चित्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
" | चित्ता
Cheetah (Acinonyx jubatus) female 2.jpg
" | शास्त्रीय वर्गीकरण
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षकA
कुळ: मार्जार कुळ
उपकुळ: फेलिने
जातकुळी: ॲकिनोनिक्स
जीव: अ‍ॅ. जुबेटस
शास्त्रीय नाव
ॲकिनोनिक्स जुबेटस
Cheetah range.gif

चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून हिंदीत चिता व मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.

आढळ[संपादन]

एकेकाळी चित्ता हा अाफ़्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता, परंतु आज चित्त्याचे आढळस्थान केवळ अाफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते मर्यादित राहिले आहे. याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वसतिस्थान. चित्त्याचे मुख्य वसतिस्थान जे गवताळ प्रदेश आहे त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले. तसेच चित्त्याचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्त्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला. चित्त्याने उत्क्रांतीमध्ये वेग मिळवला खरे परंतु त्याने शारीरिक ताकद गमावली. त्यामुळे बहुतेक वेळा चित्ता त्याच्या पिलांचे इतर भक्षकांपासून अथवा त्याने मिळवलेल्या भक्ष्याचे रक्षण करू शकत नाही. त्यामुळे चित्त्याची संख्या बऱ्याच ठिकाणी कमी झाली. भारतातील चित्त्याला अशियाई चित्ता म्हणत. त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता. चित्त्याची बंदिवासात वीण होत नाही असा अनुभव आहे. भारतातील शेवटचा जंगली चित्ता १९५१ मध्ये आंध्रप्रदेशात दिसला. यानंतर भारतातून जंगली चित्ता दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला आहे[१]. महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्या नोंदी आहेत[२]. आशियाई चित्त्याची आज केवळ इराणमध्ये जवळपास पन्नास इतकी संख्या राहिली आहे. अधूनमधून बलुचिस्तानमध्ये चित्ता दिसण्याच्या घटना घडतात.

अाफ़्रिकेतील मुख्यत्वे सव्हानाच्या गवताळ प्रदेशात अजूनही चित्त्याचे अस्तित्व आहे. जेथे खाद्याची मुबलकता आहे, अशा भागात अजूनही चित्ते आढळतात. केनिया, झिंबाब्वे, बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका, नामीबिया, युगांडा इत्यादी देशांत चित्ता आढळतो.

वर्णन[संपादन]

चित्त्याच्या अंगावरचे ठिपके भरीव असतात व चेहऱ्यावरील अश्रूंसारख्या दिसणाऱ्या रेषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. चित्त्याचे ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अंगावरचे ठिपके. ठिपक्यांमुळे बिबट्या आणि चित्त्यामध्ये लोक नेहेमी गफलत करतात. परंतु दोन्ही प्राण्यात मूलभूत फरक आहे. चित्त्याच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे आतून पोकळ असतात. चित्त्याचे ठिपके हे २ ते ३ सें.मी. व्यासाचे असून ते केवळ बाह्य भागातील त्वचेवर असतात. पोट व पायांचे आतील भागांवर ठिपके नसतात. चित्त्याच्या चेहऱ्यावर दोन काळ्या रेषा असतात त्या ओघळणाऱ्या अश्रूंप्रमाणे दिसतात. बाकी शरीरयष्टीमध्ये दोघांमध्ये बराच फ़रक आहे. बिबट्यांची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबगुबीत असते, तर चित्त्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सक्षम अशी असते. चित्त्याची छाती ही खोलवर व कंबर अतिशय बारीक असते. पाय अतिशय लांब सडक व लवचीक असतात. चित्त्याचे वजन साधारणपणे ४० किलोग्रॅमपर्यंत भरते. त्याची लांबी सव्वा ते १.३५ मीटरपर्यंत भरते. चित्त्याची शेपटी साधारणपणे ८४ सें.मी.पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्त्याला पळताना दिशा बदलायला होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो. चित्त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या नख्या. चित्त्यांना इतर मांजरांप्रमाणे नखे पूर्णपणे आत घेता येत नाही. ती अर्धवट बाहेर व अर्धवट आत घेता येतात. तर मांजरांना पूर्णपणे आत बाहेर करता येतात. याचा फायदा चित्याला अतिवेग घेण्यास झालेला आहे.

चित्ता हा लांबी रुंदीत मांजरांमध्ये मोठ्या आकारात येत असला तरी तो पॅंथेरा उपकुळात येत नाही. त्याचे कारण चित्त्याला डरकाळी फोडता येत नाही, तसेच गुरगुरता देखील येत नाही. चित्ता केवळ लहान मांजरांप्रमाणे क्यांव क्यांव करू शकतो.

अतिवेगासाठी सक्षम होण्यास चित्त्यामध्ये मोठ्या नाकपुड्या, मोठी फुप्फुसे व वेगाने पळू शकणारे हृदय विकसित झाले आहे.

आहार व शिकार पद्धत[संपादन]

चित्ता हा मांसभक्षक असून त्याच्या आहारात छोट्या हरिणांचा समावेश होतो. अाफ़्रिकेत मुख्यत्वे इंपाला, विविध प्रकारचे गॅज़ेल, स्प्रिंगबक हे त्याचे खाद्य आहे. तो कधीकधी झेब्रा किंवा वाईल्ड बीस्ट अशा मोठ्या प्राण्यांचीही शिकार करण्यात यश मिळवतो. चित्त्याचे अतिशय वेगवान होण्याचे कारण त्याचे खाद्य आहे. हरणे ही देखील अतिशय वेगाने पळू शकतात व त्यांना गाठण्यासाठी चित्त्याला अतिवेग मिळवावा लागतो.

चित्ता साधारणपणे दिवसा शिकार साधतो. सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उन्हे कलल्यानंतर तो शिकार साधतो. दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो शिकार करणे टाळतो. दुरून शिकार टेहळल्यावर भक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ दबा धरून जातो व भक्ष्य साधारणपणे १० ते २० मीटरवर आल्यावर तो जोरदार वेगवान चाल करतो. चित्त्याची ही चाल पाहणे अतिशय नेत्रसुखद अनुभव असतो. अनेक छायाचित्रकार चित्त्याचा हा क्षण टिपण्यास आतुर असतात. चित्ता कधी लांबवर खूप काळ पाठलाग करत नाही. चित्याला वेग असला तरी लांबवर पाठलाग करण्याचे बळ त्याच्यापाशी नसते. साधारणपणे १ ते दीड मिनिटापर्यंत पाठलाग करून शिकार साधतो. नाही जमल्यास शिकारीचा नाद तात्पुरता सोडून देतो. पाठलाग करताना चित्ता आपल्या भक्ष्याला सरळसरळ गळा पकडून ठार मारत नाही. पाठलागादरम्यान सुरुवातीला भक्ष्याला पाडायचा डाव असतो व त्यानंतर त्याचा वेग कमी होतो व मग जखमी करून मग तो त्याला मारतो. शिकार साधल्यानंतर चित्ता बराच वेळ दम खातो. त्याचे शरीराचे तापमान पाठलागादरम्यान प्रचंड वाढते व ते कमी करण्यात बराच वेळ जातो.

चित्त्याच्या पुनर्वसनाचा प्रयत्न[संपादन]

हैदराबाद येथील काही भारतीय शास्त्रज्ञांनी इराण मधील आशियाई चित्त्यांचे क्लोनिंग करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु आशियाई चित्त्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, व त्यांची संख्या १०० देखील उरलेली नाही. त्यामुळे आफ्रिकेतील चित्त्यांना आयात करण्यावर विचार चालू आहे.

ऐतिहासिक संदर्भ[संपादन]

चित्त्यांचा वापर राजेलोक शिकारींसाठी करत. मुघल दरबारात शेकडो चित्ते केवळ शिकारीसाठी पाळले होते याची नोंद आहे. कोल्हापूरच्या दरबारात देखील होते. त्यांच्या शिकारीचे छायाचित्रे शाहू महाराजांच्या संग्रहालयात पहायला मिळतात[३]. अकबर राजाकडे जवळजवळ हजार चित्ते होते.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ इंग्रजी विकिपीडिया भारतीय चित्ता
  2. ^ अरण्यपुत्र - ले. सुरेशचंद्र वारघडे
  3. ^ आपली सृष्टी आपले धन -निसर्ग प्रकाशन ले. मिलिंद वाटवे

बाह्य दुवे[संपादन]

  • "चित्त्याविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • चित्त्याची चपळता बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.