माझगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माझगाव

मुंबई ज्या सात बेटांची बनली त्यापैकी माझगाव हे एक बेट होते. हा विभाग आता दक्षिण मुंबईत येतो. माझगावला भायखळा (मध्य रेल्वे) स्थानक किंवा डॉकयार्ड रेल्वे (हार्बर रेल्वे) स्थानकावरून जाता येते. माझगावच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठी गोदी आहे. तेथे जहाजबाधंणी, मालाची चढ-उतार करणे वगैरे कामे चालतात.

इतिहास[संपादन]

माझगाव हे नाव मत्स्य ग्राम या संस्कृत शब्दापासून तयार झाले आहे असे म्हणतात. त्याचा अर्थ माशांचा गाव असा होतो. याचबरोबर काहीजण माझगाव हा शब्द मराठी माझं गाव ह्या शब्दापासून तयार झाला आहे असे म्हणतात. माझगाव हा शब्दाची उत्पत्ती कदाचित पोर्तुगीज भाषेतूनही झाली असावी. पूर्वी माझगाव हा विभाग आंब्याच्या झाडांसाठी फार प्रसिद्ध होता. २०व्या शतकात देखील काही आंब्याच्या खास जाती या भागात दिसून आल्या आहेत. माझगाव हे छोटेसे बेट उत्तरेकडे छोट्या छोट्या डोंगरांनी आणि बंदराकडील बाजूकडे किनाऱ्याने वेढलेले असून कोंकणाची आठवण करून देते. येथील मूळ रहिवासी हे आगरी आणि कोळी समाजाचे होते.

येथे पहिल्यांदा येऊन राहणारा हा पोर्तुगीज वंशांचा जेसुईयाटस् होता. त्यानेच १६व्या शतकात येथे एक चर्च बांधले. १५७२ मध्ये पोर्तुगालच्या राजाने हे बेट डिसोझा ई लिमा या कुटुंबाला दिले, याच मुद्द्यावर मुंबईचे डिसोझा आपली ओळख सांगत असतात. ज्यावेळेस पोर्तुगीजानी हे बेट ब्रिटिशांना दिले त्यावेळेस येथे रोमन कॅथॉलिक लोकांची बरीच मोठी लोकसंख्या होती. हे प्रामुख्याने बाटलेले मूळ हिंदू कोळी होते. तसेच काही युरोशियन्स तर काही दक्षिण आफ्रिकेतून आणले गेलेले गुलामदेखील होते. त्यांना काफिर असे म्हटले जायचे. ह्यांची लाकडाची अशी पारंपरिक घरे अजूनही दिसून येतात. ही घरे आता पूर्वांपार असा चालत आलेला खजिना म्हणून संरक्षित केलेली आहेत.

मूळचे ग्लोरिया चर्च हे नोस्सा सेन्होरा दा ग्लोरिया हे १६३२ मध्ये डिसोझा कुटुंबीयांकडून मिळालेल्या देणगीतून बांधले होते. १९११ मध्ये ते पाडण्यात आले व दोन वर्षांनी पुन्हा गॉथिक पद्धतीने मूळ चर्चपासून साधारणपणे १ किलोमीटर दूर बांधले.

माझगाव मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी राहत होता. तो १६९० मध्ये मोंगलांच्या नाविक दलामध्ये सामील झाला. त्याला एका वर्षानंतर रुस्तमजी दोराबजी ह्या पारसी माणसाने डोंगरी भागातील कोळ्यांच्या मदतीने हाकलून लावले. ह्या रुस्तमजीना त्यांच्या ह्या कामासाठी पटेल ही पदवी दिली गेली आणि त्यांचेच वारसदार पुढे पटेल नावाने ओळखले जाऊ लागले.

उमरखाडीमध्ये भराव टाकून १७ व्या शतकाच्या अखेरीस, माझगाव हे मुंबईचे दक्षिणेकडील उपनगर बनले. इतकेच नव्हे तर हा भाग म्हणजे रहिवाशांसाठी एक फॅशनेबल भाग म्हणून ओळखला जाऊ लागला. येथील नावाजलेले असे तरला नावाचे घर होते वाडिया कुटुंबाने १८ व्या शतकाच्या अखेरीस बांधले होते. ते मग जीजीभाई कुटुंबाला १०० वर्षानंतर विकण्यात आले. तेच पुढे १९२५ मध्ये कोर्टाची इमारत झाले. पुढे कोर्ट मलबार हिल येथे हलविण्यात आल्यानंतर ते घर सैन्याच्या ताब्यात आले. पुढे आग लागल्यावर त्या घराचा उपयोग १९४३पासून जे.जे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची वसाहत म्हणून वापरत होते. नंतर ते जमीनदोस्त करण्यात आले.

माझगावमध्ये इतरही बंगले आणि शेतीवाडी होती. ज्यावेळेस एक्स्प्लेनेड(?) फोर्ट विभागातून हलविण्यात आले त्यावेळेस १७६०मध्ये मुंबईच्या किल्ल्यातील शस्त्रागार हलवून ते माझगाव मध्ये आणण्यात आले. त्यामुळेच तेथील रस्त्याला गनपावडर रोड हे नाव देण्यात आले. १७९० मध्ये माझगाव गोदी बांधण्यात आली. तर १७९३ मध्ये हॉर्नबी व्हेलार्ड(आताचा हाजी अली रोड) बांधल्यानंतर, बेलासिस रोड बांधण्यात आला व माझगाव आणि मलबार हिल हे भाग जोडण्यात आले.

पुढच्या शतकामध्ये जवळचेच भायखळा हे उपनगर म्हणून उदयास आले आणि लोक तेथे स्थायिक होऊ लागले. त्यामुळे माझगावचे नशीब पालटून त्याला अवकळा आली. त्याचे आणखी एक कारण म्हणजे म्हणजे शतकाच्या अखेरच्या तीस वर्षांमध्ये पूर्वेकडे(?) असणाऱ्या गोदीची वाढ झाली आणि परळ्ला कापडाच्या गिरण्यांची संख्या वाढू लागल्याने ह्या भागातून तिकडे स्थलांतर होत गेले.

१७९९ मध्ये नवाब अवाज अली हा मैसूरच्या टिपू सुलतानचा नातेवाईक येथे स्थाईक झाला व त्याला येथेच दफन करण्यात आले.