Jump to content

घोडसगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?घोडसगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२१° ०१′ २२″ N, ७६° ०८′ ५५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२.२५ चौ. किमी
• २३१ मी
हवामान
तापमान
• उन्हाळा


• ४७ °C (११७ °F)
जवळचे शहर मुक्ताईनगर, भुसावळ
जिल्हा जळगाव
लोकसंख्या
घनता
३,२८७ (२०११)
• १,४६१/किमी
भाषा मराठी
सरपंच प्र. कोल्हे
शासकीय संघटना ग्रामपंचायत
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२५३०६[१]
• +०२५८३
• एम एच १९

घोडसगाव (इंग्रजी : Ghodasgaon) हे मुक्ताईनगर तालुक्यातील एक गाव आहे.[२] हे गाव पूर्णा नदीच्या जवळ बसलेले आहे. गाव जळगाव जिल्ह्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जवळ स्तीत आहे. [३]

घोडसगावची लोकसंख्या ३२८७ आणि क्षेत्रफळ २२२७ हेक्टर आहे.[३] या गावात दोन प्राथमिक मराठी शाळा व एक कनिष्ठ विद्यालय आहे. हे गाव पुर्वी पूर्णा नदीच्या काठी बसलेले होते, १९५९ ला गावाच्या परिसरात भीषण पुर आला होता, त्यावेळेस अनेक लोकांनी गाव सोडले व ते गावापासून 3 किमी वर असलेल्या टेकड्यांवर येऊन स्थायिक झाले, नंतर जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदीकाठच्या गावांचे पुनर्वसन केले व उर्वरित नागरिकांनी सुध्धा शासनाने नियुक्त केलेल्या गावाच्या जागेवर १९९०-२०१० च्या दशकात स्थलांतरण केले, जेथ आता वर्तमानात घोडसगाव बसलेल आहे.

लोकसंख्येची तुलना केली असता लोकसंखेमध्ये घोडसगावचा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ५ वा क्र. लागतो.[३]

उन्हाळ्यात या गावाचे तापमान मे मध्ये ४७-४८ ° से पर्यंत वाढते, त्यामुळे येथे उन्हाळा अती उष्ण असतो.

पूर्णा नदी, घोडसगाव (मे २०२१)

इतिहास[संपादन]

घोडसगाव पुर्वी पूर्णा नदीच्या काठी बसलेले होते, १९५९ ला महापुरात संपूर्ण गाव बुडाले होते, त्यामुळे अनेक नागरिकांनी गावाजवळ असलेल्या झाडांवर चढून स्वतःचे रक्षण केले होते, ते काही रात्री आणि दिवस या झाडांवरच होते, पाणी कमी झाल्यानंतर ते गावात परतले होते. या पुराच्या वेळेला शेकडो लोकांनी गाव सोडले व गावा पासून ३ मैल अंतरावर असलेल्या टेकड्यांवर गाव बसवले. या गावाला स्थानिक भाषेत "बरड" असे संबोधले गेले.

हतनूर धरण बांधले गेल्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रात वाढ झाली होती तसेच पावाळ्यात वारंवार पुराचा धोका जुन्या घोडसगावला उद्धभवायचा, त्यामुळे १९८०/१९९० च्या दशकात जिल्हा प्रशासनाने या गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला. १९९०-२०१० च्या वर्षात जवळ जवळ सर्वच नागरिकांनी शासनाने नियुक्त केलेल्या जागे वर स्थलांतरण केले, ही नवी जागा १९५९ मध्ये बसलेल्या गावा जवळ होती, तेथे आता घोडसगाव बसलेले आहे.

श्री. विठोबा लक्ष्मण धायडे हे घोडसगावचे पहिले सरपंच होते.

१९०५ पर्यंत हे गाव खान्देश जिल्हात होते, उल्लेख केलेल्या वर्षी तत्कालीन इंग्रज सरकारने खानदेश जिल्हाचे विभाजन केले व पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश हे दोन जिल्हे अस्तित्वात आले. त्यावेळेला घोडसगाव पूर्व खानदेश जिल्यात आले. १९६० ला महारष्ट्र राज्य बनल्यानंतर पूर्व खानदेशचे नामांतर जळगाव जिल्हा करण्यात आले.

हे गाव १९५१ पर्यंत बॉम्बे प्रेसिडेन्सी या राज्यात होते. १९५० च्या दशकात भारत सरकारने, बॉम्बे राज्याची स्थापना केली तेव्हा गाव या राज्यात होते. १९६० ला मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तीतवात आले.

भारत सरकारने सन १९८१ मध्ये घेतलेल्या जनगणनेनुसार, १९८१ मध्ये घोडसगावची लोकसंख्या २११४ होती.[४] १९९१ च्या जनगणनेनुसार १९९१ ला या गावाची लोकसंख्या २५०८ होती.[५] २००१ मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा या गावाची लोकसंख्या २९३४ भरली.[६] १९८० च्या दशकात गावात वीज आली. १९९० च्या दशकात गावात ८ वी पर्यंत मराठी शाळा होती, या शाळेचे नाव 'केंद्रीय पूर्ण प्राथमिक शाळा' होते नंतर येथे वर्ग कमी करण्यात आले आणि ४ थी पर्यंत ठेवण्यात आले.

अंदाजे १९८० च्या दशकाच्या अखेरीस जुन्या घोडसगावात विद्यालय स्थापन झाले.

भूगोल[संपादन]

घोडसगाव जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आहे आणि राष्ट्रीय महामार्ग ५३ जवळ स्तीत आहे.[७] घोडसगाव समुद्र सपाटिपासुन २३१ मिटर उंचीवर वसलेले आहे.

या गावाचे दोन भाग आहेत आणि हे भाग गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ ने विभागलेले आहेत. १९५९ ला महापुरा नंतर बसलेले गाव हे महामार्गाच्या पश्चिम दिशेला आहे आणि त्याला पुर्वी "बरड" म्हणत आता त्याला घोडसगाव (नवे) म्हणून सुध्धा ओडखले जाते तर १९९०-२०१० या काळात पूर्णा नदी काठच्या पुनर्वसन झालेल्या गावाला घोडसगाव पुनर्वसन, घोडसगाव (जुने) म्हणून संबोधले जाते, ते राष्ट्रीय महामार्ग जवळ पूर्व दिशेला बसलेले आहे. घोडसगाव (नवे) पेक्षा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या मानाने घोडसगाव (जुने) हे मोठे आहे.

कृषी क्षेत्रात ऊस, गहु, कापुस, हरभरा आणिज्वारी या पिकांची येथे मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते. मोठया प्रमाणात शेती येथे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. येथे शेतकरी दोन हंगाम घेतात - खरीप आणि रब्बी.

पूर्णा नदी येथे पाण्याचा मुख्य स्रोत आहे, ही नदी गावापासून अंदाजे ३ मैल अंतरावर आहे. गावाच्या परिसरात 'मुरूम तसेच गारा' हे गौन खनिजे सापडतात. घोडसगाव जवळील मोठ शहर हे भुसावळ आहे ते येथून अंदाजे ४० किमी अंतरावर आहे तसेच लहान शहर मुक्ताईनगर येथून १० किमी अंतरावर आहे. शासकीय कामांसाठी नागरिकांना मुक्ताईनगरला जावे लागते.

पूर्णा नदी, घोडासगाव (मे २०२१)

घोडसगावच्या पश्चिमेस सतोड, ढोरमाळ, रुईखेडा, तरोडा ही गावे आहेत तर उत्तर-पश्चिमेस पिंप्री आकराउत आणि मुक्ताईनगर आहे, उत्तरेला डोलारखेडा गाव आहे. गावाच्या उत्तरेला पूर्णा नदी पूर्व दिशेकडून पश्चिमदिशेकडे वाहते तसेच याच दिशेला सातपुडा पर्वत सुद्धा आहे, जो महाराष्ट्र राज्यआणि शेजारील मध्यप्रदेश मधील भौगोलिक सीमा आहे.[३]

घोडसगाव शेतातील वांन्हेर (माकड)
घोडसगाव जवळ शेतात टिपलेले एका वानराचे छायाचित्र.

या गावाच्या जंगलात बाभूळ, निंब, चिंचची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. गावात आणि आजुबाच्या परिसरात कावळा, पोपट, बगळे आणि चिमण्या हे पक्षी आणि उंदीर, मुंगुस, घोरफोड, कुत्रे, मांजर, माकड (स्थानिक भाषेत यांना "वांन्हेर" म्हणतात) आणि बिबट्या[८] इत्यादी प्राणी आढळतात. घोडसगावच्या शेतांतील क्षेत्रात जंगली डुक्कर, विविध प्रकारचे साप, ससे, हरीण हे प्राणी आढळतात. उत्तरेकडील गावा जवळच्या जंगलात अनेक वाघ असल्याचे अनेक वेळेस निदर्शनास आलेले आहे, हा उत्तरेकडील भाग डोलारखेडा गावाच्या वनक्षेत्राशी जुळलेला आहे, येथे हरीन हा दुर्मिळ प्राणी आढळतो. [९]

२०११ च्या जनगणनेनुसर घोडसगावची एकूण लोकसंख्या ३२८७ आहे, गावात १५९० महिला आहेत तर १६९७ पुरुष आहेत. येथे ९६६ नागरिक निरक्षर आहेत, यामध्ये महीलांचे प्रमाण अधिक आहे, ५८९ महिला निरक्षर आहेत, ३७७ पुरुष अशिक्षित आहेत. येथे ५८८ नागरिक शेतकरी आहेत.[३]

या गावापासून जवळचे रेल्वे स्थानक 'भुसावळ रेल्वे स्थानक' आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ ' जळगाव विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगर जील्हातील 'औरंगाबाद विमानतळ' येथे आहे.

शिक्षण व्यवस्था[संपादन]

घोडसगावात दोन प्राथमिक शाळा (शासकीय) आहेत आणि एक विद्यालय आहे. दोन्ही शाळांमध्ये पहिली ते चवथी पर्यंतचे वर्ग आहेत आणि विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. दहावी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्याना मुक्ताईनगरला जावे लागते.

प्रशासन[संपादन]

घोडसगावातील शासन ' घोडसगाव ग्रुप ग्रामपंचायतद्वारे' होते. प. कोल्हे बाई या गावाच्या विद्यमान सरपंच आहे. हे गाव मुक्ताईनगर विधानसभा आणि रावेर लोकसभा क्षेत्रात आहे.

गावात २४ घंटे विजेची उपलब्ध असते परंतु शेतीसाठी लोडशेडींगमूळे नेहमी वीज उपलब्ध नसते. येथे वीज विभाग काही दिवस रात्री तर काही दिवस दिवसा वीज देतो. २४ घंटे शेतीसाठी वीज उपलब्ध नसल्यामुळे येथे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, अशी ग्रामस्थांची तक्रार असते.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Maharashtra Latest News,Maharashtra Breaking News Headlines". India TV News.
  2. ^ "मुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ कंटेनरने कामगाराला चिरडले". Lokmat. 26 फेब्रु, 2018. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b c d e District census handbook Jalgaon. Maharashtra: Director of census operation Maharashtra. 2014. p. 178.
  4. ^ District census handbook Jalgaon. India: Government of Maharashtra/India.
  5. ^ District census handbook Jalgaon. Maharashtra. 1991.
  6. ^ District census handbook Jalgaon Part A (PDF). Series 28. India: Maharashtra government. 2001.
  7. ^ "नकली हिर्ऱ्यांचे गाव ,त्याचे नाव घोडसगाव". जळगाव , महाराष्ट्र.: लोकमत. २०१७. pp. १.
  8. ^ a b "आढावा बैठक:शेतकरी, पशुधनावरील वन्यप्राण्यांचे हल्ले रोखा; त्वरित उपाययोजना करा, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वन विभाग अधिकाऱ्यांना सूचना". महाराष्ट्र: दिव्य मराठी. २०२२. 26 April 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "वाघांचे अस्तित्त्व सुखावणारे!". मुंबई: महाराष्ट्र टाइम्स. 2014.