पेण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पेण हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे. पेण हे गणपतीच्या मूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे [१]. ते रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र आहे.

इतिहास[संपादन]

पेण करणे म्हणजे मुक्काम करणे. पेणे म्हणजे मुक्कामाची जागा. सैन्याचे, व्यापारी लमाणांच्या तांडय़ाचे, घाटावरून उतरणार्‍या प्रवाशांच्या मुक्कामाचे ठिकाण म्हणून या गावाला नाव मिळाले पेण. बुद्धकाळापासून या पेणला जुन्नर - पुणे - नगर पासून माल येत असे. बंदर म्हणूनही पेण मोठे प्रसिद्ध ठिकाण होते. अंतोरे हे पेणचे तरते बंदर होते. ९ व्या ते १५ व्या शतकात पेण हे शिलाहार राजे, स्थानक राजे, यादव राजे, यांच्या अमलाखाली होते. हे गाव मोठी व्यापारी पेठ व समृध शहर म्हणून कोकणात प्रसिद्ध होते.

शिलाहार राजांच्या काळात देवीची शक्तिपूजा ही मोठी मानली जात असे. पेणची कासारआळीतील महालक्ष्मी, वाशीची अंबा, रामेश्वर मंदिरातील गावदेवी, धावटा, चौल, नागावची आक्कादेवी येथील देवीची देवस्थाने त्या काळचीच आहेत. शिवाची प्राचीन मंदिरे चालुक्यांनी व कदंबांनी बांधली. पेण शहरातील वाकेश्वर ( म्हणजेच आत्ताच वाकरूळ गाव )दांडेश्वर (रामेश्वर) व व्याघ्रेश्वर, गोटेश्वर, पाचणोलीचे पाटणेश्वर ही मंदिरे त्या काळातली आहेत. अनेक शिवमंदिरे मलिक कपूर व निजामशाही सैन्याने वेळोवेळी राजापुरीवर केलेल्या स्वारीचे वेळी पाडून मोडून टाकलेली आहेत.

पेण शहरातले गोटेश्वराचे मंदिर तर फारच भव्य होते. या मंदिरापुढे असलेल्या नंदीच्या आकारावरुन मंदिरातील शिवपिंड किती मोठी असावी याची कल्पना येते. त्या काळात हे शिवमंदिर या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. या मंदिरापुढे भव्य अशी पुष्करणी होती. या मंदिराचे आवारच ५ ते ६ एकराचे होते. या आवारात भव्य असा बगीचा होता. शाइस्तेखान पुण्याला आला असताना नामदार ताहेरखान नावाचा सरदार मिऱया डोंगरावर आपली छावणी टाकून मुक्कामाला होता. ताहेरखानाने पेणवर छापा घातला त्यात हे शिवमंदिर उध्वस्त केले. शिवाजी महाराजांनी पेणवर छापा घालण्यापूर्वी २७ फेब्रुवारी १६६२ चे सुमारास मिऱयाडोगरावर छावणी टाकलेल्या खानास व रतनगडावरील बलाकी सरदारास वेढा घातला. नेताजी पालकराने उंबरखिंडीच्या युद्धात खानाच्या सैन्याकडून जांभुळपाडय़ाचा परिसर मुक्त केला. तर शिवाजीच्या कावजी कोंडाळकराने रतनगड जिंकून बलाकी सरदारास पळविले. बारा हजार सैन्य व सातशे पायदळासह नेताजी पालकराने मिऱया डोंगराला वेढा दिला. वाघोजी तुपे, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, सचिव शंकर नारायण यांची कुमक येताच नामदार खानाचा पराभव होऊन खान पळून गेला. दुसऱया दिवशी २८फेब्रुवारी १६६२ रोजी सकाळीच शिवाजीचे हे सैन्य वाघोजी तुपे या सरदाराच्या नेतृत्वाखाली पेणच्या गढीवर चालून गेले. पेणच्या गढीला वेढा पडला. (पेणच्या मामलेदार कचेरीची जागा ही पेणची जुनी गढी होती.) गढीचा संरक्षक खानही त्वरित तयारीनिशी वाघोजी तुप्याच्या समोर तलवारीनिशी उभा राहिला. समबल असलेले दोन्ही वीर लढत होते. दोन्ही वीर जखमांनी बेजार झाले. शेवटी एका योग्य क्षणी वाघोजी तुपे यांनी खानावर जबरदस्त प्रहार करून त्यास यमसदनास पाठविले. या लढाईत वाघोजी तुपेस २७ जखमा झाल्या. या युद्धात मरण पावलेल्या मराठा सरदारांच्या समाध्या आजही मामलेदार कचेरीच्या प्रांगणात दिसतात. [२]

यानंतर, पेण मराठी साम्राज्याच्या अंतापर्यंत स्वराज्यात राहिले. पेशवेकाळात पराक्रमी सदाशिवराव भाऊंच्या पत्नी, पार्वतीबाई ह्या पेणमधील कोल्हटकर घराण्यातील होत्या [३]. स्वातंत्र्यसंग्रामातही पेणकर आघाडीवर होते. यात हुतात्मा विनायकराव कोल्हटकरांसारख्या अनेक सशस्त्र क्रांतिकारकांचाही समावेश होता.

भौगोलिक[संपादन]

१८° ४०' उ. अक्षांश व ७३° ०५' पू. रेखांशावर वसलेले पेण शहर रायगड जिल्ह्यात येते. पेणच्या पूर्वेकडील भाग डोंगराळ असून खाडीलगतचा पश्चिम विभाग वैशिष्ट्यपूर्ण 'खारेपाट' विभाग म्हणून ओळखला जातो. पेण शहराचे क्षेत्र ६.६७ चौरस मैल व तालुक्याचे क्षेत्र १९९.६ चौरस मैल इतके आहे. [४] जिते :- पनवेल मंगलूर राष्ट्रिय महामार्गवर पेण पासून उत्तरेला 10 किमीवर मुंबर्इ पासून 70 किमी तर पनवेल पासून 21 किमीवर. गावालगद उत्तरेला जिते रेल्वे स्टेशन. श्री लक्ष्मी नारायण देवस्थानची 50 वर्षे, 10 मे ते 14 मे 2013 प्रतिष्ठान महोत्सोव चे आयोजन,

अधिक वाचन[संपादन]

  • 'पेण तालुक्यातील स्वातंत्र संग्रामाचा इतिहास'; लेखक: प.रा.दाते
  • 'कर्मयोगी रामभाऊ मंडलिक'; लेखक: मा. के. सहस्रबुद्धे
  • 'पेण शहराचा इतिहास'

संदर्भ[संपादन]