मास्टर कृष्णराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर या पानावरून पुनर्निर्देशित)
मास्टर कृष्णराव
टोपणनावे मास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर / मास्तर
आयुष्य
जन्म जानेवारी २०, १८९८
जन्म स्थान आळंदी, पुणे, भारत
मृत्यू ऑक्टोबर २०, १९७४
मृत्यू स्थान पुणे, भारत
मृत्यूचे कारण वृद्धापकाळ
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव फुलंब्री, औरंगाबाद महाराष्ट्र
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई मथुरा
वडील गणेशपंत
जोडीदार राधाबाई
अपत्ये तीन
संगीत साधना
गुरू पं. भास्करबुवा बखले
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
घराणे आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर-अत्रौली
संगीत कारकीर्द
कार्य शास्त्रीय गायक, संगीत नाटक गायक नट, चित्रपट नट, संगीतकार, बंदीशकार
पेशा गायक
कार्य संस्था पुणे भारत गायन समाज
विशेष कार्य पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन, सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते, स्वतंत्र संगीतरचना, अनवट राग, जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्याकरिता प्रखर सांगीतिक लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार बुद्धवंदना भारतात सर्वप्रथम संगीतबद्ध केली.
कारकिर्दीचा काळ सन १९११ ते १९७४
गौरव
विशेष उपाधी संगीतकलानिधि
गौरव संगीत नाटक अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णूदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक
पुरस्कार पद्मभूषण
बाह्य दुवे
[www.masterkrishnarao.com संकेतस्थळ]

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित) (जानेवारी २०, १८९८ - ऑक्टोबर २०, १९७४) हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते पट्टशिष्य होते.

पूर्वायुष्य[संपादन]

मास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात देवाची आळंदी येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या अकाली निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत लहानग्या कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' या नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळीच्या नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्व आणि ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. इ.स. १९११ मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाई गंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते.

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

गुरुवर्य बखलेबुवांच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी १९१६ साली गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.

१९२२ साली झालेल्या गुरुवर्य बखलेबुवांच्या निधनानंतर गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'नंदकुमार', 'विधीलिखित','अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुवर्य भास्करबुवा बखले यांच्या निर्वाणानंतर गुरुस्थानी मानायचे.

नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीताच्या वळणाने जाणारी गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली.

मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहॉं', 'गोपालकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी','लाखारानी' यांसारख्या प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या चित्रपटांतील व इतर संस्थांतर्फे निर्माण केलेल्या चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तिचा मळा' व 'मेरी अमानत'या चित्रपटांत भूमिकाही केल्या. त्यांनी भक्तिचा मळा या राजकमलने निर्माण केलेल्या चित्रपटात पडद्यावर संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली, त्या चित्रपटास संगीत दिले व संत सावता महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनय करते वेळी गायन देखील केले. या चित्रपटाची 'माली' ही हिंदी आवृत्तीदेखील राजकमलने निर्माण करून भारतभर प्रदर्शित केली. यात देखील कृष्णरावांनी संत सावता माळी ही प्रमुख भूमिका साकारली तसेच चित्रपटास संगीत दिले आणि प्रमुख भूमिकेतून गीतांचे गायनदेखील केले. मास्टर कृष्णरावांनी मेरी अमानत या हिंदी चित्रपटात शाळा मास्तरची भूमिका केली व गायन केले.

संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी संगीत दिलेले 'झिंझोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ.स. १९४० ते इ.स. १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे.

'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् गीताला विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेतली व घटना समितीच्या सर्व सदस्यांसमोर संसदेत प्रात्यक्षिके सादर करून त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. पं.नेहरूंनी आधीच 'जन गण मन ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे निदान राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था,जाहीर सभा-संमेलने वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन पाली भाषेचा अभ्यास केला होता.ही ध्वनिमुद्रिका १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमधील धर्मांतरण सोहळ्यात वाजवली गेली.

पुणे आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली.

पुणे येथे ऑक्टोबर २०, इ.स. १९७४ रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात.

मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, ए.पी. नारायणगांवकर, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ. पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन. करकरे, शिवराम गाडगीळ, बळवंत दीक्षित, राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, वसंत तुळजापूरकर, इंदिराबाई केळकर, रामभाऊ भावे, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैंकी काही शिष्य होत.

सन्मान व पुरस्कार[संपादन]

  • करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे हस्ते 'संगीतकलानिधि' ही पदवी प्रदान
  • देवासच्या महाराजांनी 'राजगंधर्व' पदवी प्रदान करून गौरवले.
  • पद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप
  • बालगंधर्व सुवर्ण पदक
  • विष्णूदास भावे सुवर्ण पदक
  • पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे.
  • जालना येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.
  • पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते.
  • मसाप तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]