Jump to content

आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विदर्भात जवळजवळ दरवर्षी, आंबेडकरी साहित्य संमेलन भरते. पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन वर्धा शहरात १९९३ साली भरले होते. कवी वामनराव कर्डक त्याचे संमेलनाध्यक्ष होते. दुसरे संमेलन त्याच शहरात १९९६मध्ये झाले.

२००८ चे संमेलन ज्या संस्थांनी आयोजित केले होते त्या सगळ्या संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव अशा प्रत्येकी दोन प्रतिनिधींची बैठक २१ सप्टेंबर २००८ रोजी अमरावतीला झाली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये, ही संमेलने सुसंगत आणि नियमित व्हावी यासाठी सांस्कृतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था एकसंघ असणे गरजेचे आहे हे लक्षात आले. म्हणून त्याच वेळी, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ नामक संस्थेची स्थापना करण्यात आली. हे महामंडळ संस्थांचा संघ म्हणून काम करेल आणि ज्या संस्था त्याच्या सभासद असतील त्यांचे दोन प्रतिनिधी या महामंडळाच्या आमसभेला निमंत्रित केले जातील, अशी योजना ठरवली गेली. मात्र त्यापूर्वीचे २००८ चे अमरावतीचे संमेलन हे "आशय" नावाच्या स्थानिक संस्थेने आयोजित केले होते.

१९९३नंतरच्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष, अरुण कांबळे(९वे संमेलन; वणी-यवतमाळ, १३ जानेवारी २००६), उत्तम कांबळे, गंगाधर पानतावणे, बाबुराव बागुल, यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे(१०वे संमेलन;अमरावती, २१-२२ फ़ेब्रुवारी २००९), लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे(९१२वे,नांदेड) वगैरे होते.

पुढे या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने दोन आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलने आणि चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने आयोजित केली गेली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते.

मार्च २०१२पर्यंत अकरा अखिल भारतीय दलित साहित्य संमेलने(११वे नागपूरला२१-२३ जाने २०११, अध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे. १२ वे भोपाळला, मार्च २०१२, अध्यक्ष शरदकुमार लिंबाळे) आणि पंधरा आंबेडकरी साहित्य संमेलने झाली होती. याशिवाय तीन अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलने नोव्हेंबर २०१२पर्यंत झाली आहेत.


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]