भूकंप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लाटा" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते.

भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.

नैसर्गिक रीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे. कॅलिफोर्नियातील सॅनफ्रान्सिको येथील १९०६ मधील भूकंप, १८९७ चा आसामचा भूकंप, १९३४ चा बिहारचा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रकारचे भूकंप होते.

दुसरे कारण : ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये हवाई बेटांमधल्या ’मौना लोआ’ ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी तेथे सतत सहा दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप होत होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात.


चिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भूकंपाची नोंद घेणाऱ्या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास 'होउफेंग डिडोंग यी' असे नाव होते.

भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.

३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते. भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी.

समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भूकंप प्रलयंकारी लाटा (त्सुनामी) निर्माण करू शकतो.

भूकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ-चकत्यांमधील घर्षण हे असले तरी खालील पैकी कोणत्याही कारणाने भूगर्भात हालचाल होऊ शकते आणि भूकंपसदृश धक्के बसू शकतात.


भूकंपमापनाचे 'रिश्टर' नावाचे परिमाण[संपादन]

वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांच्या परिणामांचे वर्णन खाली दिले आहे. या तक्त्याचा विशेष काळजीपूर्वक अभ्यास करावयास हवा. एखाद्या गावी जाणवणारी भूकंपाची तीव्रता व तदनुषंगाने होणारे दुष्परिणाम फक्त भूकंपाच्या महत्तेवरच अवलंबून नसून त्या गावाचे केंद्रबिंदूपासूनचे अंतर, भूकंपाच्या नाभीची भूकंपकेंद्रापासूनची जमिनीखालील खोली व गावाची आणि त्याच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती यांवरही अवलंबून असतात.(काही प्रदेश भूकंपाच्या संकेतांची(सिग्नल्स प्रतिदिन) तीव्रता वाढवतात.)[१]

’रिश्टर महत्ता’ वर्णन भूकंपाचे परिणाम होण्याची वारंवारता
२.० पेक्षा कमी सूक्ष्म सूक्ष्म, लक्षात येत नाही. जवळपास प्रतिदिन ८,०००.
२.० ते २.९ किरकोळ सामान्यतः लक्षात येत नाही.

.

जवळपास प्रतिदिन १,०००.
३.० ते ३.९ कधीकधीच लक्षात येतो, पण नुकसानकारक. ४९,००० दरवर्षी(अंदाजे)
४.० ते ४.९ हलका घरातील वस्तूंचे लक्षात येण्याजोगे हलणे, पण दिसण्यासारखे नुकसान नाही. ६,२०० दरवर्षी(अंदाजे)
५.० ते ५.९ मध्यम थोड्या क्षेत्रात अयोग्यरीत्या बांधलेल्या इमारतीस जास्त नुकसान; योग्यरीत्या डिझाईन केलेल्या इमारतीस अत्यल्प नुकसान. ८०० दरवर्षी(अंदाजे)
६.० ते ६.९ जोरदार रहिवासी क्षेत्रात नुकसान दरवर्षी(अंदाजे) १२०
७.०ते ७.९ बराच मोठा मोठ्या क्षेत्रात अत्याधिक नुकसान १८ दरवर्षी(अंदाजे)
८.० ते ८.९ मोठ्ठा सभोवतालच्या कितीतरी क्षेत्राच्या परिसरात अत्याधिक नुकसान दरवर्षी १
९.० ते ९.९ सभोवतालचे १६०० किलोमीटरातले क्षेत्र धराशायी २० वर्षातून एखादा
१०.०आणि + पूर्ण पृथ्वी अद्याप नोंद नाही. फारच दुर्लभ (माहीत नसलेला)

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.