महानुभाव पंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ज्ञानेश्वरांच्या काही काळ आधी 'महानुभाव' संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला.आणी मराठी भाषेचा आद्य मराठी ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला'‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः'’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. वि.भि. कोलते यांच्या मते (पहा : लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५) या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले असल्याचे शं. गो. तुळपुळे म्हणतात.

समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वैदिक तत्त्वज्ञानाला बाजूला करून, ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला आणि सर्वच देवतांचे प्रस्थ कमी केले. देवतांच्या पूजेचा निषेध केला आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर हल्ला चढविला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, सकलजाती, बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय ठेवली. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले. धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या बौद्ध आणि जैन संप्रदायांप्रमाणो जनभाषेत आपले तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला.

श्री चक्रधरस्वामी आणि पुढे इतर संतांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते.

ओळख[संपादन]

महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. उत्तरेकडे या संप्रदायाला जयकृष्णी पंथ म्हटले जाते. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम व महंत आहेत. या संप्रदायाच्या समाजावादी व चातुर्वर्ण्यविरोधी विचारसरणीमुळे मोठय़ा प्रमाणात अनुयायी लाभले. महानुभाव संप्रदायाचे तेरा आम्नाय आहेत. कवीश्वर आम्नाय हा त्यांतील एक होत. मुरारी बास हे याच आम्नायातले आहेत. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथांवर भाष्ये-महाभाष्ये लिहिली गेली. भाष्यलेखनाची परंपरा व्यापक, प्रदीर्घ व भाष्य-लेखन सातत्य टिकविणारी आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप श्री चक्रधरस्वामी यांनी बाराव्या तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररूपाने 'दृष्टान्तपाठ' या ग्रंथात सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. हा इतिहासही महानुभाव साहित्याचे वेगळपण सिद्ध करणारा आहे. याच भाष्यलेखनमालिकेतील मुरारीबासांचा 'दृष्टान्तप्रबोध' हा ग्रंथ होय. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे.

यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींना लोक "पंचकृष्णां" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल स्वामींना आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठांत संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. ते अहिंसा, शाकाहार, सात्त्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यांनी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाचे महानुभाव पंथाचे संन्यासी यांनी तिथे महानुभाव पंथाचा प्रचार-प्रसार केला . ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला ते हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात.

महानुभाव पंथ व साहित्य[संपादन]

यादवराजांच्या कारकिर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला.
‘महानुभाव’ या नावाने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे.
चक्रधरोक्त सिद्धान्तसूत्रपाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्णलीलावर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात. कृतयुगात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात श्रीकृष्ण आणि कलियुगात चक्रधर असे चार अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी आहे. द्वारकाधीश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धिपूरचे गोविंदप्रभू आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात. त्यांपैकी दत्तात्रय, श्रीकृष्ण चक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत.
जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि व अनंत मूळ चार तत्त्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. मनुष्यरूपानेच प्राणिमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रपंच हा अनित्य असून अनादि अविद्यायुक्त जीव बद्धमुक्त, देवता नित्यबद्ध आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे; जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत. जीवेश्वराचा संबंध हा स्वामिभृत्यासारखा आहे, असे ते मानतात. या दृष्टीने हा पंथ द्वैती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणारा आहे.
अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वरस्वरूपाचा आनंद भोगण्याची पात्रता जीवाच्या ठिकाणी असल्याने महानुभावांनी जीवास ‘बद्धमुक्त’ मानले आहे. प्रपंचाचे स्वरूप अष्टभैरवस्थित पंचमहाभूते व त्रिगुण यांच्यापासून निर्माण झालेली सृष्टी असे असून त्याचे ‘कारण प्रपंच’ व ‘कार्य प्रपंच’ असे दोन भाग केले आहेत. ‘कारण प्रपंच’ हा अनादि अनंत म्हणूनच नित्य आहे. कार्यरूप प्रपंच हा व्यक्त आणि अनित्य होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘प्रपंचु संहारे’ असे म्हटले असल्यामुळे प्रपंच अनित्य वर्गातला आहे, यात शंका राहत नाही. अविद्या अनादि मानली तरी ती नित्य असली पाहिजे, असे अनुमान करण्याचे कारण नाही. कारण–अविद्या व कार्य−अविद्या मोक्षस्थितीत संपूर्ण नाश पावतात, असे गौतम बुद्धशंकराचार्य यांचे मत आहे, तेच चक्रधर स्वामींनी मान्य केले आहे (महाराष्ट्र जीवन, खंड १, पृष्ठ २१९).
देवतांचे नऊ थोवे महानुभावीयांनी कल्पिले असून त्यांची प्रत्येक ब्रह्मांडातील संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा इतकी आहे, असे ते समजतात. त्या नित्यबद्ध, भावरूप पण अव्यक्त आणि ज्ञान, सुख, ऐश्वर्य, प्रकाश व सामर्थ्य यांनी युक्त असल्या, तरी परमेश्वरूप नव्हेत. देवतांचे मुख्य कार्य सृष्टीतील जीवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे आहे, अशी त्यांची धारणा असते. अद्वैत वेदान्तामध्ये ब्रह्मस्वरूप हे अंतिम सत्य व ईश्वर हे ब्रह्माचे सोपाधिक म्हणजे गौण स्वरूप मानले आहे.
महानुभाव तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराचे (१) अवतरदृश्यावतार, (२) परदृश्यावतार, (३) उभयदृश्यावतार असे तीन प्रकारचे अवतार आहेत. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धार करू शकतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सन्निधानाने आपला उद्धार करून घेतात. मात्र जीवाचे उद्धरण म्हणजे अद्वैत्यांची मुक्ती नव्हे. मुक्तीनंतरही जीवाचे अस्तित्व टिकून राहते. ईश्वराकडून शब्दज्ञान झाले, तरी मोक्षमार्गाने जाण्यासाठी अनुसरणाच्या मार्गाचा अवलंब करून वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापूर्वी सर्वेंद्रिये कार्यक्षम असताना संन्यास घेणे आवश्यक आहे. संन्यास घेऊन परमेश्वराला अनुसरल्यानंतर देहान्तापर्यंत साधकाला ‘असती−परी’ आचरावी लागते. महानुभावांचे उपदेशी आणि संन्यासी असे दोन वर्ग असून उपदेशी वर्ग लौकिक जीवनात चातुर्वर्ण्य पाळतो. संन्यासदीक्षेनंतर मात्र जातिनिर्बंध पाळण्याची आवश्यकता नाही.

महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर हे होत. ऋद्धिपूरच्या गोविंदप्रभू या परमेश्वरावताराचे ते शिष्य. त्यांचे मूळचे नाव हरपाळदेव असून त्यांच्या मृत शरीरात चांगदेव राऊळ यांनी प्रवेश करून नवीन अवतार धारण केला अशी कल्पना आहे. नागदेवाचार्य हे चक्रधरांचे पट्टशिष्य व पंथाचे पहिले आचार्य. चक्रधरांच्या वैदिक धर्माहून आणि लोकरूढीहून वेगळ्या शिकवणीमुळे तत्कालीन सनातनी लब्धप्रतिष्ठितांकडून त्यांना विरोध झाला व त्यांना नाहीसे करण्याचे प्रयत्न झाले.

महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय. महानुभाव वाङ्मयात चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र व व्यक्तिमहात्मवर्णने, स्तोत्रे इ. प्रकारचा समावेश आहे. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर; भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध व उद्धवगीता. दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत. श्रीचक्रधर व श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले आणि पंथीयांच्या नित्यस्मरणाची मोठी सोय केली. केसोबासांनी लीळाचरित्रातील काही लीळा निवडून त्या संस्कृत भाषेत पद्यबद्ध केल्या व आपला रत्नमालास्तोत्र ग्रंथ निर्माण केला. नागदेवांच्या जीवनावरील स्मृतिस्थळ हा चरित्रग्रंथ प्रथम नरेंद्र व परशराम बासांनी तयार केला, असे म्हणतात. पुढे त्याचे मालोबास व गुर्जर शिववास यांनी संस्करण केले. केशवराज सूरी यांनी सिद्धान्तसूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ हे पंथीय तत्त्वज्ञान विशद करणारे ग्रंथ तयारे केले. श्रीचक्रधरांनी नित्यदिनचर्या सांगणारा छोटा पण महत्त्वाचा ग्रंथ पूजावसर हा वाङ्देववास यांचा. मुनिव्यासांनी श्रीचक्रपाणी, गोविंदप्रभू व चक्रधर यांच्या ‘संबंधा’ने पवित्र झालेल्या स्थळांची स्थानपोथी लिहिली. डॉ. कोलते ह्यांच्या मते ते कर्तृत्व शंकास्पद आहे. म्हाइंभट हे मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. धवळे व मातृकी रुक्मिणीस्वयंवर रचणारी चक्रधरशिष्या महदाइसा ही आद्य मराठी कवियत्री होय. हयग्रीवाचार्य यांनी भागवताच्या दशम स्कंधावर गद्यराज हे निर्यमक श्लोकबद्ध काव्य लिहिले. पंथाच्या उत्कर्षकाळात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या ग्रंथरचनेनंतर भाष्यग्रंथ व इतर प्रकारचे साहित्य लिहिले गेले. त्यात गुर्जर शिववासाने, चक्रधरांच्या वचनांवर संबंधिलेले लक्षणस्थळ, विचारस्थळ व आचारस्थळ हे ग्रंथ महत्त्वाचे होत. यांतील प्रत्येक स्थळावर पुढे अनेक भाष्ये किंवा बंद लिहिले गेले. त्यांत दत्तराज मराठे यांचा लक्षणबंद, वाईंदेशकरांचा विचारबंद विश्वनाथवास बीडकर यांचा आचारबंद विशेष महत्त्वाचे आहेत. स्थळ व बंद ग्रंथांनी चौदाव्या-पंधराव्या शतकांत मराठी गद्याचे दालन विशेष समृद्ध झाले आहे. याच काळात मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला. चक्रधरांची वचने ज्या प्रसंगी निरूपिली गेली वर्णन करणारा, निरुक्तशेष ग्रंथ भीष्माचार्य वाइंदेशकर ह्यांनी तयार केला. तोही पंथीय वाङ्मयात महत्त्वाचा मानला जातो.

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराती भाषक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली (नको गा केशवदेया : येणें, माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवैस की : किंवा ‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा :) (स्मृ. स्थ. १५, ६६). चक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपरिक संस्कृत पठडीत तयार झालेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृत वाङ्मयाच्या वळणावर गेली असून त्यांच्या भाषेवर संस्कृताचा मोठा प्रभाव आहे. या ग्रंथात प्रारंभी महाकाव्यसदृश सलग ग्रंथरचना झाली. पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या, धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली. लक्ष्मण रत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीसलक्षणांची टीप यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे सूत्रभाष्य, अर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र यांची रचना मराठीच्या प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर जोपासनाही केली. महानुभावीयांच्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१) चरित्रग्रंथ, (२) सूत्रग्रंथ, (३) साती (काव्य) ग्रंथ, (४) भाष्यग्रंथ, (५) साधनग्रंथ, (६) तात्त्विक ग्रंथ, (७) गीता टीका, (८) आख्यानक काव्ये, (९) स्थलवर्णनपर ग्रंथ, (१०) इतिहासग्रंथ, (११) स्फुटरचना अशा प्रकारांत करता येईल.

भास्करभट हे पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमणाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपूरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. काही आग्नायांनी सांकेतिक लिपीत आपले ग्रंथ निबद्ध केले. आपली ब्रह्मविद्या, धर्ममते भ्रष्ट होऊ नयेत म्हणून इतरांपासून गुप्त ठेवण्याची आणि पंथीय वाङ्मयाचे पावित्र्य राखण्याची भावना वाढीस लागून त्यासाठी ग्रंथ सांकेतिक लिपीत लिहिण्यास येऊ लागले. रवळो व्यासाने १३५३ मध्ये सकळ लिपी तयार केली आणि १३६३ मध्ये सुंदरी लिपी निघाली. त्यानंतर पारमांडल्य, वज्रलिपी, अंकलिपी इ. अनेक लिप्या तयार झाल्या असल्या, तरी बहुतेक ग्रंथ सकळ लिपीतच आढळतात. परशुराम आचार्यांच्या काळात निर्माण झालेल्या अनुयायांची नावे अशी : (१) कवीश्वर, (२) उपाध्ये, (३) पारिमांडल्य, (४) अमृते, (५) मदळसा, (६) कुमर, (७) यक्षदेव, (८) दामोदर, (९) हरिदेव, (१०) जयदेव, (११) साळकर, (१२) दिवाकर आणि (१३) महेश्वर. महानुभाव पंथाने प्रस्थापित आचारधर्मावर प्रहार करून एक नवा विचारप्रवाह निर्माण केला. चक्रधरांनी गीतेवरील भाष्याच्या स्वरूपात पारंपरिक पद्धतीने आपले विचार न मांडता स्वतंत्रपणे मांडले. श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानून त्यांनी पंचकृष्णांखेरीज अन्य देवता क्षुद्र मानल्या. स्त्रीशूद्रादिकांना संन्यासाचा अधिकार देऊन मोक्षमार्ग सर्वासाठी त्यांनी खुला केला. पंथीय तत्त्वविचार लोकभाषेत, मराठीत मांडले मराठी वाङ्मय समृद्ध झाले; परंतु सामान्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार न करता या पंथातील संस्कृतज्ञ ग्रंथकारांनी लेखन केल्यामुळे त्याच्या प्रसारास मर्यादा पडल्या. महानुभाव पंथाच्या वैदिक वा अवैदिक स्वरूपाबाबत वाद आहे. तो वेदानुयायी किंवा वेदविरोधी दोन्ही नसून त्याचे स्वतंत्र रूप आहे. असेही काही मानतात. त्यांचे वेदविरोधकत्व सांगताना (१) वेद हे कर्मरहाटीचे शास्त्र म्हणून त्याज्य आहे, हे चक्रधरांचे मत, (२) देवतांची उपासना परमेश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अप्रमाण, (३) चक्रधर वचने हीच महानुभावांची श्रुती असून वेदवचने ते प्रमाण मानीत नाहीत म्हणून, वगैरे.

महानुभाव ह्या प्रमुख संप्रदायामध्ये महानुभाव, वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आहेत.

अवतार[संपादन]

महानुभाव पंथातील देवाचे अवतार

 1. श्रीकृष्ण प्रभू,
 2. श्रीदत्तात्रेय प्रभू,
 3. श्री चक्रपाणी महाराज,
 4. श्री गोविंदप्रभू,
 5. सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी प्रभू

महानुभावीय तत्त्वज्ञान[संपादन]

‘सूत्रपाठ’ या ग्रंथास महानुभावांचा वेद असे संबोधले जाते. त्यातून महानुभावांचे सारे तत्त्वज्ञान विशद झाले आहे. महानुभाव जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या वस्तू मुख्य व नित्य अशा मानतात. त्यांच्या मते, या चार वस्तू स्वतंत्र, नित्य, अनादि व अनंत आहेत. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर यांचे परस्परांशी किंवा सर्वांशी कधीच ऐक्य साधले जात नाही, असे हा पंथ मानतो. म्हणूनच त्यास ‘द्वैती पंथ’ म्हणतात. ‘देवता या नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत, परमेश्वर नित्यमुक्त आहे व प्रपंच अनित्य आहे’ असे या तत्त्वज्ञानाचे सूत्र आहे.

जीव : जीव बद्धमुक्त म्हणजे बद्ध असूनही मुक्तीस पात्र असणारा असा आहे. त्याला मायेचे बंधन आहे. तो मूलतः स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे पण अविद्येमुळे त्याला काळसरपणा प्राप्त झालेला आहे. तांदळाच्या दाण्यावर जसे पाच पदर असतात, तसा जीव हा ‘पाच पिशीं’नी युक्त असतो. अनादि, अविद्या, अन्यथाज्ञान, जीवत्व व आदिमळ या त्या पाच पिशी होत. यासाठी उद्धवगीतेत मडक्याच्या उतरंडीचा समर्पक दृष्टान्त दिला आहे. यांतील सर्वांत तळाचे मडके अविद्या हे आहे. हे अविद्येनेच मडके फोडले म्हणजे वरची मडकी आपोआपच फुटतील.

प्रपंच : प्रपंचास महानुभाव अनित्य मानतात. कारणप्रपंच व कार्यप्रपंच असे त्यांनी प्रपंचाचे दोन भाग केले आहेत. अव्यक्त असणारी पंचमहाभूते व त्रिगुणी म्हणजेच कारणप्रपंच होय. कार्यप्रपंचाची निर्मिती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज, तम हे त्रिगुण यांच्यातून झाली आहे.

देवता : देवतांना महानुभावांनी गौण मानले आहे. परमेश्वर हा नित्यमुक्त असल्यामुळेच तो जीवाचा उद्धार करू शकतो. (परमेश्वर एकु सोडविता) परमेश्वराचे ज्ञान झाले म्हणजे, अथवा भक्ती केली म्हणजे, जीवाला मोक्ष मिळतो. मोक्ष परमेश्वराकडूनच मिळू शकतो. देवतांकडून नाही. देवतांचे कार्य सृष्टीतील जिवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे होय.

वेदान्तातील कल्पनेच्या उलट महानुभावीय ईश्वरास प्रमुख स्थान देतात आणि ब्रह्मास एक भाग मानतात. त्यांच्या मते, ईश्वर हा अनादि, नित्य, अव्यक्त, स्वयंप्रकाशी, सर्वव्यापी, ज्ञानमय, आनंदमय, सर्वसाक्षी व सर्वकर्ता असा आहे. जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यदेह धारण करून अवतार घेतो. ईश्वराचे स्वरूप ज्ञानामुळे ओळखता येते. शब्दज्ञान, सामान्यज्ञान, अपरोक्षज्ञान व विशेषज्ञान असे या ज्ञानाचे चार प्रकार आहेत. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग ही मोक्षप्राप्तीची दोन साधने आहेत.

महानुभाव चार युगांचे चार अवतार मानतात. कृतयुगात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात कृष्णावतार आणि कलियुगात चक्रधरावतार असे हे अवतार होत. महानुभावांनी फक्त पाचच मूर्ती मानून त्यांची पूजा केली आहे. हे पाच अवतार हेच त्यांचे पंचकृष्ण होत. गुरूवर प्रीती करावी पण त्याला परमेश्वर समजू नये असे महानुभाव मानतात. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा असला तरी वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांच्या वचनांनाच प्रमाण मानतात.

महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान[संपादन]

व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, असे सांगणारा महानुभाव हा एकच पंथ असून, येथे सर्व माणसे समान आहेत, असे काही विद्वान मानतात. त्यांच्या मते दंभ निर्माण होतात तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. प्रत्यक्ष असणे व दिसणे यातील भेद संपतो, तेव्हा दंभ संपतो. त्याचवेळी समाजात परिवर्तन घडू शकते. महानुभाव पंथ हा सर्वाना सामावून घेणारा पंथ आहे. येथे सर्व समान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक येथे दिसतात. येथे जातिभेद नाही, तर केवळ तत्त्वज्ञान आहे. धर्मासाठी आम्ही नाही, तर धर्म आमच्यासाठी आहे. तो साध्य नाही, तर साधन आहे. हीच पंथाची शिकवण आहे. इ.स. १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. महानुभाव संप्रदाय हा अहिंसावादी असून अहिंसा परमो धर्मः हे त्याचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे

चक्रधर स्वामी सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक[संपादन]

बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. त्या काळानंतर हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्यांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले, असा आरोप होतो. चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले. हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे, असे काहींचे मत आहे. चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते, असे म्हटले जाते.

 • आचार्य भानुकवी जामोदेकर साहित्य संघाचे पहले आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे भरले होते. या संमेलनाचे अध्यक्ष महंत बाभुळगावकरशास्त्री होते
 • 2018 साली अखिल भारतीय महानुभाव साहित्य महा मंडळाने सुद्धा 12वे तपपूर्ती महानुभाव साहित्य संमेलन जालना येथे भरविले होते. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे हे होते. या संमेलनात राज्यातील सर्व साहित्यिक, राजकीय नेते, विद्यार्थी, संशोधक, मराठी साहित्य प्रेमी व महानुभाव पंथाचे अनुयायी सहभागी झाले होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून तत्कालीन आमदार राजेशभैया टोपे हे होते. कार्याध्यक्ष म्हणून महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव होते. हे संमेलन सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी विचार प्रबोधिनी सेवाभावी संस्था , खनेपुरी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण जालना यांनी यशस्वी रित्या आयोजन केले होते.

प्रमुख महानुभावी व्यक्ती[संपादन]

महानुभाव पंथाचे अभ्यासक[संपादन]

महानुभाव पंथ हा सर्वांत जुन्या पंथांपैकी एक असला तरी त्यावर राजकीय आक्रमणांमध्ये पंथीय साहित्य पुन्हापुन्हा नष्ट होण्याचे प्रसंग आले. त्यामुळे सांगोवांगी लीळा मिळवून पुनर्लेखनाचे प्रयत्‍न झाले. कोणत्या लीळा मूळ आहेत याविषयी (त्यांचा मोठा जाणता वर्ग संन्यस्त असल्यामुळे) पंथेतर साहित्यिकांनी केलेले संशोधन खऱ्या पंथश्रद्धांशी जुळत नाही असा आक्षेप काही पंथीयांनी कालौघात घेतला. विष्णू भिकाजी कोलते यांचा परिचय अग्रगण्य महानुभाव साहित्य संशोधक म्हणून होता. पण नंतरच्या काळात पंथ संप्रदायाच्या लोकांनी काही मुद्द्यांवरील त्यांचे लेखन अमान्य असल्याचे सांगितले.

चरणांकित तीर्थस्थाने[संपादन]

 • श्री दत्तात्रेय आत्मतीर्थ भोजनस्थान पांचाळेश्वर
 • आसन छिन्नस्थळी , डोमेग्राम, जिल्हा अहमदनगर
 • राजमठ , श्रीक्षेत्र डोमेग्राम , कमालपूर, जिल्हा अहमदनगर
 • पिंगळभैरव देवस्थान, अचलपूर
 • श्री चक्रधर मंदिर, भोकर ता.श्रीरामपुर
 • वटेश्वर निद्रास्थान वडनेर-भुजंग
 • सर्पद्वयपतन स्थान वडनेर-भुजंग
 • वाळकेश्वर मंदिर, पातूर
 • उत्तरेश्वर मंदिर, आलेगाव
 • वाळकेश्वर मंदिर, आलेगाव
 • काटेशुक्रमबाबा संस्थान, काकडा
 • अष्टमासिद्धी देवस्थान अचलपूर
 • भारद्वाज वेध स्थान श्रीक्षेत्र खनेपुरी, जिल्हा जालना
 • बारा घोडा स्थान - रिद्धपुर
 • भैरव बुरूज स्थान - रिद्धपूर
 • भिंगार जिल्हा अहमदनगर
 • विघ्नेश्वरी बाबा, येळवण, जिल्हा अकोला
 • श्रीक्षेत्र वालसावंगी, ता.भोकरदन,जि.जालना.
 • श्रीक्षेत्र जाळीचा देव, जालना जिल्हा
 • (सावळेद्वार) सावळदबारा, ता.सोयगाव जि.औरंगाबाद
 • श्रीदत्त मंदिर मौजे सुकेने,(नाशिक). श्री दत्त मंदिर शेंदुरजन बुलढाणा जिल्हा

प्रमुख ग्रंथ[संपादन]

महानुभावांनी, आठवणी, दिनचर्या, स्थळवर्णन, व्यक्तिवर्णन, कथात्मक भावगीतसदृश, तात्त्विक व विवेचनपर अशी विविध प्रकारची रचना केली आहे. लीळाचरित्र, स्मृतिस्थळ, ऋद्धिपूरचरित्र, सिद्धान्तसूत्रपाठ, दृष्टांतपाठ व पूजावसर हे गद्यवाङ्‌मय एका धार्मिक प्रेरणेतून आल्याचे दिसते. या सर्व रचनेत चक्रधरांचे चरित्र व शिकवणूक हाच विषय प्राधान्याने आहे. बहुतेक गद्यग्रंथ संकलनात्मक आहेत.

गद्यग्रंथ[संपादन]

पद्यग्रंथ[संपादन]

वर दिलेल्या सूचीतील पहिल्या सात ग्रंथांना महानुभाव पंथामध्ये खास मानाचे स्थान असून ते सामूहिकपणे "साती ग्रंथ" या नावाने ओळखले जातात.

महानुभावी वाङ्मय : एक मूल्यमापन[संपादन]

महानुभाव पंथाच्या वाङ्मयीन कालमर्यादेच्या दृष्टीने इ. स. १३५० ते १६८० हा कालखंड म्हणजे त्या वाङ्मयाचा उत्तररंग ठरत असला तरी त्याला उत्तररंगाचे वैभव मात्र नाही; कारण या पंथाच्या वाङ्मयाचा ‘पूर्वरंग’ अतिशय समृद्ध आणि संपन्न आहे. वि.ल. भावे यांच्या महानुभाव वाङ्मयसूचीचे अवलोकन केल्यास आजमितीस त्याचा निम्माशिम्मा भागही प्रकाशित झालेला नाही हे लक्षात येते. त्यांच्या सूचीत नोंदलेले भाष्यग्रंथ, स्थळग्रंथ, लक्षणग्रंथ, टीपग्रंथ इत्यादी ज्या दिवशी मुद्रणाचा संस्कार घडून उपलब्ध होतील, त्या दिवशी या कालखंडाच्या संपन्नतेचा नेमका साक्षात्कार होऊ शकेल. महानुभाव पंथाने मराठी भाषेला ‘शास्त्र काट्याची कसोटी’ प्राप्त करून दिली आहे.

== अनावश्यक मसुदा

अधिक वाचन[संपादन]

संदर्भ[संपादन]