Jump to content

शेतकरी कामगार पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेतकरी कामगार पक्षाचे चिन्ह
शेतकरी कामगार पक्षाचे चिन्ह

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा एक महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे.

आमदार भाई जयंत पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेवर सलग ३ वेळा निवडून गेले आहेत, तर पक्षाचे आमदार भाई बाळाराम पाटील हेही कोकण शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेत गेले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख(सांगोला), भाई विवेक पाटील (पनवेल-उरण), सुभाष पाटील(अलिबाग), भाई धैर्यशील पाटील (पेण) हे विधानसभेचे आमदार आहेत. भाई गणपतराव देशमुख हे केव्हापासूनतरी ५० वर्षे पक्षाचे काम करत आहेत, ते १९६२ पासून (केव्हापर्यंत?) विधानसभेवर निवडून येत आहेत. रायगड जिल्हा परिषदेवर शेकापचेच वर्चस्व गेली (केव्हापासून?) अनेक वर्षे आहे

२०१७ साली, महाराष्ट्रामध्ये पक्षाचे ४ विधानसभा सदस्य, १ विधान परिषद सदस्य आहेत. तसेच रायगड जिल्हा परिषद तसेच पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समितीवर शेकापची सत्ता आहे. रायगडसह नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर या ५ जिल्हा परिषदांमध्ये पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत.अलिबाग, काटोल,बिलोली, इत्यादी नगरपरिषद शेकापच्या वर्चस्वाखाली आहेत, तसेच खोपोली, पनवेलमध्ये पक्षाचे नगरसेवक आहेत. (२०२०ची स्थिती?)

शेकापच्या जन्माची पार्श्वभूमी

[संपादन]

सन १९४६ च्या सप्टेंबर महिन्याच्या काळात काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यां सहकाऱ्यांना शंकरराव शांताराम मोरे यांनी आपली खंत बोलून दाखविली. ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाने जनतेला वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांना आणि निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांना हरताळ फासलेला आहे. काँग्रेस सरकार हे भांडवलदारांचे हित पाहणारे आणि शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेच्या विरोधात काम करत आहे. यामुळे आपणास वेगळा मार्ग निवडावा लागेल.” उपरोक्त खंत व्यक्त केल्यानंतर प्रत्यक्षात ११-९-१९४६ रोजी शंकरराव मोरे यांनी त्यांचे सहकारी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे व इतर काही आमदारांच्या मदतीने ‘शेतकरी-कामकारी संघ’ स्थापन केला. या संघाच्या स्थापनेनंतर मोरे यांच्या काँग्रेसमधील विरोधकांनी टीकास्त्र सोडले. त्यावेळेस ‘नवयुग’ सारख्या साप्ताहिकांमधून शंकरराव मोरे यांनी आपल्या लेखणीने त्यांना चोख उत्तर दिले. यानंतर दिनांक ११-१-१९४७ रोजी मुंबईतील फणसवाडी येथील शंकरराव मोरे यांच्या बंगल्यात पुनश्च एकदा काँग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक बोलावण्यास आली. सदर बैठकीत महाराष्ट्राचे उदगाते यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम “शेतकरी-कामकरी पक्ष” स्थापनेस प्रखर विरोध केला होता, या विरोधाने खचून न जाता पुण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी केशवराव जेधे, औटे, मोहिते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करून शंकररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामकरी’ ऐवजी नवा ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा मुहूर्त नारळ फोडला. परिणामे ३ ऑगस्ट १९४७ रोजी आळंदी मुक्कामी शंकरराव मोरे यांनी निवडक कार्यकर्त्यांना बोलावून ऐतिहासिक बैठक घेतली. याच बैठकीत आजचा ‘शेतकरी कामगार पक्ष’ महाराष्ट्रात जन्मास आला.

शेतकरी कामगार पक्षाची प्रारंभिक कार्ये

[संपादन]

या पक्षाला प्रारंभापासूनच शास्त्रीय समाजसत्तावादाची वैचारिक बैठक देऊन शंकरराव मोरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना या पक्षाच्या झेंड्याखाली खेचून आणले. शंकररावांच्या सार्वजनिक जीवनातील तिसऱ्या व सर्वात तेजस्वी कालखंडाला शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनच सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाची धोरणे सर्वांना समजावी म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक भक्कम करण्यासाठी अनेक अभ्यास वर्गांतून व शिबिरांतून शंकररावांनी बौद्धिक वर्ग घेतले. शंकररावांनी महाराष्ट्रात तुफानी दौरे काढून भांडवलदारांच्या व त्यांचे मुनीम बनलेल्या काँग्रेस सरकारच्या विरुद्ध उभ्या महाराष्ट्रात जबरदस्त रान उठवून राज्यकर्त्यांच्या सिंहासनाला धाम फोडला. शंकररावांनी त्यांच्या ‘जनसत्ता’ ह्या साप्ताहिकातून मार्क्सवाद आणि शेतकरी कामगार पक्षाचे एकसूत्री विचार लोकांसमोर मांडले. यावेळी ‘शेकाप’ हा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. वर्गविग्रहाच्या तत्त्वांवर अतूट निष्ठा असलेला शेतकरी कामगार पक्ष लोकांच्या पसंदीस जस-जसा खरा उतरत गेला तस-तसे काँग्रेसवाल्यांचे आरोप धांदात खोटे ठरू लागले. पक्षस्थापनेच्या निवेदनातच स्पष्ट ठरले होते की, “यापुढे स्पष्टपणे समाजवादी तत्त्वानुसार कामगार शेतकऱ्यांच्या वर्ग संघटना उभारणे व त्यांचे दैनंदिन वर्गलढे लढविणे हाच एक मार्ग आहे.” त्यामुळे ‘शेकाप’ हा जातीयवादी पक्ष म्हणणाऱ्याची तोंडे आपोआपच बंद होत असत. त्याचप्रमाणे ३ ऑगस्ट १९४७ रोजी ह्या पक्ष स्थापनेच्या बैठकीत झालेल्या ठरावातदेखील असे ठरले होते की, “प्रखर लढ्याशिवाय किसान कामगारांचे राज्य स्थापन करता येत नाही. कोणताही पक्ष वर्ग संघटनांचे पाठबळ घेतल्याशिवाय सत्तारूढ झाला, तरीही तो पक्ष किसान कामगारांचे राज्य स्थापन करू शकणार नाही.” त्याचवेळेस असेदेखील म्हणले होते की, “या वर्गसंघटना केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अस्तित्त्वात न आणता त्या सामाजिक व आर्थिक क्रांतीच्या आधारस्तंभ बनल्या पाहिजेत. शेतकरी कामगार पक्षाचे हेच प्रमुख धोरण संस्थापक शंकरराव मोरे यांनी आखले होते. आजही शेतकरी कामगार पक्ष याच धोरणावर कार्यरत आहे'

‘शेकाप’च्या जन्माची बीजे

[संपादन]

शेकापच्या जन्माची बीजे कशी रुजवली गेली याचे विवेचन शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे यांनी उद्बोधकरीत्या केले आहे. शंकरराव मोरे विवेचनात म्हणतात, “मार्क्सवादी तत्त्वज्ञान आणि कामगार वर्गाचे आंतरराष्ट्रीयत्व ही स्वातंत्रलढ्याला पोषक आहेत; परंतु या देशात कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने धोरणविषयक चुका करून मार्क्सवादाचे विकृत स्वरूप भारतीय जनतेपुढे ठेवले, हे श्रमजीवी जनतेचे दुर्दैव म्हणले पाहिजे. सन १९३५मध्ये झालेल्य कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या सातव्या काँग्रेसमध्ये वासाहतिक देशांतील स्वातंत्र्यलढ्यासंबंधी मार्गदर्शन करण्याचे कार्य डिमिट्राव्ह प्रबंधाने केले. हिंदुस्थानातील कम्युनिस्टांनी स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसजनांसह भाग घेतला पाहिजे असे धोरण जाहीर करून देखील येथील कम्युनिस्टांनी १९३० च्या व १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यांत सहभाग घेतला नाही. त्यामुळे कम्युनिस्टांना भारतीय जनतेचा मोठा रोष पत्करावा लागला होता. तसेच या लढ्यांतून कामगार वर्गीय पुढारीपणाही तो प्रस्थापित करू शकला नाही. त्यामुळे कम्युनिस्ट हे स्वातंत्र्यलढ्याचे स्वातंत्र्यलढ्याचे शत्रू आहेत ही भावना हिंदुस्थानात जोपासली गेली. याउलट कम्युनिस्टांनी स्वातंत्र्यलढ्यांत पुढारपण घेतले असते तर १९४७ साली तडजोड करण्याची ताकद काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणाच्या हाती राहिली नसती. कम्युनिस्टांच्या चुकांमुळेच देशातील कामगार-किसान हा काँग्रेसच्या मागे गेला. ब्रिटिश साम्राज्याशी हातमिळवणी करणे काँग्रेसला त्याचमुळे सोपे झाले. सदर घटनेस विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्रात कामगार–किसान क्रांती जिवंत ठेवण्यासाठीच मला शेतकरी-कामगार पक्षाची निर्मिती करावी लागली” असेही शंकरराव मोरे यांनी ठामपणे सांगितले.

‘शेकाप’चा सुवर्णकाळ

[संपादन]

सन १९४८ ते १९५६ हा ‘शेतकरी-कामगार पक्षाचा’ सुवर्णकाळ होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण याचकाळात शंकरराव मोरे यांचे झुंजार नेतृत्व या पक्षास लाभले होते. शंकररावांनी श्रमजीवी जनतेला समजेल अश्या सोप्या भाषेत हजारो खेड्यात नेण्याचे व जनतेला काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणा खालून काढून मार्क्सवादी छावणीत आणण्याचे मोलाचे कार्य आपल्या सिद्धहस्त लेखणीने व जुगलबंद वक्तृत्वाने पार पाडले. आजही मार्क्सवाद व लालबावटा खेड्या-पाड्यात दिसून येत आहे ते ‘शेकाप’ मुळे होय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही शेकाप अग्रेसर होता. १९५२ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे २८ आमदार निवडून गेले होते तर शंकरराव मोरे व इतर काहीजण लोकसभेमध्ये निवडून गेले होते. यामुळेच शेतकरी कामगार पक्षाचा हा सुवर्णकाळ होता. दुर्दैवाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस ऐन भर आला असतानाच शेकाप फुटली आणि पक्षाची वाताहत सुरू झाली. शंकररावांचे शिष्य व मानसपुत्र एन. डी. पाटील यांनी शंकररावांनंतर शेकापची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आज केवळ रायगड जिल्ह्यात आपले अस्तित्त्व टिकवून असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा महामेरू आमदार विवेक पाटलांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलला आहे. (सन २०१७).

‘शेकाप’चा विक्रम

[संपादन]

१९५२ साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शेकाप’चे २८ आमदार निवडून येण्याचा विक्रम घडला होता. हे यश जरी शेकापला टिकवता आले नाही, तरी देखील आजतागायत रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार सातत्याने निवडून येत आहे. आमदार गणपतराव देशमुख यांनी तर सांगोला विधानसभेतून सतत अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे. पुढील २५ वर्षे तरी ‘शेकाप’ शिवाय येथे पर्याय नसणार इतकी ‘शेकाप’ने तेथे घट्ट पाय रोवलेले आहेत. समविचारी पक्षांना एकत्रित करून येणाऱ्या विधानसभेत देखील शेकपच्या आमदारांची संख्या वाढेल अशी सध्या येथे परिस्थिती आहे.(२०१७ साल)

‘शेकाप’चे नेतृत्व

[संपादन]

१९४७ ते २००९ पर्यंतच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास शंकरराव मोरे यांच्या समर्थ नेतृत्वाने गाजलेल्या या पक्षाने महाराष्ट्रात ग्रामीण भागातील बहुजन समाजातील कर्तबगार तरुणांची एक नवी पिढी घडविली असे दिसून येते. या समर्थ नेतृत्वामध्ये गणपतराव देशमुख, यशवंतराव मोहिते, एन. डी. पाटील, उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, दाजीबा देसाई, कृष्णराव धुळप, विठ्ठलराव हांडे, सोनू आनंदा पंडित (जळगाव)आणि आजचे धडाडीचे आमदार विवेक पाटील यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील.

पुरस्कार

[संपादन]

’शेकाप’चे नेते प्रा. एन.डी. पाटील यांना डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात राष्ट्रीय बंधुता पुरस्कार मिळाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन डी पाटील यांनी सत्यशोधकी विचारांची कास धरून महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला जनसामान्यांपर्यंत या पक्षाचे कार्य पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. सामान्य लोकांच्या प्रश्नासंबंधी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी संघर्षात्मक लढा उभारला. रयत शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची द्वारे सर्वांना खुली करून दिली. रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली, आणि त्या माध्यमातून गोरगरीब उपेक्षित पीडित शेतकरी यांच्या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला