सारंगी
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
इतिहास
[संपादन]सारंगी हे उत्तर भारतीय संगीतातील प्रामुख्याने कमानदार गज किंवा धनुकली यांनी वाजविले जाणारे एक वाद्य आहे. हे वाद्य सतराव्या शतकाच्या मध्यात लोकसंगीतामध्ये साथीसाठी वाजविले जाणारे वाद्य म्हणून प्रसिद्ध होते. अजूनही त्याने स्वतःचा दर्जा राखला आहे. तसेच हार्मोनियमच्या साथीबरोबर हे वाद्य महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते.
या वाद्यामध्ये असणारी आवाजाची लवचिकता, अमर्याद सांगितिक शैली, विविध स्वरांची निर्मिती आणि भावनांतील सूक्ष्म फरक दाखविणारी छटा यांमुळे सारंगीला 'शतरंगी' असेही म्हणले जाते. सारंगीमध्ये भावनिक अभिव्यक्तीबरोबरच मानवी आवाजाचे स्वरभेद आणि टिंबर यांचे अनुकरण करण्याची गूढ क्षमता आहे. सर येहुदी मेनूद्दीन म्हणतात की, सारंगी ही विश्वासार्हता, उत्साह आणि भारतीय मूळ तंतुवाद्य एवढ्यापुरतीच मर्यादित राहत नसून, ती भारतीय भावनांचा आणि विचारांचा आदर्श नमुना सादर करते.
लोकसंगीतामधून आलेल्या सारंगीने अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकादरम्यान हिंदुस्थानी कला संगीतात प्रवेश केला. इतर उच्च प्रतीच्या वाद्यांबरोबर गीतकाराला साथ देण्यासाठी मधुर आवाजाच्या सारंगीला प्राधान्य दिले गेले. एकोणिसाव्या शतकात सितार आणि सरोद तुलनात्मकरित्या प्राथमिक अवस्थेत असताना सारंगीला उत्तर भारतात भरपूर प्रसिद्धी मिळाली. विसाव्या शतकापर्यंत सारंगीमध्ये फारसे तांत्रिक बदल झालेले दिसून येत नाहीत. त्याकाळी काढलेल्या चित्रांमध्ये सारंगीवादक हा गायक आणि नृत्य करणाऱ्या तरुणी यांच्या आजूबाजूला दिसत असे.
निर्माण
[संपादन]सारंगी हे वाद्य फणस, साग इत्यादी वृक्षांचे लाकूड पोखरून तयार करतात. सारंगीची लांबी सुमारे दोन फूट असते. तिच्या खालच्या बाजूला मंथान व वरच्या भागाला छाती किंवा गळा असे नाव आहे. सरोदप्रमाणे तिच्या खालच्या भागाला कातड्याचे वेष्टन असते. वरच्या पोकळ भागात प्रत्येक बाजूला दोन-दोन खुंट्या बसविलेल्या असतात. कमी अधिक जाडीच्या तीन तातीच्या तारा व एक पितळी तार अशा चार तारा आधारस्वरासाठी लावलेल्या असतात. काही वेळा चारही तारा तातीच्या असतात. प्राण्यांच्या शरीरातील आतड्यांपासून तातीच्या तारा बनवितात. सध्याच्या सारंगीत अनुध्वनीसाठी पंधरा ते वीस किंवा तीस ते चाळीस तारा मुख्य तारांच्या खाली लावलेल्या असतात. बाजूला बसविलेल्या लहान खुंट्यांना या तारा बांधलेल्या असतात. तारा पितळी व पोलादी असून रागाला अनुसरून त्या स्वर सप्तकात लावतात.
सारंगी वाजविण्यासाठी गजाचा वापर करतात. गजाला स्वच्छ केलेले घोड्याचे केस लावलेले असतात. हा गज पाश्चिमात्य व्हायोलिनच्या गजापेक्षा जाड असून त्यामुळे सारंगीच्या आवाजातील दर्जामध्ये भर पडते.
सारंगी हे वाद्य हकीम बकरात गौ या व्यक्तीने निर्माण केले, असे म्हणतात. तसेच ते मियाँ कल्लुखाँने तयार केले, असेही सांगतले जाते. शारंगदेवाने सारंगीचा उल्लेख केल्याचे पुराणात आढळते. नारायणाने १६ व्या शतकाच्या अखेरीस केलेले सारंगीचे वर्णन आजच्या सारंगीशी बरेचशे जुळणारे आहे. सारंगीच्या मध्यकालीन उल्लेखांवरून, हे मुळात लोकवाद्य असावे व नंतर योग्य त्या सुधारणा करून त्याचा अभिजात वाद्यांत समावेश केला गेला असावा, असे वाटते. हे मधूर वाद्य असून त्याचा मिंड कामासाठी विशेष उपयोग होतो. साथीसाठी तसेच स्वतंत्र वादनासाठी देखील याचा वापर करण्यात येतो.
बंदुखाँ, गुलाम साबिर, मिर्जा मेहमूद अली, राम नारायण, उस्ताद अब्दुल लतिफ खाँ, गुलाब अली खाँ, अब्दुल वहिद खाँ, अब्दुल करीम खाँ, अमीर खाँ, नियाज अहमद, फयाज अहमद खाँ, राजन व संजय मिश्रा, बादल खाँ, मास्टर सोहन, गोपाल मिश्रा आणि शकूर खान इत्यादी काही प्रसिद्ध सारंगीवादकांनी ही कला पुढील पिढीपर्यंत पोहोचवली.
कसे वाजवितात
[संपादन]सारंगी वाद्याचे स्वर आणि माधुर्य हे वाद्याची लांबी, तारांची जाडी व लांबी आणि खुंट्यांची जागा यांवर अवलंबून असते. या सर्वांमध्ये समतोल आणण्यासाठी उत्कृष्ट कौशल्याची आवश्यकता असते.
सारंगीच्या तीन स्वरतारा हाताच्या बोटांनी थांबविल्या जातात, असे म्हणतात. मात्र तारांचा आवाज नियंत्रित करण्यासाठी नखाच्या वरील कातड्याचा उपयोग केला जातो. क्रेटन लायरा आणि बल्गॉरियन गडुस्का या वाद्यांमध्ये नखाच्या वरच्या बाजुच्या कातड्याने तारा दाबल्या जातात. सारंगी वादन करताना बोटाच्या नखांना खाचा पडतात, असे असंवेदनशीलपणे आणि विस्मयजनकरित्या जगजाहीर केले गेले आहे. इतर वाद्यांशी तुलना करता एकोणिसाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर आणि आधुनिक संगीत जलस्यांच्या व्यासपीठावर सारंगी आपले वैशिष्ट्य दाखवू शकली नाही. वाद्यामध्ये आवश्यक असणारा विविध वैशिष्ट्यांचा समावेश सारंगीमध्ये आढळला नाही. त्यामुळे तिचे महत्त्व दिवसेंदिवस कमी झाले. सारंगी फक्त साथ देण्यासाठी वापरली जाऊ लागली.
एकलवादन (सोलोवादन)
[संपादन]सारंगीचे एकलवादन करणे खूपच जिकीरीचे असते. सारंगीवादक आणि तबलावादक हे गीत आणि नृत्य यांना साथ देताना एकाच गुणवत्तेचे होते. पण सरोद आणि सितार यांच्या साथीत तबल्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळेच तबल्यावर जास्त भर दिला जाऊ लागला. सारंगीवादन हे सामान्य न राहता ते उच्चवर्गियांच्या जगाशी संबंधित राहू लागले.
कला टिकविण्याचे प्रयत्न
[संपादन]सरकारने गीतकारांसाठी व कला संगीताच्या उत्क्रांती व संवर्धनासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. काही नशिबाने व काही बुद्धिमत्ता व कौशल्य यांच्या जीवावर 'आकाशवाणी'वर वादक म्हणून काम करु लागले. ज्यांना नोकरी मिळाली नाही, अशा लोकांनी नंतर सारंगीवादन सोडून दिले व उपजीविकेसाठी इतर वाद्यांचा आधार घेतला. आता वंशपरंपरेने घराणी चालताना दिसत नाहीत. सारंगीवादक आपली कला आपल्या मुलांना शिकवताना दिसत नाहीत. मध्यमवर्गिय शिक्षित मुले छंद किंवा कारकीर्द म्हणून याकडे पाहतात. सारंगीवादन करणाऱ्या संगीतकारांनी नवीन लोकांना वादन शिकविण्यासाठी विविध संगीत संस्था सुरू केल्या आहेत. अशा पद्धतीने सारंगीचे अस्तित्त्व टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही दिसते.
संदर्भ
[संपादन]
बाह्य दुवे
[संपादन]- Resham Firiri A popular Nepali folk music with a Sarangi and madal.
- Nicolas Magriel's Sarangi Site most informative, a veritable treasure of information and archives
- sarangi.info – downloadable sarangi and vocal music, including the integral of two important books, The Voice of the Sarangi, Joep Bor; The Sarangi, by Ram Narayan and Neil Sorrell
- The Sarangi – This article on sarangis includes pictures of an exquisitely crafted sarangi by Paul Martin.
- Sadarang Archives Archived 2010-09-16 at the Wayback Machine. Gallery of Pakistani sarangi players
- Nepali Sarangi Video from YouTube
Three historic sarangi from The Metropolitan Museum of Art