे हे माथेरानच्या सहलीतले एक महत्त्वाचे आकर्षण आहे.
माथेरानच्या सौंदर्याचे, ताजेपणाचे रहस्य म्हणजे, माथेरान मध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. नेरळहून डांबरी रस्त्याने वर आले, की माऊंटबेरी पॉईंटच्या खाली असलेल्या दस्तूरी नाक्याजवळ गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य हे पर्यावरण प्रदुषणापासून सुरक्षित राहिले आहे. दस्तुरी नाक्यावरून सुमारे १.५ कि. मी. किंवा चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर मध्यभागी मार्केट आहे. आगगाडी मात्र आपल्याला सरळ मार्केट पर्यंत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही ह्या मार्केटच्या अवतीभवती आहेत. असे म्हणतात की १९०७ मध्ये ‘आदमजी पिरभॉय’ नावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही झुकझुकगाडी सुरू झाली. माथेरानमधील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे पर्यटकांवर अवलंबून असतो. इथे बहुतांशी लोक हे मराठीच आहेत.

खरेदी

[संपादन]

पर्यटकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आवकजावक होत असल्यामुळे येथील मार्केटमध्ये बऱ्याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स् आहेत. सांबराच्या कातड्याच्या वहाणा व बूट प्रसिद्ध आहेत. तसेच ‘पांढरी’ची काठीही मिळते. रस्त्यावर काही मुले छोट्या मोठ्या चपला, विविध प्रकारच्या टोप्या, शोभेच्या वस्तू, इत्यादी विकताना दिसतात. इथला मध, चिक्की, फज देखिल बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे.

वाहतूक

[संपादन]

माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

  • झुकझुकगाडीने नेरळवरून येता येते.
  • लिट्ल चौक ह्या पॉईंटच्या खालून येणारी वाट.
  • नेरळवरून सरळसरळ डांबरी रस्त्याची ८ कि. मी.ची सोपी वाट. हीच वाट मोटारींना वर नेण्यासाठी आहे.
  • कर्जतच्या दिशेने गार्बेट पॉईंटवर निघणारी १३ कि. मी.ची वाट आहे.
  • गाडेश्वर तलावावरून पनवेल, नेर, वाघाची वाडी अशा रस्त्याने येणारी वाट सनसेट किंवा पॉर्क्युपाईन पॉईंटवर येऊन मिळते. ही वाट साधारण १९ कि. मी. आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. नेरळ ते माथेरान गाडीचे वेळपत्रक.
  2. अमन लॉज ते माथेरान मिनीट्रेन पुन्हा सुरू![permanent dead link]