वंचित बहुजन आघाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वंचित बहुजन आघाडी
Flag of the Vanchit Bahujan Aghadi.png
पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर
स्थापना २० मे २०१८
राजकीय तत्त्वे संविधानवाद, आंबेडकरवाद, सामाजिक न्याय, सामाजिक समता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, पुरोगामीत्व
संकेतस्थळ www.joinvba.com

वंचित बहुजन आघाडी (संक्षिप्त: वंबआ, व्हीबीए) हा २० मे २०१८ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. १५ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीस महाराष्ट्रातील नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली.[१] प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत सहभागी आहेत.[२] या पक्षाने एआयएमआयएम पक्षांसह १७व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर एआयएमआयएम उमेदवार उभा होता तर इतर ४७ जागांवर वंबआचे उमेदवार उभे होते.[३][४] या युतीतील, एकमेव एआयएमआयएमचा उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला तर वंबआचे संपूर्ण ४७ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये वंबआ व एआयएमआयएम ने एकत्रित ४१,३२,२४२ (७.६४%) मते मिळवली.

तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.[५][६] तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव म्हणून सागर डबरासे कार्य करीत आहेत.[७]

इतिहास व पार्श्वभूमी[संपादन]

इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.[८] हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता.[९] आंबेडकरांनी पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेतले. १९९९ ते २०१४ पर्यंतच्या सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.[१०]

२०१४ मध्ये झालेल्या १६व्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर राज्यात २३ उमेदवार उभे केले होते, मात्र सर्वांचा पराभव झाला. त्यांना एकत्रित ३,६०,८५४ (०.७%) मते मिळाली होती.[११] २०१४ मध्ये झालेल्या १३व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर ७० उमेदवार उभे केले होते, मात्र त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाला. सर्व उमेदवारांना एकत्रित ४,७२,९२५ (०.९%) मते मिळाली होती.[१२]

१ जानेवारी २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या. सध्या बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.[१३] जून २०१८ मध्ये, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर २० मे २०१८ रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. १५ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने भारतातील नोंदणीकृत पक्षांची यादी जाहीर केली त्यानुसार वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली आहे, आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.[१४] वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापुरात झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एआयएमआयएम ला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी एआयएमआयएम चे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि एआयएमआयएम पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला.[१५] आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.[१६]

२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परिषद झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाणे आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.[१७] या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एआयएमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.[१८] "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.[१९]

१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.[२०][२१][२२][२३][२४]

२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठीच्या जागा वाटपावरुन वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात मतभेद झाला आणि सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांची युती तुटली.[२५][२६]

उमेदवारी[संपादन]

१७वी लोकसभा निवडणूक, २०१९[संपादन]

मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या जातीचा किंवा धर्मांचा उल्लेख करण्यात आलेला होता. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लिम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, आगरी, शिंपी, लिंगायत आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठ्यांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही पद्धत कोणताच पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.[३][२७] प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.[२८] महाराष्ट्रातील २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी औरंगाबाद मतदारसंघाच्या एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.[२९] त्यापैकी एआयएमआयएम चा एकमेव उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला तर वंबआचा कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली आहेत.[३०]

भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएम च्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तर ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.[३१]

लोकनिती-सीएसडीएस संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बौद्ध धर्मीयांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला तर मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा काँग्रेसला होता. महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम मते ८७% काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, १२% भाजप-शिवसेना युतीला व १% वंबआ-एआयएमआयएम युतीसह इतर पक्षांना मिळाली. बौद्ध मते ८१% वंचित बहुजन आघाडीला, १२% काँग्रेस आघाडीला, व ७% भाजप-सेना युतीला मिळाली.[३२]

उमेदवारांची यादी[संपादन]

सतरावी लोकसभा, २०१९ मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
अ.क्र. मतदारसंघ उमेदवार निकाल मिळालेली मते
अकोला प्रकाश आंबेडकर पराभूत २,७८,८४८
सोलापूर प्रकाश आंबेडकर पराभूत १,७०,००७
नांदेड यशपाल भिंगे पराभूत १,६६,१९६
धुळे नबी अहमद अहमदुल्ला पराभूत ३९,४४९
अमरावती गुणवंत देवपारे पराभूत ६५,१३५
सांगली गोपीचंद पडळकर पराभूत ३,००,२३४
बुलढाणा बळीराम सिरस्कार पराभूत १,७२,६२७
लातूर राम गारकर पराभूत १,१२,२५५
बीड विष्णू जाधव पराभूत ९२,१३९
१० परभणी आलमगीर खान पराभूत १,४९,९४६
११ नाशिक पवन पवार पराभूत १,०९,९८१
१२ मावळ राजाराम पाटील पराभूत ७५,९०४
१३ उस्मानाबाद अर्जुन सलगर पराभूत ९८,५७९
१४ हिंगोली मोहन राठोड पराभूत १,७४,०५१
१५ माढा विजय मोरे पराभूत ५१,५३२
१६ कोल्हापूर अरुणा माळी पराभूत ६३,४३९
१७ नंदुरबार दाजमल गजमल मोरे पराभूत २५,७०२
१८ रामटेक किरण रोडगे पराभूत ३६,३४०
१९ नागपूर सागर डबरासे पराभूत २६,१२८
२० रत्नागिरी-सिंधुदुर्ग मारुती रामचंद्र जोशी पराभूत ३०,८८२
२१ यवतमाळ-वाशिम प्रवीण पवार पराभूत ९४,२२८
२२ जालना शरदचंद्र वानखेडे पराभूत ७७,१५८
२३ दिंडोरी बापू केळू बरडे पराभूत ५८,८४७
२४ पुणे अनिल जाधव पराभूत ६४,७९३
२५ बारामती नवनाथ पडळकर पराभूत ४४,१३४
२६ शिर्डी संजय सुखदान पराभूत ६३,२८७
२७ अहमदनगर सुधाकर आव्हाड पराभूत ३१,८०७
२८ सातारा सहदेव एवळे पराभूत ४०,६७३
२९ हातकणंगले असलम बादशाहजी सय्यद पराभूत १,२३,४१९
३० शिरूर राहुल ओव्हाळ पराभूत ३८,०७०
३१ चंद्रपूर राजेंद्र महाडोळे पराभूत 112079
३२ गडचिरोली-चिमूर रमेश गजबे पराभूत 111468
३३ जळगाव अंजली बाविस्कर पराभूत 37366
३४ रावेर नितीन कांडेलकर पराभूत 88365
३५ वर्धा धनराज वंजारी पराभूत 36340
३६ भंडारा-गोंदिया एन.के. नान्ह पराभूत 45842
३७ पालघर सुरेश अर्जुन पडवी पराभूत 13728
३८ भिवंडी ए.डी. सावंत पराभूत 51455
३९ कल्याण संजय हेडावू पराभूत 65572
४० ठाणे मल्लिकार्जुन पुजारी पराभूत 47432
४१ उत्तर मुंबई सुनील उत्तम थोरात पराभूत 15651
४२ वायव्य मुंबई संभाजी शिवाजी काशीद पराभूत
४३ ईशान्य मुंबई नीहारिका खोंडले पराभूत 68239
४४ उत्तर मध्य मुंबई अब्दुल रहमान पराभूत 33703
४५ दक्षिण मध्य मुंबई संजय भोसले पराभूत 63412
४६ दक्षिण मुंबई अनिल कुमार पराभूत 30348
४७ रायगड सुमन कोळी पराभूत 23196

विधानसभा निवडणूक, २०१९[संपादन]

वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची उमेदवारी देताना ओबीसी, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम व अल्पसंख्य समाजाला प्राधान्य दिले आहे. 

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी बहुतेक मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूका लढवत आहेत, काही मतदारसंघात उमेदवारांचे कागदोपत्री अर्ज बाद झाले आहेत. या विधानसभा निवडणूकीत पक्षाने मराठा समाजाचे १८ उमेदवार दिले आहेत. १८ टक्के उमेदवार भटके-विमुक्त (एनटी) जात गटातील दिले असून त्यात बंजारा, वंजारी आणि धनगर या जातींना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जातीचे (एससी) ५० उमेदवार (१७ टक्के) आहेत; यापैकी ४२ उमेदवार बौद्ध समाजाचे आहेत. तर ८ उमेदवार हे चांभार, मोची, मांग आणि ढोर अशा जातीचे आहेत. इतर मागास (ओबीसी) गटाला वंचितने चांगले प्रतिनिधित्व दिले असून वंचितच्या यादीत ३२ उमेदवार (११ टक्के) ओबीसी आहेत. त्यात हलबा कोष्टी, माळी, सोनार, कुणबी, लेवा पाटील या छोट्या जातींच्या बहुसंख्य उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने २५ उमेदवार (९%) मुस्लिम धर्मीय दिले आहेत. त्यातही मुस्लिमांतील शिकलगार, धोबी, पटवे अशा मागासवर्गीय जातगटातील उमेदवारांना वंचितने प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राज्यात असलेल्या २५ राखीव मतदारसंघांत वंचितने उमेदवार (९ टक्के) दिले आहेत. आदिवासींतील माना, गोंड, गोवारी या लहान जमातींना वंचितने उमेदवारीत प्रतिनिधित्व दिलेले आहे. पक्षाने २५ उमेदवार (९%) धनगर समाजाचे दिले आहेत. वंचितने एक ख्रिस्ती, एक शीख, एक ईस्ट इंडियन आणि एक मारवाडी उमेदवार दिला आहे. तसेच वंचितने १२ उमेदवार (४ टक्के) या महिला दिलेल्या आहेत.[३३] वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघात एआयएमआयएमच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलेला आहे, ज्यात औरंगाबाद पूर्व, भायखळा, व कुर्ला मतदारसंघांचा समावेश आहे.

निवडणूक चिन्ह[संपादन]

२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "कपबशी" हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना किल्ली, शिट्टीपतंग ही चिन्हे दिली होती. महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे.

ध्वज[संपादन]

३१ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण केले. या ध्वजात अशोकचक्रासह निळा भीम ध्वज, केशरी, पिवळाहिरवा रंग घेतलेला आहे.

जाहीरनामा[संपादन]

६ एप्रिल २०१९ रोजी, वंचित बहुजन आघाडीने भारतीय संविधानाचा सरनामा हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणे, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणे अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आलेली होती.[३४][३५]

निवडणुका[संपादन]

लोकसभेसाठी निवडणुका[संपादन]

लोकसभा क्रमांक निवडणूक वर्ष लढवलेल्या
जागा
जिंकलेल्या
जागा
मिळालेली मते राज्यातील मतांचे
शेकडा प्रमाण
लढवलेल्या जागांवरील
मतांचे शेकडा प्रमाण
राज्य (जागा)
१७वी लोकसभा २०१९ ४७ ०० ३७,४३,२०० ६.९२ ७.०८ महाराष्ट्र (०)


पक्षाचे पदाधिकारी[संपादन]

वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

 1. अध्यक्ष तथा सर्वेसर्वा - प्रकाश आंबेडकर
 2. उपाध्यक्ष –
  1. शंकरराव लिंगे
  2. विजयराव मोरे
  3. धनराज वंजारी
 3. महासचिव –
 4. सचिव –
  1. राजाराम पाटील
  2. डॉ. अरुण सावंत
  3. सचिन माळी
  4. ए.आर. अंजेरीया
  5. कुशल मेश्राम
  6. प्रा. किसन चव्हाण
  7. अनिल जाधव
  8. नवनाथ पडळकर
  9. शिवानंदजी हैबतपुरे
 5. स्वतंत्र प्रभार व पक्षीय जबाबदारी
  1. राम गारकर
  2. सचिन माळी
  3. मोहन राठोड
  4. प्रा.यशपाल भिंगे
 6. पार्लमेंट्री बोर्ड
  1. अण्णाराव पाटील
  2. अशोक सोनवणे
 7. महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – रेखा ठाकूर

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ author/lokmat-news-network (2018-09-29). "वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात बदलाचे वारे!". Lokmat. 2019-03-12 रोजी पाहिले. 
 2. ^ "Prakash Ambedkar Front To Contest All 48 Lok Sabha Seats in Maharashtra". www.jagran.com (hi मजकूर). 2019-03-15 रोजी पाहिले. 
 3. a b "प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे ३७ उमेदवार जाहीर" (en-GB मजकूर). 2019-03-15. 2019-03-15 रोजी पाहिले. 
 4. ^ "प्रकाश आंबेडकर के अकेले चुनाव लड़ने से बीजेपी-शिवसेना को होगा फायदा– News18 हिंदी". News18 India. 2019-03-12. 2019-03-12 रोजी पाहिले. 
 5. ^ author/lokmat-news-network (2019-03-05). "वंचित बहुजन आघाडीत तृतीय पंथीयांना स्थान - दिशा शेख". Lokmat. 2019-03-12 रोजी पाहिले. 
 6. ^ "vanchit bahujan aaghadi: तृतीयपंथी दिशा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते पदी". Maharashtra Times (mr मजकूर). 2019-02-23. 2019-03-12 रोजी पाहिले. 
 7. ^ "वंचित बहुजन आघाडीला बळ द्या". Maharashtra Times (mr मजकूर). 2018-11-26. 2019-03-12 रोजी पाहिले. 
 8. ^ The Bharipa Bahujan Mahasangh founded on 4 July 1994 — The constitution of the BBM, page no. 1; Available to the Election Commission of India.
 9. ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा (2019-03-14). "भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा". ABP Majha (mr मजकूर). 2019-04-22 रोजी पाहिले. 
 10. ^ Sat, सुधीर महाजन on; March 30; 2019 9:22pm (2019-03-30). "Lok Sabha Election 2019 : वंचित बहुजन आघाडी : नवी राजकीय शक्ती". Lokmat. 2019-04-22 रोजी पाहिले. 
 11. ^ "IndiaVotes PC: Party peformance over elections - Bharipa Bahujan Mahasangh Maharashtra". IndiaVotes. 2019-05-25 रोजी पाहिले. 
 12. ^ "IndiaVotes AC: Party peformance over elections - Bharipa Bahujan Mahasangh". IndiaVotes. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 2019-04-21 रोजी मिळवली). 2019-05-25 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
 13. ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा (2019-03-14). "भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा". ABP Majha (mr मजकूर). 2019-03-15 रोजी पाहिले. 
 14. ^ "आता आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी". Maharashtra Times (mr मजकूर). 2018-06-20. 2019-03-12 रोजी पाहिले. 
 15. ^ "महाराष्ट्र: प्रकाश आम्बेडकर और ओवैसी का गठबंधन, कांग्रेस का नुकसान?". The Quint Hindi (en मजकूर). 2019-03-12 रोजी पाहिले. 
 16. ^ "प्रकाश आंबेडकरांचे शनिवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन". Loksatta (mr-IN मजकूर). 2019-02-20. 2019-03-15 रोजी पाहिले. 
 17. ^ "शिवाजी पार्कवर प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवारांची घोषणा करणार?". News18 Lokmat. 2019-03-15 रोजी पाहिले. 
 18. ^ "वंचित बहुजन आघाडीला चार जागा". Loksatta (mr-IN मजकूर). 2019-03-04. 2019-03-12 रोजी पाहिले. 
 19. ^ "लोकसभा चुनाव 2019: प्रकाश आंबेडकर बोले- महाराष्ट्र में कांग्रेस के साथ नहीं करेंगे गठबंधन– News18 हिंदी". News18 India. 2019-03-12. 2019-03-12 रोजी पाहिले. 
 20. ^ "भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार: प्रकाश आंबेडकर". Loksatta (mr-IN मजकूर). 2019-03-14. 2019-05-03 रोजी पाहिले. 
 21. ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा (2019-03-14). "भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा". ABP Majha (mr मजकूर). 2019-05-03 रोजी पाहिले. 
 22. ^ author/online-lokmat (2019-03-14). "भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय". Lokmat. 2019-05-03 रोजी पाहिले. 
 23. ^ "प्रकाश आंबेडकरांचा Big Decision..भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार". divyamarathi (mr मजकूर). 2019-03-14. 2019-05-03 रोजी पाहिले. 
 24. ^ टिल्लू, रोहन (2019-03-10). "लोकसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं आहे?" (en-GB मजकूर). 2019-03-12 रोजी पाहिले. 
 25. ^ https://m.maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/deprivation-mim-alliance-broken/articleshow/71014565.cms
 26. ^ https://www.timesnowmarathi.com/election/article/vidhansabha-election-2019-prakash-ambedkar-imtiyaz-jaleel-asaduddin-owaisi-maharashtra-election-vanchit-bahujan-aghadi-news-in-marathi/259729
 27. ^ कोण्णूर, तुषार कुलकर्णी आणि मयुरेश (2019-03-15). "'लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'" (en-GB मजकूर). 2019-03-15 रोजी पाहिले. 
 28. ^ author/lokmat-news-network (2019-04-09). "वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग". Lokmat. 2019-04-20 रोजी पाहिले. 
 29. ^ Khushbu (2019-04-14). "महाराष्ट्र में BJP-शिवसेना के लिए कितनी गंभीर है अंबेडकर-ओवैसी की चुनौती?". India TV Hindi (hindi मजकूर). 2019-05-03 रोजी पाहिले. 
 30. ^ कदम, अमृता (2019-05-24). "या 7 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे झाला काँग्रेसचा पराभव?" (en-GB मजकूर). 2019-05-28 रोजी पाहिले. 
 31. ^ "General Election 2019 - Election Commission of India". results.eci.gov.in. 2019-05-28 रोजी पाहिले. 
 32. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/mahaelection-87-muslim-behind-the-congress-mim-hits-breakthrough-1567826038.html
 33. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/buddhist-dhangar-muslim-candidates-preferred-by-vanchit-bahujan-aghadi-125859826.html
 34. ^ "LokSabha2019 : केजी टू पीजी शिक्षण मोफत वंचित बहुजन आघाडीचे आश्‍वासन ; जाहीरनामा प्रसिद्ध". www.esakal.com (mr मजकूर). 2019-04-08 रोजी पाहिले. 
 35. ^ author/online-lokmat (2019-04-06). "संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा : वंचित बहुजन आघाडी". Lokmat. 2019-04-08 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]