चंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

चंद्र  Moon symbol decrescent.svg
Full Moon Luc Viatour.jpg
पृथ्वीवरून दिसणारा चंद्र
Lunar libration with phase Oct 2007.gif
चंद्राच्या कला
कक्षीय गुणधर्म
उपपृथ्वी: ३,६३,१०४ कि.मी.
अपपृथ्वी४,०५,६९६ कि.मी.
परिभ्रमण काळ: २७.३२१५८२ दिवस
सिनॉडिक परिभ्रमण काळ: २९.५३०५८८ दिवस
सरासरी कक्षीय वेग: १,०२२ मी. प्रति सेकंद
कक्षेचा कल: ५.१४५ °
कोणाचा उपग्रह: पृथ्वी
भौतिक गुणधर्म
सरासरी त्रिज्या: १,७३७.१० कि.मी.
विषुववृत्तीय त्रिज्या: १,७३८.१४ कि.मी.
धृवीय त्रिज्या: १,७३५.९७ कि.मी.
फ्लॅटनिंग: ०.००१२५
परीघ: १०,९२१ कि.मी. (विषुववृत्तावर)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: ३.७९३ x १० वर्ग कि.मी.
( पृथ्वीच्या ०.०७४ पट)
वस्तुमान: २.१९५८ x १०१० घनमीटर
सरासरी घनता: ३,३४६.४ कि.ग्रॅ प्रति घनमीटर
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ): १.६२२ मी. प्रति वर्ग सेकंद
मुक्तिवेग: २.३८ कि.मी./सेकंद
सिडेरियल दिनमान: २७.३२१५८२ दिवस
विषुववृत्तावरील परिवलनवेग: ४.६२७ मी/सेकंद
आसाचा कल: १.५४२४°
पृष्ठभागाचे तापमान:
   विषुववृत्तीय
   ८५° उत्तर
किमानसरासरीकमाल
१०० के२२० के३९० के
७० के१३० के२३० के
विशेषणे: चांद्र


चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७४ कि.मी. आहे.[१] याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे व चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते.

अनुक्रमणिका

चंद्राच्या कला[संपादन]

चांद्र मास, चांद्र वर्ष[संपादन]

चांद्र मास हा तीस दिवसांचा (प्रत्यक्षात साडे एकोणतीस दिवसांचा) असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे (प्रत्यक्षात ३५४ दिवसांचे). हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे दर (सुमारे) ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो. त्यातूनही राहिलेली तफावत दूर करण्यासाठी (सुमारे) १९ किंवा १४१ वर्षांनी क्षयमास येतो.

नीलचंद्र[संपादन]

जेव्हा एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला (मास-सीमित) नीलचंद्र (मन्थली ब्लू मून) म्हणतात. असा नीलचंद्र यापूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी होता आणि त्यांनंतर ३१ ऑक्टोबर २०२०ला असेल.

जेव्हा एका त्रैमासिक ऋतूमध्ये तीनच्या जागी चार पौर्णिमा येतात तेव्हा त्यांच्यापैकी तिसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला (ऋतुसीमित) नीलचंद्र (सीझनल ब्लू मून) म्हणतात. २१ मार्च ते २१ जून या कालावधीतील सौर वसंत ऋतूत, १८ मे २०१९ रोजी, वसंत ऋतूतल्या चार पौर्णिमांपैकी तिसरी पौर्णिमा होती. त्या पौर्णिमेच्या चंद्राला नीलचंद्र ((ब्लूमून) म्हटले गेले. यापूर्वीचा (ऋतुसीमित) नीलचंद्र २१ मे २०१६ दिवशी होता, तर यानंतरचा २२ ऑगस्ट २०११ रोजी असेल.

इसवी सनाच्या १५५० ते २६५० या ११०० वर्षांच्या काळात ४०८ ऋतुसीमित नीलचंद्र आणि ४५६ मास-सीमित नीलचंद्र होते/असतील. याचा अर्थ कोणत्यातरी प्रकारचा नीलचंद्र दर दोन किंवा तीन वर्षांनी यॆतो.

नीलचंद्र निळया रंगाचा नसतो. परंतु नीलचंद्राचा योग येणे हे जरासे दुर्मीळ असल्याने क्वचित घडणाऱ्या घटनेसाठी Once in a blue moon हा वाक्प्रचार वापरतात. मराठी ह्याला 'कधीतरी, सठी-सामासी' असा समांतर वाक्प्रयोग आहे.

सुपरमून[संपादन]

पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर (उपभू बिंदूवर - Perigeeला) येतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपॆक्षा मोठा दिसतॊ. यालाच सुपरमून म्हणतात. वर्षाच्या १२-१३ महिन्यांत असा सुपरमून दोन किंवा तीनवेळा दिसतो. खरोखरच अतिविशाल सुपरमून २६ जानेवारी १९४८ला दिसला होता; त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी. यापुढचे अतिशय मोठे सुपरमून २५ नोव्हेंबर २०३४ रोजी आणि त्यानंतर ६ डिसेंबर २०५२ रोजी दिसतील.

सुपरमून आणि चंद्रग्रहण कधीकधी एकाच दिवशी येते. असे महिने : जानेवारी २०१९ आणि मे २०२१.

वर्षातून वारंवार (सुमारे २ ते ५ वेळा) आलेले काही सुपरमून दिवस[संपादन]

 • ३१ जुलै२०१५
 • २९ ऑगस्ट २०१५
 • २८ सप्टेंबर २०१५
 • २७ ऑक्टोबर २०१५
 • २५ नोव्हेंबर २०१५
 • १६ सप्टेंबर २०१६
 • १६ ऑक्टोबर २०१६
 • १४ नोव्हेंबर २०१६
 • १४ डिसेंबर २०१६
 • १२ जानेवारी २०१७
 • ४ नोव्हेंबर २०१७
 • ३ डिसेंबर २०१७
 • २ जानेवारी २०१८
 • ३१ जानेवारी २०१८
 • २२ डिसेंबर २०१८
 • १९ फेब्रुवारी २०१९
 • २१ मार्च २०१९

चंद्रावरील मानवी मोहिमा[संपादन]

ज्या खगोलीय वस्तूवर माणसाने पाऊल ठेवले आहे, अशी चंद्र ही ही एकमेव खगोलीय वस्तू आहे सोव्हियत संघाचे लूना १ हे अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटून चंद्राच्या अतिशय जवळून जाणारी पहिली वस्तू आहे. लूना २ हे अंतराळयान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले. तसेच लूना ३ या यानाने चंद्राच्या दुसऱ्या बाजूची सर्वप्रथम छायाचित्रे घेतली. ही तिन्ही याने सोव्हियत संघाने १९५९ साली सोडली. १९६६ साली चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले अंतराळयान हे लूना ९ होते; तसेच लूना १० ने चंद्राला सर्वप्रथम प्रदक्षिणा घातल्या.[१] ज्याद्वारे मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवले अशी अमेरिकेची अपोलो मोहीम ही जगातील आजवरची एकमेव मोहीम आहे

चंद्राचा पृष्ठभाग[संपादन]

चंद्राच्या दोन बाजू[संपादन]

चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू (सन्मुख बाजू) पृथ्वीच्या दिशेला असते. चंद्राच्या दुसऱ्या बाजूची (विन्मुख बाजूची) छायाचित्रे ही सर्वप्रथम लूना ३ या अंतराळयानाने १९५९ साली घेतली.

पृथ्वीवरून पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा एकूण ५९% इतका भाग पृथ्वीवरून दिसतो. पण एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त ५०% भागच पाहता येतो.

Moon PIA00302.jpg   Moon PIA00304.jpg
चंद्राची पृथ्वीसन्मुख बाजू   चंद्राची पृथ्वीविन्मुख बाजू

चंद्राच्या दोन्ही बाजूंमध्ये लक्षात येणारा सर्वांत मोठा फरक म्हणजे चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर दिसणारे डाग (मारिया).

मारिया[संपादन]

चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर असलेल्या डागांना ”मारिया” असे नाव आहे. हे नाव ”लॅटिन” भाषेतील ”मेअर” म्हणजे ”समुद्र” या शब्दाचे अनेकवचन आहे. पूर्वीचे खगोलशास्त्रज्ञ या डागांना पाण्याचे समुद्र समजत असत. आता मात्र हे डाग म्हणजे लाव्हा पासून बनलेले बसाल्ट खडक असल्याचा शोध लागलेला आहे. चंद्रावर धडकलेल्या उल्का तसेच धूमकेतू यांच्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यांमध्ये लाव्हा भरला गेल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर डाग दिसतात.

चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूपैकी सुमारे ३१% भाग[१] हा मारिया डागांनी व्यापलेला आहे. तर पृथ्वीविन्मुख बाजूवर फक्त २% एवढाच भाग या डागांनी व्यापलेला आहे.,[२] यामागील शास्त्रीय कारण म्हणजे चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर असणारे उष्णता निर्माण करणाऱ्या घटकांचे जास्त प्रमाण होय..[३][४]

चंद्राच्या पृष्ठभागावरील डागांचा भाग सोडला तर इतर भाग हा उंच पर्वतरांगानी व्यापलेला आहे. या पर्वतरांगा उल्का व धूमकेतूंच्या झालेल्या धडकांमुळे तयार झाल्या असाव्यात असे शास्त्रज्ञांना वाटते. पृथ्वीप्रमाणे अंतर्गत हालचालींमुळे तयार झालेल्या पर्वतरांगा चंद्रावर आढळत नाहीत.

१९९४ साली क्लेमेंटाईन अंतराळयानाने घेतलेल्या चंद्राच्या छायाचित्रांमध्ये असे दिसून आले की चंद्राच्या उत्तरध्रुवावरील ”पियरी विवराच्या” बाजूने असणाऱ्या चार मोठ्या पर्वतरांगांवर पूर्णवेळ प्रकाश असतो. चंद्राच्या अक्षातील छोट्याशा कलण्याने (१.५ अंश) या ठिकाणी कायम प्रकाश असतो. चंद्राच्या दक्षिणध्रुवाजवळ असणाऱ्या काही पर्वतरांगांवर दिवसाच्या ८०% वेळ सूर्यप्रकाश असतो.

चंद्रावरील विवरे[संपादन]

पृथ्वीविन्मुख बाजूवर असणारे डिडॅलस विवर

चंद्राच्या पृष्ठभागावर उल्का तसेच धूमकेतूंच्या धडकेने तयार झालेली अनेक विवरे दिसतात. यातील जवळजवळ पाच लाख विवरांचा व्यास हा १ कि.मी. पेक्षा जास्त आहे.[५] चंद्रावरील वातावरणाचा अभाव, तिथले हवामान व इतर खगोलीय घटनांमुळे ही विवरे पृथ्वीवरील विवरांपेक्षा सुस्थितीत आहेत.

चंद्रावरील सर्वांत मोठे विवर म्हणजे दक्षिण ध्रुवाजवळ असणारे एटकेन विवर होय. हे विवर संपूर्ण सूर्यमालेतील सर्वांत मोठे ज्ञात विवर आहे. हे विवर चंद्राच्या पृथ्वीविन्मुख बाजूवर असून त्याचा व्यास सुमारे २,२४९ कि.मी. तर खोली सुमारे १३ कि.मी. आहे..[६] पॄथ्वीकडील बाजूवरील मोठी विवरे म्हणजे इंब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम व नेक्टारिस.

रिगॉलिथ[संपादन]

चंद्राच्या पृष्ठभागावर आढळणारी धूळ म्हणजे रिगॉलिथ. चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या विविध आघातांमुळे ही धूळ तयार झालेली आहे. ही धूळ चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग एखाद्या चादरीप्रमाणे व्यापते व हिची जाडी मारियामध्ये ३-५ मी. तर इतरत्र १०-२० मी. इतकी आहे.[७]

पाण्याचे अस्तित्व[संपादन]

असे मानले जाते की उल्का व धूमकेतू जेव्हा चंद्रावर आदळतात तेव्हा त्यांच्यातील पाण्याचा अंश हा चंद्रावर सोडतात. असे पाणी नंतर सूर्यप्रकाशामुळे विघटित होऊन ऑक्सिजनहायड्रोजन हे वायू तयार होतात. चंद्राच्या अतिशय कमी गुरुत्वाकर्षणामुळे हे वायू कालांतराने अवकाशात विलीन होतात. पण चंद्राचा अक्ष किंचित कललेला असल्याने चंद्राच्या ध्रुवप्रदेशावरील काही विवरे अशी आहेत की ज्यांच्या तळाशी कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही. या ठिकाणी पाण्याचे रेणू आढळण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते.

क्लेमेंटाईन यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील विवरांचा नकाशा बनविला असता[८] संगणकाच्या साहाय्याने केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे १४,००० चौरस कि.मी. इतक्या प्रदेशात कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही असे अनुमान काढण्यात आलेले आहे.[९] क्लेमेंटाईन यानावरील रडारच्या साहाय्याने नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या बर्फापासून तयार झालेल्या छोट्या छोट्या भागांचे अनुमान निघते. तसेच स्पेक्ट्रोमीटरने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या ध्रुवीय भागांमध्ये हायड्रोजन वायूचे जास्त प्रमाण असल्याचे दिसून येते.[१०] चंद्रावरील एकूण बर्फाचे प्रमाण हे सुमारे एक अब्ज घनमीटर (एक घन कि.मी.) असल्याचे अनुमान शास्त्रज्ञांनी काढलेले आहे.

हा पाण्याचा बर्फ खणून काढून अण्विक जनित्रे अथवा सौर उर्जेवर चालणाऱ्या विद्युत जनित्रांच्या साहाय्याने ऑक्सिजन व हायड्रोजन मध्ये रूपांतर करणे शक्य झाल्यास भविष्यात चंद्रावर वसाहती स्थापन करणे शक्य होईल. कारण पृथ्वीवरून पाण्याची वाहतूक करणे अतिशय किचकट व महागडे काम आहे. तरीसुद्धा सध्याच्या काही संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे क्लेमेंटाईनच्या रडार मध्ये दिसणारे बर्फाचे भाग हे बर्फ नसून नवीन विवरांमधून निघालेले खडक असण्याची शक्यता आहे.[११] त्यामुळेच चंद्रावर नक्की किती प्रमाणात पाणी आहे हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे.

भौतिक संरचना[संपादन]

अंतर्गत रचना[संपादन]

सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्र निर्माण होताना लाव्हाच्या वेगवेगळ्या वेळी झालेल्या स्फटिकीकरण क्रियेमुळे चंद्राचा अंतर्भाग तीन भागांमध्ये विभागला गेलेला आहे.

सर्वांत बाहेरचा भाग (क्रस्ट) हा मुख्यत्वे ऑक्सिजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियमॲल्युमिनियम यांच्या विविध संयुगांमुळे तयार झालेला आहे. या भागाची सरासरी जाडी ही ५० कि.मी. आहे.[१२]

त्याखालील दुसरा भाग (मँटल) हा काही प्रमाणात वितळलेल्या लाव्हामुळे तयार झालेला असून यातील काही भाग पृष्ठभागावर आल्यामुळे चंद्रावर मारिया (डाग) तयार झालेले आहेत. या बॅसॉल्ट खडकांचे पृथ:करण केले असता, मँटल हे मुख्यत्वे ऑलिविन, आर्थोपायरोक्सिन व क्लिनोपायरोक्सिन यांपासून तयार झालेले असल्याचे आढळते. तसेच पृथ्वीच्या मँटलमध्ये आढळणाऱ्या लोहापेक्षा चंद्राच्य

भौगोलिक संरचना[संपादन]

चंद्राची भौगोलिक संरचना

चंद्राच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास हा मुख्यत्वे क्लेमेंटाईन मोहिमेत जमविलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेला आहे. चंद्रावरील सर्वांत खालच्या पातळीवर असलेली जागा म्हणजे दक्षिण ध्रुवावर असणारे एटकेन विवर होय. चंद्रावरील सर्वांत जास्त उंच ठिकाणे म्हणजे या विवराच्या ईशान्येला असणारी पर्वत शिखरे आहेत. यामुळे असे अनुमान निघते की चंद्रावर धडकलेल्या उल्का अथवा धूमकेतूमुळे अवकाशात उत्सर्जित झालेल्या घटक पदार्थांमुळेच या पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत. इतर मोठी विवरे, उदा. इंब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम, स्मिथी व ओरिएंटेल सुद्धा अशाच प्रकारच्या भौगोलिक रचना दर्शवितात. चंद्राच्या आकारातील अजून एक वैविध्य म्हणजे पृथ्वीविन्मुख बाजूवरील पर्वतरांगा या पृथ्वीसन्मुख पर्वतरांगांपेक्षा सुमारे १.९ कि.मी. उंच आहेत.[१२]

गुरुत्वाकर्षण क्षेत्र[संपादन]

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचे मोजमाप चंद्राच्या भोवती फिरणाऱ्या अंतराळयानाने प्रक्षेपित केलेल्या रेडियो तरंगांच्या मोजमापाने करण्यात आलेले आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये एक विशेष बाब म्हणजे विवरांवर असणारे जास्तीचे गुरुत्वाकर्षण.[१३] या जास्तीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राभोवती फिरणाऱ्या अंतराळयानाच्या कक्षेवर बराच परिणाम झालेला आढळतो. त्यामुळेच यापुढील चांद्रमोहिमांपूर्वी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.[१४]

चंद्राच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण क्षेत्र

असे मानण्यात आलेले आहे की चंद्रावर असलेल्या विवरांमध्ये गोठलेला लाव्हा या विशिष्ट ठिकाणी जास्तीचे गुरुत्वाकर्षण असण्याला कारणीभूत आहे. पण जास्तीच्या गुरुत्वाकर्षणाचे अस्तित्व हे फक्त लाव्हाच्या प्रवाहाने होत नसून क्रस्टची जाडी कमी होण्याने पण दिसून आलेले आहे. लुनार प्रोस्पेक्टर गुरुत्वाकर्षण अभ्यासामध्ये काही ठिकाणी विवरे नसताना सुद्धा जास्तीचे गुरुत्वाकर्षण आढळून आलेले आहे.[१५]

चुंबकीय क्षेत्र[संपादन]

चंद्राचे चुंबकीय क्षेत्र

चंद्राचे बाह्य चुंबकीय क्षेत्र हे सुमारे १ ते १०० नॅनोटेस्ला इतक्या ताकदीचे आहे. हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या सुमारे १०० पटीनी कमी ताकदवर आहे.चुम्बकीय क्षेत्रचंद्रमा का करीब 1-100 नैनोटेस्ला का एक बाह्य चुम्बकीय क्षेत्र है। पृथ्वी की तुलना में यह सौवें भाग से भी कम है। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पृथ्वीप्रमाणे चंद्र हा दोन ध्रुवांचा चुंबक नाही, तर जे काही चुंबकीय क्षेत्र तयार झालेले आहे ते संपूर्णत: क्रस्ट मध्ये असणाऱ्या घटकांमुळे तयार झालेले आहेचुम्बकीय क्षेत्र.[१६] शास्त्रज्ञांचे असे अनुमान आहे की चंद्रावर येऊन धडकलेल्या उल्का तसेच धूमकेतूंमुळे हे चुंबकीय क्षेत्र तयार झाले असावे कारण विवरांजवळ हे क्षेत्र जास्त प्रभावी आहे.[१७]

वातावरण[संपादन]

चंद्रावर अतिशय विरळ वातावरण आहे. चंद्रावर असलेल्या वातावरणाचे एकूण घनमान फक्त १० कि.ग्रॅ. आहे.[१८] चंद्रावर असणाऱ्या वातावरणाचे प्रमुख स्रोत म्हणजे एक - क्रस्ट आणि मँटलमध्ये होणाऱ्या प्रक्रियांमुळे रेडॉन सारख्या वायूंचे उत्सर्जन. दुसरे म्हणजे छोट्या उल्का, सौरवात तसेच सूर्यप्रकाशामुळे होणारे विविध पदार्थांचे विघटन. आत्तापर्यंत विविध प्रकारे केल्या गेलेल्या चाचण्यांमधून चंद्राचे वातावरण हे मुख्यत: सोडियम, पोटॅशियम, रेडॉन, पोलोनियम, आरगॉन, हेलियम, ऑक्सिजन तसेच मिथेन, नायट्रोजन, कार्बन मोनोक्साईडकार्बन डायाक्साईड या वायूंचे बनले असल्याचे सिद्ध झालेले आहे.[१९]

पृष्ठभागावरील तापमान[संपादन]

चंद्रावर दिवसाचे सरासरी तापमान हे १०७ अंश सेल्शियस तर रात्रीचे सरासरी तापमान हे उणे १५३ अंश सेल्शियस असते.[२०]

उत्पत्ती[संपादन]

चंद्राची निर्मिती[संपादन]

चंद्राच्या उत्पत्तीबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. चंद्राची निर्मिती ही सूर्यमालेच्या उत्पत्तीनंतर सुमारे ३-५ कोटी वर्षांनंतर म्हणजेच सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात.[२१] चंद्राच्या उत्पत्ती बद्दल जी अनेक मते आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे:

 • फिशन थियरी - जुन्या संशोधनानुसार चंद्र हा पृथ्वीपासून तुटून वेगळा झालेला तुकडा असल्याचे मानण्यात आले. या तुकड्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर खूप मोठी दरी तयार झाली ती म्हणजेच प्रशांत महासागर असे अनुमान काढण्यात आलेले होते.[२२] पण अशा प्रकारे तुकडे होण्यासाठी पृथ्वीची सुरुवातीची फिरण्याची गती ही खूप जास्त असायला हवी होती. तसेच जर असा तुकडा पडलेला असेल तर तो तुकडा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या अक्षातच पृथ्वी भोवती फिरत राहिला असता असे शास्त्रज्ञ मानतात.
 • कॅप्चर थियरी - काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्राची निर्मिती ही इतरत्र कोठेतरी झाली व तो पॄथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यामुळे कायमचा पृथ्वीभोवती फिरत राहिला.[२३] पण अशा तऱ्हेने एखाद्या वस्तूला पृथ्वीभोवती फिरत ठेवण्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी (जसे की जास्तीची उर्जा वापरण्यासाठी जास्तीचे वातावरण) अस्तित्वात नाहीत.
 • को-फॉर्मेशन थियरी - या थियरीप्रमाणे शास्त्रज्ञांना असे वाटते की सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वी व चंद्राची एकाच ठिकाणी उत्पत्ती झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात. चंद्राची निर्मिती ही पृथ्वीच्या भोवती फिरणाऱ्या व सूर्यमालेतील उरलेल्या पदार्थांपासून झाली असावी. पण काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावर आढळणाऱ्या लोहाचे प्रमाण ही थियरी सिद्ध करू शकत नाही.

ही सर्व अनुमाने चंद्र व पृथ्वी यांच्या फिरण्याने आढळणाऱ्या कोनीय बलाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत.[२४]

 • जायंट इम्पॅक्ट थियरी - ही थियरी आजकालच्या शास्त्रज्ञांमध्ये लोकप्रिय आहे. या थियरीप्रमाणे साधारण मंगळाच्या आकाराची एक वस्तू (थिया) ही पृथ्वीवर धडकल्याने पृथ्वीवरील पुरेसे पदार्थ पृथ्वीच्या भोवती विखुरले गेले.[१] या पदार्थांपासूनच नंतर चंद्राची निर्मिती झाली. संगणकावर बनविलेली ह्या घटनेची संचिका चंद्र व पृथ्वी यांच्यामधील कोनीय बलाचे तसेच चंद्राच्या छोट्या कोअरचे यथोचित स्पष्टीकरण देते.[२५] तरीही या अनुमानात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जसे की पृथ्वीवर धडकणाऱ्या वस्तूचा आकार तसेच चंद्राच्या निर्मितीमध्ये पृथ्वीचे घटक कोणते व त्या वस्तूवरील घटक कोणते.

लाव्हाचा समुद्र[संपादन]

चंद्राची अंतर्गत रचना

राक्षसी धडकेच्या वेळी तयार झालेल्या अति उष्णतेमुळे असे मानण्यात येते की चंद्राचा बराचसा भाग हा सुरुवातीला वितळलेल्या अवस्थेत होता. हा विरघळलेला बाह्य पृष्ठभाग जवळ जवळ ५०० कि.मी. ते चंद्राच्या गाभ्यापर्यंत खोल होता.[३] यालाच लाव्हाचा समुद्र असे म्हणले जाते.

हा समुद्र जेव्हा थंड होऊन गोठू लागला, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे झालेल्या स्फटिकीकरणामुळे क्रस्ट व मँटल वेगवेगळे तयार झाले.[३] यातील कमी घनतेचे पदार्थ पृष्ठभागावर जमा झाले तर जास्त घनतेचे पदार्थ चंद्राच्या गाभ्यामध्ये (कोअर) जमा झाले.

चंद्रावरील खडक[संपादन]

चंद्रावर मुख्यत्वे दोन प्रकारचे खडक आढळतात. पर्वतरांगांमध्ये सापडणारे अनॉर्थाईट युक्त खडक व मारिया मध्ये सापडणारे बॅसॉल्ट खडक.[२६][२७] पृथ्वीवरील बसाल्ट खडक व चंद्रावरील बॅसॉल्ट खडक यातील मुख्य फरक म्हणजे चंद्रावरील खडकांमध्ये आढळणारे जास्तीचे लोहाचे प्रमाण.[२८][२९]

चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावरील धूळीचे वर्णन बर्फासारखी मऊ व बंदूकीच्या दारूसारखा वास असणारी असे केले आहे.[३०] ही धूळ मुख्यत: चंद्रावर धडकलेल्या उल्काधूमकेतूंमुळे तयार झालेली आहे. या धूळीमध्ये मुख्य घटक म्हणजे सिलिकॉन डायॉक्साईड (SiO2). तसेच त्यामध्ये कॅल्शियममॅग्नेशियमसुद्धा आढळते.

फिरण्याची कक्षा व पृथ्वीशी संबंध[संपादन]

अपोलो ८ मोहिमेच्या वेळी चंद्रावरून घेतलेले पृथ्वीचे छायाचित्र

चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सुमारे २७.३ दिवसात पूर्ण करतो. पण पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या आकाशात त्याच ठिकाणी यायला चंद्राला जवळजवळ २९.५ दिवस लागतात.[१] इतर ग्रहांचे उपग्रह त्या त्या ग्रहांच्या विषुववृत्तावरून फिरतात. पण चंद्र मात्र थोडासा तिरका फिरतो. चंद्र हा ग्रहाच्या प्रमाणात बघितल्यास सूर्यमालेतील सर्वांत मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. याचमुळे मराठीत कोणत्याही नैसर्गिक उपग्रहाला चंद्र हाच शब्द वापरतात. उदा० मंगळाला दोन चंद्र आहेत.

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीवर भरती - ओहोटीचे चक्र चालू असते. समुद्रांतर्गत होणाऱ्या या घडामोडींमुळे चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर दरवर्षी ३.८ सेंटिमीटर या प्रमाणात वाढते आहे.[३१] कोनीय बलामुळे तसेच या वाढणाऱ्या अंतरामुळे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती ०.००२ सेकंद प्रति दिवस प्रति शतक या प्रमाणात कमी होत आहे.[३२]

चंद्र व पृथ्वी यांच्या जोडीला बरेच जण जोडग्रह मानतात. या मानण्याला चंद्राचा पृथ्वीच्या प्रमाणात असलेला आकार कारणीभूत आहे. चंद्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांश आहे व त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १/८१ पट आहे. तरीसुद्धा काहीजण ही बाब मानत नाहीत कारण चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या एक दशांशापेक्षा कमी आहे.

१९९७ मध्ये ३७५३ क्रुइथ्ने (Cruithne) नावाचा लघुग्रह सापडला. या लघुग्रहाची कक्षा ही पृथ्वीच्या भोवती घोड्याच्या नालाच्या आकारातील होती. तरीसुद्धा खगोलशास्त्रज्ञ या लघुग्रहाला पृथ्वीचा दुसरा चंद्र मानत नाहीत कारण या लघुग्रहाची कक्षा स्थिर नाही.[३३] या लघुग्रहाप्रमाणेच फिरणारे (५४५०९) २००० पीएच ५, (८५७७०) १९९८ यूपी१ व २००२ ए‍ए२९ हे तीन लघुग्रह आजपर्यंत शोधण्यात आलेले आहेत.[३४]

चंद्र व पृथ्वी यांचे आकार व त्यांमधील अंतर हे प्रकाशाच्या वेगाच्या हिशोबात इथे दाखविलेले आहे. पृथ्वी व चंद्र यांच्यातील सरासरी अंतर कापायला प्रकाशाला १.२५५ सेकंद लागतात तर सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर कापण्यास प्रकाशाला ८.२८ मिनिटे लागतात.

भरती व ओहोटी[संपादन]

पृथ्वीवरील समुद्रांमध्ये होणारे भरती - ओहोटीचे चक्र हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या चंद्राकडील बाजूवरील पाणी हे इतर भागांपेक्षा चंद्राकडे जास्त ओढले जाते. पृथ्वीच्या फिरण्यामुळे हे पाणी किनाऱ्यावर येते. एका ठिकाणी भरती आलेली असताना पृथ्वीच्या चंद्राविरुद्ध बाजूवर ओहोटी आलेली असते.

भरती - ओहोटीच्या चक्राचा चंद्राच्या कक्षेवर सूक्ष्मसा परिणाम होतो. या चक्राच्या परिणामाने चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे. ही गती वर्षाला ३.८ से.मी. इतकी सूक्ष्म आहे.[३१] जोपर्यंत चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवरील समुद्रांवर होत राहील तोपर्यंत चंद्र पृथ्वीपासून दूर जात राहील. त्यानंतर चंद्राची कक्षा स्थिर होईल.

ग्रहणे[संपादन]

मार्च ३ २००७ रोजी दिसलेले चंद्रग्रहण

जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एका रेषेत येतात, तेव्हा एकाची छाया दुसऱ्यावर पडते. यालाच ग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण अमावास्येच्या आसपास होते जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो. याउलट चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास होते जेव्हा पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते. चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेशी जवळजवळ ५ अंशाचा कोन करते. त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावास्येला ग्रहण होत नाही. ग्रहण होण्यासाठी चंद्र हा पृथ्वी व चंद्राच्या कक्षा जिथे एकमेकांना छेदतात तिथे असावा लागतो. या छेदनबिंदूंना भारतीय ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू असे म्हणतात. त्यामुळेच चंद्र किंवा सूर्याला राहू वा केतूने गिळले की ग्रहण होते, अशी कविकल्पना केली गेली आहे. सामान्य लोकांना किचकट गणित समजत नाही, त्यांना ही ’गिळण्या’ची कल्पना पटते. [३५]

खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळी गणिते करून असा निष्कर्ष काढला आहे की सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण हे दर ६,५८५.३ दिवसांनी (१८ वर्षे, ११ दिवस व ८ तास) होते. या कालावधीला सारोस चक्र असे म्हणतात.[३६]

चंद्र व सूर्याच्या कक्षा (पृथ्वीवरून पाहताना) बऱ्याच ठिकाणी एकमेकांना छेदतात, त्यामुळेच खग्रास अथवा खंडग्रास सूर्यग्रहणे पहायला मिळतात. खग्रास सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे झाकला जातो व सूर्याभोवती असणारे तेजोवलय (Corona) दृष्टिपथास येते. चंद्र व पृथ्वीमधील अंतर हे सूक्ष्म गतीने बदलत असल्यामुळे चंद्राचा कोनीय व्यास कमी होत आहे. याचाच अर्थ असा की काही कोटी वर्षांपूर्वी प्रत्येक ग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्रामागे झाकला जात होता. तसेच साधारण ६० कोटी वर्षांनंतर चंद्र कधीही पूर्णपणे सूर्याला झाकू शकणार नाही व फक्त खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळेल.

ग्रहणा संदर्भात घडणारी घटना म्हणजे अधिक्रमण.

भारतीय संस्कृतीतील चंद्र[संपादन]

भारतीय संस्कृतीत चंद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही भारतातील बहुतेक सणउत्सव हे चांद्र दिनदर्शिकेप्रमाणेच साजरे केले जातात. उदा. गणेशोत्सव, दिवाळी, नारळी पौर्णिमा, इत्यादी. आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते. लख्ख चंद्रप्रकाशाच्या या रात्री जाग्रण करून केशरी दूध पिण्याचा समारंभ असतो. दम्याकरिता खास औषध कोजागरीच्या चांदण्यात बनते.

इस्लामी पंचांगात अधिक महिना नसतो व वर्ष चांद्रमासानुसार चालते, त्यामुळे मुसलमानी सण इसवी सनाच्या तारखेनुसार पाहिले तर थोडथोडे दिवस अलीकडेअलीकडे येतात.

मुसलमानी महिन्यांची सुरुवात चंद्रदर्शनानंतर होते. प्रतिपदेला किंवा त्यानंतरच्या दिवशी चंद्रदर्शन झाले की ईद साजरी होते.

चंद्रावरच्या डागांना त्यांच्या तशा दिसण्यामुळे भारतीय संस्कृतीत चंद्रावर असलेला ससा किंवा हरीण असे म्हटले आहे. हे डाग म्हणजे चंद्राला लागलेला कलंक आहे, अशीही कविकल्पना आहे.

असे म्हणतात की श्रीरामाने लहानपणी चंद्रासाठी हट्ट केला होता. तेव्हा सुमंतांनी आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाला खुश केले होते.

फार पूर्वीपासूनच चंद्र हा कविजनांना खुणावत आलेला आहे. अनेक प्रेमगीतांमधून चंद्राचे उल्लेख आढळतात. कुठे चंद्राला प्रेयसीच्या चेहऱ्याची उपमा दिलेली आढळते तर कुठे चंद्राच्या साक्षीने प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या दिसतात. लहान मुलांच्या गाण्यांमध्येही चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्र म्हणजे लहान मुलांचा मामा. त्यांच्या आईचा हा भाऊ असल्याने जर भाऊबीजेला भावाला ओवाळता आले नाही तर स्त्रिया चंद्राला ओवाळतात. कडवा चौथ या उत्तर भारतीय व्रतात तिथल्या स्त्रिया नवऱ्याच्या हातून अन्नप्राशन करण्यापूर्वी चंद्राला पीठ चाळायच्या चाळणीमधून पाहतात.

पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला चंद्राची कला म्हणतात. शुक्ल प्रतिपदेपासून चंद्र दर रात्री कलेकलेने वाढत असलेला दिसतो, आणि पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार होऊन, पुढे अमावास्येपर्यंत क्रमाक्रमाने लहान होतो. अमावास्येला चंद्राची अप्रकाशित बाजू आपल्याकडे आल्याने चंद्र दिसत नाही.

चंद्राला संस्कृतमध्ये इंदु, कुमुदबांधव, चंद्रमा, निशाकर, निशापति, मृगांक, रजनीनाथ, रोहिणीकांत, शशांक, शशिन्‌, सुधांशु, सोम, वगैरे नावे आहेत. आकाशातल्या रोहिणी नक्षत्राचा तारा चंद्राच्या जितक्या जवळ येतो, तितका कोणताच येत नाही, त्यामुळे रोहिणीला चंद्राची पत्नी मानले जाते.

चंद्राच्या प्रकाशाला चांदणे किंवा कौमुदी म्हणतात. चंद्रप्रकाशात जी कमळे फुलतात त्या कमळाच्या जातींना चंद्रविकासी कमळे किंवा कुमुदिनी म्हणतात.

हिंदू धर्मातील नवग्रह स्तोत्रात चंद्राचा एक श्लोक आहे. तो असा-

दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवं | नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणं ||

या श्लोकाप्रमाणे, दही व शंख यांच्या तुषाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, समुद्रातून उत्पन्न झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्याप्रमाणे शोभणाऱ्या अशा ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.

यानुसार चंद्र हा पृथ्वीपासूनच निर्माण झाला आहे, असे म्हणता येईल.

भारतीयांच्या नावात किंवा आडनावात चंद्र असलेली नावे[संपादन]

इंदुमती, ईश्वरचंद्र, करमचंद, केवलचंद, कृष्णचंद्र, गुलाबचंद, घेलाचंद, चंदाराणी, चंदू, चंद्रकांत, चंद्रन्, चंद्रमुखी, चंद्रमोहन, चंद्रवदन, चंद्रहास, चंद्रा (नाव आणि आडनाव), चंदात्रेय, चंद्रानना, चंद्रावळ (गडकऱ्यांच्या राजसंन्यासमधील एक पात्र), चांदणी, चांदबाली (गावाचे नाव), चाँदबिबी, जगदीशचंद्र, दूतीचंद, देवचंद, ध्यानचंद, नवीनचंद्र, पिराचंद, पूर्णचंद्र, प्रेमचंद, फतेचंद, बंकिमचंद्र, बालचंद्र, भालचंद्र. भूलचंद, मूळचंद, मूलचंदानी, रामचंद्र, लक्ष्मीचंद, वालचंद, शरच्चंद्र, सरस्वतीचंद्र, सुभाषचंद्र, सोमनाथ, सोमेश्वर, हरिश्चंद्र, हिराचंद, हुकूमचंद, हेमचंद्र, वगैरे.

इतर शब्दांतील चंद्र[संपादन]

ईद का चाँद, चंद्रदर्शन, चंद्रमौळी (घर), चेटीचंड, मधुचंद्र,

समुद्र मंथन[संपादन]

असे मानण्यात येते की अमृतप्राप्तीसाठी देवांनी व दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून चंद्राची निर्मिती झाली. भगवान शंकराने हलाहल प्यायल्यानंतर त्याच्या घशात निर्माण झालेल्या दाहाला शांत करण्यासाठी चंद्राचा उपयोग करण्यात आला असे पुराणात नमूद केलेले आहे.

कवितांमधील आणि गीतांमधील चंद्र[संपादन](अपूर्ण)


चंद्र कलांनी वाढताना दिसतो

संदर्भ[संपादन]

 1. a b c d e स्पूडिज, पी.डी. (२००४). "चंद्र". वर्ल्ड बुक ऑनलाईन रेफरन्स सेंटर, नासा. 
 2. ^ गिलिज, जे.जे.; स्पूडिज, पी.डी. (१९९६). "चंद्राच्या पृथ्वीविन्मुख बाजूवरील मारियाची भौगोलिक संरचना". लुनार व प्लॅनेटरी सायन्स २७: ४१३–४०४. 
 3. a b c शियरर, सी. (२००६). "थर्मल व मॅग्मॅटिक इव्हॉल्यूशन ऑफ द मून". रिव्ह्यूज इन मिनरॉलॉजी व जियोकेमिस्ट्री ६०: ३६५–५१८. 
 4. ^ टेलर, जी.जे. (२०००-०८-३१). "अ न्यू मून फॉर द ट्वेंटिफर्स्ट सेंच्युरी". हवाई इन्स्टिट्यूट ऑफ जियोफिजिक्स ॲन्ड प्लॅनेटॉलॉजी. 
 5. ^ मेलोश, एच.जे. (१९८९). इम्पॅक्ट क्रेटरींग: अ जियोलॉजीक प्रोसेस. ऑक्सफर्ड युनि. प्रेस. 
 6. ^ टेलर, जी.जे. (१९९८-०७-१७). "द बिगेस्ट होल इन सोलर सिस्टिम". हवाई इन्स्टिट्यूट ऑफ जियोफिजिक्स ॲन्ड प्लॅनेटॉलॉजी. 
 7. ^ हेकेन, जी.; वनिमन, डी.; फ्रेंच, बी. (सं.) (१९९१). लुनार सोर्सबुक, अ यूजर्स गाईड टू द मून. न्यू यॉर्क: केंब्रिज युनि. प्रेस. pp. ७३६. 
 8. ^ "लुनार पोलर कॉम्पोसाईट्स". लुनार ॲन्ड प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट. 
 9. ^ मार्टल, एल. (२००३-०६-०४). "द मून्स डार्क, आईसी पोल्स". हवाई इन्स्टिट्यूट ऑफ जियोफिजिक्स ॲन्ड प्लॅनेटॉलॉजी. 
 10. ^ "युरेका! आईस फाऊंड ऑन लुनार पोल्स". लुनार प्रॉस्पेक्टर (नासा). २००१-०८-३१. 
 11. ^ स्पूडिज, पी. (२००६-११-०६). "आईस ऑन द मून". द स्पेस रिव्ह्यू. 
 12. a b विक्झोरेक, एम. (२००६). "द कॉन्स्टिट्यूशन ॲन्ड स्ट्रक्चर ऑफ लुनार इंटीरियर". रिव्ह्यूज इन मिनरॉलॉजी ॲन्ड जियोकेमिस्ट्री ६०: २२१–३६४. 
 13. ^ म्यूलर, पी.; जोग्रेन, डब्ल्यू. (१९६८). "मॅसन्स : लुनार मास कॉन्सेंट्रेशन्स". सायन्स १६१: ६८०–६८४. 
 14. ^ "डॉपलर ग्रॅव्हिटी एक्सपेरिमेंट रिझल्ट्स". लुनार प्रॉस्पेक्टर (नासा). २००१-०८-३१. 
 15. ^ कोनोप्लीव, ए.; अस्मार, एस.; करांझा, ई.; जोग्रेन, डब्ल्यू.; युवान, डी. (२००१). "रिसेंट ग्रॅव्हिटी मॉडेल्स ॲज अ रिझल्ट ऑफ द लुनार प्रॉस्पेक्टस मिशन". इकारस ५०: १–१८. 
 16. ^ "मॅग्नेटोमीटर / इलेक्ट्रॉन रिफ्लेक्टोमीटर रिझल्ट्स". लुनार प्रॉस्पेक्टर (नासा). २००१. एप्रिल १२ २००७ रोजी पाहिले. 
 17. ^ हूड, एल.एल.; हुआंग, झेड. (१९९१). "फॉर्मेशन ऑफ मॅग्नेटिक ॲनॉमलीज ॲन्टिपोडल टु लुनार इम्पॅक्ट बेसिन्स: टू-डायमेन्शनल मॉडेल कॅलक्युलेशन्स". जे. जियोफिजिक्स रिसर्च ९६: ९८३७–९८४६. 
 18. ^ ग्लोबस, रूथ (२००२). "इम्पॅक्ट अपॉन लुनार ॲटमॉस्फियर". ऑगस्ट २९ २००७ रोजी पाहिले. 
 19. ^ स्टर्न, एस.ए. (१९९९). "द लुनार ॲटमॉस्फियर : हिस्टरी, स्टेटस, करंट प्रॉब्लेम्स, ॲन्ड कॉन्टेक्स्ट". रिव्ह. जियोफिज. ३७: ४५३–४९१. 
 20. ^ सरासरी तापमान
 21. ^ क्लीन, टी.; पाम, एच.; मेझ्गर, के.; हॅलिडे, ए.एन. (२००५). "एचएफ–डब्ल्यू क्रोनोमेट्री ऑफ लुनार मेटल्स ॲन्ड द एज ॲन्ड अर्ली डिफरन्शियेशन ऑफ द मून". सायन्स ३१० (५७५४): १६७१–१६७४. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 
 22. ^ बिंदर, ए.बी. (१९७४). "ऑन द ओरिजिन ऑफ द मून बाय रोटेशनल फिजन". द मून ११ (२): ५३–७६. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 
 23. ^ मिट्लर, एच.ई. (१९७५). "फॉर्मेशन ऑफ ॲन आयर्न-पुअर मून बाय पार्शल कॅप्चर, किंवा : येट अनादर एक्झॉटिक थियरी ऑफ लुनार ओरिजिन". इकारस २४: २५६–२६८. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 
 24. ^ स्टिव्हन्सन, डी.जे. (१९८७). "ओरिजिन ऑफ द मून – द कोलाईजन हायपॉथिसिस". ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ अर्थ ॲन्ड प्लॅनेटरी सायन्सेस १५: २७१–३१५. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 
 25. ^ कॅनप, आर.; अस्फाग, ई. (२००१). "ओरिजिन ऑफ द मून इन अ जायंट इम्पॅक्ट नियर द एन्ड ऑफ द अर्थ्‌स फॉर्मेशन". नेचर ४१२: ७०८–७१२. 
 26. ^ पॅपिके, जे.; रायडर, जी.; शियरर, सी. (१९९८). "लुनार सॅम्पल्स". रिव्ह्यूज इन मिनरॉलॉजी ॲन्ड जियोकेमिस्ट्री ३६: ५.१–५.२३४. 
 27. ^ हायसिंगर, एच.; हेड, जे.डब्ल्यू; वुल्फ, यू.; जौमान्म, आर.; न्यूकम, जी. (२००३). "एजेस ॲन्ड स्ट्रॅटिग्राफी ऑफ मेअर बॅसॉल्ट्स इन ओशनस प्रोसेलॅरम, मेअर नंबियम, मेअर कॉग्निटम, ॲन्ड मेअर इन्सुलॅरम". जे. जियोफिज. रिस. १०८: १०२९. 
 28. ^ नॉर्मन, एम. (२१/०४/२००१). "द ओल्डेस्ट मून रॉक्स". हवाई इन्स्टिट्यूट ऑफ जियोफिजिक्स ॲन्ड प्लॅनेटॉलॉजी. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 
 29. ^ वारिचियो, एल. (२००६). इनकॉन्स्टंट मून. लिब्रिस बुक्स. आय.एस.बी.एन. 1-59926-393-9. 
 30. ^ द स्मेल ऑफ मूनडस्ट फ्रॉम नासा
 31. a b "अपोलो लेझर रेंजिंग एक्सपेरिमेंट्स यिल्ड रिझल्ट्स". नासा. ११/०७/२००५. ३०/०५/२००७ रोजी पाहिले. 
 32. ^ रे, आर. (१५/०५/२००१). "ओशन टाईड्स ॲन्ड द अर्थ्‌स रोटेशन". आय्‌ईआरएस स्पेशल ब्युरो फॉर टाईड्स. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 
 33. ^ व्हॅम्प्यू, ए. "नो, इट्स नॉट अवर "सेकंड" मून!!!". १२/०४/२००७ रोजी पाहिले. *वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर २८, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
 34. ^ मोरेस, एम.एच.एम.; मॉर्बिडेली, ए. (२००२). "द पॉप्युलेशन ऑफ नियर-अर्थ ॲस्टेरॉईड्स इन कोऑर्बायटल मोशन विथ द अर्थ". इकारस १६०: १–९. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 
 35. ^ थिमन, जे.; कीटिंग, एस. (०२/०५/२००६). "एक्लिप्स ९९, फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स". नासा. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 
 36. ^ एस्पेनाक, एफ. "सारोस सायकल". नासा. १२/०४/२००७ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]

चित्र व नकाशे
चांद्र मोहिमा
चंद्राच्या कला
इतर