शोभा गुर्टू
शोभा गुर्टू | |
---|---|
शोभा गुर्टू | |
उपाख्य | ठुमरी सम्राज्ञी |
आयुष्य | |
जन्म | फेब्रुवारी ८, इ.स. १९२४ |
जन्म स्थान | बेळगाव, कर्नाटक भारत |
मृत्यू | सप्टेंबर २७, इ.स. २००४ |
मृत्यू स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
आई | मेनकाबाई शिरोडकर |
जोडीदार | विश्वनाथ गुर्टू |
अपत्ये | नरेंद्र गुर्टू त्रिलोक गुर्टू |
संगीत साधना | |
गुरू | उस्ताद अल्लादिया खान उस्ताद भुर्जी खान , घम्मन खान, |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
घराणे | जयपूर घराणे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
पुरस्कार | पद्मभूषण पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार |
शोभा गुर्टू (फेब्रुवारी ८, इ.स. १९२५ - सप्टेंबर २७, इ.स. २००४) ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते.
पूर्वायुष्य
[संपादन]शोभा गुर्टूंचे लग्नाअगोदरचे नाव भानुमती शिरोडकर. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यात बेळगाव येथे इ.स. १९२५ मध्ये झाला. संगीताचे प्रारंभिक शिक्षण त्यांना आपली आई व नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांचेकडून मिळाले. मेनकाबाईंनी गाण्याचे शिक्षण जयपूर घराण्याच्या उस्ताद अल्लादिया खान यांचेकडून घेतले होते.
शोभाताईंचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण त्या लहान असतानाच उस्ताद भुर्जी खान यांचेकडे सुरू झाले. ते उस्ताद अल्लादिया खानांचे धाकटे सुपुत्र होत. शोभाताईंची ग्रहणशक्ती व प्रतिभा यांमुळे भुर्जी खानांच्या कुटुंबाने ह्या मुलीस आपल्या परिवाराचा जणू हिस्साच बनविले. नंतर त्या उस्ताद नथ्थन खानांकडे संगीत शिकू लागल्या. उस्ताद घम्मन खान हे शोभाताईंच्या आईला, मेनकाबाईंना त्यांच्या मुंबई येथील घरी ठुमरी - दादरा व इतर उपशास्त्रीय संगीताचे प्रकार शिकवायला यायचे. त्यांच्याकडेही शोभाताई संगीत शिकल्या.
सांगीतिक कारकीर्द
[संपादन]ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती इत्यादी उपशास्त्रीय संगीत प्रकार हे शोभाताईंची खासियत होते. आपल्या गायनात शास्त्रीय संगीतातील आलापी त्या खुबीने वापरत असत. गायिका बेगम अख्तर व उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. शोभाताईंच्या ठुमरी गायनाचे असंख्य चाहते होते. त्यांनी मराठी व हिंदी भाषा चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी सर्वप्रथम ज्या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले तो म्हणजे कमाल अमरोहींचा पाकिजा (१९७२) होय. फागुन (१९७३) मध्ये त्यांनी 'बेदर्दी बन गए कोइ जाओ मनाओ सैंयां' हे गीत गायले. मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) साठी त्यांनी गायलेल्या 'सैंया रूठ गए' गाण्याबद्दल त्यांना फिल्मफेअरचे उत्कृष्ट पार्श्वगायिकेचे नामांकन मिळाले होते. 'सामना' व 'लाल माती' ह्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. गझल, मराठी नाट्य संगीत या गायन प्रकारांतही त्यांनी श्रोत्यांची दाद मिळविली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.
आपल्या कारकिर्दीत शोभाताईंनी संगीत कार्यक्रमांसाठी देशोदेशी दौरे केले. आपला मुलगा त्रिलोक गुर्टू यांच्या जाझ संगीताच्या ध्वनिमुद्रिकांसाठीही त्या गायल्या आहेत. इ.स. २००० मध्ये भारताच्या गणराज्याला पन्नास वर्षे झाल्याप्रीत्यर्थ भारतातील मान्यवर गायक व संगीतज्ञांच्या गटाने एकत्रितपणे गायलेले 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत गाण्याचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला. हे राष्ट्रगीत त्यानंतर वर्षभर दूरदर्शनवर रोज प्रसारित होत असे.
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]शोभाताईंचा विवाह विश्वनाथ गुर्टू यांच्याशी झाला होता. त्यांचे सासरे 'पंडित नारायण नाथ गुर्टू' हे बेळगावातील उच्चपदस्थ पोलीस ऑफिसर, विद्वान व सतार वादक होते. शोभाताईंच्या नरेंद्र व त्रिलोक ह्या दोन मुलांपैकी त्रिलोक हे वाद्यमेळकार (पर्कशनिस्ट) आहेत.
पाच तपांपेक्षाही अधिक काळ ठुमरी विश्वाचे सम्राज्ञीपद भूषविलेल्या शोभाताईंचे २७ सप्टेंबर, इ.स. २००४ रोजी मुंबई येथे निधन झाले.
पुरस्कार व सन्मान
[संपादन]- संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९८७.
- पद्मभूषण पुरस्कार, इ.स. २००२
बाह्य दुवे
[संपादन]- आयटीसी संगीत संशोधन संस्थेचे संस्थळ(इंग्लिश मजकूर)
- रिडिफ न्यूझ (इंग्लिश मजकूर)
- इंडिया टुडे (इंग्लिश मजकूर)
- शोभा गुर्टू श्रद्धांजली लेख (इंग्लिश मजकूर)