बेगम अख्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अख्तरी बाई फैझाबादी
उपाख्य बेगम अख्तर
आयुष्य
जन्म ७ ऑक्टोबर १९१४
जन्म स्थान लखनौ
मृत्यू ३० ऑक्टोबर १९७४
मृत्यू स्थान अहमदाबाद
संगीत साधना
गायन प्रकार गझल, ठुमरी, दादरा
संगीत कारकीर्द
पेशा गायिका

अख्तरी बाई फैझाबादी तथा बेगम अख्तर (७ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - ३० ऑक्टोबर, इ.स. १९७४) या भारतीय शास्त्रीय गायिका तसेच गझल, दादरा आणि ठुमरी गायिका होत्या. त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गझलगायकीमुळे मलिका-ए-गझल म्हणण्यात येत असे.[१] त्यांना संगीत-नाटक-अकादमी-पुरस्कार, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुस्कार लाभले होते.

जन्म व बालपण[संपादन]

अख्तरीबाईंच्या बालपणाविषयी विविध मतांतरे आहेत.[१] त्यांपैकी प्रचलित उल्लेखांनुसार अख्तरीबाईंचा जन्म मुश्तरी बेगम ह्या कलावंतिणीच्या पोटी झाला. त्यांना एक जुळी बहीण होती. तिचे नाव अन्वरी असे होते. मात्र ती वयाच्या तिसऱ्या वर्षी वारली. अख्तरीबाईंचे वडील हे लखनौमधील ख्यातनाम वकील होते. मात्र अख्तरीबाईंचा व त्यांचा फारसा संबंध आला नाही. अख्तरीबाईंचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले.[१] अख्तरीबाईंचे बालपण गुलाबबारी, फैजाबाद येथे गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती.[१]

संगीतशिक्षण[संपादन]

वयाच्या सातव्या वा आठव्या वर्षापासून अख्तरीबाईंचे संगीतशिक्षण सुरू झाले. सारंगीवादक इमाद खॉं हे त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्याकडील अख्तरीबाईंचे शिक्षण सहा महिन्यांतच संपुष्टात आले. त्यांचे नंतरचे शिक्षण पतियाळा घराण्याच्या अता मोहोम्मद खॉं ह्यांच्याकडे सुरू झाले. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे शिष्य गुरूकडे राहून शिकत असत. पण अख्तरीबाईंचे गाणे ऐकून ते त्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवण्यास तयार झाले. अता मोहोम्मद खॉं ह्यांच्याकडून अख्तरीबाईंना ख्यालगायकीचे शिक्षण मिळाले. पण त्यांचा कल शास्त्रीय गायकीपेक्षा ठुमरी, दादरा आणि गझल ह्यांत आहे हे लक्षात आल्यावर तसे शिक्षण त्यांना देण्याविषयी अता मोहोम्मद खॉं ह्यांनी मुश्तरीबाई ह्यांना सुचवले.[१]

पहिला कार्यक्रम[संपादन]

१९३४ साली कोलकाता येथील आल्फ्रेड थिएटर येथे बिहारच्या भूकंपग्रस्तांसाठी निधी जमवण्यासाठी आयोजित केलेल्या संगीतमहोत्सवात महत्त्वाचे गायक न आल्याने अख्तरीबाईंना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांना लोकांची चांगली दाद मिळाली.[१]

चित्रपटांतील अभिनय[संपादन]

नंतर अख्तरीबाईंना नाटकांत तसेच चित्रपटांत अभिनय करण्याची संधी मिळाली. एक दिन का बादशाह (१९३३), नलदमयंती (१९३३), मुमताझ बेगम (१९३४), अमीना (१९३५), नसीब का चक्कर (१९३५), आणि जवानी का नशा (१९३५) अशा विविध चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.[१]

ध्वनिमुद्रणे, संगीतशिक्षण व यश[संपादन]

मेगाफोन कंपनीने अख्तरीबाईंच्या ध्वनिमुद्रिका १९३३ पासून काढल्या असल्या तरी १९३८च्या दीवाना बनाना है तो दीवाना बना दे ह्या गझलेमुळे त्यांना अमाप लोकप्रियता लाभली. चित्रपटकारकीर्दीमुळे अख्तरीबाईंच्या संगीतशिक्षणात खंड पडला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा संगीतशिक्षण घेण्याचे ठरवले. किराणा घराण्याच्या उस्ताद अब्दुल वहीद खॉं ह्यांच्याकडे शिक्षण घ्यायला प्रारंभ केला. ह्याच काळात अख्तरीबाईंच्या गाण्याला विविध संस्थानांतील संस्थानिकांकडून दाद मिळू लागली. १९४४मध्ये अख्तरीबाईंनी लखनौमधील बॅरिस्टर इश्तियाक अहमद अब्बासी ह्यांच्याशी विवाह केला. त्यायोगे त्यांना हवी असलेली सामाजिक प्रतिष्ठा त्यांना मिळाली. १९४८मध्ये अख्तरीबाईंना लखनौमध्ये ऑल इंडिया रेडियोवर गाण्याची संधी मिळाली. लवकरच त्या रेडियोवर गायिका म्हणून अ-दर्जा मिळाला.[१]

संदर्भ[संपादन]


संदर्भसूची[संपादन]

  • "बेगम अख्तर ह्यांचे चरित्र" (इंग्लिश भाषेत). १६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)