Jump to content

नामांतर आंदोलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार, औरंगाबाद.

नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही प्रमुख मागणी या आंदोलनाची होती. शेवटी १६ वर्षांच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला.

इतिहास​

[संपादन]

१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला. शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे. दबलेल्यानी पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वाच्च शिक्षण, उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षितनी कष्टप्रदच राहील. उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. उच्चशिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकातल्या माणसास संधी मिळायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५०ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली. शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यवाचक नावे होती. व्यक्तींची फक्त दोनच नावे सुचविली होती - छत्रपती शिवाजी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे १९६० साली स्थापन झाले, शिवाजी महाराजांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव २७ जुलै इ.स. १९७८ला संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला. परंतु ह्याने काही लोकांचे पित्त खवळले. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला. या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या (बाबासाहेबांच्या) नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती. नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या अस्मितेची लढाई होती. ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक - युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. कित्येक दलित आया-भगिनीवर बलात्कार झाले तर काही गावांत दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. कित्येक गावातून दलित आया-भगिनींच्या भरचौकातून उघड्या - नागड्या धिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. पोलिसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध, पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला. विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहीत नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय - अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज”'. नांदेडमध्ये दलित पेंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, "नामांतर झालेच पाहिजे" बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले . परभणी जिल्ह्यातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बंसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून "जिंकू किंवा मरू ", जळतील नाहीतर जाळून टाकतील " अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे (बाबासाहेबांचे) नाव विद्यापीठाला द्यावे ही (सरकारी) मागणी. ज्यांनी दीनदलित, पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्यांचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर... चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी इ.स. १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले, ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव 'मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद' असे होते. नामांतरानंतर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद" एवढेच झाले.

नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात.

नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला .

इतिहास

[संपादन]

नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षाचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानांच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचं "वारं' प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघीतले. आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सूर्यास्त्र. डोक्‍याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील "लॉंगमार्च.' काढला गेला.
या लॉंगमार्चमध्ये मामा सरदार, कवि. इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे,नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे.
नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्‍चिमचे आंदोलन ऍड. विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेचे उपोषण लॉंगमार्चनंतरचा एक महत्त्वाचा टप्पा. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावं घेता येतील. वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वणवा कार्यकर्त्यांच्या जणू बुबुळात पेरला असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यानी वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला चर्चेतून उभे केले. मराठवाड्यात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून, शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाड्याला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले.आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला, त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली, ठीक ठिकाणी मोर्चे, आंदोलने होवू लागले, नामांतराला विरोध म्हणून जातियवादी लोकांनी दलितांवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरुवात केली, जाळपोळ करू लागले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

सफलता

[संपादन]

सोळा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.नामांतराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]