पंडित रविशंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंडित रविशंकर
Ravi Shankar 2009 crop.jpg
पंडित रविशंकर
जन्म नाव रवीन्द्र श्याम शंकर चौधरी
टोपणनाव रबू
जन्म एप्रिल ७, इ.स. १९२०
वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू डिसेंबर ११, इ.स. २०१२
सॅन डियेगो अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत
संगीत प्रकार सतारवादन
वाद्ये सतार
कार्यकाळ इ.स. १९३९-इ.स. २०१२
प्रभाव जॉर्ज हॅरिसन
वडील श्याम शंकर
आई हेमांगिनी
पत्नी अन्नपुर्णादेवी
अपत्ये अनुष्का शंकर
पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार, पद्मभूषण(१९८१), भारतरत्न(१९९९)
संकेतस्थळ http://ravishankar.org/
१९८८ मधे एका कार्यक्रमातील भावमुद्रा

पंडित रविशंकर (जन्म एप्रिल ७, इ.स. १९२०, मृत्यु- डिसेंबर ११, इ.स. २०१२), हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे सतारवादनातील सद्यकालीन श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील माइहार घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे गिनेस रेकॉर्ड (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) त्यांच्या नावावर आहे.

बालपण[संपादन]

रवीन्द्र शंकर यांचे (घरातील टोपण नाव - रबू) मूळ गाव बांग्लादेशाच्या नडाइल जिल्ह्याच्या कालिया तालुक्यात आहे. त्यांचा जन्म भारतातील काशी शहरात झाला. वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमांगिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले.

संगीत जीवन[संपादन]

१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचित झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले.

१९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,धरती के लालनीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहाँसे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.

इ.स. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. इ.स. १९५० ते इ.स. १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपू त्रयी - (पथेर पांचाली, अपराजितअपूर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले.

इ.स. १९६२ साली पंडित रवि शंकर यांनी किन्नर स्कूल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिक, लॉस ॲन्जेलिस स्थापन केली.

आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात[संपादन]

रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जॅझ, आणि अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसंगीत अशा विविध प्रवाहांवर काम केले.

इ.स. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर इ.स. १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत अनेक कार्यक्रम केले. यांत एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.

इ.स. १९६५ साली बीटल्सपैकी एक, जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरुवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थापित झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढण्यास मदतरूप ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवि शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रविउ शंकरांनी मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, कॅलिफोर्निय़ा आणि १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यांत सहभाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.

इ.स. १९७१ सालच्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामास पाठिंबा दर्शविणाऱ्या जॉर्ज हॅरिसन आयोजित न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध कन्सर्ट फॉर बांग्लादेश या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली.

पाश्चात्य संगीतविश्वातील विख्यात असामी व व्हायोलिनवादक यहुदी मेनुहिन यांच्या सोबत केलेले सतार-व्हायोलिन काँपोझिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी नेन ठेवले. त्यांचे आणखी एक विख्यात काँपोझिशन म्हणजे जपानी बासरी साकुहाचीचे प्रसिद्ध वादक ज्यँ पियेरे रामपाल, गुरु होसान यामामाटो व कोटो (पारंपारिक जपानी तंतुवाद्य - कोटो)चे गुरू मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे काँपोझिशन. १९९० सालचे विख्यात संगीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना पॅसेजेस ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय रचना. २००४ साली पंडित रवि शंकर हे फिलिप ग्रासच्या ओरायन रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते.

पुस्तके व रचना[संपादन]

 • २००३ सालपर्यंत ६० टी म्युझिक आल्बम
 • रागा (१९७१) हॉवर्ड वर्थ दिग्दर्शित चित्र
 • राग अनुराग (बंगाली पुस्तक)
 • राग माला (१९६७), (जॉर्ज हॅरिसन संपादित आत्मचरित्र) (इंग्रजी)
 • म्युझिक मेमरी (१९६७) (इंग्रजी)
 • माय म्युझिक , माय लाइफ (१९६८), (आत्मचरित्र) (इंग्रजी)
 • लर्निंग इंडियन म्युझिक - ए सिस्टिमॅटिक ॲप्रोच (१९७९) (इंग्रजी)

पुरस्कार व सन्मान[संपादन]

 • १९६२ साली भारतीय कलेचे सर्वोच्च सन्मान पदक राष्ट्रपती पदक;
 • १९८१ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण;
 • १९८६ साली भारताच्या राज्यसभेचे सदस्यत्व ;
 • १९९१ साली फुकोदा एशियन कल्चरल प्राइझेस ;
 • १९९८ साली स्वीडनचा पोलर म्युझिक प्राइज (रे चार्ल्‌स सोबत)
 • भारत सरकारकडून पद्मविभूषण
 • भारत सरकारकडून देशिकोत्तम
 • १९९९ साली भारत सरकारकडून भारतरत्न;
 • २००० साली फ्रेन्च सर्वोच्च नागरी सन्मान लिजियन ऑफ अनार;
 • २००१ साली राणी दुसरी एलिजाबेथ यांच्याकडून ऑनररी नाईटहूड;
 • २००२ साली भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सचे लाइफ टाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड;
 • २००२ चे २ ग्रॅमी पुरस्कार;
 • २००३ साली आय.ई.एस.पी.ए. डिस्टिंगविश्ड आर्टिस्ट ॲवार्ड, लंडन;
 • २००६ साली फाउंडिंग ॲम्बॅसेडर फॉर ग्लोबल एमिटि ॲवॉर्ड, स्यान डियेगो स्टेट विद्यापीठ;
 • एकूण १४ सन्माननीय डी.लिट्. पदव्या;
 • मॅगसेसे पुरस्कार, मनिला, फिलिपाइन्स;
 • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून ग्लोबल ॲम्बॅसेडर ही उपाधी.


संदर्भ[संपादन]

हेही पाहा[संपादन]