ब्रह्मगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. उंचीनुसार हा महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १२९५ मीटर आहे. ब्रम्हगिरीच्या दक्षिणेला कळसूबाई, अलंग, कुलंग, मदन अशी सह्याद्रीतली काही शिखरे आहेत. हा डोंगर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. येथे खूप पाऊस पडतो.

ब्रह्मगिरी डोंगरामधून वैतरणा नदी, अहिल्या नदी आणि गोदावरी नदी या नद्यांचा उगम होतो. वैतरणा पश्चिम दिशेने खाली उतरते आणि अरबी समुद्राकडे जाते तर गोदावरी पूर्वेच्या दिशेने आंध्रप्रदेशात राजमहेन्द्री इथे बंगालच्या उपसागराला मिळते. [१]

पौराणिक आख्यायिका आणि स्थानमाहात्म्य[संपादन]

ब्रह्मदेवाने एकदा विष्णूला म्हटले,‘मी सृष्टिकर्ता असल्यामुळे शिवमहिमा काय तो मलाच माहीत आहे.’ विष्णूने मात्र नम्रपणे सांगितले की,‘मी पुष्कळ तप केले, परंतु मला अजूनही शिवाचे ज्ञान झालेले नाही.’ या संवादानंतर ब्रह्मा आणि विष्णूंनी शिवाचा शोध घ्यावा असे ठरवले. ब्रह्माने शिवाचे मस्तक शोधावे आणि विष्णूने चरण. दोघांनी पुष्कळ शोध घेतला, पण तो व्यर्थ ठरला. तेव्हा ब्रह्मदेवाने एक कारस्थान रचले. त्याने आपल्या सामर्थ्याने गाय आणि केतकीपुष्प निर्माण केले आणि त्यांना आपल्या बाजूने साक्ष देण्यास राजी करत आपल्याला शिवाचे मस्तक सापडल्याचा दावा केला. देवांना या दाव्याबद्दल शंका वाटली. तिचे निराकरण करण्यासाठी ते शिवलोकात गेले. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाचे कारस्थान शिवाच्या ध्यानात आले. तो क्रोधित झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला शाप दिला, ‘आजपासून भूतलावर तुझी कोणीही पूजा करणार नाही.’

ब्रह्मदेवालाही शिवाचा राग आला आणि त्याने शिवाला प्रतिशाप दिला. ‘तू भूतलावर पर्वत होऊन राहशील’ नंतर ब्रह्मदेवाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्याने शिवाची तपश्चर्या केली. शिव प्रसन्न झाला. त्याने ब्रह्मदेवाला वचन दिले,‘पर्वतरूपाने भूतलावर माझे वास्तव्य असेल आणि या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी असेल!’

यात्रा[संपादन]

यात्रा म्हणून अनेक लोक हा पर्वत चढून येतात अथवा प्रदक्षिणा करतात. त्र्यंबकेश्वराचं दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा ही परंपरा जुनी आहे. संत ज्ञानेश्वरांचा काळ इसवी सनाच्या तेराव्या शतकातला. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन निवृत्तिनाथांना घडले होते.

हा डोंगर चढण्यासाठी साधारणपणे तीन ते पाच तास लागतात. रस्त्यात मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. वर पाण्याची सोय आहे. वरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते. तसेच येथे शंकराने जटा आपटल्या व त्यातून गंगेचा/गोदावरी नदीचा उगम झाला अशीही कथा आहे.

(पहिला क्रमांक कळसूबाई शिखर)


संदर्भ[संपादन]

  1. ^ यूनिक फिचर्स Archived 2012-02-03 at the Wayback Machine. संकेतस्थळावर त्र्यंबकेश्वर - ब्राह्मणांचा गाव हा लेख दिनांक ९ एप्रिल २०११ रोजी भाप्रवे रात्रौ १०.३० वाजता जसा दिसला