वेरूळ लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेरूळ (लेणी) या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg
कैलास मंदिर
लेणे क्र. १० स्तूपातील बुद्धमूर्ती

वेरूळ लेणी (Ellora Caves) औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावरील जगप्रसिद्ध लेणी आहे. वेरूळ परिसरात प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. सह्याद्रीच्या सातमळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात कोरलेल्या या लेण्यांचे खोदकाम साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात पूर्ण झाले असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी या ठिकाणी एकत्र पहावयास मिळतात. वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागनी केली जाते. इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले.

अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर शैव संपद्रायाचा प्रभाव आहे.[ संदर्भ हवा ] या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय. `आधी कळस, मग पाया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.

भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं लक्षणीय आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत.जगभरातील लाखो पर्यटक या लेण्यांना भेट देतात.

दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.

युनायटेड नेशन्सने १९८३मध्ये वेरूळ लेणी ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.

चित्रदालन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg