विकिपीडिया:सद्य घटना/सप्टेंबर २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सप्टेंबर २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. २५ एप्रिल २०२४, गुरूवार


दि. ३०.०९.२००८[संपादन]

जोधपूरला चेंगराचेंगरीत दीडशे ठार
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जोधपूरच्या किल्ल्यातील प्रसिद्ध चामुंडादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत २०० भाविकांचा बळी गेला. दीडशेहून अधिक भाविक जखमी झाले. दर्शनासाठी दरवाजे उघडताच मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. जोधपूरमध्ये राजे गजसिंह यांनी बांधलेल्या प्रसिद्ध मेहरनगड किल्ल्यात चामुंडादेवीचे १५ व्या शतकातील मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी दोन किलोमीटरचा अरुंद रस्ता आहे. या रस्त्यावरच ही दुर्घटना घडली. नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असल्यामुळे मंगळवारी सकाळी भाविक मोठ्या संख्येने दर्शनास आले होते. मंदिरात प्रवेश करताना तीव्र चढण आहे. मंदिराचे दरवाजे उघडताच झालेल्या घाईगडबडीत पुरुषांसाठी असलेल्या रांगेतील काही भाविक घसरून पडले. त्यांच्या अंगावर इतर भाविक पडले आणि चेंगराचेंगरीला सुरवात झाली.
सकाळ


कार्पोरेट निर्मात्यांना अनुदान नको
मराठी चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस विकासाचा एक नवीन टप्पा गाठत असली आणि मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्यांनी मराठी चित्रपटनिर्मिती करायचे ठरविले असले तरी या कार्पोरेट कंपन्यांविरोधात अन्य निर्माते उभे राहणार आहेत. सरकारने अशा कंपन्यांना अनुदान देऊ नये, अशा प्रकारची मागणी त्यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कार्पोरेट कंपन्या आणि अन्य निर्माते यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीची वाढती बाजारपेठ पाहून अनेक कार्पोरेट कंपन्यांनी आपला मोर्चा या इंडस्ट्रीकडे वळविला आहे. करोडो रुपये खर्चून ते मराठी चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. केवळ निर्मितीवरच नाही तर त्या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिताही लाखो रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे अन्य निर्मात्यांचे कंबरडे मोडणार आहे. कारण त्या कंपन्यांच्या आव्हानासमोर उभे राहणे त्यांना अवघड जाणार आहे. खरोखरच ज्या निर्मात्यांना मराठीची आस्था आहे किंवा एखादा सामाजिक विषय प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आहे आणि त्याला स्वतंत्ररीत्या चित्रपट काढायचा आहे अशा निर्मात्यांचा या कार्पोरेट कंपन्यांसमोर निभाव लागणे कठीण आहे.
सकाळ


म्हैसूर दसरोत्सव उधळण्याचा कट
जगप्रसिद्ध असलेला म्हैसूर दसरोत्सव उधळून लावण्याचा कट उघडकीस आला असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रांस्त्राचा साठा जप्त करण्यात आला आहे. कर्नाटकची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या म्हैसूरमध्ये दसरा महोत्सवाला प्रारंभ होत आहे. यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ

दि. २९.०९.२००८[संपादन]

मालेगावात बॉम्बस्फोट; चार ठार
मालेगाव शहरातील भिक्कू चौक भागातील निसार डेरीसमोरील उपाहारगृहाजवळ आज रात्री साडेनऊच्या सुमारास मोटारसायकलला (एमएच १५ पी ४५७२) लावलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन चार जण ठार झाले; तर चाळीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने अप्पर पोलिस अधीक्षक, सहायक उपअधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. सहायक उपअधीक्षक वीरेश प्रभू यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला. रात्री पावणेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी एस. चोक्कलिंगम, पोलिस अधीक्षक डॉ. निखील गुप्ता आदी वरिष्ठ अधिकारी शहरात दाखल झाले. त्यानंतर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
सकाळ


गुजरातही हादरला
बॉम्बस्फोटाने मालेगाव हादरण्यापूर्वी काही क्षण आधी गुजरातलाही अतिरेक्‍यांनी दणका दिला. सांबरकाठा जिल्ह्यातील मोडासा या गावातील बाजारात अतिरेक्‍यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार, तर १५ जखमी झाले. "सांबरकाठातील मोडासा गावात बॉंम्बस्फोट झाला. मात्र, या बाबतचा तपशील अद्याप हाती आलेला नाही . बॉंम्बशोधक आणि विनाशक पथक आणि श्‍वानपथक घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. या स्फोटात दोन जण मृत्युमुखी पडले असून, १५ जण जखमी झाले आहेत", अशी माहिती साबरकांठाचे पोलिस अधीक्षक आर.बी.ब्रह्मभट्ट यांनी दिली.
सकाळ

दि. २८.०९.२००८[संपादन]

ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे यांचे निधन
तब्बल सहा दशके रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक आणि अभिनेते दामू केंकरे (वय ८०) यांचे आज सायंकाळी साडेपाच वाजता विलेपार्ले येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. गेले वर्षभर ते अर्धांगवायूने आजारी होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे, चिरंजीव ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे व सून मंगल केंकरे असा परिवार आहे. आज रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ


बॉंम्ब टाकणार्‍या तरुणांचा पोलिसांकडून शोध सुरू
दक्षिण दिल्लीतील मेहरौलीत बॉम्बची पिशवी टाकणार्‍या दोन तरुणांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरात अनेक ठिकाणी त्यांचा कसून शोध घेण्यात येत असून, वाहनांचीही तपासणी केली जात आहे. तसेच दिल्ली-गुडगाव सीमेवरही कडक तपासणी करण्यात येत असून, अन्य राज्यांतही तपासासाठी पथके पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. या स्फोटामागे बांगलादेशी घुसखोरांचा हात असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मेहरौलीतील बॉम्बस्फोटातील जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील एकाचा आज मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.
सकाळ


"नंदनवना"ला भ्रष्टाचारानेही पोखरले
जम्मू-काश्‍मीरला हिंसाचाराप्रमाणेच अलीकडील काळात भ्रष्टाचारानेही पोखरले आहे. राज्य दक्षता विभागाने गेल्या नऊ महिन्यांत २८ वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांवर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. भ्रष्टाचारात सर्वच सरकारी खाती आघाडीवर असली, तरी हस्तकला महामंडळाने तीनशे कोटींचा गफला करून त्यावर कळस केला आहे. राज्यातील भ्रष्टाचाराबाबत दक्षता विभागातील अधिकार्‍यांनी दिलेली माहिती केवळ धक्कादायकच नाही, तर हा रोग जम्मू-काश्‍मीरसारख्या निसर्गसुंदर राज्यात किती खोलवर रुजला आहे, याची प्रचीती आणून देणारी आहे. बिहारलाही मागे टाकून हे राज्य भ्रष्टाचारात "नंबर वन" बनल्याचा निष्कर्ष काही स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी दक्षता विभागाने गुन्हे दाखल केलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये वन विभागाचे महासंचालक एजाझ भट आणि राज्याचे मुख्य नगर नियोजन अधिकारी मीर नसीम यांचाही समावेश आहे. त्यापैकी भट यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.
सकाळ

दि. २७.०९.२००८[संपादन]

दिल्लीतील मेहेरोलीमध्ये बॉम्बस्फोट; चार ठार
राजधानी दिल्ली शनिवारी (ता. २७) पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरली. दुपारी अडीचच्या सुमारास प्रसिद्ध कुतुबमिनार या वास्तूच्या परिसरातील मेहेरोलीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चार जण ठार, तर १५ जण जखमी झाले. दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलीवरून येऊन बॉम्ब ठेवल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. दहशतवाद्यांनी जेवणाच्या डब्यामध्ये बॉम्ब ठेवला होता. जखमींना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मेहेरोलीच्या भर बाजारपेठेत हा स्फोट झाल्याने जखमींची आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, स्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीसह देशातील सर्व महानगरांमधील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
सकाळ


अतिरेक्‍यांच्या चौकशीसाठी अन्य राज्यांची पथके मुंबईत
गेल्या तीन वर्षांत देशभरात झालेल्या बाँबस्फोटांत सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांच्या चौकशीसाठी केंद्रीय गुप्तचर विभागासह यापूर्वी बाँबस्फोट झालेल्या राज्यांची पोलिस पथके मुंबईत दाखल झाली आहेत. यात दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात पोलिसांच्या पथकांचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. बॉम्बस्फोट घडविण्यापूर्वी त्यांच्या धमकीचे ई-मेल पाठविण्याची क्‍लृप्ती इंडियन मुजाहिदीनचा थिंकटॅंक असलेल्या रोशन खान ऊर्फ रियाज भटकळ याची होती. जयपूर, अहमदाबाद व दिल्ली स्फोटांचे ई-मेल पाठविण्याची जबाबदारी त्याचीच होती. चौकशीनंतर या अतिरेक्‍यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात येईल, अशी माहिती मारिया यांनी दिली.
सकाळ


नानावटी अहवाल रोखण्यास नकार
गुजरातमधील गोधरा हत्याकांडासंदर्भात नेमण्यात आलेल्या न्या. जी. टी. नानावटी आयोगाच्या अहवालाचे सादरीकरण थांबविण्याची मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या आयोगाच्या अहवालास स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या खंडपीठापुढे १३ ऑक्‍टोबरला सुनावणी होणार आहे.
सकाळ

दि. २६.०९.२००८[संपादन]

"डाऊ"च्या उभारणीला एक महिना स्थगिती
चाकणजवळील डाऊ कंपनीच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी घेतला. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून त्यांच्यामार्फत एक महिन्यात कंपनीबाबत असलेले आक्षेप आणि तेथे सुरू असलेले काम, यांबाबत चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. डाऊ कंपनीच्या विरुद्ध सुरू झालेले आंदोलन, त्यामुळे होणारी चर्चा लक्षात घेऊन पणनमंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार उल्हास पवार यांनी परदेश दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री देशमुख यांच्याशी पुण्यातून संपर्क साधला. आंदोलनाबाबतची परिस्थिती सांगून, डाऊ कंपनीच्या कामाला स्थगिती देण्याची विनंती पाटील व पवार यांनी त्यांना केली. त्यानंतर, मुख्यमंत्री यांनी राज्य सरकारला त्याबाबतचे आदेश दिले.
सकाळ


दक्षिणेत दहशतवाद; धारवाडजवळ ५ जिवंत बॉंम्ब हस्तगत
पुणे-बंगळूर महामार्गावर धारवाडपासून १३ किलोमीटरवर पाच जिवंत बाँब आणि स्फोटके आढळून आली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. बंगळूरचे बाँब निष्क्रिय पथक घटनास्थळी दाखल झाले असून, हे पथक रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी कार्यरत होते. उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक राघवेंद्र औरादकर यांनीही घटनास्थळी भेट दिली असून, उत्तर कर्नाटकातील सात जिल्ह्यांत सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
सकाळ


लोणावळ्यात साकारणार रेल्वेचे भव्य वस्तुसंग्रहालय
लोणावळा स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल्वेच्याच १७ एकर जागेत मध्य रेल्वेकडून येत्या दोन वर्षांत भव्य वस्तुसंग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. ११ कोटी ६० लाख रुपयांची प्राथमिक गुंतवणूक असलेल्या या संग्रहालयाची जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या संग्रहालयांमध्ये गणना होऊ शकेल, असे रेल्वे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
सकाळ

दि. २५.०९.२००८[संपादन]

साबरमती एक्‍सप्रेसला लागलेली आग पूर्वनियोजित
गुजरातमध्ये २७ फेब्रुवारी २००२ मध्ये साबरमती एक्‍स्प्रेसला लागलेली आग ही पूर्वनियोजित असल्याचा अहवाल नानावटी आयोगाने आज (गुरूवार) गुजरात विधानसभेत सादर केला. याप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांना क्‍लीन चिट देण्यात आली आहे. अहवालानुसार या घटनेचा कट मौलवी उमरेज याने रचला, त्यानंतर दोघाजणांनी १४० लिटर पेट्रोल खरेदी केले. हसन नावाच्या व्यक्तीनी जबरदस्तीने ६ आणि ७ क्रमांकाचा दरवाजा उघडून प्रवेश केला. आणि सहा कोच पेटवून देण्यात आले, त्यात ९ जण जळाले. या व्यक्तींचा हेतू दहशत पसरविण्याचा असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ


बाँबस्फोटांचे रहस्य उलगडले
शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेणार्‍या बाँम्बस्फोटांत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांच्या मुसक्‍या आज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. या अतिरेक्‍यांमध्ये इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य असलेला आणि दिल्ली बाँम्बस्फोटांचा प्रमुख सूत्रधार असलेला महम्मद सादिक शेख व अहमदाबाद येथे बाँम्बस्फोट घडविण्यासाठी नवी मुंबईतून गाड्या चोरणारा अफजल उस्मानी यांचा समावेश आहे. या अतिरेक्‍यांना लष्कर-ए-तोयबा व हुजी या अतिरेकी संघटनांकडून प्रशिक्षण मिळाले असून त्यांच्यावर पाकिस्तानातून नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अतिरेक्‍यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटके व शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. मुंबईतही घातपात घडविण्याचा या दहशतवाद्यांचा कट उधळल्याची माहितीही गफूर यांनी यावेळी दिली.
सकाळ


अमेरिकेचे देशांतर्गत कायदे भारतावर बंधनकारक
अणुकराराला संमती देतानाच, अमेरिकी सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीने पेच मात्र आणखी बिकट करण्याचा प्रयत्न केला. १२३ करारालाच बांधील आहोत, या भारताच्या म्हणण्याला केराची टोपली दाखवितानाच हाइड कायदा, अणुऊर्जा कायदा यासह अमेरिकेचे अन्य कायदे भारतावर बंधनकारक असतील, असे समितीने स्पष्ट केले आहे; तसेच जर या सर्व देशांतर्गत कायद्याचे भारताने उल्लंघन केले तर केवळ अमेरिकाच नव्हे, तर एनएसजीमधील अन्य देशांकडून अणुतंत्रज्ञान, इंधन, उपकरणे दिली जाणार नाहीत, असे नमूद करणारे विधेयक समितीने मंजूर केले आहे.
सकाळ


कर्करोगाच्या पेशी नष्ट करणारे जनुक विकसित
असाध्य रोगांमध्ये अजूनही कर्करोगाची गणना होते. दर वर्षी लाखो लोकांचे जीव घेणार्‍या कर्करोगाच्या पेशींना कोणत्याही साइड इफेक्‍टशिवाय 'पार-४' या जनुकाद्वारे नष्ट करता येणे शक्‍य होत असून, या जनुकाद्वारे कर्करोगाला प्रतिबंध करतील अशी उंदरांची पिढी तयार करण्यात एका मराठी शास्त्रज्ञाला नुकतेच यश आले आहे. केंटकी विद्यापीठातील डॉ. विवेक रांगणेकर यांनी हे संशोधन केले असून, पुढील सात ते दहा वर्षांत ही उपचारपद्धती माणसांवरही अवलंबता येईल, असा विश्‍वास त्यांनी केला.
सकाळ


महानदीच्या महापुराची स्थिती बिकट
ओरिसात महानदीच्या महापुराचे थैमान सुरूच आहे. नदीकाठावरील शंभर ठिकाणचे भराव फोडून पाणी बाहेर पसरले आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या कटक, पुरी, जाजपूर, जगतसिंगपूर आणि केंद्रपाडा या जिल्ह्यांना महानदीच्या पुराचा जोरदार तडाखा बसला असून, रोज नवनवीन भागांमध्ये पाणी घुसत असल्याने पूरग्रस्तांचा आकडा वाढत आहे. सुमारे ४० लाख नागरिकांना आतापर्यंत पुराचा फटका बसला आहे. मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्याही सातत्याने वाढत असल्याने परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.
सकाळ

दि. २४.०९.२००८[संपादन]

खैरलांजी हत्याकांड खटल्यातील सहा आरोपींना फाशीची शिक्षा
बहुचर्चित खैरलांजी हत्याकांड खटल्यातील सहा आरोपींना भंडारा प्रथम तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयात ता. २४ फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, उर्वरित दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, बचाव पक्षाने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. एकापेक्षा अधिक आरोपींना एकाच वेळी फाशी सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

खैरलांजी या गावात २९ सप्टेंबर २००६ ला भैयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबातील चार जणांची लाठ्या-काठ्या आणि चेनने हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयच्या वतीने ११ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील तिघांची १५ सप्टेंबरला पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित आठ आरोपींना दोषी मानून त्यांची शिक्षा न्यायालयाने राखून ठेवली होती. आज सकाळी ११ वाजता शिक्षा ऐकण्यासाठी न्यायालयात अनेकांनी गर्दी केली होती. न्यायाधीश एस. एस. दास यांनी निकाल वाचायला सुरुवात करण्यापूर्वी, सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानून या हत्याकांडाविषयी खंत व्यक्त केली.

सकाळ


औद्योगिक क्षेत्रात आता ३२ तासांचे भारनियमन
औद्योगिक क्षेत्रात आता ३२ तासांचे भारनियमन करण्यात येणार आहे. अर्थात हे भारनियमनही दोन टप्प्यांत व सलग होणार आहे. पूर्वी शनिवारनंतर रविवारी दिवसभर होणारे भारनियमन आता शुक्रवार दुपारपासून सुरू होणार आहे; मात्र त्यामुळे कंपन्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
सकाळ


लडाखच्या प्रवेशद्वारी पोचला प्रकाश
काश्‍मीरमधील सर्वांत उंच असलेल्या लडाखचे प्रवेशद्वार मानले जाणारे मातेन गाव काल रात्री प्रकाशाने उजळले आणि गावकर्‍यांनी जणू दिवाळीच साजरी केली. गावातील प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. कारगिल ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलने (केएएचडीसी) या गावात पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. ७०० किलोवॉट क्षमतेचे वीजनिर्मिती संयत्रही येथे सुरू करण्यात आले आहे. काल या संयंत्राचे काम सुरू झाले आणि गावातील प्रत्येक घरात विद्युत दिवा प्रकाशला.
सकाळ


"मॅरियट"वरील हल्ल्यात अल्‌ कायदाचा हात असल्याचा दावा
मॅरियट या पंचतारांकित हॉटेलवर शनिवारी (ता. २०) झालेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी "फिदायिन इस्लाम" या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यामागे अल्‌ कायदाचा हात असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला असून, या संघटनेचा दुसर्‍या क्रमांकाचा म्होरक्‍या अयमान अल जवाहिरीच्या हस्तकास अटक करण्यात आली आहे.
सकाळ

दि. २३.०९.२००८[संपादन]

दहशतवादाविरोधात स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा
दहशतवादविरोधी कडक कायद्यापेक्षा या समस्येच्या हाताळणीसाठी स्वतंत्र केंद्रीय संस्था (सेंट्रल किंवा फेडरल एजन्सी) स्थापन करण्यास प्राधान्य देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. या मुद्यावर राज्य सरकारे आणि राजकीय पक्ष यांच्यात मतैक्‍य नसले, तरी त्यावर सर्वसंमती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे आज उच्च सरकारी वर्तुळातून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान, प्रशासकीय सुधारणा आयोग, काँग्रेस यांच्यातर्फे दहशतवादाविरोधातील कडक व कठोर कायद्याच्या निर्मितीचा मुद्दा सातत्याने मांडला जात होता. त्याचप्रमाणे दहशतवादासारख्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्याच्या हाताळणीसाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा मुद्दाही मांडण्यात येत होता; परंतु या मुद्यावर राज्य सरकारे किंवा राजकीय पक्ष यांच्यात अजिबात मतैक्‍य नसल्याने त्याबाबतची चर्चा मागे पडत होती. मात्र, दिल्लीतील स्फोटमालिका आणि त्यामागील दहशतवाद्यांना पकडण्याची कारवाई, या दरम्यान दहशतवाद हाताळणीसाठी स्वतंत्र संस्थेच्या स्थापनेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.
सकाळ


गोल्डमन, मॉर्गनला फेडरलची मदत
अमेरिकेतील वित्तीय क्षेत्रातील गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅन्ले यांनी वित्तीय पेचातून वाचण्यासाठी अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडे मदत मागितली असून, ती फेडरल रिझर्व्हने मान्य केली आहे. त्यामुळे या इन्व्हेस्टमेंट बँकांचे नियमन फेडरल रिझर्व्ह करणार असल्याने गेल्या वीस वर्षांपासून चालत आलेले इन्व्हेस्टमेंट मॉडेल बरखास्त होणार आहे. लेहमन ब्रदर्सच्या मार्गावर चालायचे नसल्याने या दोन बँकांकडे कमी पर्याय उरले आहेत. लेहमन ब्रदर्स दिवाळखोरीत गेली असून, मेरिल लिंचने स्वतःला बँक ऑफ अमेरिकेला विकले आहे. देशातील अन्य वित्तीय संस्था लेहमन ब्रदर्सच्या मार्गाने गेल्यास देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याची भीती अमेरिकी सरकारला आहे. त्यामुळे अमेरिकी सरकारने देशातील वित्तीय संस्थांना वित्तीय पेचप्रसंगातून वाचविण्यासाठी सातशे अब्ज डॉलरचे पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या पॅकेजला अमेरिकी काँग्रेसची मान्यता मिळायची आहे.
सकाळ


जे. जे. हत्याकांडातील ब्रिजेश सिंग दोषमुक्त
जे. जे. शासकीय रुग्णालयाबाहेर १५ वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी व दाऊद इब्राहिमचा साथीदार ब्रिजेश सिंग ऊर्फ भीरू ऊर्फ अरुणकुमारच्या विरोधात मुंबई पोलिसांनी सबळ पुरावा दाखल न केल्याने विशेष टाडा न्यायालयाने आज त्याला दोषमुक्त जाहीर केले. त्याला पंधरा वर्षानंतर पोलिसांनी अटक केली होती. सिंगच्या विरोधात अभियोग पक्षाने दाखल केलेले पुरावे पुरेसे नाहीत. तसेच अन्य आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबात जरी त्याचा उल्लेख असला तरी सिंगवर स्वतंत्रपणे खटला सुरू आहे. त्यामुळे हा जबाब वापरता येणार नाही, असे विशेष न्या. डी. यू. मुल्ला यांनी निकालात म्हटले आहे. अभियोग पक्षाने सिंगवर टाडान्वये केलेली कारवाईही वैध नाही कारण त्याच्याविरोधात पुरावाच दाखल केलेला नाही, हा बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.
सकाळ


ओरिसातील महानदीचा ३७ लाख नागरिकांना तडाखा - २९ जणांचे बळी
ओरिसातील पुराचे महाथैमान सुरूच असून, राज्यात ठिकठिकाणी बळी गेलेल्यांची संख्या २९ झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने मदत व बचाव कार्यासाठी वायुसेनेच्या चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. एक हजार २०० बोटींद्वारे पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येत आहे. ३७ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. मदत छावण्यांमध्ये दाखल होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महानदीच्या महापुराने सुमारे १८ जिल्ह्यांना तडाखा दिला आहे.
सकाळ


बिग बँगची मोहीम दोन महिने लांबणीवर
गेल्या आठवड्यात ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने काम थांबलेल्या बिग बँग मोहिमेत पुन्हा अडथळे आले असून, या वेळी चुंबकात बिघाड झाल्याने ही मोहीम आता दोन महिने स्थगित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने नव्या हार्डवेअरचे काम थांबले होते. त्यामुळे प्रकल्पाचे शीतकरणही थांबले होते. त्यापाठोपाठ आता सुमारे ३० टन सुपर कंडक्‍टिंग चुंबकातील दोन भागांमध्ये बिघाड झाला आहे. या दोन भागांना जोडणारा केबलचा बार बिघडल्याने वितळला. त्यामुळे द्रवरूप हेलियमची गळती झाली. अग्निशामक दलाने तातडीने ही गळती आटोक्‍यात आणली. बिगर सुपर कंडक्‍टिव्ह चुंबक हे प्रोटॉन बीम हाताळू शकत नाहीत.
सकाळ


आर्क्‍टिकवरचे बर्फ झपाट्याने वितळतेय
प्रदूषणामुळे, जागतिक तापमानवाढीने आर्क्‍टिक महासागरातील बर्फाचे थर झपाट्याने वितळत असून, यंदाचा हा उच्चांक असल्याचे वृत्त नॅशनल जिऑग्राफिक डॉट कॉम या संकेतस्थळाने आज दिले. या बर्फाची पाहणी केलेल्या शास्त्रज्ञांनी बर्फ वितळण्याचा वेग जास्त असल्याची माहिती दिली. जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका आर्क्‍टिकला बसत असल्याचे कोलोराडोच्या नॅशनल स्नो ऍण्ड आईस डेटा सेंटरमधील शास्त्रज्ञ मार्क सेरेझ्झी यांनी केलेल्या अभ्यासात आढळले. आर्क्‍टिकमधील बर्फ मृत्युपंथाला लागला असल्याचे ते सांगतात. दर हिवाळ्यात आर्क्‍टिक महासागरावर बर्फ साठतो आणि उन्हाळ्यात वितळतो. १९८० पासून हा बर्फ वितळत असल्याचे सेरेझ्झी यांनी नमूद केले. मात्र, गेल्या काही वर्षांत बर्फाचा वितळण्याचा वेग वाढला असून, आर्क्‍टिकवरील बर्फाचा थर सातत्याने कमी होत असल्याचे ते म्हणाले.
सकाळ

दि. २२.०९.२००८[संपादन]

घरांच्या किमती उतरण्यास सुरवात
गेल्या तीन-चार वर्षांत गगनाला भिडलेल्या घरांच्या आणि कार्यालयांच्या किमती हळूहळू घसरण्यास सुरवात झाली आहे. अमेरिकेतील चिंताग्रस्त घडामोडींमुळे घटत जाणारी परकी गुंतवणूक आणि महागडे झालेले गृहकर्ज यांच्यामुळे रिअल इस्टेट बाजाराच्या किमती 'रिअल' होऊ लागल्या आहेत. लेहमन ब्रदर्स, मेरिल लिंच या बड्या वित्तीय संस्था दिवाळखोरीत निघाल्याने भारतातही जोरदार पडसाद उमटणार आहेत. सुमारे अडीच लाख चौरस फूट एवढी व्यावसायिक जागा लेहमनने भारतात घेतली आहे; तसेच युनिटेकच्या मुंबईतील प्रकल्पात ७४० कोटी रुपयांची, तर डीएलएफमध्ये ९२० कोटी रुपयांची गुंतवणूकही लेहमनने केली होती.
सकाळ


दिल्लीत अतिरेक्‍यांचा २० बॉंबस्फोट घडविण्याचा इरादा होता
राजधानी दिल्लीत वीस बाँबस्फोट घडवून मोठ्या प्रमाणात दहशत आणि विध्वंस घडवून आणण्याचा अतिरेक्‍यांचा कट होता. या कटात इंडियन मुजाहिदीन आणि सिमीला पाकिस्तानातून कारवाया करणार्‍या लष्करे तोयबा या अतिरेकी संघटनेनेही मदत केली होती, अशी माहिती दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त एच. जी. एस. धालिवाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अहमदाबाद आणि जयपूर येथील बाँबस्फोटांमागेही याच अतिरेक्‍यांचा हात असल्याचे सांगून दिल्ली बाँबस्फोटाचा कट उलगडल्याचा दावाही त्यांनी केला.
सकाळ


’टिंग्या’ स्वतंत्ररीत्या ऑस्कर स्पर्धेत उतरणार
"मराठी भाषेविषयी असलेली आपुलकी आणि प्रेम, मराठी संस्कृतीबद्दल असलेला आदर आणि जिव्हाळा तसेच महाराष्ट्र-मुंबईचे असलेले अनंत उपकार यामुळे टिंग्या हा चित्रपट बनविला असला तरी मी येथेच थांबणार नाही. मी आणखी पाच मराठी चित्रपट बनविणार आहे. त्यापैकी एक चित्रपट मी स्वतः दिग्दर्शित करणार आहे. शिवाय ऑस्करला लागणारा निधी स्वतःच उभा करणार आहे", अशी माहिती प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक रवी राय यांनी दिली. स्मॉल टाऊन प्रॉडक्‍शनतर्फे बनविण्यात आलेला "टिंग्या" हा चित्रपट स्वतंत्ररीत्या ऑस्करसाठी नेणार असल्याची घोषणा रवी राय यांनी काल केली.
सकाळ


सहाव्या वेतन आयोगाचा निम्मा भार केंद्राने उचलावा
सहाव्या वेतन आयोगाने केलेल्या वेतनवाढीच्या शिफारशींमुळे पडणारा आर्थिक बोजा राज्य सरकारच्या आवाक्‍याबाहेरचा असल्यामुळे त्यातील निम्मा भार केंद्र सरकारने उचलावा, अशी विनंती राज्य सरकारांनी केंद्राला केली आहे. पाचव्या वेतन आयोगाच्या वाढीनंतर देशातील बहुसंख्य राज्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली होती. पुन्हा वेतनवाढ देताना तीच परिस्थिती येऊ नये म्हणून राज्य सरकारने केंद्राला साकडे घातले आहे. मूल्यवर्धित कर प्रणालीवरील (वॅट) मंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीने १३ व्या वित्त आयोगासमोर केलेल्या सादरीकरणात ही मागणी केली आहे.
सकाळ


वाढदिवस साजरा करण्याचे फतवे थांबवा - शरद पवारांचा आदेश
केवळ वाढदिवसांची पोस्टर, होर्डिंग लावून संघटना चालविता येत नाही आणि लोकप्रियताही मिळविता येत नाही, त्यासाठी जनतेत जाऊन काम करावे लागते, अशा शब्दांत केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. यापुढे माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी पक्षाच्या कार्यालयातून फतवे काढण्याचे ताबडतोब थांबवा, असा आदेशही त्यांनी दिला.
सकाळ


उच्च उत्पन्न असलेल्या घटस्फोटितांना पोटगी नाही
"स्वतःवरील जबाबदार्‍या पूर्ण पाडण्याएवढे उत्पन्न मिळविणार्‍या घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालय देऊ शकत नाही," असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यानुसार ऐंशी हजार पगार असणार्‍या महिलेला दरमहा साडेसात हजार रुपयांची पोटगी देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. "पत्नी मिळवती नसेल आणि अन्य कोणताच पाठिंबा नसेल, तर पतीचे उत्पन्न लक्षात घेऊन पोटगी देण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते; मात्र पती आणि पत्नी दोघेही मिळवते असतील आणि त्यांचे उत्पन्न गरजेहून अधिक असेल, तर न्यायालय पोटगीचा आदेश देऊ शकणार नाही," असे निकालात नमूद करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एस. एन. धिंग्रा यांनी हा आदेश दिला आहे.
सकाळ

दि. २१.०९.२००८[संपादन]

पाकिस्तानात बॉंबस्फोटात १०० ठार
इस्लामाबाद शहरातील पंचतारांकित मेरियट हॉटेल दहशतवाद्यांनी शनिवारी आत्मघाती हल्ला करून उडवून देण्याचा प्रयत्न केला. स्फोटकांनी भरलेला ट्रक हॉटेल परिसरात घुसवून त्यांनी स्फोट घडवून आणला. यात १०० जण ठार झाले असून, २०० जण जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष भवन, पंतप्रधान कार्यालय या परिसरातच असल्याने हा स्फोट म्हणजे पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे. ’तेहरिक-ए-तालिबान’ या अतिरेकी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
सकाळ


मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आता आदिवासी नेत्यांचीही आघाडी
राज्यातील आदिवासींना आजपर्यंत वापरा आणि फेकून द्या पद्धतीने वागविण्यात आले. यापुढे अशी वागणूक सहन करणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या तक्रारींचा पाढाच राज्यातील आदिवासी नेत्यांनी काल थेट राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडला. प्रगतिशील मानल्या जाणार्‍या महाराष्ट्रात आदिवासींच्या विकासाच्या वाटा मुख्यमंत्री देशमुख यांनीच रोखल्या आहेत, असा थेट आरोप माजी मंत्री मधुकर पिचड यांनी या भेटीनंतर बोलताना केला. त्यामुळे मुख्यमंत्री देशमुख यांच्याविरोधात आता आदिवासी नेत्यांची आघाडी सक्रिय झाल्याचे मानले जात आहे.
सकाळ


एलएचसी मशीनमधील महाचुंबकामध्ये गंभीर बिघाड
युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्‍लीअर रिसर्च (सर्न) प्रयोगशाळेने फ्रान्स-स्वित्झर्लंड सीमेवरील लेक जिनिव्हाजवळ भूगर्भात उभारलेल्या लार्ज हॅड्रॉन कोलायडरमध्ये (एलएचसी) येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणारा दुसर्‍या टप्प्यातील प्रयोग पुढे ढकलला आहे. एलएचसीमधील अत्यंत शक्तिशाली अशा ९३०० महाकाय चुंबकांपैकी एका चुंबकात बिघाड झाला आहे. तसेच प्रोटॉन कणांची टक्कर घडविण्यासाठी तयार केलेल्या २७ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातील एलएचसीच्या निर्वात पोकळी असणार्‍या नळीतील हेलियमला गळती लागल्याने संशोधकांनी हा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर सोमवारपासून (ता. २२) प्रोटॉन टकरीची दुसरी फेरी कार्यान्वित करण्यात येणार होती. ही दुरुस्ती करण्यास काही आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सकाळ



अमेरिकेच्या वित्तीय संस्थांसाठी बुश यांचे अब्जावधींचे पॅकेज
घरतारण कर्जाच्या पेचप्रसंगामुळे कंबरडे मोडलेल्या अमेरिकन वित्तीय संस्था आणि बँका यांच्यासाठी बुश प्रशासनाने घाईघाईने तब्बल सातशे अब्ज डॉलरचे (सुमारे ३२.२५ लाख कोटी रुपये) पॅकेज तयार केले आहे. पेचप्रसंगाची तीव्रता लक्षात घेऊन काँग्रेसकडून (सिनेट आणि प्रतिनिधी गृह) त्याला तातडीने मंजुरीही मिळण्याची शक्‍यता आहे. "हे पॅकेज दिले नाही, तर वॉल स्ट्रीटवर लागलेली आग रस्त्यारस्त्यांवर पोचेल," अशी भीती खुद्द अध्यक्ष जॉर्ज बुश यांनीच व्यक्त केली आहे.
सकाळ

दि. २०.०९.२००८[संपादन]

नाशिकमध्ये गोदावरीचा रूद्रावतार
त्र्यंबकेश्‍वरसह नाशिक परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला महापूर आला आहे. पुराच्या पाण्याने रौद्र रूप धारण केल्याने गंगाघाट परिसरातील दुकाने व घरे पाण्याखाली बुडाली आहेत. अनेक ठिकाणी घरांना पुराच्या पाण्याने वेढल्याने लोक पाण्यात अडकले. त्यांना काढण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. पुरात पाच जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून, उर्वरित चार बेपत्ता झाले आहेत. १९६९ मध्ये आलेल्या गोदावरीच्या पुराची आठवण या पुराने करून दिली आहे.
सकाळ


दिल्लीत चकमक; दोन दहशतवादी ठार
दिल्ली आणि अहमदाबाद बाँबस्फोटांत सामील असल्याचा संशय असलेले अतिक ऊर्फ बशर आणि फक्रुद्दीन हे दोन दहशतवादी जामियानगर परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी ठार झाले. या चकमकीचे नेतृत्व करणारे पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांना यात हौतात्म्य प्राप्त झाले. उत्तर प्रदेशातील आझमगडचे रहिवासी असलेले हे दोघे अतिरेकी हरकत उल्‌ जिहादी इस्लामिया आणि सिमी या दोन संघटनांशी संबंधित होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सुमारे पाऊणतास चाललेल्या चकमकीत दोन पोलिसही जखमी झाले. दोन दहशतवादी पळून गेले. चकमकीनंतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली. विशेष शाखेचे सहपोलिस आयुक्त कर्नाल सिंह यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
सकाळ



अमराठी अधिकार्‍यांची मराठीत दमछाक
राज्यात मराठीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी कामकाजात या भाषेचे महत्त्व वाढले असले, तरी राज्य सरकारच्या सेवेतील अमराठी कर्मचारी मात्र मराठीमुळेच धास्तावल्यासारखे दिसत आहेत. राजपत्रित आणि अ-राजपत्रित अमराठी कर्मचार्‍यांसाठी सक्तीच्या असलेल्या मराठीच्या परीक्षेचे अग्निदिव्य पार पाडताना या कर्मचार्‍यांची दमछाक झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, हिंदीच्या परीक्षेत मात्र महाराष्ट्रातील सरकारी कर्मचार्‍यांनी भरघोस यश संपादन केले आहे.
सकाळ


गायक महेंद्र कपूर यांना लता मंगेशकर पुरस्कार
राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासाठी यावर्षी ज्येष्ठ गायक महेंद्र कपूर यांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १९) येथे या पुरस्कारांची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूर्वी हा पुरस्कार संगीतकार खय्याम, स्नेहल भाटकर, जयमाला शिलेदार, मन्ना डे, रवींद्र जैन, प्यारेलाल, सुधीर फडके, अनिल विश्वास, आशा भोसले आदींना प्रदान करण्यात आला आहे.
सकाळ

दि. १९.०९.२००८[संपादन]

महिला बचतगटांना चार टक्के व्याजदराने कर्ज
राज्यातील दीड लाखांवर महिला बचतगटांना चार टक्के व्याजदराने कर्ज, सफाई कामगारांना निवृत्तीच्या वेळी मोफत घरे, नवबौद्ध, मागासवर्गातील नागरिकांसाठी ५० हजार घरांची बांधणी आदी महत्त्वाचे निर्णय आज येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. बुधवार व गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत झाली. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बैठकीनंतर पत्रकारांना निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यात महिला बचतगटांच्या चळवळीने व्यापक स्वरूप घेतले आहे. ९९ टक्के वसुलीचा आदर्श निर्माण केला आहे. ही चळवळ अधिक बळकट करण्यासाठी येत्या दोन ऑक्‍टोबरपासून चार टक्के व्याजदराने कर्जवाटप केले जाईल. राज्यातील दीड लाख व मराठवाड्यातील १२ हजार ८९३ गटांना याचा लाभ होईल.
सकाळ



जगभर पसरले होते छत्रपतींच्या तलवारीचे तेज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचे तेज त्यांच्याच काळात जगभरात पसरले होते. "प्रिन्स", "राजे" व राज्याभिषेकानंतर "महाराज" असे उल्लेख लंडनच्या वृत्तपत्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत केले होते. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळातील अभ्यासक सायली पलांडे-दातार यांनी केलेल्या संशोधनातून ही महत्वपूर्ण माहिती हाती आली आहे. शिवछत्रपतींची सुरत लूट या घटनेचा उल्लेख असणारी बातमी द लंडन गॅझेट या तत्कालीन वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापून आली होती. या "घटनेचा परिणाम' म्हणून सुरतेची वखार मुंबईला हलविण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतल्याचा उल्लेखही या वृत्तामध्ये आहे.
सकाळ


राजस्थानात मराठी माणसाच्या केसालाही धक्का लागणार नाही - शिवसेना
राजस्थानात जोपर्यंत शिवसेनेचे अस्तित्व आहे, तोपर्यंत येथील एकाही मराठी माणसाच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन शिवसेनेचे राजस्थान संपर्कप्रमुख राजेश रूपावत यांनी दिले. राजस्थानातून मराठी माणसांची हकालपट्टी करण्याचा दावा करणारी शिवसेना हिंदुस्थान ही संघटना बोगस असून शिवसेनेचा त्यांच्याशी काडीमात्र संबंध नसल्याचेही रूपावत यांनी स्पष्ट केले. पूर्वी शिवसेनेत असलेल्या, परंतु कालांतराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या काही नतद्रष्ट लोकांनी हा उद्योग केला आहे. त्या संघटनेचे राजस्थानात कुठलेही राजकीय वा सामाजिक अस्तित्व नाही. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी हा खोडसाळपणा केल्याचेही रूपावत यांनी सांगितले.
सकाळ


माफी मागितल्याने जया अमिताभवर रागावल्या
’हम युपीवाले हैं, हिंदी में ही बात करेंगे’ या वक्‍तव्यावर महानायक अमिताभ बच्चन यांनी माफी मागितल्याने समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आपल्या पतीवर रागावल्या आहेत. अमिताभ यांनी आपली बाजू न मांडता, माफी मागितल्याने दुःखी झालेल्या जया यांनी यापुढे "द्रोण" या चित्रपटाच्या प्रचारमोहिमेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ

दि. १८.०९.२००८[संपादन]

"शिवसेना: करणार मराठी माणसांची हकालपट्टी
विश्‍वास ठेवा अगर ठेवू नका; मराठी माणसांची हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेना हिंदुस्थान या पक्षाने घेतला आहे. "शिवसेना हिंदुस्तान"तर्फे राजस्थानातील मराठी माणसांना सात दिवसांची नोटीसही देण्यात येणार आहे. त्यानंतरही मराठी लोकांनी राजस्थान न सोडल्यास त्यांना जबरदस्तीने राजस्थानबाहेर काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पंजाब केसरी या प्रथितयश वर्तमानपत्रातील राजस्थान आवृत्तीत हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राजस्थान सरकारच्या सेवेत आणि खासगी उद्योगांमध्ये नियुक्त करण्यात आलेले मराठी अधिकारी व कर्मचारी यांना राजस्थानबाहेर हाकलण्यासाठी त्यांची यादी करण्याचा निर्णय शिवसेना हिंदुस्थानचे प्रदेश अध्यक्ष फत्तेचंद गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेण्यात आला, असे या वृत्तात म्हटले आहे. शिवसेना हिंदुस्तानने आपल्या जिल्हा संघटनांना आपल्या जिल्ह्यातील मराठी कर्मचारी; तसेच अधिकार्‍यांची यादी करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर मराठी व्यक्तींना या संदर्भात नोटीस बजाविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नोटीस दिल्यानंतरही मराठी कर्मचार्‍यांची राज्याबाहेर बदली झाली नाही किंवा ते नोकरी सोडून गेले नाहीत, तर त्यांना राजस्थान सोडण्यास भाग पाडण्यात येईल, असेही या वृत्तात म्हटले आहे.

सकाळ


सेवाज्येष्ठता नव्हे; गुणवत्ता हाच पदोन्नतीसाठी निकष - सर्वोच्च न्यायालय
काम न करता केवळ सेवाज्येष्ठतेच्या भांडवलावर पदोन्नती पदरात पाडून घेणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारेच वरच्या पदावर दावा सांगता येणार आहे. उत्तर प्रदेश वीज महामंडळाशी (यूपीपीसीएल) संबंधित असलेल्या एका खटल्यात बुधवारी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता नव्हे, तर गुणवत्ता हाच एकमेव निकष असल्याचा निर्वाळा दिला. "एकाच पातळीवरील पदांवर असलेल्या दोन सरकारी नोकरांतील जास्त सेवाकाळ असलेल्या व्यक्तीला केवळ त्याच्या सेवाज्येष्ठतेमुळे पदोन्नती देता येणार नाही. वरच्या पदासाठी एकच जागा असेल, तर त्यांच्यापैकी ज्याच्याकडे जास्त गुणवत्ता असेल, त्यालाच पदोन्नतीसाठी लायक समजण्यात यावे आणि तो कनिष्ठ असला तरी त्याला पदोन्नती द्यावी", असे न्या. सी.के. ठक्कर आणि न्या. एल.एस. पंटा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
सकाळ


गुप्तचर यंत्रणेत त्रुटीची पंतप्रधानांची कबुली
देशातील दहशतवादविरोधी कायदा कठोर करण्याचे आणि कारवायांच्या तपासासाठी मध्यवर्ती यंत्रणा निर्माण करण्याचे सूतोवाच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी केले. गुप्तचर यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुलीही पंतप्रधानांनी दिली. राष्ट्रपती भवनात आयोजिण्यात आलेल्या राज्यपालांच्या परिषदेत ते बोलत होते. दहशतवादाबाबत केंद्र सरकार बोटचेपे धोरण स्वीकारत असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
सकाळ


पश्‍चिम महाराष्ट्र थरारला - ५३७ घरांची पडझड
कोयना परिसरासह पश्‍चिम महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे पाटण तालुक्‍यातील ९२ गावांतील ५३७ घरांची पडझड झाली. १२ जण जखमी झाले असून, शेकडो घरांच्या भिंतींना तडे जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. आज पहाटे झालेल्या ४.८ रिश्‍टर स्केलच्या या धक्‍क्‍याने पाटण तालुक्‍यात घबराट पसरली. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका पोचलेला नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरले असले, तरी ते सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळ


"एआयजी"ला "फेडरल"चा आधार
आर्थिक पेचप्रसंगात सापडलेल्या अमेरिकेतील अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुपच्या (एआयजी) मदतीला फेडरल रिझर्व्ह धावून आली असून, बॅंकेने एआयजीला ८५ अब्ज डॉलरचे कर्ज दिले. त्यामुळे अमेरिकेच्या वित्तीय क्षेत्रात आलेले वादळ काहीसे शमण्यास मदत होणार आहे. दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी लेहमन ब्रदर्सने फेडरल रिझर्व्हकडे आर्थिक मदत मागितली होती. मात्र, अशा प्रकारची मदत न मिळाल्याने या कंपनीला दिवाळखोरी जाहीर करावी लागली. फेडरल रिझर्व्हने एआयजीला आर्थिक मदत केली असल्याने ती दिवाळखोरीत जाताजाता वाचली. त्यामुळे जागतिक वित्तीय क्षेत्रावर होणारा विपरीत परिणाम टळला आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. एआयजीने गुंतवणूकदारांना कर्जरोख्यांवर वित्तीय संरक्षण दिले असून, ही महत्त्वाची बाब आहे. एआयजी दिवाळखोरीत गेल्यास अनेक नवे प्रश्‍न निर्माण होण्याची भीती फेडरलला होती. त्यामुळे दिवाळखोरीपासून वाचविण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ

दि. १७.०९.२००८[संपादन]

पश्‍चिम महाराष्ट्राला भूकंपाचा धक्का
पश्‍चिम महाराष्ट्राला बुधवारी पहाटे भूकंपाचा मघ्यम धक्का बसला. पहाटे तीन वाजून एकोणीस मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के जवळपास एक मिनिटापर्यंत जाणवत होते. रिश्‍टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक आठ इतकी नोंदली गेली. भूकंपप्रवण असलेला पाटण तालुका आज पुन्हा एकदा हादरला. कोयना परिसर आणि पाटण तालुक्‍यात नेहमीच भूकंपाचे हलके धक्के बसतात. पण आजचा भूंकप नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेचा होता. त्यामुळं नागरिक घाबरले होते. कोयनाघराच्या दक्षिणेला साडे तेरा किलोमीटरवर असलेल्या काडोली या गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीच्या आत तेरा किलोमीटर भूकंपाचं केंद्र होतं. पण फक्त पाटण परिसरातच भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. तर कर्‍हाडसह, सातारा, सांगली, पाटण, कोल्हापूर आणि पुणे ही प्रमुख शहरंही भूकंपानं हादरली. कोकणात रत्नागिरी, चिपळूण आणि लांजा याठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचप्रमाणे नवी मुंबईचा काही भाग आणि मुंबईतही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
सकाळ


अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी १०० अब्ज डॉलरचा महापूर
लेहमन ब्रदर्सच्या घोटाळ्यापाठोपाठ एआयजी ही जगातील सर्वांत मोठी विमा कंपनी दिवाळखोरीत जाता-जाता कशीबशी वाचली. ब्रिटनच्या बर्कलेने दहा अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचे मान्य केल्याची बातमी आज रात्री नऊला आली. आता गोल्डमन सॅक्स या न्यूयॉर्कस्थित बँकेनेही आपल्या नफ्यात ७० टक्के घट झाल्याचे जाहीर केल्याने सारे जग हादरले आहे. अर्थव्यवस्थेत पैशांची कमतरता जाणवण्यास सुरवात झाल्याने युरोप आणि जपानमधील बँकांनी आज दिवसभरात तब्बल १०० अब्ज डॉलरचा निधी ओतला. परंतु, यामुळे काहीही उपयोग होणार नसून अमेरिकी अर्थव्यवस्थेत जोपर्यंत साफसफाई होत नाही, तोपर्यंत संकट सुरू राहणार असल्याचे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
सकाळ


दहशतवादाच्या विरोधात कठोर कायद्याची गरज - प्रशासकीय सुधारणा आयोग
वाढत्या दहशतवादाला आळा घालण्याच्या दृष्टीने सध्याचा कायदा अपुरा असल्याने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (रासुका १९८०) अंतर्गतच नवा राष्ट्रीय सर्वसमावेशक स्वरूपाचा कायदा करून तपासासाठी ’स्वतंत्र मध्यवर्ती यंत्रणा’ (फेडरल एजन्सी) स्थापावी, अशा शिफारशी प्रशासकीय सुधारणा आयोगाने मंगळवारी केल्या. नवा दहशतवादविरोधी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडून होणार्‍या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर ही शिफारस महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सरकारने अहवालाची दखल घेऊन कार्यवाही सुरू केली असल्याचा दावा आयोगाचे अध्यक्ष वीरप्पा मोईली यांनी पत्रकार परिषदेत केला.
सकाळ


शिवराज पाटलांचे भवितव्य अनिश्‍चित
काँग्रेसने अधिकृतरीत्या गृहमंत्री शिवराज पाटील यांना हटविण्याची कल्पना अमान्य केली असली, तरी पक्षातून आणि पक्षाबाहेरूनही त्यांच्या विरोधात रान उठविण्याचा प्रकार मंगळवारीही सुरू राहिला. त्यांच्या भवितव्याबद्दलच्या मतमतांतरांत लालूप्रसाद यादवमुलायमसिंह यादव या नव्या मित्रांमध्येही मतभिन्नता निर्माण झाली आहे. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून गृहमंत्र्यांनी अधिक कडक धोरण आखण्याची आवश्‍यकता स्पष्ट करण्यात आली.
सकाळ


वीजवितरणावरून टाटा-रिलायन्समध्ये वाक्‌युद्ध
मुंबईत वीजवितरणाची परवानगी मिळालेल्या टाटा पॉवर आणि रिलायन्स एनर्जी यांच्यात वीजवितरणावरून आगामी काळात जोरदार शीतयुद्ध रंगणार असून, त्याची सुरुवात वाक्‌युद्धाने झाली आहे."टाटा पॉवर लवकरच मुंबईत वीजवितरण सुरू करील", या रतन टाटा यांच्या विधानानंतर वीजवितरण करताना केवळ बडे आणि सोयीस्कर ग्राहक निवडण्याची मुभा कोणाला असता कामा नये, असा टोला अनिल अंबानी यांनी लगावला आहे. टाटा पॉवर कंपनीची सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच झाली. त्यात बोलताना, कंपनीला मुंबईत वीजवितरण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. लवकरच कंपनी वीजवितरणाचे काम सुरू करील, असे टाटा पॉवरचे प्रमुख रतन टाटा यांनी स्पष्ट केले होते.
सकाळ

दि. १६.०९.२००८[संपादन]

दिल्ली बाँबस्फोटामागे "सिमी"चाच हात
राजधानी दिल्लीत शनिवारी (ता.१३) रोजी घडविण्यात आलेल्या बाँबस्फोटांमागे कय्यमुद्दीन आणि अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीर या स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या (सिमी) अतिरेक्‍यांचाच हात असावा, असा संशय अहमदाबाद पोलिसांनी व्यक्त केला आहे. अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटप्रकरणी हे दोघेही पोलिसांना हवे आहेत. "दिल्लीत झालेल्या बाँबस्फोटामागे कय्यमुद्दीनचाच हात असावा, त्यानेच राजधानीतील विविध ठिकाणी बाँब पेरले असावेत; त्याचबरोबर मुंबईतील संगणक अभियंता तौकीरही या कटात सामील असावा," असा संशय अहमदाबादचे पोलिस सहआयुक्त आशिष भाटिया यांनी व्यक्त केला आहे. अहमदाबाद कटात या दोघांची नावे समोर आली होती. हे दोघेही पोलिसांच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत आहेत. कय्यमुद्दीन गुजरातमधील बडोद्याचा रहिवासी आहे. अहमदाबाद स्फोटांपूर्वी तो महिनाभर येथे राहिला होता. त्याने केरळ आणि गुजरातेत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ


ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचे निधन
बदलत्या समाजमनाचा अचूक वेध घेताना मनोविश्‍लेषणात्मक कथाप्रकार हाताळून नवकथेचे अध्वर्यू ठरलेले प्रा. गंगाधर गाडगीळ (वय ८६) यांचे सोमवारी (ता. १५) सकाळी सहाच्या सुमारास वांद्रे येथील साहित्य सहवासमधील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शीव येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ



बॅडमिंटनपटू साईनाने पुन्हा इतिहास घडविला
'नेक्‍स्ट बिग थिंग इन इंडियन बॅडमिंटन' ही उपाधी सार्थ ठरविणारी कामगिरी साईना नेहवाल हिने केली आहे. गोल्ड दर्जा असलेली स्पर्धा जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला बॅडमिंटनपटू ठरली. दोन स्टार स्पर्धा जिंकणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरण्याचा पराक्रमही तिने केला. तैवानमध्ये रविवारी साईनाने ही कामगिरी केली. तिने मलेशियाच्या लिडीया ली या चियाह हिच्यावर सरळ गेममध्ये मात केली. जागतिक क्रमवारीत साईना १४ व्या स्थानावर असून तिला दुसरे मानांकन होते. या कामगिरीमुळे ती १२ व्या क्रमांकापर्यंत प्रगती करेल. साईनाला पहिला गेम जिंकण्यासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. दुसऱ्या गेममध्ये ती सहा गुणांनी पिछाडीवर होती. मात्र तिने झुंजार खेळ करीत १६-१६ अशी बरोबरी साधली.
सकाळ


मनसेच्या दिव्याखालचा अंधार अखेर दूर
मराठी अस्मितेसाठी रान उठविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेची वेबसाईट मात्र इंग्रजीतून असल्याचे वृत्त "सकाळ'ने देताच मनविसेचे पदाधिकारी खडबडून जागे झाले.त्यांनी आपली वेबसाईट तातडीने मराठीतही आणली व मराठी अस्मितेचा मान राखला.

"मनसेच्या दिव्याखाली अंधार' अशा आशयाचे वृत्त सर्वप्रथम "सकाळ'ने दिले. मराठीच्या प्रश्‍नासाठी आंदोलनांचे रण उठविणाऱ्या मनसेच्या विद्यार्थी शाखेची वेबसाईटच चक्क इंग्रजी भाषेत असल्यामुळे मनसेच्या मराठी अस्मितेविषयीच विविध प्रश्‍न उपस्थित केले जात होते.

मनविसेची वेबसाईट उघडल्यानंतर आता त्यावर इंग्रजी व मराठी असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मराठी पर्यायावर क्‍लिक केल्यानंतर आपल्याला त्यांच्या मराठी भाषेतील वेबसाईटवर जाता येते.

सकाळ http://mnvsena.org

दि. १५.०९.२००८[संपादन]

खैरलांजी हत्याकांड - आठजण दोषी, तिघे निर्दोष
संपूर्ण देशभर गाजलेल्या खैरलांजी हत्याकांडातील खटल्यात अकरा पैकी आठजणांना न्यायालयाने आज (सोमवारी) दोषी ठरविले. महत्त्वाचे म्हणजे हे दलित आहेत म्हणून हत्याकांड घडलेले नाही. त्यामुळे हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला. गोपाल सक्रू बिंजेवार, सक्रू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, महिपाल धांडे, धर्मपाल धांडे, विश्‍वनाथ धांडे, प्रभाकर मंडलेकर, जगदीश मंडलेकर, रामू धांडे, पुरुषोत्तम तितिरमारे व शिशुपाल धांडे हे आरोपी होते. त्यांच्याविरुद्ध खटला चालला. यापैकी महिपाल धांडे, धर्मपाल धांडे, पुरुषोत्तम तितीरमारे यांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. उर्वरित आठ जणांना दोषी धरले आहे.
सकाळ


बॉम्बस्फोटप्रकरणी आठ जण ताब्यात
दिल्लीत शनिवारी बॉम्बस्फोट घडविणार्‍या अतिरेक्‍यांचा कसून शोध घेण्यात येत असून पोलिसांनी रविवारी याप्रकरणी आठ संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांची रेखाचित्रे तयार करण्यात येत आहेत. लवकरच ती प्रसारमाध्यमांना पाठविण्यात येतील. यापूर्वी अहमदाबाद, जयपूर आणि सूरतमध्ये झालेल्या स्फोटांशी दिल्लीत काल झालेल्या स्फोटांचे साधर्म्य असल्याचे सुरुवातीला केलेल्या तपासावरून दिसून येत आहे. दिल्लीतील बाजारपेठेत बॉम्बस्फोट घडविणार्‍यांपैकी एकाचे नाव समजले असून अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीर असे त्याचे नाव असून तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.
सकाळ


मराठवाड्यासह नगर, नाशिकमध्ये दमदार पाऊस
मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत जोरदार पाऊस झाला आहे. नांदेड, बीड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. नाशिकमध्येही गोदावरी नदीला पूर आला आहे. नगर जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे वाहून जाण्यासारख्या दुर्घटना घडल्या असल्या, तरी धरणांमधील साठ्यांची स्थिती समाधानकारक असल्याने पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.
सकाळ

दि. १४.०९.२००८[संपादन]

दिल्लीवर "हल्ला"; २५ ठार
राजधानी दिल्लीत शनिवारी (ता. १३) २० मिनिटांत पाच बाँबस्फोट झाले. यात २५ जण ठार झाले असून, १०० जण जखमी झाले आहेत. चार बाँब निकामी करण्यात आले असून, त्यातील एक संसद मार्गवर सापडला. यानंतर संपूर्ण देशात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. इंडियन मुजाहिदीन या संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. ऑपरेशन बॅड (बेंगळूरु, अहमदाबाद, दिल्ली) संपले असल्याचे या संघटनेने पाठविलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे. हा ईमेल मुंबईहून पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी कॅनॉट प्लेस भागात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, पुण्यातही डबल रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
सकाळ


अतिरेक्‍यांचा ईमेल मुंबईतून पाठविल्याचे उघड
दिल्लीतील बाँबस्फोटांची जबाबदारी स्वीकारणारा ईमेल मुंबईतील चेंबूरमधून पाठविण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. इंडियन मुजाहिदीन या संघटनेने हा ईमेल पाठविला होता. त्यावरील पत्त्यासनुसार हा मेल मुंबईतून आल्याचे निष्पन्न झाले. मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाने त्याचा तपास केल्यानंतर हा मेल आयपी ऍड्रेस कामरान पॉवर लिमिटेड या कंपनीचा असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले.
सकाळ


मनसेच्या दिव्याखाली अंधार
दुकानांच्या मराठी पाट्यांचा विषय असो, की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील मराठीचा विषय... प्रत्येक मुद्द्यावर आंदोलनाचे निशाण फडकविणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिव्याखाली मात्र अंधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात मराठीचा मुद्दा लावून धरणार्‍या मनसेच्या विद्यार्थी सेनेने मात्र मराठी भाषेला "बायपास" करून इंग्रजीचीच कास धरली आहे. मनविसेची वेबसाईट चक्क इंग्रजी भाषेत असल्यामुळे मनसेच्या मराठी अस्मितेविषयीच राजकीय वर्तुळात प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.
सकाळ


भारताच्या भात्यात नवे "अस्त्र"
रडार यंत्रणेला चकविणार्‍या आणि स्वनातीत वेगाने (आवाजाच्या दुप्पट वेग) जाणार्‍या ’अस्त्र’ या क्षेपणास्त्राची शनिवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. हवेतून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र स्वदेशी बनावटीचे आहे. ओरिसातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर (आयटीआर) ही चाचणी घेण्यात आली. त्याचा पल्ला ११० किलोमीटरचा आहे. हे क्षेपणासास्त्र बियॉंड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) प्रकारचे आहे. "अस्त्र"च्या आणखी काही चाचण्या केल्या जाणार असून, त्यानंतर सुखोई-३० या लढाऊ विमानांच्या ताफ्यात ते सामील होण्याची शक्‍यता आहे.
सकाळ


’आइक’च्या तडाख्याने दहा लाख विस्थापित
आइक या चक्रीवादळाने समुद्रात उमटलेल्या वीस फूट उंचीच्या लाटा, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस आणि रौद्ररूप धारण केलेले घोंगावणारे वारे यांनी अमेरिकेतील टेक्सास या राज्यात विध्वंस सुरू केला आहे. दहा लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले असून, सुमारे एक लाख घरांमध्ये सहा फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. टेक्‍सासमधील गेल्या पन्नास वर्षांतील हे चक्रीवादळ सर्वाधिक विध्वंसक आहे. टेक्‍सासला झोडपण्यापूर्वी आइकने दिलेल्या तडाख्याने हैती या छोट्या देशातील दहा लाख जण बेघर झाले आहेत.
सकाळ


टोपालोवविरुद्ध आनंदची बरोबरी
ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने बिल्बाओ ग्रँडस्लॅम फायनल बुद्धिबळ स्पर्धेतील बरोबरीची मालिका कायम राखली. बल्गेरियाच्या वॅसेलीन टोपालोव याच्याशी त्याने बरोबरी साधली. नवव्या फेरीअखेर आनंद संयुक्त पाचव्या स्थानावर आहे. त्याचे सात गुण झाले आहेत.
सकाळ

दि. १३.०९.२००८[संपादन]

मराठी चित्रपट दाखवा; अन्यथा परवाना रद्द
मराठी-अमराठी वादामुळे महाराष्ट्र पेटला असतानाच आज एक नवाच फतवा गृहमंत्रालयाने काढला. ’मराठी चित्रपट दाखवा; अन्यथा परवाना रद्द करू’ अशी भूमिका त्यांनी घेतली. तसे पत्र राज्यातील सर्व पोलिस आयुक्‍त आणि जिल्हाधिकार्‍यांना पोहोचले आहेत. चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्‍सला आता यापासून पळ काढता येणार नाही. डिसेंबर २००८ पर्यंत यासंदर्भात करण्यात आलेले निर्देश पाळणे बंधनकारक राहणार आहे; अन्यथा कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येईल, असे पत्रात नमूद आहे.
सकाळ


अणुइंधन पुरविण्याचे अमेरिकेवर बंधन नाही
अणुकराराअंतर्गत भारताला अणुइंधन पुरविण्याचे आणि गोपनीय माहिती देण्याचे कायदेशीर बंधन नाही, असा उल्लेख अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कम्युनिस्ट पक्ष आणि भाजपने या विषयावरून सरकारवर पुन्हा टीकेची झोड उठविली. "बारीकसारीक गोष्टींचा कीस पाडण्याची गरज नाही," अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. २५ सप्टेंबरला जॉर्ज बुश व पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या होणार्‍या भेटीत अणुकराराला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नव्या वादाने पेचात भर पडली. या करारामुळे भारताबरोबर अमेरिकेच्या नागरी क्षेत्रातील सर्वंकष अणुसहकार्याचा मार्ग खुला होईल. त्यानुसार भारताला अणुभट्ट्यांसह सर्व संशोधनात्मक अणुसामग्री आणि अणुऊर्जेसाठी लागणारे सहकार्य देता येईल. तथापि, गोपनीय स्वरूपाची माहिती देण्याचा त्यात समावेश नाही, असे बुश यांनी म्हटले आहे.
सकाळ


अमेरिकन क्षेपणास्त्रांचा पाकिस्तानात पुन्हा हल्ला; दहा ठार
पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील उत्तर वझिरीस्तानवर अमेरिकेने शुक्रवारी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दहा जण ठार झाले. मिरनशाह शहराजवळच्या तुल खेली येथे हा हल्ला करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. वायव्य सरहद्द प्रांतात अड्डे वसवलेल्या "अल कायदा" व "तालिबान"च्या अतिरेक्‍यांचा निःपात करण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारची परवानगी न घेता हल्ले सुरू करण्याचा गुप्त आदेश अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिला आहे. त्यातून दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दहा जण ठार झाल्याची माहिती अमेरिकेच्या एका अधिकार्‍याने दिली. दोन क्षेपणास्त्रे तुल खेलीवर डागण्यात आली होती. हल्ल्यांसाठी अमेरिका "ड्रोन"चा वापर करीत आहे. पाकिस्तानने या हल्ल्याचा निषेध केला आहे.
सकाळ


वेलकम टू सज्जनपूर लंडन फेस्टिव्हलमध्ये
प्रसिद्ध दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांच्या पहिल्यावहिल्या "वेलकम टू सज्जनपूर" या विनोदी चित्रपटाची लंडन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. १५ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीत हा चित्रपट महोत्सव भरणार आहे. वर्ल्ड सिनेमा विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. जगात गाजलेले चित्रपट या महोत्सवात दाखविले जातात. दर वर्षी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. अनेक दर्जेदार चित्रपट या महोत्सवात दाखविले जातात. वेलकम टू सज्जनपूर या चित्रपटात श्रेयस तळपदे, अमृता राव, दिव्या दत्ता, इला अरुण आदी कलाकार काम करीत आहेत. विकस बहेल निर्माते आहेत. ते म्हणाले, की कुठल्याही महोत्सवात या चित्रपटाची निवड व्हावी म्हणून आम्ही तो बनविला नव्हता. पण आता लंडन महोत्सवात या चित्रपटाची निवड झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. आमचा उत्साह वाढला आहे. एक प्रकारचे प्रोत्साहन मिळाले आहे. दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांनीदेखील आपल्याला आनंद होत असल्याचे सांगितले.
[ सकाळ]


सिंगूर प्रश्‍नी बुद्धदेव-ममतांची बैठक अनिर्णीत
सिंगूरचा तिढा सोडविण्यासाठी पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यात आज झालेल्या बैठकीतही काही निर्णय होऊ शकला नाही. टाटांच्या प्रकल्पातील ७० एकर जमीन परत देण्याची तयारी सरकारकडून दाखविण्यात आली; पण १०० एकरांहून कमी जमिनीबाबत सहमती दर्शविण्यास ममता तयार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सकाळ

दि. १२.०९.२००८[संपादन]

पाकिस्तानात घुसून अमेरिकेचे हल्ले सुरू
अमेरिकेच्या विशेष सैनिकांना पाकिस्तानात घुसून हल्ले करण्याची परवानगी देणारा गुप्त आदेश अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जारी केला आहे. पाकिस्तान सरकारची परवानगी न घेता हल्ले करण्याचा हा आदेश असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने गुरुवारी दिले आहे. तालिबान आणि अल्‌ कायदा या दहशतवादी संघटनांविरुद्ध अमेरिकेने सात वर्षांपूर्वी युद्ध पुकारून मोहीम सुरू केली. तीत पाकिस्तानची साथ अपेक्षित होती; पण ती पुरेशी नसल्याचे दिसल्याने बुश यांनी हा आदेश जारी केल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा हवाला देऊन म्हटले आहे. "पाकिस्तानच्या आदिवासी भागातील स्थिती सहन करण्यापलीकडे गेली आहे. आता आणखी आक्रमक धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. तसा आदेश जारी करण्यात आला आहे" असे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.
सकाळ


२५ सप्टेंबर रोजी करारावर शिक्कामोर्तब
एकीकडे अणुकराराचा मसुदा अमेरिकन काँग्रेसकडे (सिनेट आणि प्रतिनिधिगृह) पाठवितानाच अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना २५ सप्टेंबर रोजी व्हाइट हाउसभेटीचे अधिकृतपणे आमंत्रण दिले आहे. यावरून, याच दिवशी अणुकरारावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचा बेत बुश प्रशासनाने आखला असल्याचे दिसत आहे. तसेच काँग्रेसमधून तो सुरळीतपणे संमत होईल, याची पुरेपूर खात्री असल्यानेच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सकाळ


राष्ट्रपतींच्या पगारात एक लाखाने वाढ; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात सुमारे ३०० टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. यामुळे राष्ट्रपतींचे एक महिन्याचे वेतन ५० हजारांऐवजी दीड लाख रुपये झाले आहे. ही वाढ जानेवारी २००७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांना मंजुरी देण्यात आली. राष्ट्रपतींबरोबरच उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार उपराष्ट्रपतींचे वेतन ४० हजारांहून सव्वा लाख रुपये करण्यात आले आहे. राज्यपालांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली असून, राज्यपालांना आता ३६ हजारांऐवजी दरमहा एक लाख १० हजार रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार्‍या फायद्याचेही सुसूत्रीकरण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ

दि. ११.०९.२००८[संपादन]

राजवर कारवाईसाठी काँग्रेस श्रेष्ठींचा दबाव
राज ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा दबाव वाढताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी मार्गारेट अल्वा यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. अल्वा यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चाही केली. सोनिया गांधी याही मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. जया बच्चन यांचे निवेदन आणि त्यावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, मनसेने बच्चन कुटुंबीयांवरील बहिष्काराची केलेली घोषणा आणि काही ठिकाणी झालेल्या हिंसक घटना या संदर्भात अल्वा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सकाळ


जिनिव्हातील प्रयोगाला माध्यमांचा अभूतपूर्व प्रतिसाद
विश्‍वनिर्मितीचे कोडे उलगडण्यासाठी जिनिव्हा येथे बुधवारी सुरू झालेल्या ऐतिहासिक प्रयोगाला जगभरातून प्रसिद्धीही अभूतपूर्व मिळाली आहे. वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांनी भरभरून प्रसिद्धी दिल्याने सर्न प्रकल्पाशी संबंधित सर्व संकेतस्थळे दिवसभर जॅम झाली होती. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांपासून कट्ट्यांवरील गप्पांमध्येही दिवसभर याच विषयाची चर्चा रंगली होती. विश्‍वनिर्मितीबद्दल मानवाला कायमच आकर्षण राहिले आहे. जिनिव्हा इथे अब्जावधी रुपये खर्चून उभारलेला प्रयोगही याच आकर्षणातून करण्यात येत आहे. मात्र, या प्रयोगाला माध्यमांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रसिद्धीमुळे विश्‍वनिर्मितीची ही चर्चा आता थेट कट्ट्यांवरही रंगू लागली आहे. विश्‍वाचे सर्वांत मोठे कोडे उलगडण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने माध्यमांसाठी ही दिवसातील सर्वांत मोठी बातमी ठरली.
सकाळ


जहाजविरोधी हार्पून भारताला मिळणार
भारताला जहाजविरोधी हार्पून-२ क्षेपणास्त्रे विकण्याचा निर्णय अमेरिकेने बुधवारी घेतला. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांचा अमेरिका दौरा सुरू होत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. हार्पून-२ क्षेपणास्त्रे भारताला विकण्याचा निर्णय अमेरिकेच्या सरकारने घेतल्याचे पेंटागॉनने काँग्रेसला कळविले आहे. १७ कोटी १० लाख डॉलरचा हा व्यवहार असून, भारतीय हवाई दलाकडील जॅग्वार विमानांच्या सागरी तुकडीला ही क्षेपणास्त्रे मिळण्याची शक्‍यता आहे. भारताने आमच्याकडे वीस एजीएम-८४ एल हार्पून क्षेपणास्त्रांची मागणी केली होती, अशी माहिती पेंटागॉनच्या संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेतर्फे (डीएससीए) देण्यात आली. स्थिर पंख असलेल्या विमानांवर ही क्षेपणास्त्रे बसविता येतात. या शिवाय एटीएम-८४ एल हार्पून ब्लॉक-२ या जातीच्या चार क्षेपणास्त्रांची मागणीही भारताने केली होती. त्यांचे सुटे भागही भारताला हवे आहेत.
सकाळ


जागतिक बिलियर्डस स्पर्धेत पंकज अडवानी विजेता
बंगळूरच्या पंकज अडवाणीने वेळेच्या स्वरूपातील जागतिक बिलियर्डस स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. गेल्याच आठवड्यात त्याने गुणांच्या स्वरूपाची स्पर्धा जिंकली होती. त्या वेळी गीत सेठीचे आव्हान पंकजने मोडून काढले होते. या वेळी त्याने अनुभवी देवेंद्रचा उत्तरार्धातील प्रतिकार मोडून काढला. यामुळे पंकजला दुहेरी मुकुट संपादन करता आला. पंकज २३ वर्षांचा आहे. त्याने उपांत्य फेरीत गीतवर मात केली होती. अंतिम फेरीत त्याने पहिली दोन सत्रे एकतर्फी ठरविली. देवेंद्रने नंतर लढाऊ खेळ करीत अंतिम सत्रात ५५७ गुणांचा ब्रेक मिळविला. मात्र, पंकजने सुरवातीलाच घेतलेली आघाडी निर्णायक ठरली.
सकाळ


देशातील बँकांमध्ये बाराशे कोटी रुपये पडून
देशातील व्यापारी बँकांमध्ये बेवारस असलेल्या दोन कोटी खात्यांमध्ये सुमारे बाराशे कोटी रुपये पडून असून, या खातेदारांनी त्यावर दावा केलेला नाही. त्यामुळे या बँका ती रक्कम वापरत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. बेवारस असलेल्या खाते ग्राहकांचा शोध घ्यावा अथवा कायदेशीर कारवाई करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशालाही या बँकांनी केराची टोपली दाखविली आहे.
सकाळ

दि. १०.०९.२००८[संपादन]

विश्‍वनिर्मिती शोधाच्या प्रयोगाला प्रारंभ
स्वित्झर्लंडफ्रान्सच्या सीमेवर जमिनीखाली १०० मीटरवर लेक जिनिव्हा व जुरा डोंगररांगांच्या मध्ये २७ किलोमीटर लांबीच्या महाकाय बोगद्यात "लार्ज हॅड्रॉन कोलायडर (एलएचसी)" हे उपकरण आज कार्यान्वित करण्यात आले. यामुळे विश्‍वाच्या निर्मितीच्या शोधाच्या आधुनिक प्रवासाला खर्‍या अर्थाने सुरवात होणार आहे. आल्प्स पर्वतरांगांच्या पायथ्याशी जमिनीखाली उभारलेला जगातील सर्वांत शक्तिशाली पार्टिकल ऍक्‍सिलरेटरने (मूलकणांना जबरदस्त गती देणारे यंत्र) गती घेतली. यासाठी स्वित्झर्लंडची राजधानी असलेल्या जिनिव्हात "युरोपीयन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्‍लियर रिसर्चने" (सर्न) नऊ अब्ज डॉलर खर्चून पार्टिकल ऍक्‍सिलरेटरची उभारणी केली आहे. भारतासह जगभरातील नऊ हजारांहून अधिक शास्त्रज्ञ गेल्या वीस वर्षांपासून या सुवर्णक्षणाची प्रतीक्षा करीत आहेत.
सकाळ


महाराष्ट्रात पावसाची भरपाई
राज्याच्या बहुतेक भागाला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. पश्‍चिम महाराष्ट्रात या पावसाचा जोर सर्वाधिक होता. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात, विशेषतः दुष्काळी भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांची मोठी हानी झाली. मात्र, या पावसाने धरणे, तलाव आणि विहिरी भरल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
सकाळ


बुकर पुरस्कारासाठी दोन भारतीय लेखकांना नामांकन
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार "बुकर"साठी भारतातील दोन लेखकांसह जगातील सहा लेखकांना मंगळवारी नामांकित करण्यात आले आहे. ऑक्‍टोबरमध्ये अंतिम पुरस्कारासाठी लेखकाची निवड केल्या जाईल. वादग्रस्त लेखक सलमान रश्‍दी यांचे नाव सलग दुसर्‍यांदा या पुरस्काराच्या शर्यतीत होते. मात्र, त्यांना अंतिम नामांकन मिळू शकले नाही. पुरस्काराचे हे ४० वे वर्ष आहे. यावर्षी दिल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेल्या लेखकांमध्ये ३४ वर्षीय अरविंद आदिगा यांचा समावेश आहे. त्यांच्या "द व्हाईट टायगर" या पुस्तकांसाठी त्यांना नामांकित करण्यात आले आहे. हे त्यांचे पहिलेच पुस्तक आहे. याशिवाय अमिताव घोष यांनाही "सी ऑफ पॉपिझ्‌" या पुस्तकासाठी नामांकित करण्यात आले आहे.
सकाळ


आरुषी खून प्रकरणी सीबीआयकडे पुरावाच नाही
नोएडातील आरुषी तलवार व हेमराज खूनप्रकरणात केंद्रीय अन्वेषण खात्याकडे (सीबीआय) पुरावाच नसल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. त्यामुळे सीबीआय बुधवारी (ता. १०) न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. आरुषी खूनप्रकरण ३१ मे २००८ रोजी सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. डॉ. तलवार यांच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे सीबीआयने म्हटले होते. काही दिवसांच्या तपासानंतर सीबीआयने तलवार यांचे नोकर कृष्णा, राजकुमार व विजय मंडल यांना अटक केली. या सर्वांनी मिळून हे दोन खून केल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते. या सर्वांविरुद्ध ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे सीबीआयवर बंधनकारक होते. ही मुदत उद्या (ता. १०) संपत आहे. मात्र, त्याआधीच विजय मंडलची जामिनावर सुटका करण्यात आली. अन्य दोन आरोपींनीही जामिनासाठी अर्ज केला आहे. अशा स्थितीत सीबीआयच्या उपसंचालक नीरज गोत्रू यांनी आरोपपत्र दाखल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.
सकाळ


ब्रिटनमधील कचरा भारताच्या अंगणात
ब्रिटनची प्रदूषणमुक्तीच्या दिशेने सध्या जोरदार वाटचाल सुरू आहे, ही खरे तर उत्साहवर्धक बातमी... पण कचरा टाकण्यासाठी ब्रिटनला भारताचे अंगण उपलब्ध झाल्याने भारतीयांसाठी ही धोक्‍याची नांदी ठरली आहे. शेकडो टन कचरा ब्रिटनमधून जहाजांमधून भारतात आणला जात असून, तो शेतजमिनींवर अस्ताव्यस्त पसरला जात आहे. एका ब्रिटिश वाहिनीनेच हे धक्कादायक वास्तव उजेडात आणले आहे. हिरवागार परिसर आणि प्रदूषणमुक्तीच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी ब्रिटनमधील नगर परिषदांनी नागरिकांना कचर्‍याचे नीट वर्गीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुनर्निर्मिती प्रक्रियेसाठी प्लॅस्टिक, धातू, कागद आणि काचेच्या टाकाऊ वस्तू वेगवेगळ्या करण्यास सांगण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात पुनर्निर्मितीऐवजी हा कचरा थेट भारतात पाठविला जात असल्याचे उघड झाले आहे. टाकाऊ वस्तूंमधून पुनर्निर्मितीसाठी प्रतिटन १४८ पाऊंड (१२ हजार रुपये) खर्च येतो, तर प्रतिटन ४० पाउंड (२ हजार ८०० रुपये) खर्च केल्यास हा कचरा भारतात धाडता येतो, हे यामागील कारण आहे. साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करून हा कचरा तमिळनाडूतील शेतजमिनींमध्ये येऊन पडत असल्याचे उघड झाले आहे.
सकाळ


रशियाबरोबरील अणुकरार अमेरिकेकडून शीतपेटीत
भारताबरोबरील अणुकरारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी व्हाइट हाउस, परराष्ट्र मंत्रालयाची जय्यत तयारी सुरू असतानाच अमेरिकेने रशियाबरोबरील अणुकरार शीतपेटीत टाकण्याचा निर्णय अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी घेतला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधून (अमेरिकन संसद) त्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. जॉर्जियामधील अतिक्रमणासाठी रशियाला ही शिक्षा आहे. मात्र, त्याच वेळी हा करार पूर्णपणे रद्दबातल करण्यात आलेला नाही. योग्य वेळी त्याचे पुनरुज्जीवन करू, असे परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राइस यांनी जाहीर केले.
सकाळ


मुंबईत रंगणार पहिले वडापाव संमेलन
चुरचुरीत खमंग वडा, सोबत लाल चटणी व हिरव्या मिरच्यांचा ठेचा, असा बेत नजरेसमोर आला तरी तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा... मग पाय आपसूकच नाक्‍यावरच्या फक्कड वडेवाल्याकडे वळतात... अस्सल खवय्यांना खवय्येगिरी करण्याची ही संधी एकाच मांडवाखाली चालून आली आहे. शिवसेना पुरस्कृत वडापाव विक्रेता सेनेने त्यासाठी पुढाकार घेतला असून, हे संमेलन ऑक्‍टोबरमध्ये मुंबईत रंगणार आहे. त्याची जोरदार तयारी सध्या सुरू असून, हे जगातील पहिले वडापाव संमेलन ठरेल, असा विश्‍वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सकाळ

दि. ०९.०९.२००८[संपादन]

राज यांना एक महिन्याची भाषणबंदी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची चिन्हे असल्याने मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर आजपासून एक महिन्याकरिता भाषणबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभराच्या कालावधीत ठाकरे यांनी प्रक्षोभक विधाने केल्यास अथवा सभा घेतल्यास त्यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दादर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त बी. यू. भांगे यांनी दिली.
सकाळ


भारताला अणुपुरवठादार गटात घेणार
अणुपुरवठादार देशांच्या गटाकडून (एनएसजी) भारताला सवलती मिळवून देण्यासाठी परिश्रम घेणार्‍या अमेरिकेचे पुढचे ध्येय भारताला या गटाचाच संपूर्ण सदस्य करवून घेणे हे आहे, असे अमेरिकेचे वाणिज्य उपमंत्री डेव्हिड बोहिगियन यांनी सोमवारी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये अणुकरारावर शिक्कामोर्तब करवून घेण्याला आता बुश प्रशासनाचे प्राधान्य राहील, असे सांगून बोहिगियन म्हणाले, "भारत एनएसजीचा संपूर्ण सदस्य बनणे हे व्यूहात्मक, राजकीय, आर्थिक आणि ऊर्जा या क्षेत्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल. सन २०२० पर्यंतची भारताची ऊर्जेची गरज लक्षात घेतली, तर अणुऊर्जेचे महत्त्व अधोरेखित होईल."
सकाळ


दाभोळची वीज महागणार
सदोष यंत्रसामग्रीमुळे पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीच्या बाबतीत अपयशी ठरलेल्या दाभोळ येथील रत्नागिरी पॉवर प्रोजेक्‍ट प्रा. लि. ची वीज आता केवळ दुर्लभ नाही तर महागही ठरणार आहे. गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या प्रकल्पाला पुरवण्यात येणार्‍या गॅसचे सरासरी दर वाढूनही वीजदरवाढ होणार आहे. सध्या दाभोळ प्रकल्पाला साडेचार डॉलर प्रति एमएमबीटीयू या सवलतीच्या सरासरी दराने जास्त पुरवठा होत आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर २० डॉलर प्रति एमएमबीटीयूपेक्षा अधिक झाल्याने दाभोळसाठी सरासरी दर नऊ डॉलर प्रति एमएमबीटीयूपर्यंत जाऊ शकतो, असे समजते.
सकाळ


सिंगूर तोडग्याबाबत टाटा असमाधानी
पश्‍चिम बंगालमधील सिंगूरमध्ये नॅनो प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्याच्या वादाबाबत राज्य सरकार व आंदोलकांत रविवारी (ता.७) रात्री उशिरा तोडगा काढण्यात आल्याचे घोषित झाले असले, तरी त्यावर टाटा मोटर्स ही कंपनी समाधानी नाही. अनेक गोष्टी अजून स्पष्टपणे समोर आल्या नाहीत. हमी मिळेपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रविवारी काढलेल्या तोडग्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करणारे एक निवेदन टाटा मोटर्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. सिंगूरमधील वादाबाबत ज्या बाबी समोर आल्या आहेत, त्यातून हा प्रश्‍न सुटल्याचे पूर्णपणे स्पष्ट होत नाही. आंदोलकांकडून यापुढे कोणताही वाद उत्पन्न केला जाणार नाही, याबाबतची हमी मिळत नाही, तोपर्यंत कंपनी काम सुरू करू शकत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ


भूगर्भात होणार विश्‍वनिर्मिती
आल्प्स पर्वतरांगांच्या पायथ्याशी जमिनीखाली उभारलेला जगातील सर्वांत शक्तिशाली पार्टिकल ऍक्‍सलरेटर बुधवारी सुरू होईल आणि विश्‍वाच्या निर्मितीच्या शोधाच्या आधुनिक प्रवासाला सुरवात होईल. भारतासह जगभरातील नऊ हजारांहून अधिक शास्त्रज्ञ या क्षणाची गेल्या २० वर्षांपासून वाट पाहत आहेत. या शोधाबरोबरच पदार्थांतील मूलकणांचे स्वरूप कसे आहे, नेमक्‍या मिती किती अशा प्रश्‍नांचाही शोध या प्रयोगात घेण्यात येणार आहे.
सकाळ


अणुकरार अमेरिकी काँग्रेसच्या कचाट्यात
अणुइंधन पुरवठा गटाची (एनएसजी) एकमताने संमती मिळविल्यानंतरही अणुकराराला कोलदांडा घालण्यासाठी अमेरिकेतील अण्वस्त्रप्रसारविरोधी गटाने धडपड सुरू केली आहे. त्यासाठीच प्रतिनिधिगृहाच्या परराष्ट्र संबंध समितीचे प्रमुख हावर्ड बर्मन यांनी अणुकरार घाईघाईने काँग्रेसपुढे (सिनेट आणि प्रतिनिधिगृह) आणू देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी परस्परांशी झुंजणारे बराक ओबामा आणि जॉन मॅककेन या दोघांनीही भारताचे अभिनंदन केले आहे.
सकाळ


तरंगणार्‍या अणुभट्टीची निर्मिती
भविष्यकाळात मानवजातीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ऊर्जेच्या अधिकाधिक निर्मितीसाठी रशियन वैज्ञानिकांनी तरंगणार्‍या अणुभट्टीची (एफएनपीपी) निर्मिती सुरू केली आहे. येत्या काही वर्षांत रशियाबरोबर जगातील अनेक समुद्रांत, खाड्यांमध्ये अशा तरंगणार्‍या अणुभट्ट्या दिसणार आहेत. या अणुभट्ट्यांमध्ये तयार होणारी वीज अतिदुर्गम-डोंगराळ, दर्‍याखोर्‍यातील भागात नेता येणे शक्‍य होणार आहे. आतापर्यंत अणूपासून वीजनिर्मिती करण्यासाठी जमिनीवर प्रकल्प उभारण्यात येत होते. यामध्ये वीजवहनासाठी निर्माण करण्यात येणार्‍या पायाभूत सुविधांत प्रचंड गुंतवणूक करावी लागत असे. तरंगणार्‍या अणुभट्टीमुळे हा अडथळा आता सहज पार होणार आहे.
सकाळ

दि. ०८.०९.२००८, सोमवार[संपादन]

परप्रांतीय टोळ्यांमुळे राज्यातील दरोड्यांत वाढ - मुख्यमंत्री
लातूर, ता. ७ - मराठवाड्यात व राज्याच्या इतर भागांत परप्रांतीय टोळ्या येत असल्याने दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी "कोंबिंग ऑपरेशन'सारखे उपाय केले जावेत, तशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे रविवारी (ता. सात) पत्रकारांशी बोलताना दिली.

बीड, परभणी सारख्या भागांत वाढत्या दरोड्याविषयी श्री. देशमुख म्हणाले, "दरोडा व त्यानंतर केले जाणारे अत्याचार ही बाब चिंताजनक आहे. परप्रांतीय टोळ्या आपल्याकडे येत असल्याने दरोड्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यांना जेरबंद करण्यासाठी वेगळे पोलिसांचे पथकही कार्यरत करण्यात आली आहेत."

यावर नियंत्रणासाठी राज्याच्या सीमेवर चेकपोस्ट करणार का? यावर श्री. देशमुख म्हणाले, "सीमेवरील चेकपोस्टचा जास्त फायदा होईल, असे वाटत नाही. पण पोलिसांनी 'कोंबिंग ऑपरेशन'सारखे उपक्रम हाती घेतली पाहिजे. तसेच नाकाबंदी वारंवार करण्याची गरज आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत."

सकाळ


'हम यूपी के है, हिंदी मे ही बोलेंगे।'- जया बच्चन
' हम यूपी के है। हिंदी मे ही बोलेंगे।' अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री व समाजवादी पाटीर्च्या खासदार जया बच्चन यांनी शनिवारी एका कार्यक्रमात हिंदीचा पुकारा करीत पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला. त्यावर अपेक्षेप्रमाणेच रविवारी राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त झाला.

बच्चन यांना हिंदीचा इतका पुळका असेल तर, दक्षिणेतील राज्यात जाऊन हिंदीचा झेंडा फडकावण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्राच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा शिवसेनेने दिला. तर त्यांच्या विधानावर सोमवारी प्रतिक्रिया देऊ, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्पष्ट केले.

म. टा.

दि. ०७.०९.२००८[संपादन]

तीन दशकांचा आण्विक बहिष्कार हद्दपार
ज्या अणुइंधन पुरवठा गटाची (एनएसजी) स्थापना भारताने १९७४ मध्ये केलेल्या अणुचाचणीनंतर झाली होती, त्याच भारतासाठी एनएसजीला आपल्या नियमावलींना मुरड घालावी लागली. अण्वस्त्रविषयक कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारावर सही न करताही भारताला जागतिक आण्विक व्यापाराचे दरवाजे खुले करण्याची वेळ एनएसजीवर आली. भारताला सवलत देणार्‍या मसुद्याला आज अखेर एकमताने मंजुरी मिळाल्याने, गेल्या ३४ वर्षांपासून चालू असलेला भारतावरील आण्विक बहिष्कार काही मूठभर देशांना मागे घ्यावा लागला आहे.
सकाळ


पाकिस्तानच्या अध्यक्षपदी झरदारी
सत्तारूढ पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सहअध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. शनिवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी दोन उमेदवारांवर दणदणीत विजय मिळविला. दिवंगत माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती असलेल्या ५३ वर्षीय झरदारी यांना सिनेटची ४३६ पैकी २८१ मते मिळाली.
सकाळ


संघर्षपूर्ण लढतीत पेस-डीलुईचा पराभव
भारताच्या लिअँडर पेसचे अमेरिकन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीपाठोपाठ पुरुष दुहेरीचेही विजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न शुक्रवारी भंगले. बॉब आणि माईक या अमेरिकेच्या ब्रायन बंधूंनी दुहेरीच्या संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात लिअँडर पेस आणि ल्युकास डीलुई जोडीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. ब्रायन बंधूंचे हे दुहेरीतील सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
सकाळ

दि. ०६.०९.२००८[संपादन]

ऑस्ट्रियाचा अणुकराराला खोडा
अणुइंधन पुरवठा गटाची (एनएसजी) बैठक रात्री उशिरापर्यंत चालू असूनही त्यात भारताला देण्यात येणार्‍या सवलतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नव्हता. विरोध करणार्‍या सहापैकी पाच देशांची समजूत घालण्यात अमेरिकेने यश मिळविले असले तरीही एकट्या ऑस्ट्रियाने खोडा घातल्याचे समजते. गेल्या दोन दिवसापासून एनएसजीची बैठक सुरू आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, हॉलंड, आयर्लंड, स्वित्झर्लंड या देशांचा भारताला अणुविषयक सवलती देण्यास विरोध आहे. अणुचाचणी केली तर सहकार्य तातडीने रद्द, हे कलम अमेरिकेने दिलेल्या मसुद्यात घालावे, याकरिता हे देश हटून बसले आहेत. पहिल्या दिवशी कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र, काही देशांना अणुकराराच्या बाजूने वळविण्यात यश आले होते. या देशांची भीती आणि शंका दूर व्हाव्यात, याकरिता भारताचे परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज निवेदन प्रसिद्ध करून अणुचाचण्यांवर भारताने स्वेच्छेनेच निर्बंध घातल्याचे जाहीर केले होते.
सकाळ


पुरुष दुहेरीत पेस पराभूत
अमेरिकन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीपाठोपाठ पुरुष दुहेरीचेही विजेतेपद पटकाविण्याचे लिअँडर पेसचे स्वप्न शुक्रवारी भंगले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बॉब आणि माईक या ब्रायन बंधूंनी लिअँडर पेस आणि ल्युकास डीलुई या जोडीचा ७-६ (७-५), ७-६ (१२-१०) असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकावले. हे त्यांचे सहावे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
सकाळ


संजीव नंदाला पाच वर्षे कैद
दिल्लीत १९९९ मध्ये सहा जणांना मोटारीखाली चिरडल्याप्रकरणी उद्योगपती संजीव नंदा याला दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. भोलानाथ व श्‍यामसिंग या दोन आरोपींना न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे राजीव गुप्ता यांना एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे.
सकाळ


रशियाबरोबरील अणुकरार अमेरिका रद्द करणार
जॉर्जियाशी गेल्या महिन्यात छेडलेल्या युद्धाची शिक्षा म्हणून रशियाबरोबर केलेला नागरी अणुकरार रद्द करण्याचा विचार अमेरिका करीत आहे. जॉर्जिया या आपल्या मित्रदेशाला अमेरिकेने एक अब्ज डॉलरची मदत जाहीर केली असली, तरी रशियावर कोणते निर्बंध जारी करणार, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. शीतयुद्धाच्या काळात व्यापारावर आलेले निर्बंध उठविण्याच्या दृष्टीने अमेरिकेने नागरी अणुसहकार्य करार करून आण्विक बाजारपेठ रशियासाठी खुली केली होती. हा करार रद्द करण्याची तयारी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे प्रशासन करीत आहे.
सकाळ

दि. ०५.०९.२००८[संपादन]

डॉ. मनमोहनसिंग सरकार बचावाच्या पवित्र्यात
अणुकराराबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुश यांच्या पत्राच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर मनमोहनसिंग सरकार गुरुवारी बचावाच्या पवित्र्यात आले. या करारासंदर्भात पंतप्रधान आणि सरकारने संसदेत स्पष्ट केलेल्या भूमिकेवरच कायम राहण्याचे आज सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. विरोधी पक्षांनी मात्र या पत्राच्या मुद्द्यावरून सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून याबाबत तत्काळ खुलासा करण्याची मागणी करून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. अणुकरार केल्यानंतरही अणुचाचणी करण्याचा भारताचा सार्वभौम अधिकार कायम राहील, असे पंतप्रधानांनी संसदेत नमूद केले होते; परंतु बुश यांनी अमेरिकी कॉंग्रेसच्या परराष्ट्र संबंधविषयक समितीला लिहिलेल्या पत्रात याच्या अगदी उलट भूमिका घेतली असून, भारताने अणुचाचणी केल्यास इंधनपुरवठा थांबविण्याचे त्यात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे, हाईड कायद्याच्या पालनाची बाबही त्यात मान्य केली असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळेच मनमोहनसिंग सरकार बचावाच्या पवित्र्यात आले.
सकाळ


'नॅनो' ऑक्‍टोबरमध्ये बाजारात आणणारच - टाटांचा निर्धार
"कितीही अडचणी आल्या, तरी ऑक्‍टोबर महिन्यात 'नॅनो' बाजारात आणण्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न करण्यात येतील," असा निर्धार टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी गुरुवारी (ता.४) येथे व्यक्त केला. सिंगूरमध्ये या प्रकल्पावरून वाद सुरू झाल्यानंतर टाटा यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. "सध्या सिंगूरमधील परिस्थिती तणावाची आहे, त्यामुळे त्या विषयी काहीच अंदाज या क्षणाला व्यक्त करता येणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. "छोट्या मोटारींच्या उत्पादन खर्चांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाहन उद्योगावर मोठा ताण येत आहे. मात्र, नॅनोची किंमत वाढविण्याचा आमचा विचार नाही," असेही त्यांनी नमूद केले. येत्या काळात भारतात छोट्या मोटारींची मागणी वाढतच जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला. "भारतीय बाजारात छोट्या आणि स्वस्त मोटारींची मागणी वाढत आहे. आपली पहिली मोटार घेण्याचे स्वप्न बघणाऱ्या हजारो भारतीयांचे स्वप्न यामुळे सत्यात येणार आहे", असे ते म्हणाले.
सकाळ



रिलायन्सचा पहिला मराठी चित्रपट
मुक्ता आर्टस्‌, वनमोअर थॉट, ए. बी. कॉर्प, झी टॉकिज या बिग बॅनर्सपाठोपाठ अनिल अंबानींची रिलायन्स ही कंपनीदेखील मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवण्यासाठी उतरत असल्यामुळे आता कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मोठे युद्ध रंगणार आहे. रिलायन्सचा पहिलावहिला मराठी चित्रपट समांतर जवळपास पूर्ण झाला असून तो यावर्षाखेरीस प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटापाठोपाठ रिलायन्स आणखी मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्यामुळे रसिकांना मनोरंजनाची एक उत्तम मेजवानी मिळणार आहे.
सकाळ

दि. ०४.०९.२००८[संपादन]

अणुकरारात बुश यांच्याकडून भारताची दिशाभूल?
अणुइंधन पुरवठा गटाच्या (एनएसजी) आज होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीच्या तोंडावर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी लिहिलेल्या गोपनीय पत्राच्या गौप्यस्फोटाने डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या पोटात भीतीचा गोळा उठला. अणुचाचणीचा भारताचा हक्क अबाधित नाही आणि अखंडित अणुइंधन पुरवठ्याचे अमेरिकेवर कोणतेही कायदेशीर बंधन नाही, असे बुश यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे हे पत्र नऊ महिने जुने असून ते डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार कोसळू नये, याकरिता चक्क दडवून ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, या पत्रातील तपशील डॉ. सिंग यांना माहीत होता की नाही, याबाबत ठोस समजू शकलेले नाही.
सकाळ



"इंटरनेट एक्‍सप्लोरर"चा आता "गूगल क्रोम"शी सामना
गूगल कॉर्पोरेशनने "क्रोम" हा नवा ब्राऊजर बुधवारी सर्वांसाठी उपलब्ध केला. इंटरनेटच्या माध्यमातून तो कोणालाही संगणकावर वापरता येणार आहे. ’गूगल गिअर’ची काही वैशिष्ट्ये यात समाविष्ट करण्यात आल्याने इंटरनेटवरील पाने सेव्ह करणे सोपे होणार आहे. नव्या ब्राऊजरच्या माध्यमातून गूगल आता मायक्रोसॉफ्टला टक्कर देऊ इच्छित आहे. जगभरातील एक तृतीयांश संगणकांवर सध्या मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्‍सप्लोरर हा ब्राऊजर वापरला जातो. मोझिला फायरफॉक्‍सचा वापर १८ टक्के संगणकांवर होतो. संगणकावरील विविध प्रणाली वापरण्यासाठी क्रोमचा फारसा उपयोग होणार नसल्याचा दावा मायक्रोसॉफ्टच्या अधिकार्‍यांनी केला आहे. गूगलला अर्थातच तो मान्य नाही.
सकाळ


भारताच्या अणुभट्ट्यांवर अमेरिकेचा डोळा
भारत सन २०१२ पर्यंत एक हजार मेगावॉटच्या आठ अणुभट्ट्या आयात करणार असून, त्यातील दोन अणुभट्ट्यांचे कंत्राट मिळाल्यास अणुउद्योगास चालना मिळण्याची अपेक्षा अमेरिकेला वाटत आहे. भारतातील अणुउद्योगाची बाजारपेठ वाढत असून, किमान दोन अणुभट्ट्यांचे कंत्राटे मिळाल्यास अमेरिकेच्या अणुउद्योगात तीन ते पाच हजार प्रत्यक्ष रोजगार व १० ते १५ हजार अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. अमेरिकेच्या कंपन्या सक्षम आहेत आणि भारतीय अणुउद्योगातील पायाभूत क्षेत्रात त्यांना प्रवेश मिळू शकतो, असेही परराष्ट्र खात्याने प्रतिनिधिगृहाच्या परराष्ट्रविषयक समितीला पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे. हे उत्तर ऑक्‍टोबरमध्ये पाठविण्यात आले असले, तरी ते बुधवारी खुले करण्यात आले. अणुऊर्जा करारावर अणुपुरवठादार देशांची बैठक होत असतानाच, ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरी अणुऊर्जा सहकार्यामुळे अमेरिकेला मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचेही त्यात म्हटले आहे.
सकाळ



पाकमध्ये घुसून अमेरिकेची कारवाई
पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांतात घुसून अमेरिकेने बुधवारी दहशतवाद्यांविरुद्ध प्रथमच लष्करी कारवाई केली. यात महिला व मुलांसहित २० जण ठार झाल्याचा दावा तेथील सरकारने केला आहे. अफगणिस्तानातील नाटोच्या फौजांनी मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत. वायव्य सरहद प्रांतात अल्‌ कायदातालिबानचे अतिरेकी सक्रिय असल्याने अफगणिस्तान व पाकिस्तानमध्ये त्यांच्याकडून हल्ले होत असल्याचे अमेरिका वारंवार म्हणत आहे. त्यातूनच अमेरिकी लष्कराने हा हल्ला केल्याचे मानले जाते.
सकाळ

दि. ०३.०९.२००८[संपादन]

अत्रामांची येरवडा तुरुंगात रवानगी
चिंकारा हरीण शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची ससून रुग्णालयातून आज रात्री येरवडा तुरुंगात रवानगी झाली. पुरंदर तालुक्‍यात १४ जून रोजी शिकार केल्याच्या आरोपावरून अत्राम यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अत्राम यांना ३० ऑगस्ट रोजी भोरमध्ये वन विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यानंतर सासवडच्या न्यायालयात त्यांना उपस्थित करण्यात आले होते. अत्राम यांनी केलेला जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता; परंतु रक्तदाब, हृदयविकार व मधुमेहाचा त्रास असल्यामुळे योग्य त्या उपचारांसाठी ससून रुग्णालयात ठेवावे, अशी विनंती अत्राम यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली होती. दोन दिवसांच्या वैद्यकीय उपचारांनंतर प्रकृती नियंत्रणात आल्यावर मंगळवारी सायंकाळी अत्राम यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, तरी पावसामुळे अत्राम सुमारे दोन तास रुग्णालयातच थांबले होते. पोलिस व वन विभागाच्या अधिकार्‍यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना येरवडा तुरुंगात पोचविल.तेथे कारागृह अधिकार्‍यांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांना रात्री उशिरा कोठडीत दाखल केले.
सकाळ


सिंगूर प्रकल्पातील काम थांबविले
सिंगूर येथील नॅनो मोटारीच्या उत्पादन प्रकल्पातील काम थांबविल्याची घोषणा टाटा मोटर्सने मंगळवारी केली. कंपनीने आपल्या अन्य प्रकल्पातून मोटारीचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. सध्याची स्थिती पाहता कंपनीने उत्पादनासाठी अन्य प्रकल्पांचा पर्याय स्वीकारला आहे, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सिंगूर प्रकल्पातील यंत्रसामग्री अन्य प्रकल्पांच्या ठिकाणी हलविण्याची योजना तयार करण्यात येत आहे, असे नमूद करून पत्रकात म्हटले आहे, "सिंगूर प्रकल्पस्थळी सुरू असलेला संघर्ष आणि तणाव यांमुळे प्रकल्पातील बांधकाम; तसेच उत्पादनाचा प्रस्तावित प्रारंभ थांबविणे कंपनीला भाग पडत आहे. कंपनीचे कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना कामावर येताना हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात येत आहे."
सकाळ



दिल्लीतील अपघात प्रकरणी संजीव नंदा दोषी
सुमारे नऊ वर्षांपूर्वी दिल्लीत गाडीखाली सहा जणांना चिरडल्याबद्दल उद्योगपती संजीव नंदा यांना दिल्ली न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरविले. नंदा यांना उद्या (बुधवारी) शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. गर्दीने खच्चून भरलेल्या न्यायालयात न्यायमूर्ती विनोद कुमार यांनी हा निकाल दिला. संजीव नंदा यांना दोषी ठरवितानाच या प्रकरणातील अन्य तिघांनाही न्यायालयाने दोषी ठरविले. यात उद्योगपती राजीव गुप्ता आणि भोला नाथ, श्‍यामसिंग या दोन कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. या तिघांनी मोटारीला लागलेले रक्त व मानवी अवयवाचे तुकडे धुवून पुरावा नष्ट केला, याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. अपघातप्रसंगी नंदा यांच्याबरोबर असलेला त्यांचा मित्र माणिक कपूर यांना मात्र न्यायालयाने मुक्त केले आहे. निकाल वाचून दाखविल्यानंतर न्यायालयाने नंदा यांच्यासहित दोषी ठरलेल्या सर्वांना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या व्हॅनमधून त्यांना तिहार तुरुंगात नेले.
सकाळ


अणुकराराला चीनच्या मुखपत्रात विरोध
चीन सरकारचे मुखपत्र समजल्या जाणार्‍या ’पीपल्स डेल’ने काल (ता. १) भारत-अमेरिका अणुकराराला विरोध दर्शविल्यामुळे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची आगामी भारत भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पीपल्स डेलीतील विश्‍लेषकाने केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे, की अणुकरार भौगोलिक- राजकीय दृष्टिकोनातून अथवा व्यापारी हितसंबंधातून असो, आंतरराष्ट्रीय (अण्वस्त्र) प्रसारबंदीला तो एक मोठा धक्का आहे. कराराचे भविष्य काहीही असले तरी अमेरिकेच्या प्रसारबंदीच्या धोरणाबाबतचा दुटप्पीपणा व दाव्याचा फोलपणा त्यातून दिसतो. चीनचे परराष्ट्रमंत्री यांग जेईची येत्या ७ सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत असून, ते पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याबरोबरही शिष्टमंडळस्तरावर वाटाघाटी होणार आहेत.
सकाळ



आणखी ऐंशी घरे कंधमालमध्ये जाळली
ओरिसातील अशांत कंधमाल जिल्ह्यातील जाळपोळ सुरूच असून, मंगळवारी हिंसक जमावाने ८० घरांना आगी लावल्या. राज्य सरकारने संचारबंदी एक दिवसासाठी शिथिल केली असून, पुनर्वसनाच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गृहसचिव टी. के. मिश्रा आणि पोलिस महासंचालक गोपालचंद्र नंदा यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पथकाने हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली.
सकाळ


राजकारण झाले पुरावरही स्वार!
बिहारमध्ये कोसी नदीच्या तांडवामुळे लाखो लोकांचे जीवन उद्‌ध्वस्त झाले असतानाही राजकीय नेत्यांची शाब्दिक चकमक मात्र सुरूच आहे. मुख्यमंत्री नीतिशकुमार व रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची दखल मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही घेतली आणि आपत्तीच्या या स्थितीत एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा सर्व पक्षांनी खांद्याला खांदा लावून काम करावे, असे आवाहन केले. बिहारमधील मधेपुरा, सुपौल, सहरसा, पूर्णिया आणि अररिया या जिल्ह्यांत पुराचे थैमान सुरूच आहे. लाखो लोकांपर्यंत अजूनही मदत व बचाव पथके पोचलेली नाहीत. सुरक्षितस्थळी पोचलेल्या पूरग्रस्तांचे अन्न-पाण्यावाचून हाल सुरू आहेत. चोर्‍या, वाटमारी आणि सर्पदंशासह अनेक संकटे पूरग्रस्तांच्या मागे हात धुवून लागली आहेत. या स्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी एकसंध यंत्रणा अजूनही सक्रिय झालेली नाही. राजकीय पक्षांतील अंतर्गत रस्सीखेच आणि वादावादीही याला कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.
सकाळ

दि. ०२.०९.२००८[संपादन]

सीमाप्रश्‍नी कर्नाटककडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान - आर. आर. पाटील
बेळगावमध्ये विधानसौध बांधणे, दुकाने, आस्थापनांवरील मराठी पाट्या बदलणे या कर्नाटक सरकारच्या कारवाया सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणार्‍या असल्याचे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. श्री. पाटील म्हणाले, "महाराष्ट्राने बेळगाववरील हक्क कायम सांगितला आहे. हा वाद दोन भाषिक राज्यांमधील आहे. न्यायालयात ही बाब प्रलंबित असताना तेथे जैसे थे परिस्थिती ठेवली पाहिजे. कर्नाटक सरकारची कृती न्यायालयीन संकेतांचे उल्लंघन करणारी आहे. विधानसभा किंवा महापालिका निवडणूक निकालांचा संबंध सीमाप्रश्‍नाशी जोडता कामा नये. त्या मुद्द्यावर या निवडणुका झाल्या नव्हत्या."
सकाळ


टॉप अप कार्डावरील प्रक्रिया शुल्क रद्द करा - ट्रायची सूचना
प्रीपेड कार्डावरील टॉप अप कार्डवर आकारले जाणारे प्रक्रिया शुल्क रद्द करण्याची सूचना दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सोमवारी मोबाईल सेवा पुरविणार्‍या कंपन्यांना केली. त्यामुळे ग्राहकांना टॉप अप कार्डवर संपूर्ण टॉक टाइम मिळणार आहे. प्रीपेडधारकांना टॉप अप कार्डवर दोन रुपयांपेक्षा प्रशासनिक शुल्क द्यावे लागणार नाही आणि अन्य कर लागू होणार नाहीत, असेही ट्रायने स्पष्ट केले आहे. टॉक टाइमची वैधता असणार्‍या ग्राहकांकडून अतिरिक्त टॉक टाइमवरील कार्डमधून कंपन्या निश्‍चित रक्कम कापत असल्याचे ट्रायच्या निदर्शनास आले. अशा प्रकारच्या ग्राहकांकडून आधीच निश्‍चित शुल्क आकारण्यात आलेले असते. त्यामुळे टॉप अप कार्डवर पुन्हा शुल्क आकारणे हे समर्थनीय नाही.
सकाळ

दि. ०१.०९.२००८[संपादन]

बिहारमध्ये कोसीचे तांडव सुरूच
नेपाळने कोसी नदीत अडीच लाख क्‍युसेक पाणी सोडल्याने बिहारमधील पूरस्थिती रविवारी आणखी बिकट झाली. यामुळे पुराची पातळी दोन फुटांनी वाढली असून, प्रवाहाच्या धारेलाही वेग आला आहे. राज्याच्या उत्तर भागातही पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा १६ जिल्ह्यांना फटका बसला आहे. पुरातील विविध दुर्घटनांत राज्यात आतापर्यंत शंभर लोकांचे बळी गेल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात हा आकडा काही हजारांत असावा, असे शहरांकडे धाव घेणार्‍या पूरग्रस्तांकडूनच सांगण्यात येत आहे
सकाळ


एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा सेवेतून बडतर्फ
सर्वच गुन्हेगारी टोळ्यांतील कुख्यात गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा ठपका ठेवून; तसेच ज्ञात स्रोतापेक्षा अधिक बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या आरोपावरून पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, या निलंबनाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रदीप शर्मा यांनी सांगितले.
सकाळ


अमरनाथ जमीन विवाद संपला
जम्मू- काश्‍मीर सरकार आणि अमरनाथ यात्रा संघर्ष समिती यांच्यात अमरनाथ जमीन विवादाबाबत समझोता झाल्याने गेले दोन महिने सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले आहे. या समझोत्यानुसार, बलताल येथील जवळपास ४० एकर जमीन अमरनाथ यात्रेच्या काळात अमरनाथ देवस्थान मंडळाला वापरासाठी विनाशुल्क देण्यात येणार आहे. सरकार आणि समिती यांच्यातील चर्चेदरम्यान काल (ता. ३०) रात्री अडीचला हा समझोता झाला आणि आज पहाटे त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.
[ सकाळ]

हे सुद्धा पहा[संपादन]