दाभोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


  ?दाभोळ
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

१७° ३५′ १२.६२″ N, ७३° १०′ ३०.७६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर दापोली
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/दाभोळ महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. या गावच्या खाडीपलीकडे गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावी रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट प्रा.लि. (पूर्वीची दाभोळ पॉवर कंपनी) हा विद्युतनिर्मिती प्रकल्प आहे.


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.anjarlebeachketkibeach.com/html/tourismcenter_dabhol.htm येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते.

दापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना सड्यावरून खाली चिपळूणकडील येणारी वाशिष्ठी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळगड किल्ला व टाळकेश्वरच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारूती मंदिर, समुद्र किना-याला लागून वाढलेले सुरूचे दाट बन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड दिसतात. दाभोलच्या अलीकडील माडाच्या हिरव्यागार झावळयांचा गुच्छ करून वा-याच्या झुळकीने येणार्‍याचे स्वागत, आणि जाणारांना निरोप देताना दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ता ही शोभा अवर्णनीय असते. कोकणातल्या समुद्रकाठच्या कुठल्याही खेडयात साधारणत: असेच वातारण असते पण दाभोळच्या या पार्श्वभूमीला, प्रचंड घडामोडींच्या इतिहासाचा रक्तरंचित गूढ पडदा आहे.

इतिहास[संपादन]

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिद्ध बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीन काळी दालभ्यवती होती, महिकावती होती. नंतर ती हामजाबाद होती. मैमुनाबादही एक वेळ दाभोळचे नाव होते. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुलहिंद म्हणजे मक्केचा दरवाजा असेही म्हणतात.

इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्त्रे विणत असत. १९व्या शतका्पर्यंत इथला साळीवाडा गजबजलेला होता आणि धोटयांचा लयबद्ध ठोक्यांवर इथे सुंदर वस्त्रे विणली जात होती. शिवशाहीतील आरमारांत येथील भंडारी समाजाचे प्रभुत्व होते. या इतिहासाच्या खाणाखुणा येथील किनारपट्टीत, डोंगरांवर, सपाटीवर सर्वत्र दिसून येतात. दाभोळ गावात पडझड झालेल्या इमारती रस्तोरस्ती, डोंगरकपारीतून दिसतात.

राजवटी[संपादन]

तेराव्या शतकापर्यंतचा दाभोळचा इतिहास चौल, शिलाहार आणि अशाच हिंदू राजवटीचा इतिहास आहे. मात्र पश्चिम पट्टीवरील या सुरक्षित बंदराची माहिती परदेशीयांना झाली, आणि या बंदरात समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी, तुर्के, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहिली. तेराव्या शतकाच्या मध्यापासून तर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळपास ३०० वर्षांहून अधिक काळ मुसलमानी सत्तांचा अंमल दाभोळवर राहिला होता. त्यातील काहींनी इथल्या स्थानिक जनतेला त्रास दिला. तर काहींनी आपल्या सत्तेत आणि कारभारात येथील लोकांना सामावून घेऊन सुखाचा राज्यकारभार केला. येथील मुसलमान सत्तांना बाहेरच्या तुर्की, हबशी, शिया आदी मुसलमानांशी युद्धे करावी लागली आणि त्यामुळे दाभोळच्या बहुसंख्य भागात कबरीच कबरी जिकडेतिकडे बघायला मिळतात. त्यात पश्चिमेच्या बाजूला समुद्रकिनारी आणि डोंगरावर शिया मुसलमानांची असंख्य थडगी दिसतात. काळाच्या ओघात शिया मुसलमानांची इथे कत्तल झाली वा ते इथून गेले. शतकांच्या या प्रदीर्घ कालखंडात ज्यांनी चांगला कारभार केला, लढाईत जे शहीद झाले, त्याची गणना साधु-संतांत झाली, ते पीर झाले, त्यांचे दर्गे बांधण्यात आले. प्रतिवर्षी या पिरांचे भक्तगणांत हिंदू समाजही सामील आहे.

थडगी, पीर, दर्गे, मशिदी[संपादन]

दाभोळ परिसरातील देर्दे हद्दीत (बंदरातून नदीच्या दिशेली उंच टेकडीवर) असलेला अमीरुद्दीन बालापीर (बला म्हणजे उंच ठिकाण) हा हिंदु-मुसलमानांत विशेषत: दर्यावर्दी समाजात अत्यंत आदराचे स्थान असलेला पीर समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर आहे. दाभोळच्या गोडाऊनजवळ शेख फरीद, खडपकर वाडीसमोर खाडीत पानी पीर, बोरीबंदरात असलेला शहानवाल पीर, वणकर मोहल्ल्यातला कमालशाली पीर, दर्वेश यांच्या बागेतला हाजी सुलेमान पीर, हॉस्पीटलजवळचा कतलशेख पीर गावात आहेत. तर ओणनवसेच्या हद्दीवरचा खाजा खिजीर आणि वणौशीचे डोंगरावरचा जहॉंबाज पीर हे गावाच्या सरहद्दीवर आहेत. परंतु दाभोळ गावातला सर्वांत प्रसिद्ध पीर म्हणजे आझमखान पीर. या पीराला इ.स. १८७४ सालात ब्रिटीश सरकारने दिलेली १८ रूपयांची सनद आजही चालू असून या दर्ग्याचे पुजारी इनुस मुजावर यांना ती मिळते.

बालापीरला ही इ.स. १८७० पासून ३० रूपयांची सनद असून ती परंपरेने नवसे येथील मुजावर घराण्याला मिळते. आझमखान पीर हे ठिकाण दाभोळच्या मध्यभागी एका डोंगराच्या पायथ्याशी आहे. निसर्गाच्या कुशीतील अत्यंत शांत ठिकाणी झाडीमध्ये हा दर्गा आहे. याच्या आजूबाजूला असलेल्या लहान-मोठया असंख्य कबरी आणि तेथील नीरव शांतता गूढ वाटते व मन अंतर्मुख करते. विशेषत: आझमखानांच्या भव्य कबरीजवळ उभे राहिले की, इथे काही प्रचंड इतिहास घडला असावा. याचा सहज साक्षात्कार होतो. जुन्या हस्तालिखित आझामखान हिजरी 900 मध्ये म्हणजे इ.स.1494 मध्ये आल्याची नोंद आहे. त्यावेळी कोकणात नागोजीराव यांचे राज्य होते. नागोजीने रत्नागिरी पासून समुद्रात आणि जमिनीवर या परकीयांशी टक्कर दिली.

दाभोळला तुंबळ रणसंग्राम झाला. त्यात आझमखान मरण पावले. परंतु नागोजीचा पराभव झाला. त्या अगोदर (1348-1500) येथे बहामनी राजवटीत दाभोळचे नाव मुस्तफाबाद यांच्या मुलाने ते बदलून हामजाबाद असे ठेवले. येथील जंगल साफ केले आणि गाव नव्याने वसविले. सुधारणा केल्या, बाजार सुरू केला. आझमखान यांचे शिर तवसाळ येथे आहे व धड दाभोळला आहे. त्यांचा ऊरूस 27 रजाग (शबे मेराज) ला मोठया इतमामाने साजरा होतो या प्रसिद्ध पिरांशिवाय आणखी लहानसहान पीर आहेत. आता ऊरूस करण्याची प्रथा परिस्थितीनुरूप बंद पडत चालली आहे.

कुणी एखादा संबंधित इसम थोडाफार खर्च करून या शहीदांची याद करतो. पिरांच्या या दर्ग्याव्यतिरिक्त गावात अनेक मशिदी आहेत. दाभोळला ३६० मशिदी होत्या, अशी लोककथा सांगितली जाते. सध्या मात्र ढोरसई मोहल्ल्यातील फरमान चबुतरा, तांबडी मोहल्ल्याच्यी फत्ताह मशीद, वणकर मोहल्ल्यातील जामे मशीद व बामणे मोहल्ल्यातील मुनी मशीद एवढया चार मशिदींतच दैनंदिन नमाज व इतर कामकाज चालू आहे. दाभोळमध्ये फड बंदर हे सर्वांत जुने बंदर आहे तेथे काकाची जुनी मशीद प्रसिद्ध होती. त्या जागेवर आता ऊर्दू हायस्कूलची प्रचंड इमारत झाली आहे. खारवाडी जवळची अली मशीद ही एक जुनी प्रचंड पडीक मशीद आहे. इ.स. १६४९मध्ये औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा या जिल्ह्याचा सुभेदार पीर अहमद अब्दला याने बांधलेली जुम्मा मशीद ही भग्नावस्थेत आहे आणि तिसरी एक जुनी प्रचंड मशीद समुद्रकिनारी सादतअली यांच्या स्मरणार्थ १५५८मध्ये बांधलेली आहे. त्या ठिकाणी १८७५ साली लाकडावर कोरलेला मजकूर मिळालेला आहे. त्याच्या बाजूलाच ख्वाजा खिझरचा दर्गा आहे. या दोन्ही वास्तू शियापंथीय वाटतात. जामा मशिदीतील मिळालेला शिलालेख मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये आहे.

मॉंसाहेब मशीद[संपादन]

दाभोळच्या सर्व जुन्या वास्तूंमध्ये चांगल्या स्थितीमध्ये उभी असलेली भव्य मशीद म्हणजे दाभोळ धक्क्यावर उतरताच प्रवाशांचे लक्ष वेधून घेणरी मॉंसाहेबांची मशीद. एवढी भव्य, एवढी देखणी आणि अद्यापही चांगल्या स्थितीत असलेली मशीद निदान कोकणपट्टीत तरी दुसरी नाही. इतिहासकाळातील ही कला-सौंदर्याची आणि भव्यतेचा साक्षात्कार घडविणारी शिल्पाकृती दाभोळचे मोठे आकर्षण आहे. ७०X६० फूट लांबी-रूंदी असलेल्या इमारतीला चार मिनार आहेत आणि 75 फूटांचा भव्य घुमट आहे.

विजापूर येथील शाही जामा मशिदीची ती प्रतिकृती आहे. तिच्या उंच जोत्याला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. जोत्याच्या पोटातही काळी खोल्यांची रचना आहे. या मशिदीभोवती पूर्वी वाटोळा उंच तट होता. तो आता दिसत नाही. कंपाऊंडमध्ये संदर बगीचा होता आणि समोरच्या मोठया चौथ-याच्या मधोमध एक अप्रतिम कारंजे होते. कंपाऊंडमध्ये विहीरही होती. इतकेच नाही, तर मिनारावर सोन्याचा पत्राही होता.

या मशिदीचा जो इतिहास लिहिलेला आढळतो त्याप्रमाणे विजापूरची राजकन्या आयेषाबिबी (मॉंसाहेबं) सन १६५९मध्ये मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. परंतु हवामान ठीक नसल्याने तिचा पुढील प्रवास होऊ शकला नाही. तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार वगैरे फार मोठा लवाजवा होता व लाखो रूपयांची संपत्ती होती. प्रवास रद्द झाल्यावर काय करावे, अशा चिंतेत मॉंसाहेब असता बरोबर असलेल्या काझी व मौलवींनी सदर धन काही धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची तिला सूचना केली. तेव्हा तिने या मशिदीचे काम हाती घेतले व ते चार वर्षे चालू होते. या कामी पंधरा लाख रूपये खर्च आला. ती मशीद कामीलखान नावाच्या शिल्पकाराने बांधली. याला अंडा मशीद असेही म्हणतात. मात्र हे नाव का पडले याचे समर्पक कारण कळत नाही.

मक्केच्या प्रवासाठीचे बंदर[संपादन]

एके काळी दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला (हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसून जात होते, तर अरबस्तानातून अरबी घोडयांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्ग होता. आजही पंढरपूर-कर्‍हाड-चिपळूण-गुहागर रस्त्याचे नाव विजापूर-गुहागर असेच आहे. हा दाभोळ गाव जितक्या वेळी बरबाद झाला. तितक्या वेळी तो परत आबाद झाला. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अनेक प्रवाशांनी दाभोळला भेट देऊन तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत.

दाभोळमदील काही मंदिरे[संपादन]

चंडिकादेवी मंदिर[संपादन]

दापोली-दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडे पठारावर तीन किमी. अंतरावर डाव्या हाताला मुख्य रस्ता सोडून वसलेले चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू समजले जाणारे स्थान आहे. एकसंध दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळया पाषाणतील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. देवीला चार हात असून हातात तलवार, ढाल व इतर आयुधे आहेत. देवीच्या मूर्तीजवळच एक इतिहासकालीन तलवार असून ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, अशी येथील पुजार्‍यांची श्रद्धा आहे. चांदीच्या पत्र्याने मढवलेले गुहेचे तोंड लहान असून, आत वाकून जावे लागते. गुहेत उतरत्या वाटेवर पायऱ्या त्याच खडकात कोरलेल्या आहेत. त्यांवरून सुमारे पाच-सहा फूट अंतर आत चालत जावे लागते. ही वाट पूर्ण अंधारी आहे. या वाटेवर इतका काळोख आहे की पुढे कोणत्या दिशेला कसे जावे हे चटकन समजत नाही. परंतु डोके थोडे खाली वाकवून तसेच अंधारात अंदाजाने पुढे गेल्यावर देवीपुढच्या समईचा मंद प्रकाश दिसतो आणि हायसे वाटते. या ठिकाणी उजवीकडे वळल्यानंतर आपण देवीसमोर येतो. या देवीला फक्त तेलाच्या दिव्याच्या प्रकाश चालतो. इतर कोणत्याही प्रकारचा प्रराकाश किंवा कॅमेर्‍याचा फ्लॅश लाईट लावलेला चालत नाही, असे येथील पुजारी सांगतात. देवीच्या उजवीकडे अंधार्‍या जागी असलेले एक भुयार थेट काशीला (?) जाते असेही पूजारी मंडळी सांगतात. देवीचे मन प्रसन्न करणारे गूढगंभीर पण आश्वासक रूप पाहून पुढे वाकूनच जावे लागते. यावेळी आपला उजवा हात खडकाला स्पर्श करून पुढे जात देवीला प्रदिक्षणा पूर्ण झाली की आपण पुन्हा मूळ जागी येतो व तेथून डावीकडे वळून आल्या मार्गाने परत बाहेर पडता येते.

चंडिकादेवी मंदिर हे मंदिर अतिशय पुरातन असून याला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती असा उल्लेख इतिहासात असल्याचे समजते. दाभोळ जिंकल्यावर राजांनी पुढे अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली. या मोहिमेरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती. पुढील काळात मात्र हे स्थान लोकविस्मृतीत गेले. कालांतराने जमनापुरी नावाच्या दाभोळमधील साधकास देवीने स्वप्राप्त दृष्टांत दिला. त्यानुसार त्यांनी या गुहेचा शोध घेतला व अनेक वर्षे ते देवीची निस्सीम भक्ती व पूजाअर्चा करत राहिले. अखेरीस चंडिकामातेच्या समोरच ते समाधिस्थ झाले. गुहेतून बाहेर पडल्यावर समोरच्या दगडी चौथर्‍यावर त्यांची व त्यांच्याच कुळातील आणखी एका साधकाची समाधी आहे. पुरी घराण्याकडेच आजही देवीची पूजा, अभिषेक करण्याचे हक्क आहेत. या चौथर्‍यावर तुळशी वृंदावन व छोटी-छोटी शिवलिंगे दिसतात. येथून खाली पायऱ्या उतरून गेल्यावर बारमाही झुळूझुळू वाहणारा थंड पाण्याचा झरा आहे.

मंदिरपरिसराच्या बाहेर दिसणारे तटबंदीचे पडके अवशेष दाभोळच्या किल्ल्याचे आहेत. या किल्याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. इतर मंदिरापेक्षा वेगळे असे हे गूढरम्य स्थान आवर्जून पाहावे असे आहे.

दालभेश्वर मंदिर[संपादन]

हे स्थान पुरातन असून सध्याचे मंदिर मात्र पेशवेकालीन आहे. मूळ मंदिराला आता वरून पत्र्याचे उतरते छप्पर घतले आहे. दाभोळ गावातील इतिहासकालीन तळयापासून जांभ्या दगडातच खोदलेली पाखाडी (पायऱ्या) चढून गेल्यावर गावापासून थोडे उंचावर दाट झाडीत हे मंदिर लपलेले आहे. मंदिरात छोटासा सभामंडप असून, एका बाजूला गणपतीची मूर्ती आहे. चार पायऱ्या उतरून आत गेल्यावर महादेवाची रेखीव पिंड दिसते.या मंदिरासमोर दुसऱ्या एका मंदिराचे पुरातन अवशेष आढळतात. येथे मारूती व गरूडाची मूर्ती कोरलेली दिसते. शेजारीच एक गुहा असून दालभ्य ऋषीं येथे तपश्चर्या करत असत अशी आख्यायिका आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनाही इ.स. १६६१मध्ये इथे दर्शन घेतल्याचे इतिहास सांगतो.

दाभोळ बंदर[संपादन]

दाभोळ बंदर आजही गजबजलेले असते. तेथून मुख्यत: मच्छीमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणावर चालतो. येथे मिळणारे विविधि प्रकारचे मासे थेट मुंबई आणि परदेशात जातात. दिपसभराच्या प्रवासानंतर सायंकाळी बंदरावर पाहोचल्यावर तेथे चालणारी मच्छीमार बोटींची वर्दळ, त्यावरील कोळी-कोळीणी यांची लगबग हे सगह पाहण्यासारखं आहे. काहीजण समुद्रावरून मासेमारी करून परतलेले असतात तर कसही रात्रीच्या सफरीची तयारी करत असतात. खाडीतून बोटीने फेरफटका मारताना उंच डोंगराच्या पार्श्वभूमीवर नारळी-पोफळीच्या आडून डोकावणारे मिनार आणि चिंचोळया पट्टीतला दाभोळ गाव हे दृष्य मनमोहक दिसते.

वेगवेगळ्या प्रकारचे मासे टोपल्या भरभरून धक्क्यावर उतरत असतात. त्यांचे आकार, रंग, पाहून त्यांची नावे विचारण्याचे कुतूहल निर्माण होत. तेथेच माशांचा बाजार भरून लिलावाद्वारे त्यांची विक्रीही होते आणि ट्रकमध्ये बर्फात घालून ते रवाना केले जातात. या वेळी धक्क्यावर चालणारा कोळी-कोळीणी संवाद, बाजारभाव, माशांची प्रतवारी, त्यांची वाहतूक हे सारं पाहताना नाक दाबावं लागलं तरी या वेगळया विश्वात आपण रमून जातो.

बंदरावर उभे राहिल्यावर समोर दिसतात ती वेलदूर, धोपावे ही गावे. चिपळूणहून येणार्‍या या वाशिष्ठी नदीच्या खाडीच्या मुखाशी अंजनवेलचा किल्ल्यापर्यंत मोटार रस्ता आहे, तर अंजनवेल गावातून चढूनही वर जाता येते. रात्रीच्या वेळी येथील दीपगृहातील फिरता प्रकाशही नजरेस पडतो. डोंगरावर आधुनिकतेकडे नेण्यार्‍या बहुचर्चित एन्रॉनच्या लाल चिमण्याही दिसतात.

दाभोळ बंदरातून दर तासाला सुवर्णदुर्ग शिपिंग अ‍ॅन्ड मरीन सर्व्हिसेसद्वारे फेरीबोटीने पर्यटकांबरोबरच मोटार व मोठ्या बसेसचीही वाहतूक चालते. यामुळे आपण स्वतःच्या वाहनातून पलीकडच्या तीरावर जाऊन चिपळूण-गुहागर, वेळणेश्वर, हेदवी अशा पर्यटनस्थळांना भेटी देऊन सायंकाळीपर्यंत पुन्हा अंजर्ल्यास परतू शकतो. या फेरीबोटमुळे गणपतीपुळे, रत्नागिरी ही गावे जवळ आली आहे आहेत.

दाभोळवरील पुस्तके[संपादन]

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले