खानदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खान्देश म्हणजे महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मध्य प्रदेशातील बुरहानपुर हे जिल्हे असलेला प्रदेश. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. खान्देशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.

मुघल काळात बुरहानपुर ही खान्देशची राजधानी होती. ब्रिटीश काळात बुरहानपुर जिल्ह्याचा मध्य प्रांत (central provinces) मध्ये सामाविष्ट करण्यात आला, तर उर्वरित खान्देशचा मुंबई प्रांत (Bombay Presidency) मध्ये सामाविष्ट केला गेला. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये मराठी-गुजराती द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. हे राज्य सन १९६० मध्ये भाषिक आधारावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत विभागले गेले. सध्या गुजरात मध्ये असलेला डांग या जिल्ह्यात सुद्धा खान्देशी भाषा व संस्कृती असून १९६० मध्ये त्याचे महाराष्ट्रात येणे अपेक्षित होते, परंतु त्यास गुजरात मध्ये सामाविष्ट केले गेले.

मुंबई प्रांतात एके काळी खान्देश हा जिल्हा होता जो १९०६ मध्ये पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.

खानदेश जिल्हा (१८७८)

भाषा[संपादन]

खान्देश हा विविध भाषा व बोल्यांनी समृद्ध असलेला प्रदेश असून खान्देशातील प्रत्येक बोलीवर अहिराणीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. कारणास्तव, अहिराणी ही खान्देशातील प्रमुख भाषा मानली जाते. १९७१ च्या शिरगणतीनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १० लाख झाली.

खान्देशात मुख्यतः अहिराणी, लेवा गणबोली, तावडी या बोल्या बोलल्या जातात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. लेवा बोली, गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. लेवा गण बोली ही जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटील समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे.

कृषी व खाद्यसंस्कृती[संपादन]

खानदेशातील सकस काळी माती, कोरडे हवामान नि त्याला अनुरूप पिके म्हणजे प्रामुख्याने ज्वारी, तूर, विविध भाज्या, केळी आणि कपाशी.. केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे घरी पाहुणे आले, की पंगती केळीच्या पानावरच होतात. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खानदेशी जेवण पाव्हण्यांना मिळते. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात.

खान्देशात पिकणारी भरताची वांगी[संपादन]

जळगाव येथील वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे. येथली भरताची वांगीही पोपटी, पांढरट रंगाची असून इतर वांग्यांपेक्षा चौपट मोठी असतात. त्यात बियाही कमी असतात. ही वांगी भाजून घ्यायची पद्धतही निराळी असते. वांग्यांना तेल लावून, तूर किंवा कपाशीच्या काट्यांवर वांगी भाजली जातात. निखाऱ्यावर भाजलेली वांगी बडगीत ठेचून घेतली जातात. हिरवी मिरची नि शेंगदाणा, खोबरे यांचा सढळ वापर करून बनवलेले भरीत, कळणाची भाकरी, पुरी, आमसुलाचे सार, कांद्याची पात असे सगळे साग्रसंगीत जेवण केळीच्या पानावर भारतीय बैठकीत आग्रहाने वाढले जाते. ही भरीत पार्टी वाढणाऱ्याचा नि खाणाऱ्याचा दोघांचाही आनंद द्विगुणित करते.

तसेच खान्देश मध्ये खापरची पुरी (मांडा) सुद्धा प्रसिद्ध आहे त्यालाच पुरण पोळी किंवा रस पुरी असे सुद्धा म्हणतात अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी या पदार्थांला खूप महत्त्व असते.

बहिणाबाई[संपादन]

अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके, तेव्हा मिळते भाकर...ही बहिणाबाई चौधरीची प्रसिद्ध कविता आहे.

खानदेशाची खरी ओळख सगळ्यांत आधी कवयित्री बहिणाबाईंच्या अगदी साध्या सोप्या बोलीभाषेतले पण जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या मार्मिक ओव्यांमधून होते. दर दहा कोसांवर भाषा बदलते; पण त्याच बरोबर जमीन, हवामान, पाणी यामध्येही बदल होतो. त्याचमुळे महाराष्ट्रात एकजिनसी मराठी समाज संस्कृती नांदत असली, तरी प्रत्येक भागात खाद्यसंस्कृतीमध्ये आमूलाग्र वेगळेपण जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रातही भौगोलिक वातावरण एकसारखे आढळत नाही. डोंगररांगा, नद्या आणि त्याचे खोरे, जमीन, पाऊस यामध्ये फरक दिसतो.

खान्देशातील प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

खानदेशातील प्रमुख शहरे[संपादन]

खान्देशी पुस्तके[संपादन]

  • खान्देशची सांगीतिक वाटचाल (लेखिका डॉ. संगीता म्हसकर)
महाराष्ट्र
Maha div.png
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ

संदर्भ आणि नोंदी[संपादन]