सौदागर नागनाथ गोरे
सौदागर नागनाथ गोरे | |
---|---|
सौदागर नागनाथ गोरे | |
उपाख्य | छोटा गंधर्व |
आयुष्य | |
जन्म | १० मार्च १९१८ [महाशिवरात्र ] |
जन्म स्थान | भाडळे,कोरेगाव, सातारा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | ३१ डिसेंबर १९९७ |
मृत्यू स्थान | पुणे |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
आई | सत्यभामाबाई नागनाथ गोरे |
वडील | नागनाथ विठोबा गोरे |
अपत्ये | सुलभा सौदागर गोरे |
संगीत साधना | |
गुरू | शेंदे खान (आग्रा घराणे) उस्ताद भुर्जी खान (जयपूर घराणे) |
गायन प्रकार | मराठी नाट्यसंगीत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
सौदागर नागनाथ गोरे, ऊर्फ छोटा गंधर्व, (१० मार्च, इ.स. १९१८ - ३१ डिसेंबर, इ.स. १९९७) हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती.
अल्प परिचय
[संपादन]सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील भाडळे (415021) या गावी १० मार्च, इ.स. १९१८ रोजी, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी झाला. जन्मतःच त्यांना एक दात होता. खेडेगावात ही गोष्ट खूप अशुभ मानली गेली. त्यावेळी सौदागरांच्या मामाने त्यावेळच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले. शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार आहे. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.
कोरेगावमध्ये मराठी तिसरीपर्यंतच सौदागरांचे शिक्षण झाले. शाळेत कॊणी पाहुणा येणार असेल तर ईशस्तवन व स्वागतपद्य म्हणण्यासाठी सौदागरांना सांगितले जाई. शाळेला भेट देणाऱ्या दामूअण्णा जोशी यांनी या रत्नास अचूक हेरले आणि सौदागरांचे वडील नागनाथ गोरे यांच्याकडे या मुलाची मागणी केली. सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामूअण्णा पुण्याला आले. आणि सौदागरांचे संगीत शिक्षण सुरू झाले. त्यांना नाट्यगीते शिकवण्यासाठी बळवंत गोवित्रीकर यांना बोलावण्यात आले. दत्तूबुवा बागलकोटकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. यानंतर नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये यांनीही सौदागरांना गायनाचे शिक्षण दिले. टप्पा आणि ठुमरीचेही शिक्षण दिले.
प्र.के. अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकात सौदागरामची स्त्री-भूमिका होती. त्यानंतर घराबाहेर या नाटकात सुरुवातीला स्त्रीभूमिका आणि मग पुरुष भूमिका होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला[१]. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला[२]. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. देवमाणूस या नाटकातील पदांच्या चाली छोटा गंधर्व यांच्या होत्या.
छोट्या गंधर्वांना १९५० साली अभिजात संगीत नाटकांमधून कृष्णाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेने इतिहास घडविला. त्यानंतर मानापमानमधे धैर्यधर या पहिल्या अंकातील शूर वीर आणि नंतरचा प्रेमात पडलेला धैर्यधर या भूमिका छोटा गंधर्व इतक्या सुंदर करायचे की प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घ्यायचेच बाकी ठेवले होते.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुणरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत[३].
इ.स. १९६३मधे त्यांनी काही कलाकारांसह छोट्या गंधर्वांनी 'कलाविकास' (छोटा गंधर्व कन्सर्न) ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.
आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.
वयाची पासष्ठी उलटलेल्या या स्वरमहर्षीला १९८४ मध्ये, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा सौदागरांचा दिनक्रम सुरू राहिला. संगीतावरील जुन्या ग्रंथांचे वाचन, ज्योतिष तसेच आध्यात्म्याचा अभ्यास व क्रिकेटसारख्या छंदांसोबत ते 'दुसरे बालपण' जगत होते. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोट्या गंधर्व यांचे निधन झाले.
संगीत नाटकांतील वाटचाल
[संपादन]संगीत सौभद्रातील तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ'मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
छोटा गंधर्व यांनी भूमिका केलेली नाटके आणि त्यांतील भूमिका
[संपादन]- उद्याचा संसार (शेखर)
- कर्दनकाळ (नायिकेची स्त्रीभूमिका)
- घराबाहेर (पद्मनाभ)
- देवमाणूस (अण्णा व अनिल)
- पराचा कावळा (कल्याण)
- प्राणप्रतिष्ठा (वारणेची स्त्रीभूमिका)
- फुलपाखरे (नाटकाचा नायक)
- भावबंधन (प्रभाकर)
- भ्रमाचा भोपळा (अरविंद)
- मानापमान (धैर्यधर)
- माझा देश (शेवंता-स्त्रीभूमिका)
- मृच्छकटिक (चारुदत्त)
- लग्नाची बेडी (पराग)
- विद्याहरण (कच)
- शारदा (कोदंड)
- संशय कल्लोळ (अश्विनशेठ आणि रेवती-स्त्रीभूमिका)
- साष्टांग नमस्कार (त्रिपुरी-स्त्रीभूमिका)
- सुवर्णतुला (नारद)
- सौभद्र (कृष्ण)
- स्वर्गावर स्वारी (मीनाक्षी-स्त्रीभूमिका)
- सौभाग्यलक्ष्मी (?)
गाजलेली पदे (नाटक)
[संपादन]- आनंदे नटती (मृच्छकटिक)
- उजळित जग मंगलमय (सुवर्णतुला)
- कोण तुजसंग सांग गुरूराया (सौभद्र)
- चंद्रिका ही जणू (मानापमान)
- चांद माझा हा हासरा (देवमाणूस)
- छळि जीवा दैवगती (देवमाणूस)
- तू माझी माउली (तुकारामाचा अभंग)
- दिलरुबा दिलाचा हा(देवमाणूस)
- दे हाता शरणागता (मानापमान)
- नच सुंदरी करु कोपा (सौभद्र)
- प्रभु अजि गमला (एकच प्याला)
- प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि (सौभद्र)
- बघुनी वाटे त्या नील पयोदाते (मृच्छकटिक)
- बहुत दिन नच भेटलो (सौभद्र)
- मधुकर वनवन (विद्याहरण)
- मधुमधुरा (विद्याहरण)
- माता दिसली समरी विहरत (मानापमान)
- या नव नवल नयनोत्सवा (मानापमान)
- रजनिनाथ हा नभी उगवला (मृच्छकटिक)
हे सुद्धा पहा : छोटा गंधर्व याची ”आठवणीतली गाणी"
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "छोटा गंधर्व डेड (छोटा गंधर्व वारले) : छोटा गंधर्व ह्यांच्या निधनाचे वृत्त" (इंग्लिश भाषेत). ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "राग मफिन: छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख" (इंग्लिश भाषेत). २५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "स्मरण अखेरच्या गंधर्वाचं...: छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख".[permanent dead link]