नांदेड जिल्हा
नांदेड जिल्हा (नांदेड जिल्हा) | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | छत्रपती संभाजीनगर |
मुख्यालय | नांदेड |
तालुके | अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, नायगाव, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, लोहा, हदगाव, हिमायतनगर |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १०,४२२ चौरस किमी (४,०२४ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ३३,५६,५६६ (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३२२ प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ७६.९४ |
-लिंग गुणोत्तर | १.०६ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | अभिजित राजेंद्र राऊत (भाप्रसे) |
-लोकसभा मतदारसंघ | नांदेड, हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)(काही भाग) |
-खासदार | रविंद्र वसंतराव चव्हाण(२०२४-लोकसभा) |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ९५४ मिलीमीटर (३७.६ इंच) |
संकेतस्थळ |
सांख्यिकी तपशील | |
---|---|
जिल्हा परिषद | नांदेड जिल्हा परिषद |
पंचायत समिती (१६) | १. नांदेड २. मुखेड ३. माहूर ४. कंधार ५. बिलोली ६. उमरी ७. देगलूर ८. नायगांव ९. धर्माबाद १०. मुदखेड ११. लोहा १२. भोकर १३. हदगांव १४. अर्धापूर १५. किनवट १६. हिमायतनगर |
विधानसभा मतदारसंघ (९) | १. नांदेड(दक्षिण) २. नांदेड (उत्तर) ३. नायगांव ४. मुखेड ५. लोहा ६. देगलूर ७. हदगांव ८. किनवट ९. भोकर |
उपविभागीय कार्यालये (८) | १. नांदेड २. भोकर ३. किनवट ४. देगलूर ५. धर्माबाद ६. कंधार ७. हदगांव ८. बिलोली |
महानगर पालिका | नांदेड-वाघाळा शहर मनपा |
नगर परिषदा (१२) | १. कुंडलवाडी २. भोकर ३. उमरी ४. किनवट ५. हदगांव ६. देगलूर ७. मुदखेड ८. धर्माबाद ९. बिलोली १०. कंधार ११. लोहा १२. मुखेड |
नगर पंचायत (४) | १) अर्धापूर २) माहूर ३) नायगांव ४) हिमायतनगर |
टंचाई ग्रस्त तहसील | ४ (किनवट, अर्धापूर, मुखेड व हदगांव) |
ऐतिहासिक पार्श्वभूमी
[संपादन]नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. नांदेड हा मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे. नांदेड शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरू गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे . गुरू गोविंद सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर गुरुद्वारा बांधण्यात आला. गुरुद्वारा हा हजूर साहिबचा भाग आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरूगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.
सामाजिक व धार्मिक जडणघडण
[संपादन]नांदेड जिल्ह्यात विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहे. हे शहर व्यापारी पेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख या धर्मातील लोकांची संख्या अधिक असून जैन व पारशी धर्मातील लोकांची संख्या जेमतेम (नगण्य) आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या नाभीस्थळी वसलेले आहे. यामुळे हे शहर धार्मिक क्षेत्रही आहे. शहरात नृसिंहाचे मंदिर आहे. शिखांचे दहावे गुरू श्रीगुरू गोविंदसिंघजी यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. शिवाय जिल्ह्यातील माहूर या तालुक्याच्या ठिकाणी रेणूका मातेचे मंदिर आहे. माहूर किल्ला परिसरात लेण्या आहेत. कंधार येथे प्राचीन भूईकोट किल्ला, हजार वर्षापूर्वी बांधलेला "जगतूंग सागर" साठवण तलाव आहे. त्याठिकाणी दोन दर्गाही आहेत. दरवर्षी कंधारचा 'उरुस' या नावाने फार जत्रा भरते. लोहा तालुक्यात माळेगाव येथे मल्हारी म्हाळसाकांताचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी याही ठिकाणी फार मोठी जत्रा भरते. माळेगाव तालुक्यातील भगवान खंडोबाला समर्पित माळेगाव यात्रा ही भारतातील सर्वात मोठी मानली जाते. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून या जत्रेचे आकर्षण असते. बिलोली या तालुक्याच्या ठिकणी जुने मस्जिदीवरील कोरीव कला व दगडी पुंगराचे कोरीव काम प्रेक्षणीय आहे. हदगाव जिल्ह्यातील केदारगुडा मंदिर हे देवराई (देवाला समर्पित जंगल) साठी ओळखले जाणारे भगवान केदारनाथ यांना समर्पित आहे. देगलूर ( होट्टल ) येथील सिद्धेश्र्वराचे मंदिर, धुंडा महाराज देगलूरकराची वारकरी संप्रादायाची ध्वजा हे प्रसिद्ध आहे. नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड धबधबा, किनवट तालुक्यातील उनकेश्वर गावात शिवमंदिर आहे. उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. अशा रितीने सामाजिक व धार्मिक गौरवशाली परंपरा नांदेड जिल्ह्यास लाभलेली आहे.[१]
प्रशासन
[संपादन]जिल्ह्याचे ग्रामीण प्रशासन जिल्हा परिषदेच्या मार्फत चालते.
राजकारण
[संपादन]जिल्ह्यात नांदेड लोकसभा मतदारसंघ स्वतंत्र आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत उत्तर नांदेड, दक्षिण नांदेड, देगलूर, भोकर, नायगाव, मुखेड, माहूर- किनवट व कंधार हे विधानसभा मतदार संघ येतात. नांदेड जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा मतदार संघ आहेत. नांदेड जिल्ह्याने आजपर्यंत देशातील राजकीय नेतृत्व घडविलेले आहे. कै. शंकरराव चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. त्यांचे सुपुत्र मा. अशोकराव चव्हाण यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. सध्या राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी केंद्रात तर कै. शामराव कदम, कै. बाजीराव शिंदे, मा. गंगाधरराव कुंटूरकर, मा.डॉ.माधवराव किन्हाळकर, कै. डि.बी.पाटिल, मा. डी.पी. सावंत यांनी राज्यमंत्री म्हणून पदे भूषविली आहेत .
- विक्रमी ७ वेळा कंधारचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे शेकापचे डॉ. केशवराव धोंडगे अशाप्रकारे राजकीय नेतृत्व या नांदेड जिल्ह्याने तयार केलेले आहे.
- २०२४ मध्ये श्री. वसंतराव चव्हाण हे जिल्ह्याचे खासदार आहेत
नांदेड जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
[संपादन]नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१ च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात तसेच मराठवाडा विभागाचा पूर्व भाग, जो औरंगाबाद विभागाशी संबंधित आहे. नांदेडच्या उत्तरेला विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याने, नैऋत्येला लातूर, पश्चिमेला परभणी आणि हिंगोली जिल्ह्याने वेढलेले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, आसना, मन्याड व पैनगंगा. नांदेड हे नाव श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून उगम पावले असल्याचे सांगण्यात येते.
उपविभाग व तालुके
[संपादन]अर्धापूर | उमरी | कंधार | किनवट |
देगलूर | माहूर | नांदेड | नायगाव |
धर्माबाद | बिलोली | भोकर | हदगाव |
मुदखेड | मुखेड | लोहा | हिमायतनगर |
- नांदेड उपविभाग:अर्धापूर, लोहा, मुदखेड, धर्माबाद व नांदेड
- भोकर उपविभाग: उमरी, हदगांव, भोकर व हिमायतनगर
- देगलूर उपविभाग: बिलोली, नायगांव, देगलूर व
- किनवट उपविभाग: किनवट, माहूर
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
[संपादन]धार्मिक स्थळे
- होट्टल: सिद्धेश्वर मंदीर व इतर मंदिर समुह (होट्टल तालुका-देगलूर)
- मुखेड येथील शिवमंदिर
- तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब: श्री. गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, रामायणात नांदेडचा उल्लेख भारतमाता जिथून आला होता, त्या ठिकाणाचा उल्लेख आहे.
- माहूर: माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), माहूरची पांडवलेणी & येथील रामगड किल्ला हा पुरातन काळातील प्रमुख किल्ला होता,
- माळेगाव: यात्रा दरवर्षी भरते, खंडोबा देवस्थान आहे
- अर्धापूर: येथील केशवराज मंदिर, १०० फूटी मजार
- पाचलेगांवकर महाराज आश्रम
निसर्ग पर्यटनस्थळे
- सहस्रकुंड धबधबा: हिमायतनगर तालुका नयनरम्य ठिकाण
- उनकेश्वर: किनवट तालुक्यात असलेले गरम पाण्याचे झऱ्यासाठी प्रसिद्ध (Winter Sprinkle)
ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे
- माहूरची पांडवलेणी: येथील रामगड किल्ला हा पुरातन काळातील प्रमुख किल्ला होता
- नांदेडचा किल्ला
- कंधार किल्ला: कंधारचा भुईकोट किल्ला व गुराखी साहित्य संमेलन
शैक्षणिक स्थिती
[संपादन]नांदेड जिल्हा हा शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. १९५८ मध्ये औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. १९८४ पासून नांदेड येथे औरंगबाद विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यरत होते. १७ सप्टेंबर १९९४ रोजी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे असून या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चार जिल्ह्याचे आहे. विद्यापीठ कक्षेत सध्या १८२ महाविद्यालये कार्यरत आहेत.[२]
संलग्न जिल्हासिमा
[संपादन]नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोऱ्यात आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे.
- तेलंगणा: आदिलाबाद,कामारेड्डी, निर्मल व निझामाबाद &
- कर्नाटक: बिदर,
तसेच यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. नांदेड जिल्हा महाराष्ट्राला (आग्नेय दिशेच्या बाजूने) कर्नाटक व तेलंगाणा या राज्यांशी जोडतो.
प्रमुख नद्या व उपनद्या
[संपादन]जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून जिल्ह्याच्या दक्षिण- नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागातून गोदावरी नदी वाहते, हा प्रदेश सपाट व सुपीक आहे. पूर्णा, मांजरा, मन्याड, लेंडी ह्या तीच्या ऊपनद्या आहेत. किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामुख्याने सागाची व बांबूची वने आढळतात.