पाचलेगांवकर महाराज
पाचलेगावकर महाराज (पूर्वाश्रमीचे नृसिंह राजारामपंत कुळकर्णी) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत होते. समर्थ रामदास स्वामींप्रमाणेच पाचलेगावकर महाराज ह्यांचा कार्यासाठी सतत सगळीकडे संचार असे. त्यावरून त्यांना ‘संचारेश्वर’ हे नाव मिळाले.
पूर्वेतिहास
[संपादन]पाचलेगावकर महाराजांची गुरुपरंपरा श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) – श्री नारायण दत्तानंद सरस्वती – श्री माधवाश्रम स्वामी अशी होती.
पैकी नारायण दत्तानंद सरस्वती हे वऱ्हाडातले असून, आजानुबाहू आणि सुंदर देहयष्टी असलेले, एम्. ए. पर्यंत शिक्षण झालेले मुळात मोठे अधिकारी होते. एकदा संस्थानाची तपासणी करण्यासाठी शृंगेरी येथील मुख्य पीठात गेले असताना त्यांना पीठाधिकारी शिवभिनव भारती भेटले. असे म्हणतात की, शिवभिनव भारतींनी त्या वेळी ‘आता आपल्याला हेच काम करायचे आहे काय? आपला अवतार कशाकरता आहे?’ असे विचारताच नारायण दत्तानंदांची पूर्वअवतारांची स्मृति जागृत झाली आणि त्यांनी तेथेच नोकरीचा राजीनामा लिहिला आणि अवतारकार्याला सुरुवात केली. असे हे नारायण दत्तानंद सरस्वती ठिकठिकाणी लोकांना धर्माचरणाचा उपदेश करत फिरू लागले.
नारायण दत्तानंदांची आणि वासुदेवानंद सरस्वतींची एकदा व्यंकटगिरीवर भेट झाली. वासुदेवानंदांनी दंडदीक्षा दिल्यानंतर नारायण दत्तानंद हे नारायण दत्तानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. स्वामी नारायण दत्तानंद सरस्वतींनी ठिकठिकाणी असलेल्या गुप्त मूर्ती, गुप्त देवालये यांचा शोध लावला आणि ठिकठिकाणी तीर्थांची स्थापना केली. घटनांदूर येथील ज्या सोमेश्वर मंदिरात त्यांनी तीर्थांची स्थापना केली, तेथे त्यांची खोलीही आहे. लोणार आणि मेहकर याठिकाणी त्यांचा बराच काळ वास होता. औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, नाशिक, पालम, नागपूर अशा खूप ठिकाणी भ्रमंती करून शेवटी ते वाडीला आले. असे म्हणतात की, त्यांनी माधवाश्रमस्वामींना 'आपण हा अवतार संपवून पाचलेगाव येथे अवतीर्ण होणार असल्याचे' सांगितले आणि स्वतःची रुद्राक्षाची माळ, भस्माचा बटवा, वही इत्यादी गोष्टी डोंगरावरच्या गुहेत ठेवून ते समोर दोन समया तेवत ठेवून पद्मासन घालून बसले.
पाचलेगावकर महाराजांचा जन्म
[संपादन]मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव नावाच्या एका छोट्या खेड्यात राजारामपंत आणि कृष्णाबाई पांडे (कुलकर्णी) हे दांपत्य राहत होते. सुशील, सात्त्विक, कर्तव्यदक्ष, सौजन्यशील आणि ईश्वरभक्तिपरायण अशा या जोडप्याच्या संसारात मूलबाळ नव्हते. आपण संन्यास घ्यावा असे डोक्यात येऊन राजारामपंत त्यासाठी परवानगी घेण्यासाठी लोणीला जाऊन सखाराम महाराजांना भेटले. परंतु त्यांनी असा विषय काढताच महाराज त्यांच्यावर रागावले आणि म्हणाले 'अविचार करु नका. देवाला घरी येऊ द्या.' असे म्हणतात की, राजारामपंतांना त्याच रात्री भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केलेला एक महात्मा स्वप्नात आला. त्याने सांगितले की, 'आम्ही तुमच्याकडे येतो. तुम्ही माघारी जावे'. दुसरे दिवशी सकाळी सखाराम महाराजांनी राजारामपंतांना खारीक आणि नारळाचा प्रसाद दिला, आणि घरी परत जायला सांगितले.
त्यानंतर सखाराम महाराजांनी दिलेली ती फळे कृष्णाबाईंनी सेवन केली. राजारामपंतांनी महाराजांचा आशीर्वाद त्यांना सांगितल्यावर त्या सुखावून गेल्या. पुढे साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी गेला. तासन् तास जप करावा आणि गावातल्या मुक्तेश्वराच्या मंदिरात जाऊन पूजा, आरती, भजन इत्यादी करावे, असे कृष्णाबाईंना वाटू लागले. आणि हे सगळे त्यांनी आचरणात आणायला सुरुवात केली. कृष्णाबाई तासन् तास यामध्ये रमून जाऊ लागल्या.
म्हणता म्हणता बरेच दिवस गेले आणि आलेल्या दिवाळीचा पहिल्या दिवशी, नरक चतुर्दशीला, जणू स्वतः ईश्वरानेच कृष्णामाईंच्या पोटी जन्म घेतला. ही तारीख होती ८ नोव्हेंबर १९१२.
बालपण
[संपादन]राजारामपंत आणि कृष्णाबाईंच्या या बाळाचे नाव ‘नारसिंह’ ठेवण्यात आले. नारसिंह नाव धारण केलेल्या या दिव्य बाळाच्या बाळलीलाही इतर सामान्य बालकांपेक्षा फार वेगळ्या होत्या. ते पाळण्यात फारसे न थांबता जमिनीवरच खेळत असे. अंगावर कपडे ठेवत नसे. तरीसुद्धा कपडे घातलेच तर रडायला सुरुवात. कधी बाळाला पाजायला म्हणून आईने पाळण्यापाशी जावे तर बाळ सापाशी खेळण्यात रंगून गेलेले दिसायचे. सुरुवातीला तर हे दृश्य पाहून किंचाळत आई बेशुद्धच झाल्या. पाळण्यात बसलेला साप मारावा कसा, हे काठ्या घेऊन धावलेल्या लोकांनाही कळेना. शेवटी पाळण्यातला साप स्वतः होऊनच पाळण्याबाहेर येऊन साऱ्यांसमोर निघून गेला. आणि साऱ्यांनी निःश्वास सोडला. घडल्या प्रसंगाचा अर्थ कसा लावाला हे कोणालाच कळेना.
हळूहळू बाळ रांगू लागला. एक दिवस श्री माधवाश्रमस्वामी तिथे आले. त्यांनी त्या दिव्य बालकाला नमस्कार केला. आणि राजारामपंतांना सांगितले, 'हे बाळ नसून प्रत्यक्ष ईश्वर आपल्या घरी अवतरलेला आहे. हा मोठा सिद्धयोगी होईल. संसारासारख्या लौकिक गोष्टींपासून तो अलिप्त राहील. हा धर्माची पुनःस्थापना करून लोकांना उपासना आणि भक्तिमार्ग शिकवेल.' श्री माधवाश्रम स्वामींनी या दिव्य बालकाचे नाव ‘संचारेश्वर’ असे ठेवले. पुढे काही दिवसांनी श्री वासुदेवानंद सरस्वती पाचलेगावला आले. त्यांनी या बाळाचे दर्शन घेतले आणि राजारामपंतांना सांगितले की 'आपण भाग्यवान आणि पुण्यवान असल्यामुळेच आपल्या घरी या बाळाच्या रूपाने परब्रह्म अवतरलेले आहे.'
वेगवेगळ्या लीला दाखवत बाळ मोठे झाले आणि घरच्यांनी त्याला शाळेत घातले. पण मुलाच्या खोड्यांमुळे चिडलेले शिक्षक त्याला 'तू शाळेत येऊन दुसऱ्यांचे नुकसान करू नकोस. त्यापेक्षा तू शिवमंदिरात जा.' असे त्याला बजावत. त्यामुळे बाराखड्या आणि जेमतेम पंधरापर्यंतचे पाढे यावरच नारसिंहाच्या शिक्षणाची इतिश्री झाली. आत्ताशी सात वर्षाचा झालेल्या या जगावेगळ्या मुलाला सारेजण 'बाबा' म्हणून ओळखू लागले.
बाबा हा सात वर्षाचा मुलगा इतर मुलांपेक्षा फारच वेगळा आहे हे आख्ख्या पाचलेगावने ओळखले. एवढ्या लहान वयातच त्याने आजवर ज्या लीला दाखवल्या होत्या त्या पाहून बाबाला लोक मोठेपणी बाबा महाराज म्हणू लागले. दणकट बांधा, बसके नाक, पाणीदार डोळे, प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा. कमरेला फक्त लंगोटी. संपूर्ण अंगाला विभूतीचे लेपन केलेले आणि सोबत नाग. अशा वेशामध्ये बसलेल्या बाबा महाराजांच्या दर्शनाला दूरदूरहून लोक येऊ लागले. भंडारा घालू लागले.
भ्रमंती
[संपादन]श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी अवतार संपवण्यापूर्वी स्वतःकडील मुक्तेश्वराची एक पंचधातूंची मूर्ती हिंगोलीच्या एका व्यापाऱ्याकडे देऊन, ती पाचलेगावच्या नारसिंह नावाच्या साक्षात भगवान दत्तात्रय अवतार असलेल्या बाबास देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्या व्यापाऱ्याने बाबांना सन्मानाने बोलावून ती मूर्ती बाबाकडे सुपूर्द केली. (ही मूर्ती आता खामगावच्या आश्रमात आहे.)
भ्रमंतीमध्ये बाबा एकदा लोणारला चालला होता. वाटेत रिसोड – मांगवाडी ह्या भागातून जाताना त्याला तहान लागली. समोर एक विहीर दिसली. म्हणून तो पाणी पिण्यासाठी तिथे गेला. पण पाहतो तर विहीर आटलेली होती. क्षणभर विचार करून त्याने गंगेचे स्मरण केले, आणि असे सांगतात की, ती विहीर पाण्याने तुडुंब भरली. बाबाने घडवलेल्या ह्या चमत्काराची बातमी पुढे लोणारच्या यात्रेमध्ये सगळ्यांना कळली आणि परिणामी पाचलेगाव हे छोटे खेडेगाव गाजू आणि गजबजू लागले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी वाहतुकीचे साधन नसतानाही पाचलेगावला येऊ लागल्या; छोट्या बाबाचे दर्शन घेऊन भंडारा घालू लागल्या. आणि काही कालावधीत छोट्या बाबामुळे पाचलेगावचे रूपांतर एका तीर्थक्षेत्रामध्ये झाले.
छोटा बाबा आता आठ वर्षाचा झाला. एक दिवस माधवाश्रम स्वामी पाचलेगावला आले. त्यांनी छोट्या बाबाला गावाबाहेरच्या एका डोंगरातल्या गुहेतून दत्तानंद स्वामींची स्मरणी (जपाची माळ), भस्म आणि लिखाणवही या तीन वस्तू मिळवून दिल्या. त्या मिळाल्याबरोबर नारसिंहाच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या आणि त्याला आपल्या अवतारकार्याची जाणीव झाली.
नारसिंहाने पालखीबरोबर औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, लोणार, लोणी, हिंगोली, परभणी, हैदराबाद अशी भ्रमंती सुरू केली. वेगवेगळे प्रदेश आणि तिथली माणसे पहायला मिळू लागली. पालखीसाठी आलेली भक्तमंडळी नारसिंहाला आपल्या गावाला घेऊन जात. पण एकंदरच सगळीकडची परिस्थिती पाहून नारसिंह कष्टी झाला. दुःख, दैन्य आणि अज्ञान यात भरडून निघणारे आपले देशबांधव पाहून त्याच्या देशकार्याला झोकून देण्याच्या निश्चयाची धार आणखी वाढली.
देश आणि देशबांधव यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा दृढनिश्चय केलेला छोटा बाबा प्रथम पाचलेगावच्या शिवमंदिरात गेला. शांतपणे बसून त्याने आपले मनोगत त्या शिवाला सांगितले, ‘शक्ती, बुद्धी आणि दिशा देणारा तूच आहेस’ हे सांगत तो शिवासमोर नतमस्तक झाला. आता देशहित हा एकच विचार रात्रंदिवस त्याच्या समोर येऊ लागला. लोणी क्षेत्रात रहिवास करणाऱ्या सखाराम महाराजांचे दर्शन घेऊन छोट्या बाबाने देशकार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. सखाराम महाराज म्हणाले, 'अरे, तुझा अवतारच धर्मकार्यासाठी आहे, त्यामुळे अगदी निर्भयपणे ते कर.'
पाचलेगावकर महाराजांच्या कार्याची त्रिसूत्री
[संपादन]- देशाच्या स्वातंत्र्यासाठी व उन्नतीसाठी अन्यायाचा प्रतिकार करणारी व न्यायाचे रक्षक अशी कर्तृत्वशाली जनशक्ती जागृत करणे.
- एका कार्यक्षम बलवान जनशक्तीला योग्य वळण देणे.
- अराष्ट्रीय वृत्तीने भरलेल्या लोकांचे संख्याबळ शुद्धीच्या द्वारे घटवून संभाव्य संकटाच्या खाईतून देशाला वाचविणे.
विस्तार
[संपादन]हे कार्य करण्यासाठी त्यांनी मुक्तेश्वर दलाची स्थापना केली. हे दल पुढे 'तरुण सभे'त एकत्रित केले गेले. त्यांनी सावरकरांची व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर त्यांच्या कार्याने प्रेरित झालेली जनता पाहून ब्रिटिशांनीही त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले. महाराज भूमिगत झाले व त्यांनी भारत भ्रमण केले.
धर्मांतरास विरोध
[संपादन]महाराजांनी हिंदूंच्या ख्रिस्ती व मुस्लिम धर्मांतरास कडाडून विरोध केला. मिरज येथे त्यासाठी जनजागृती केली. हिंदू महासभेच्या शाखा त्यासाठी स्थापन केल्या. मे १९४१ मध्ये ग्वाल्हेर येथे हिंदुराष्ट्र सेना स्थापन केली. जातिभेद विरहित सहभोजने, हिंदू संघटन आणि शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक यावर भर दिला जाई.
ख्रिश्चनांनी अनेक प्रकारे धर्मांतर केलेल्या लोकांना त्यांनी परत हिंदू करून घेतले. खांडवा व जबलपूर जिल्ह्यात प्रचार करून १२०० गावातील हजारो लोकांत प्रचार करून ख्रिस्ती प्रसाराची लाट थोपवली. तेथेही अनेक लोकांना स्वधर्मात घेतले. विशेषतः याच काळात कडवा मिशनरी फॉनवेल हा महाराजांचे कार्य पाहून चकित झाला. हिंदू तत्त्वज्ञान त्याने समजून घेतले. व तो ही हिंदू होण्यास उत्सुक झाला. त्यास सहकुटुंब शुद्ध करून घेतले.
एक शाळा स्थापन करून फॉनवेल यास शिक्षक म्हणून तेथे नियुक्त केले गेले. बऱ्हाणपूर येथे मुस्लिम पंथीयांनी बाटवलेल्यांना स्वधर्मात घेण्यासाठी २२ ते २४ मार्च १९४५ रोजी एक संघटन यज्ञ घेतला.त्याला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी १५० कुटुंबांना स्वधर्मात घेतले गेले. सावरकर, भाई परमानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जुगलकिशोर बिर्ला, अनेकांचे शुभेच्छा संदेश त्यासाठी आले होते. मध्य प्रांताचे तत्कालीन शिक्षण मंत्री बाबासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेत यज्ञाचा समारोप झाला.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- प. पू. राष्ट्रसंत श्री पाचलेगांवकर महाराज Archived 2013-10-25 at the Wayback Machine.