Jump to content

गणपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गणपती

दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयातील मूषकासहित मूर्ती

बुद्धी, विघ्ने, शुभारंभ - इत्यादींची अधिपती देवता

मराठी गणपती
वाहन उंदीर
शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत
वडील शंकर
आई पार्वती
पत्नी ऋद्धी, सिद्धी
अपत्ये शुभ, लाभ
अन्य नावे/ नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण

गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन

मंत्र ॐ गं गणपतये नमः
नामोल्लेख गणेश पुराण, मुद्गल पुराण
तीर्थक्षेत्रे अष्टविनायक

गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे[] त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते.[] अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात. गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. जैन आणि बौद्ध धर्मांमध्येही तो पूजला जातो.[] जरी गणेशाचे अनेक गुणधर्म असले तरी तो त्याच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे सहज ओळखला जातो.[] तो मोठ्या प्रमाणावर आदरणीय आहे, विशेषतः अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता) आणि नशीब आणणारा देव म्हणून तो ओळखला जातो. [] [] कला आणि विज्ञानाचा संरक्षक; तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे. [] सुरुवातीसाठीचा देव म्हणून, त्याला संस्कार आणि समारंभाच्या सुरुवातीला सन्मानित केले जाते. लेखन सत्रादरम्यान अक्षरे आणि शिक्षणाचा संरक्षक म्हणून गणेशाचे आवाहन केले जाते. [][] अनेक ग्रंथ त्याच्या जन्म आणि पराक्रमांशी संबंधित पौराणिक कथा सांगतात.

गाणपत्य संप्रदाय

१७३० सालचे वासहलि गणेशचित्र, सध्या नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात

गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो.या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकात झाला असे मानले जाते.[१०] हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. त्यांचा मुख्य मंत्र, गणेश गायत्री मंत्र असा आहे - एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात।[११] आदी शंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य देवतेत स्थान दिल्यावर गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली. गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला.[१२] पुण्याजवळच्या चिंचवडचे मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायातील एक पुरूष मानले जातात. या संप्रदायात गणपतीवर दोन उपपुराणे रचिली गेली - गणेश पुराण[१३] आणि मुद्गल पुराण.[१४]

नावे

पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे.[१५] महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता.[१६]

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.[१७] विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो.[१८] याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचलित आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय.[१९]

वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.[२०] गणपतीला इतर काही नावे आहेत त्यांचे अर्थ असे वक्रतुंड म्हणजे "ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो".[२१] गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसऱ्या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला.[ संदर्भ हवा ] आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.[२२][१७]

गणेश ह्या संकल्पनेचा ऐतिहासिक आढावा

सध्या स्मिथ्सोनियन इन्स्टिट्यूटमध्ये असलेले व मूळचे इ.स. १३ व्या शतकातील म्हैसूर भागातील गणपतीचे पाषाणशिल्प

*वैदिक काळ - गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. [२३]दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम् हवामहे... [२४]विषु सीदा गणपते...[२५]) वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप निर्माण झाल्याचे संशोधक मान्य करतात.[२६]

ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पती, वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई.[२७] तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुऱ्हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.[२८]

दुसऱ्या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रीकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे.[२९] इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे अभ्यासक मानतात.[३०]

*विनायक रूप- मानवगृह्यसूत्रयाज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे.[३१] पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला.[३२] याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय.[२३] गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो. कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील 'भूमारा'त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे हत्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या हत्तीमुखाचे हेही कारण असावे. पुराणांमध्ये हत्तीमुखधारी यक्ष आहेत. यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात. याज्ञवल्क्य संहिता' या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते. इसवी सनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे.[३३]

गाणपत्य संप्रदायाची पुराणे

गणेश ही पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या एक मुख्य देवता आहे. गणपती संप्रदायाने गणेश म्हणून व मुदगल या देवतेदोन पुराणे व महाकाव्यांत उल्लेखआहेत. गणेशाविषयीची सर्वाधिक महत्त्वाची आख्यायिकात अवस्थांतर होय.

गणेश पुराणमुद्गल पुराण या ग्रंथाच्या रचनाकाळात मतभेद आहेत. यांची रचना साधारणपणे इ.स. ११०० ते इ.स. १४०० मध्ये झाल्याचे मानले जाते. सामान्यपणे गणेश पुराण हा आधीचाव मुद्गल पुराण नंतरचा ग्रंथ मानतात. गणपती अथर्वशीर्षाची रचना इसवीसनाच्या सोळा ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळात झाली.

  • गणेश पुराणगणेश पुराण गणेशाच्या कथा व पूजापद्धती यासाठी हे पुराण महत्त्वाचे आहे. याचे दोन खंड आहेत - उपासनाखंड आणि क्रीडाखंड किंवा उत्तरखण्ड. उपासना खंडाची अध्यायसंख्या ९२ असून क्रीडाखंडाची अध्यायसंख्या १५५ आहे. उपासनाखंडाच्या ३६ अध्यायांच्या आधारे प्रसिद्ध गणेश सहस्रनाम स्तोत्राची रचना झाली आहे. याचा अनेक ठिकाणी पाठ होतो. क्रीडाखंडाचे अध्याय १३८-४८ गणेश गीता नावाने प्रसिद्ध आहेत. गणपतीने आपल्या गजानन अवतारात ही गीता राजा वरेण्य यास सांगितली. याचे स्वरूप भगवद्गीता ग्रंथाप्रमाणे आहे. कृष्णाऐवजी येथे गणपतीस भगवद्-तत्त्व मानले आहे. क्रीडाखंडात गणपतीच्या चार अवतारांचे वर्णन आहे.[३४]

अथर्वशीर्ष

श्री गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश अथर्वशीर्षोपनिषद हा गणपतीविषयीचे प्रधान उपनिषद आहे.[३६] महाराष्ट्र राज्यात याचा विशेष प्रभाव आहे. रांजणगाव येथील मंदिरात प्रवेशतोरणावर हा ग्रंथ कोरला आहे. या ग्रंथात गणपतीस सर्व देवीदेवतांच्या रूपात पाहण्यात आले असून सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ मानण्यात आले आहे. या ग्रंथावर तंत्रमताचाही प्रभाव आहे. ‘गं’ हा गणपतीचा बीजमंत्र आहे असा उल्लेख या ग्रंथात येतो. गणेशाच्या तत्त्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन हे उपनिषद करते. समाजमनात गणेशाचे प्रसिद्ध स्तोत्र म्हणून हे मान्यता पावलेले आहे.[३७]

विविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका

  • देवीपुराण

शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी त्यास होकार दिला परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.[३८]

  • स्कंदपुराण -

स्कंदपुराणात - गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते मस्तक स्वतःच्या शरिरावर चढवले.

स्कंदपुराणाच्या ब्रह्मखण्डातील कथेनुसार, पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुन्दर व पूर्णांग बालकाचा पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली. या बालकाने नंतर तेथे स्नानागारात जाणाऱ्या शंकरास अडवले. त्यावेळी या बालकाचे शंकरासोबत युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले.[३९] या नंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले.[४०]
स्कंदपुराणाच्या- अर्बुद खण्डात म्हणले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले. गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशीर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुऱ्हाड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.[ संदर्भ हवा ]

  • बृहद्धर्मपुराण

बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने चुंबन करण्यास सांगितले.[४१] पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले. यामुळे पार्वती शोकाकुल झाली. या वेळी उत्तरदिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. तद्नुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले. नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.

शिव व पार्वती गणेश बाळास न्हाऊ घालताहेत, कांडा चित्रकला - १८ वे शतक
  • ब्रह्मवैवर्त पुराण

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शंख-चक्र-गदा-पद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एकदिवस जेव्हा शिव-पार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मणरूपात भिक्षा मागण्यास आला. पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असता शंकराचे वीर्यपतन झाले व तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या शतचन्द्रसमप्रभम् बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता व ऋषिगण बालकास पाहण्यास कैलासी आले. त्यात शनीदेवही होता. शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले. पण शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुण्ठात कृष्णाच्या देहात जाऊन विलिन झाले. पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. तेव्हा गरुडावरून जाणाऱ्या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तरदिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक उडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून दोन मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघांना जीवित केले.[४२] शंकरांच्या आशिर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. पार्वतीच्या आशिर्वादाने तो गणांचा पती, विघ्नेश्वर व सर्वसिद्धिदाता झाला. यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इन्द्राचा हात आखडला. शंकरास याचे कारण विचारले असता, गणेशाची अग्रपूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले. [ संदर्भ हवा ]
ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार, माली आणि सुमाली नामक दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले.[ संदर्भ हवा ]

  • पद्मपुराण

पद्मपुराणानुसार, शंकर पार्वती ऐरावतवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला.[४३]

  • लिंगपुराण

लिंगपुराणानुसार, देवगणांनी शंकरापाशी येऊन असूरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला.[४४]

राजा रवि वर्मा कृत 'ऋद्धि सिद्धि' चित्रातील सपत्निक गणेश
  • वराहपुराण

वराहपुराणानुसार, देव व ऋषिगण शंकरापाशी येऊन विघ्ननिवारणासाठी नव्या देवतेची मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रकट झाला. देवगण, पार्वती बालकास पाहून मुग्ध झाले. पण शंकर क्रोधित झाले. त्यांच्या शापाने बालकास गजमुख, लांबडे पोट व पोटाशी नाग प्राप्त झाला. क्रोधित शंकरांच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला. गणपती त्यांचा अधिपति झाला.[४५] या ठिकाणी गणपतीचा गणेश, विघ्नकर व गजास्य म्हणून उल्लेख आहे.[ संदर्भ हवा ]

  • देवीपुराण

देवीपुराणानुसार, शंकरांच्या राजसिक भावामुळे हातातून घाम स्त्रवला व त्यातून गणपतीचा जन्म झाला.

  • मत्स्यपुराण

मत्स्यपुराणानुसार, पार्वती चूर्ण (भुकटी) स्वतःच्या शरीराचे मर्दन करत होती. याच भुकटीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली. पुतळा मोठा होत होत पृथ्वीइतका झाला. नंतर या मुलास गंगापार्वतीने पुत्ररूप मानले व ब्रह्माच्या आशिर्वादाने हा मुलगा गणाधिपती झाला.

  • वामनपुराण

वामनपुराणानुसार, पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भूज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले मया नायकेन विना जातः पुत्रकः (मला सोडूनही पुत्र जन्म झाला) त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्ननाशकारी होईल.

  • ब्रह्मवैवर्त पुराण

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला.

  • शिवपुराण

शिवपुराणानुसार, गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीपरिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस सातवेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वीपरिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत - रिद्धी (बुद्धी) व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष्य हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय. विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दुःखी कार्तिकेय क्रौञ्च पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छीत होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशील असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला.

  • तन्त्र

तंत्रमतानुसार लक्ष्मीसरस्वती या गणपतीच्या पत्नी होत. याखेरीज तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या इतर नऊ पत्नी होत.

  • महाभारत

महाभारतामध्ये, कौरव व पाण्डव यांच्या मृत्युनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या सर्व घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला.[४६] पण त्याची एक अट होती - लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली - अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये.[४७] यासाठी व्यासांनी महाभारतात ८८०० कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला.[४८]

गणेश चतुर्थी

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असे म्हणतात. हिलाच शिवा असेही म्हणले जाते.[४९]गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे व्रत मानले जाते. गणेश चतुर्थीची प्रचलित आख्यायिका येणेप्रमाणे आहे - एकदा गणपती चतुर्थीचे दिवशी स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. हे पाहून तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा गणपतीने चंद्राला शाप दिला अशी आख्यायिका प्रचलित आहे.[५०]

गणेश जन्म

माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हणले जाते.[५१] हा गणपतीचा जन्म दिन होय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अशा चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीयावास्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्त्वज्ञान मानते.[५२]

गणपतीचे विविध अवतार

उपपुराण मानल्या जाणाऱ्या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराणमुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.[५३]

  • गणेश पुराणगणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे. हे होते -
    • महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप, दिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला.[५४] या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
    • मयूरेश्वर – हा सहा भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे. याचे वाहन मोर आहे. त्रेतायुगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेय यास दान केला अशी आख्यायिका आहे. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.[५५]
    • गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला. अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.
    • धूम्रकेतु – द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.
  • मुद्गल पुराणमुद्गल पुराणात- गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे -[५६]
    • वक्रतुंड – हा प्रथम अवतार. याचे वाहन सिंह असून या अवतारात मात्सऱ्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.
    • एकदंत – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो. हा मूषकवाहन असून अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.
    • महोदर – वक्रतुंड व एकदंताचे सम्मिलित रूप. ब्रह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक. मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
    • गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
    • लंबोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक. वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
    • विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
    • विघ्नराज – विष्णूचे प्रतीक. ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य.
    • धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा. अभिमानासुराचा नाश केला.[५७]

विविध कलांमधील गणपतीची रूपे

१८१० सालातील गणेश चित्र, सध्या चंदीगढ संग्रहालयात

भारतीय शिल्प व चित्रकलेत गणेश एक अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकप्रिय मूर्तीविषय आहे. गणपतीच्या नाना रूपांचे वर्णन जे पुराण व इतिहासात मिळते, ते भारतीय उपखंडात व भारताबाहेरही विविध रूपात आविष्कृत झाले आहे. गणेशाच्या विविधरूपातील मूर्ती आहेत. कोठे उभा, कोठे नृत्यरत, कोठे असुरवधकारी वीर युवक म्हणून, कोठे शिशु तर कोठे पूजक रूपातील गणपती दिसतो. भारतीय शिल्पकलेमध्ये सप्त मातूकांच्या जोडीने गणपतीचे शिल्प अंकित केलेले दिसते.[५८]

श्री गणेशाची विविध रूपे

भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात-

सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मद्गन्धलुब्धमधुपब्यालोलगण्डस्थलम्।
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्।। (गणेशध्यानम्)

[५९]

एकदंन्तं महाकायं लम्बोदरं गजाननं।
विघ्ननाशकरं देवम् हेरम्बं प्रणमाम्यहम्।। (गणेशप्रणामः)

[५९]

देवेन्द्रमौलिमन्दारमकरन्दकणारुणाः।
विघ्नं हरन्तु हेरम्वचरणाम्बुजरेणबः।। (गणेशप्रार्थना)

[६०]

सुरुवातीच्या काळापासूनच गणपती एकदंत रूपात शिल्पबद्ध आहे. गुप्तकाळातील गणेशमूर्तीही लंबोदर आहेत. ब्रह्मांड पुराणात या उदरात सारे जग सामावू शकेल असे म्हणले आहे.[६१] गणपतीच्या हातांच्या व अस्त्रांच्या संख्येत मतांची विविधता दिसते. गणपती चतुर्भुज, द्बिभुज, षड्भुज अशा अनेक रूपात दिसतो. हातात साधारणपणे पाश-अंकुश, वरदहस्त व मोदक असे रूप असते.

नृत्यरत बौद्धगणेश, मध्य तिबेट मधील चित्र - काल : पंधराव्या शतकाचा प्रथमार्ध

भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभूज आहेत. तंत्रमार्गी ग्रन्थ तन्त्रसारात, काश्मीरात, नेपाळमध्येअफगाणिस्तानमध्ये आढळणाऱ्या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे. पण प्राणतोषिनी तन्त्र- या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो असे म्हणले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देऊन असतो असा उल्लेख आहे.

  • महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.
  • हेरंब-गणपती – हेरंब-गणपती तन्त्रसार- ग्रंथात उल्लेखित आहे. हे रूप पंचानन (पाचतोंडी) असते. त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी (आकाशाकडे तोंड केलेल्) असते. अभयवर, मोदक, निजदंत, मुण्डमाला, अंकुश व त्रिशूल असतो. हेरंब म्हणजे दीन पालक होय. वाहन सिंह. नेपाळमध्ये हेरंब-गणपतीचे वाहन उंदिरही असते.
  • नृत्यगणेश – नृत्यगणेश आठहाताचा व नृत्यरत असतो. हाती शस्त्र नसते. मुद्रा नाचाची असते.
  • विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे. याची पाच भिन्न रूपे आहेत - चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एकच असून तो अम्बिकापुत्र आहे.
  • बौद्ध गणेश[६२] – बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला-ग्रंथात मिळतो.तो द्बादशभुज (बारहाती) आहे. त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते.
  • अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाणे (तालुका शेवगाव) येथे झोपलेल्या गणपतीची तथाकथित स्वयंभू मूर्ती आहे.

इसवीसनाच्या पहिल्या शतकात बनलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशाच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभुज दगडी गणेशमूर्ती पहायला मिळते. इसवीसनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणाऱ्या गणपतीची मूर्ती मिळालेली आहे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या गणेशमूर्ती पहायला मिळतात - आसनस्थ, नृत्यरत व उभ्या. यात बसलेल्या मूर्तींची संख्या सर्वाधिक आहे. जबलपूर येथे हत्तीमुख असलेल्या देवीची मूर्ती मिळाली आहे. तंत्रमार्गात ऊल्लेखित गणेशपत्नी - गणेशाणी हीच असावी असा अंदाज आहे.

भारताबाहेरील गणेश

इंडोनेशिया देशातील प्राम येथे मिळालेली गणेशमूर्ती

गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते. भारतातच नव्हे तर जगभरात गणपतीची पूजाविधी व उपासना प्रचलित असल्याचे दिसून येते.[६३] नेपाळ, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया (जावा आणि बाली), सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स आणि बांगलादेश; तसेच फिजी, गयाना, मॉरिशस, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांसह मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये गणेशभक्त पसरलेले आहेत. भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत. प्राप्त गणेशमूर्ती द्बिभुज व मोदकभक्षणरत आहेत. हातात मोदकभांडे, कुऱ्हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात.

गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात श्रीलंकेत निर्मिली गेली. जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या अकराव्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे. या मूर्तीवर तंत्रमताचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत.[६२][६४] यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून, अभंगदेह, सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे. चारपैकी तीन हातात अक्षसूत्र, विषाण, मोदकभांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आहे.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव

मुख्य पान: गणेशोत्सव

महाराष्ट्रातील गणेशोत्सव गणपतीसंबंधित सर्वात मोठा उत्सव आहे. प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी वा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी पासून सुरू होतो. हा उत्सव दहा दिवस चालतो.[६५] अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती विसर्जित केल्या जातात. पेशव्यांच्या काळात हा घरगुती उत्सव्याच्या स्वरूपात असण्याचे उल्लेख आहेत. पूर्वी केवळ घरगुती व्रत/उत्सव अशा स्वरूपात असलेल्या गणेश उत्सवास इ.स. १८९३ साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक स्वरूप दिले. या स्वरूपामुळे सुरुवातीस सुधारकी व सनातनी अशा दोन्ही मतांच्या लोकांनी टिळकांवर टीका केली होती. पारंपरिक स्वरूपामुळे पुण्याचे व भव्यतेमुळे मुंबईचे गणपती प्रेक्षणीय असतात.

इतर राज्यांतील गणेशपूजा

प्रसिद्ध मंदिरे

ओडिसा राज्यातील मंदिराबाहेरील गणेशमूर्ती

हिंदू मंदिरात गणपती दोन रूपात दिसतो - पहिला परिवार-देवता वा पार्श्वदेवता रूपात; अथवा मंदिरातील मुख्य देवता रूपात. पुराणांमध्ये पार्वतीने गणेशास द्बाररक्षक म्हणून नेमले होते त्या अनुषंगाने दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरली जाते. याशिवाय स्वतंत्र गणेशमंदिरेही आहेत. यात सर्वाधिक उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरसमूह.[६८] पुणे शहराच्या १०० किमी परिघातील ही आठ मंदिरे गणेशाचे मंडल (वर्तुळ) बनवतात. याशिवाय महाराष्ट्रातील मुंबईच्या सिद्धिविनायक व टिटवाळ्याच्या गणपतीचा समावेश होतो. कोकणातील गणपतीपुळ्याचे मंदिर विख्यात आहे. पुण्यात सारसबाग येथील उजव्या सोंडेचा गणपती प्रसिद्ध आहे.[६९] पुण्याचे ग्रामदैवतही गणपतीच आहे. कसब्यातील ह्या गणपतीची पूजा जिजाबाई करत असत. जळगाव येथे उजव्या व डाव्या सोंडेच्या गणपतीचे एकत्रित मंदिर आहे. अशा स्वरूपाचे एकत्र मंदिर दुर्मिळ आहे. वाईच्या ढोल्या गणपतीची विशालकाय मूर्ती प्रेक्षणीय आहे.

महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतातील मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन; राजस्थान राज्यातील जोधपुर, रायपूर; बिहार राज्यातील वैद्यनाथ; गुजरात राज्यातील बडोदा, धोळकावलसाड; उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरातील धुंडिराज मंदिर आदि उल्लेखयोग्य मंदिरे आहेत. दक्षिण भारतातील गणेश मंदिरांमध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्लीचे जम्बुकेश्वर मंदिर, रामेश्वरम व सुचिन्द्रम येथील मंदिर; कर्नाटक राज्यातील हंपी, इडागुंजी; आंध्र प्रदेश राज्यातील भद्राचलमचे मंदिर आणि केरळमधील कासारगोड उल्लेखयोग्य आहेत. भारताबाहेर नेपाळ मध्येही अनेक मंदिरे आहेत.[७०]

वास्तू

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असते. तिला गणेशपट्ट असे संबोधले जाते.[७१] महाराष्ट्रातील घरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेशप्रतिमा असते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते.

साहित्यात

  • महानुभाव पंथ-

मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङ्मयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणीस्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो -

तेया गणरायाचे उदार रूपडे थोरपण जिंकले होडे ।

कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे, जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ।।
गोर मेरु जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग, नानाविध वसती भोग ।
तेण आधारे अग्नेय सुखावले।।

  • संत साहित्य-

ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे -
ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||[७२]

नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -
लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करीतसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||

तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात -
गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घागर्या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।

  • गोसावी नंदन हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेशभक्त होते. त्यांनी ज्ञानमोदक हा ग्रंथ रचला आहे.[७३]
  • लोकसाहित्य व लोकसंस्कृती

गणपती संतवाङमय व शास्त्रपुराणांबाहेर पडून लोकसंस्कृतीतही अनेक ठिकाणी आला आहे. तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो.

पठ्ठे बापूराव आपल्या कवनात म्हणतात - तुम्ही गौरीच्या नंदना । विघ्न कंदना । या नाचत रमणी । जी जी जी ||
कोकणातील गणपतीच्या नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. रत्‍नागिरी जिल्ह्यातील बाल्यांचा गणपतीचा नाच दमदार व लक्षवेधी असतो. बाल्यांचे गणपतीचे एक गाणे असे - यावे नाचत गौरीबाळा । हाती घेऊनी पुष्पांच्या माळा । सर्वे ठायी वंदितो तुला | यावे नाचत गौरीबाळा।
[७४]

लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत. एका लोकगीतातले वर्णन असे - [७५]

हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
आमी जातो आमी जातो, सोनारू साळा ।।

सोनारीन बाई ग सोनारू दादा ।।
बाळाचं पैजण झालंका न्हाई ?
फिरून येजा फिरून येजा गवराबाई गवराबाई ।।
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।

गवराबाईने म्हणजे गणपतीच्या आईने (गौरीने) गणेशबाळासाठी सोनाराकडे पैजण करायला टाकले आहेत आणि सोनाराने ते अजून दिले नाहीत असे वर्णन या गीतात आहे.

चित्रपट

  • वक्रतुंड महाकाय - गणपती हा नायक असलेला हा एक मराठी चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन पुनर्वसू नाईक यांनी केले आहे.
  • अष्टविनायक - हा चित्रपट गणेशाच्या अष्टविनायक संकल्पनेची माहती सांगतो.

हे सुद्धा पहा

सार्वजनिक गणेशोत्सव

निवडक प्रसिद्ध गणपती मंदिरे

चित्रदालन

हे सुद्धा पहा


संदर्भ

  1. ^ Ramachandra Rao 1992, पान. 6.
  2. ^    
  3. ^ Brown, Robert L. (1991-08-06). Ganesh: Studies of an Asian God (इंग्रजी भाषेत). State University of New York Press. ISBN 978-0-7914-9775-3.
  4. ^ Martin-Dubost, p. 2.
  5. ^ For Ganesha's role as an eliminator of obstacles, see commentary on , verse 12 in Saraswati 2004
  6. ^ DeVito, Carole; DeVito, Pasquale (1994). India - Mahabharata. Fulbright-Hays Summer Seminar Abroad 1994 (India). United States Educational Foundation in India. p. 4.
  7. ^ Heras 1972
  8. ^ Getty 1936, पान. 5.
  9. ^ These ideas are so common that Courtright uses them in the title of his book, Ganesha: Lord of Obstacles, Lord of Beginnings.
  10. ^ Gune, Dr Ashok Modak, Prof Prabhakar Nanakar, Prof Narayan (2019). Desh-Videshon Ki Rashtriya Vichardharayen (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789353221553.
  11. ^ गाडगीळ, अमरेंद्र. श्री गणेश कोश.
  12. ^ Hindī viśvakośa (हिंदी भाषेत).
  13. ^ Shastry, Yagneshwara (1955). "Sri Ganesh Puranam" (Kannad भाषेत). Cite journal requires |journal= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ mudgala purana.
  15. ^ "Ganesh Purana Thousand Names". archive.org. 2018-08-31 रोजी पाहिले.
  16. ^ 121 Gaṇeśa darśana: sarvapūjya sarvādipūjya Bhagavāna Śrī Gaṇeśāvarīla sakhola va māhitīpūrṇa grantha. Sañjanā Pablikeśana, Śrī Gaṇeśa Grāmastha Sevā, Maṇḍaḷa, Borivilīcyā Vidyamāne. 1996.
  17. ^ a b Chaturvedi, B. K. (2004). Shiv Purana (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788171827213.
  18. ^ Chaturvedi, B. K. (2004). Shiv Purana (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788171827213.
  19. ^ Saiva Siddhanta (इंग्रजी भाषेत). Saiva Siddhanta Mahasamajam. 1979.
  20. ^ Sharma, Mahesh; Bhalla, P. (2017-09-20). क्या कहते हैं पुराण : Kya Kahate Hain Puran (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5278-497-4.
  21. ^ Rysdyk, Evelyn C. (2019-02-19). The Nepalese Shamanic Path: Practices for Negotiating the Spirit World (इंग्रजी भाषेत). Simon and Schuster. ISBN 9781620557952.
  22. ^ भाषा अभिधान, प्रथम द्बितीय खण्ड, ज्ञानेन्द्रमोहन दास संकलित, साहित्य संसद, कोलकाता, इ.स. १९८६ आवृत्ती
  23. ^ a b Jain, Sandhya (2018). Aadidev Aarya Devata (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352668731.
  24. ^ ऋग्वेद, २।२३।१
  25. ^ ऋग्वेद, १०।११२।९
  26. ^ Hindu Gods and Goddesses, Swami Harshananda, Sri Ramakrishna Math, Chennai, 1981, p.125
  27. ^ Gadgil, Sadashiv Ramchandra (1974). Lokāyata. Loka Vāñmaya Gr̥ha.
  28. ^ Hindu Gods and Goddesses, Swami Harshananda, Sri Ramakrishna Math, Chennai, 1981, p.125-27
  29. ^ Jain, Sandhya (2018). Aadidev Aarya Devata (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352668731.
  30. ^ Higham, Charles (2014-05-14). Encyclopedia of Ancient Asian Civilizations (इंग्रजी भाषेत). Infobase Publishing. ISBN 9781438109961.
  31. ^ Bhudhidata Ganesh (हिंदी भाषेत). Atmaram & Sons.
  32. ^ गाडगीळ, अमरेंद्र (२०११). श्रीगणेश कोश. पुणे: गोकुळ मासिक प्रकाशन.
  33. ^ पौराणिका (विश्वकोश हिन्दुधर्म), प्रथम खण्ड, फार्मा केएलएम प्राइव्हेट लिमिटेड, कोलकाता, इ.स. २००१ द्रः
  34. ^ "Vishayanukramani Of Ganesh Purana By Nag Publishers". archive.org. 2018-08-30 रोजी पाहिले.
  35. ^ Yatra 2 Yatra (इंग्रजी भाषेत). Yatra2Yatra. 2009.
  36. ^ "Atharva Sheersha". archive.org. 2018-08-31 रोजी पाहिले.
  37. ^ Swami Chinmayananda. Glory of Ganesha. (Central Chinmaya Mission Trust:Mumbai , 1987). pp. 121-131. Other reprint editions: 1991, 1995.
  38. ^ "Devi Purana ( Mahabhagavat) Hindi Gita Press". archive.org. 2018-08-31 रोजी पाहिले.
  39. ^ स्कन्दपुराण १२।१८
  40. ^ Sherman, Howard J. (2014-12-18). Mythology for Storytellers: Themes and Tales from Around the World: Themes and Tales from Around the World (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781317464181.
  41. ^ बृहद्धर्मपुराण, ३०।२४
  42. ^ ब्रह्मवैवर्त पुराण, १२।२०
  43. ^ Dr. Narinder Sharma. Padma Purana Vishwanath Narayan (Sanskrit भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  44. ^ Sharma, pt shriram (1969). Linga Purana Khand-ii.
  45. ^ वराहपुराण, २।१६।१८
  46. ^ Publishers, Sterling (2009-01-01). The Greatest Epic Of All Time Mahabharata (इंग्रजी भाषेत). Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 9788120744479.
  47. ^ महाभारत, १।१।७५
  48. ^ "Who wrote Mahabharata, Ved Vyas or Lord Ganesh?".
  49. ^ गाडगीळ, अमरेंद्र (२००९). श्री गणेश कोश. प्राची चिकटे.
  50. ^ Storl, Wolf-Dieter (2004-09-14). Shiva: The Wild God of Power and Ecstasy (इंग्रजी भाषेत). Simon and Schuster. ISBN 9781594777806.
  51. ^ श्री गणेश कोश-संपादक-अमरेंद्र गाडगीळ
  52. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
  53. ^ Jośī, Manohara Y. (1973). Śrī Gaṇeśa-darśana. Prasāda Prakāśana.
  54. ^ गणेश पुराण, १।४६।२८
  55. ^ Balasubramanian, Lalitha (2017-08-30). Temples in Maharashtra: A Travel Guide (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781947697881.
  56. ^ Pattanaik, Devdutt (2015-01-27). 99 Thoughts on Ganesha (इंग्रजी भाषेत). Jaico Publishing House. ISBN 9788184951523.
  57. ^ Khole, Gajānana Śã (1992). Om̐kāra Gaṇeśa: Purāṇokta 21 Gaṇapatī, pūjā-utsava, upāsanā, ārādhanā. Indrāyaṇī Sāhitya.
  58. ^ Pattanaik, Devdutt (2015-01-27). 99 Thoughts on Ganesha (इंग्रजी भाषेत). Jaico Publishing House. ISBN 9788184951523.
  59. ^ a b स्तवकुसुमाञ्जलि, स्वामी गम्भीरानन्द सम्पादित, उद्बोधन कार्यालय, कोलकाता, १९६१ द्रः
  60. ^ स्तवकुसुमाञ्जलि, स्बामी गम्भीरानन्द सम्पादित, उद्बोधन कार्यालय, कोलकाता, १९६१ द्रः
  61. ^ ब्रह्मांड पुराण, २।३।४२।३४
  62. ^ a b Grewal; Royina (2007). Deva Tuchi Ganesha (Marathi). Penguin Books India. ISBN 9780144000753.
  63. ^ Brown, Robert L. (1991). Ganesh: Studies of an Asian God (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780791406564.
  64. ^ Saran, Shyam (2018-07-20). Cultural and Civilisational Links between India and Southeast Asia: Historical and Contemporary Dimensions (इंग्रजी भाषेत). Springer. ISBN 9789811073175.
  65. ^ "प्रियजनांना द्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा खास, हे घ्या नवेकोरे संदेश अन् फोटो". सकाळ. 2023-09-18 रोजी पाहिले.
  66. ^ Singh, Kumar Suresh; Halbar, B. G.; India, Anthropological Survey of (2003). Karnataka (इंग्रजी भाषेत). Anthropological Survey of India. ISBN 9788185938981.
  67. ^ Guides, Bluworlds (2015-05-06). Goa, Kovalam Pocket Travel Guide (इंग्रजी भाषेत). Bluworlds Guides.
  68. ^ Berntsen, Maxine (1988). The Experience of Hinduism: Essays on Religion in Maharashtra (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780887066627.
  69. ^ Subramuniyaswami, Satguru Sivaya (1996). Loving Ganesha (इंग्रजी भाषेत). Himalayan Academy Publications. ISBN 9781934145173.
  70. ^ GANGASHETTY, RAMESH (2019-10-30). THIRTHA YATRA: A GUIDE TO HOLY TEMPLES AND THIRTHA KSHETRAS IN INDIA (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-68466-134-3.
  71. ^ Yadu, Hemūlāla (1990). Dakshiṇa Kosala kī kalā: Mahanta Ghāsīdāsa Smāraka Saṅgrahālaya, Rāyapura ke viśesha sandarbha meṃ, āṭhavīṃ śatī Īsvī se terahavīṃ śatī Īsvī (हिंदी भाषेत). Rāmānanda Vidyā Bhavana.
  72. ^ "ज्ञानेश्वरी/अध्याय पहिला - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2018-09-06 रोजी पाहिले.
  73. ^ Jośī, Manohara Y. (1973). Śrī Gaṇeśa-darśana. Prasāda Prakāśana.
  74. ^ गुणाधिश जो ईश - जयंत साळगावकर
  75. ^ गुणाधीश जो ईश - जयंत साळगावकर पा १८८
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: