Jump to content

मोसमी वारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मौसमी वारे या पानावरून पुनर्निर्देशित)

विशाल भूखंड व त्यालगतचे समुद्र यांच्या तापमानांत हिवाळ्यात व उन्हाळ्यात होणाऱ्या फरकांमुळे प्रचलित वाऱ्यांच्या दिशांत व्युत्क्रमण निर्माण होते (म्हणजे ऋतूंप्रमाणे उलट सुलट दिशांनी वाहणारे वारे निर्माण होतात) यास मॉन्सून वारे म्हणतात. विस्तीर्ण भूखंडीय भागावरील जलवायुमानावर (दीर्घकालीन सरासरी हवामानावर) या विशाल पवनव्यूहाचा प्रभाव पडत असतो. अरबी समुद्रावर हिवाळ्यात ईशान्येकडून व उन्हाळ्यात नैर्ऋत्येकडून वाहणाऱ्या ऋतुकालिक वाऱ्यांना प्रथम अरबांनी मॉन्सून हे नाव दिले. अरबी भाषेत ‘मौसीम’ म्हणजे ऋतू. त्यावरून मॉन्सून हे नाव पडले. या वाऱ्यामुळे केवळ अरबी समुद्रावरीलच नव्हे, तर लगतच्या आफ्रिकेच्या भागावरील व संपूर्ण दक्षिण आणि विशेषतः आग्नेय आशियाच्या विशाल क्षेत्रावरील पवनदिशांत व हवामानात ऋतूंप्रमाणे मूलभूत स्वरूपाचे बदल घडून येतात. पृथ्वीच्या वातावरणात उष्णतेचे फार मोठ्या प्रमाणावर परिवहन घडविणारी यंत्रणा म्हणजे मॉन्सून वारे होत. मॉन्सून वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाचा संबंध जगातील निम्म्या लोकांच्या जीवनाशी पोहोचतो.

नीच अक्षवृत्तांवरील उत्तर ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील गल्फ किनारपट्टी, मध्य आणि दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका यांसारख्या विस्तीर्ण भूखंडीय प्रदेशांवरही आशियाई मॉन्सूनसारखे लाक्षणिक जलवायुमान प्रत्ययास येते. त्यांना ‘मॉन्सूनसम वाऱ्यांचे प्रदेश’ म्हणून निर्देशिले जाते.

मॉन्सून पवनव्यूहांची निर्मिती : भूमी आणि पाणी यांवर सौर प्रारणांचा (तरंगरूपी ऊर्जेचा) भिन्न प्रकारे परिणाम होतो. याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक कारण असे की, पाण्याची उष्णता धारण करण्याची क्षमता (एक अंश तापमान वाढविण्यास द्यावी लागणारी उष्णता) अधिक असते. यामुळे एकाच मूल्याचे सौर प्रारण सारख्याच वस्तुमानाच्या भूमीवर व पाण्यावर पडल्यास भूमीच्या तापमानातील वाढ ही पाण्याच्या तापमानातील वाढीच्या जवळजवळ दुप्पट असते. दुसरे कारण म्हणजे मिसळण्याची प्रक्रिया फक्त पाण्यातच सहज होत असते. यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाला मिळालेली उष्णता पाण्यात होणाऱ्या हालचालींमुळे खालच्या थरांना वाटली जाते. हिवाळ्यात पृष्ठभागी थंड झालेले पाणी अधिक घनतेमुळे खाली जाऊन त्याची जागा खालच्या थरांतील उष्ण पाणी घेते. यामुळे महासागरांच्या तापमानात ऋतुमानानुसार मोठे फरक पडत नाहीत. महासागर एक प्रकारे उष्णता साठवणाऱ्या प्रचक्राचे (एखाद्या यंत्राला प्राप्त होणारी वा त्यापासून मिळणारी ऊर्जा बदलत असेल, तर त्याची गती इष्ट मर्यादेत राखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट रचनेच्या चक्राचे) काम करतात. याउलट भूमी उन्हाळ्यात जलद व खूप तापते आणि हिवाळ्यात थंड होते. अशा तऱ्हेने हिवाळ्यात विशाल भूखंडे थंड होतात. लगतचे महासागर त्यामानाने उष्ण असतात. भूखंडांवर हवेच्या उच्च दाबाचे क्षेत्र प्रस्थापित होते, तर महासागरावर न्यून (कमी) दाबाचे क्षेत्र प्रस्थापित झालेले असते. अशा परिस्थितीत वारे उच्च दाबाच्या क्षेत्रापासून न्यून दाबाच्या क्षेत्राकडे म्हणजे भूपृष्ठाकडून महासागराकडे वाहू लागतात. उन्हाळ्यात भूपृष्ठ अत्यंत तप्तायमान होते, त्यांवर न्यून दाबाचे क्षेत्र प्रस्थापित होते. महासागर तौलनिक दृष्ट्या शीत असतात. त्यांवर उच्च दाबाचे क्षेत्र प्रस्थापित होते. अशा परिस्थितीत वारे उलट दिशेने म्हणजे महासागरावरून भूपृष्ठाकडे वाहू लागतात. त्यामुळे महासागरावरून येताना आर्द्रतेने भारावले जात असलेल्या या वाऱ्यामुळे मुख्यत्वेकरून उन्हाळ्यातच पाऊस पडतो. विशाल भूप्रदेश व विस्तीर्ण महासागर यांच्यामधील ऋतुकालिक तापमानभिन्नता हेच मॉन्सून वाऱ्यांच्या निर्मितीचे प्राथमिक कारण देण्यात येते. पृथ्वीचा पृष्ठभाग संपूर्णपणे जमीन किंवा समुद्र असता, तर मॉन्सून वारे निर्माण झाले नसते.

समुद्रकिनारी प्रदेशांत अगदी लहान प्रमाणात दररोज अशाच कारणाने वारे निर्माण होतात. दिवसा समुद्रकिनाऱ्यावरील जमीन तापल्यामुळे व लगतचा समुद्र थंड असल्यामुळे मध्यान्हींनंतर सागरी (खारे) वारे भूपृष्ठाकडे वाहू लागतात. रात्री जमीन खूपच थंड झाल्यामुळे व लगतचा समुद्र उष्ण असल्यामुळे मध्यरात्रीनंतर मतलई वारे भूपृष्ठाकडून समुद्राकडे वाहू लागतात. खारे व मतलई वारे आणि मॉन्सून वारे यांत काही फरकही आहेत. खारे व मतलई वारे यांवर पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाचा लक्षणीय परिणाम होत नाही. मॉन्सून वाऱ्यांच्या दिशेत बदल होतो. त्याचप्रमाणे मॉन्सून वारे पाण्याचे बाष्परूप अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत फार मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर घडवत असतात.

सौर उष्णता मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या नीच अक्षवृत्तांवरील प्रदेशांच्या बाबतीत असाच आविष्कार प्रकर्षाने दिसून येतो. मध्यम अक्षवृत्तांवरील महासागर व विशाल भूखंडीय प्रदेश यांच्यामध्येही ऋतुमानानुसार लक्षणीय स्वरूपात तापमानभिन्नता निर्माण होते व तेथे मॉन्सूनसम ऋतुकालिक दिशा व्युत्क्रमण असणारे पवनव्यूह अस्तित्वात येतात परंतु या अक्षवृत्तांना आपाती सौर प्रारण उष्ण व उपोष्ण कटिबंधांच्या मानाने बऱ्याच कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे तेथील मॉन्सूनसम वारे जागतिक पवन प्रणालींच्या मानाने बरेच सौम्य असतात व ते तेथील पश्चिमी वाऱ्याच्या परिसंचरणांत अल्पशी विकृती निर्माण करतात. विषुववृत्तीय पट्ट्यात भूपृष्ठ जलपृष्ठाच्या मानाने फार तापत नाही किंवा विशेष थंड होत नाही. त्यामुळे दिशा-व्युत्क्रमण असणारे मॉन्सूनसारखे पवनव्यूह निर्माण होण्याचा तेथे प्रश्नच उद्‌भवत नाही. अंटार्क्टिकाच्या सतत बर्फाच्छादित असलेल्या क्षेत्रातही मॉन्सूनसारखे प्रभावी पवनव्यूह निर्माण होण्याची शक्यता नसते.

आशियाई मॉन्सून पवनव्यूह: आशिया खंडात ४५° उ. अक्षवृत्ताच्या दक्षिणेला मॉन्सूनचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. आशियाई मॉन्सूनचे ऋतुकालिक परिसंचरण महत्त्वाचे होण्याचे कारण त्याच्याशी निगडीत झालेले वृष्टीचे वितरण व प्रमाण, क्वचित अवर्षण आणि गडगडाटी वादळे, चंडवात (अल्पावधित एकाएकी जोरावून नंतरच्या कित्येक मिनिटांत क्रमशः मंद होत जाणारा वारा), अभिसारी चक्रवात (ज्यात केंद्रीय प्रदेशाकडे हवा जात असते व भूपृष्ठापासून अनेक मीटर उंचीपर्यंत वारे चक्राकार पद्धतीने फिरत असतात असे चक्रवात), पर्जन्यवृष्टिस्फोट (अल्पावधीत एकाएकी पडणारा स्थानिक स्वरूपाचा मुसळधार पाऊस) यांसारख्या अनेक वातावरणीय आविष्कारांच्या घटना हे होय. भारत व आग्नेय आशिया हे भाग विषुववृत्ताच्या जवळचे भूखंड आहेत. मे–जून महिन्यांत साधारणपणे २५° ते ३०° अक्षवृत्तीय पट्ट्यात अरबस्तानापासून उत्तर भारतापर्यंत विशाल न्यून वायुदाबाचे क्षेत्र प्रस्थापित झालेले असते. त्यातील न्यूनतम वातावरणीय दाब ९९० मिलिबार वायव्य भारतावर असतो. अनेक दिशांनी त्यात हवा प्रवेश करते. याच वेळी हिवाळी गोलार्धातील ऑस्ट्रेलिया खंड व हिंदी महासागर हे भाग शीतसर होत जातात. त्यांवर उच्च दाबाचे क्षेत्र प्रस्थापित झालेले असते. त्यातून निसटलेली हवा विषुववृत्त ओलांडल्यानंतर भारतावरील अभिसारी परिसंचरणात ओढली जाते. त्याचप्रमाणे ती आग्नेय चीनपर्यंतच्या आग्नेय आशियातील द्वीपसमूहावर जाते. हा वातप्रवाह हिमालय पर्वतामुळे अडविला जाऊन हिमालयाच्या पायथ्याशी पर्जन्यमान वाढते पण उत्तरेकडील तिबेट पठार मात्र कोरडे राहते. भारतातील सर्वाधिक वार्षिक पर्जन्य (१,०२५ सेंमी. हून अधिक) आसाम व पूर्व हिमालयात पडतो. अशा रीतीने हिवाळी गोलार्धातील आर्द्रतेने भारावलेली हवा उन्हाळी गोलार्धातील भारत व आग्नेय आशियावर येऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पाडावयास कारणीभूत होते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत उत्तर गोलार्धात हिवाळ्याला सुरुवात होते. सायबीरियावर विशाल अपसारी चक्रवात (वरच्या पातळीवरील हवा भूपृष्ठाकडे येऊन केंद्रीय प्रदेशातून बाहेर निघून इतरत्र पसरते असा चक्रवात) प्रस्थापित झालेला असतो. त्याचा केंद्रीय भाग ४८° उ. १०५° पू. या अनुक्रमे अक्षवृत्ताच्या व रेखावृत्ताच्या जवळपास असतो. जगातील सर्वाधिक वातावरणीय दाब (&gt १०३५ मिलिबार) याच भागावर जानेवारी महिन्यात आढळतो. [→ जलवायुविज्ञान]. या अपसारी चक्रवाताच्या पूर्वभागातून निघालेली अतिशीत हवा उत्तर किंवा ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या स्वरूपात आशियाई पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशांवरून सातत्याने वाहत असल्यामुळे तेथे तीव्र हिवाळी परिस्थिती प्रत्ययास येते. हा आशियाई अपसारी चक्रवात सरासरी स्थानापासून पश्चिमेकडे सरकल्यास त्यातून निघालेली हवा पूर्व व आग्नेय दिशांनी वाहणाऱ्या वाऱ्यांच्या स्वरूपात पूर्व यूरोप व स्कँडिनेव्हियावर पसरून तेथील हिवाळा तीव्रतम करते. कधीकधी हे अतिशीत वारे ब्रिटिश बेटांपर्यंत पोहोचतात. आशियाई अपसारी चक्रवातातील अतिशीत हवा हिमालय पर्वताच्या विशाल व उत्तुंग रांगांमुळे अडविली जात असल्यामुळे ती भारतातील उत्तरेकडील प्रदेशांवर अंमल गाजवू शकत नाही. तिबेटचे पठार व त्याच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील भागांवर मात्र कडाक्याची थंडी पडते. ह्या हवेचा उगम भूपृष्ठावर झाल्यामुळे तापमान अतिशय कमी असते व हवेतील जलांशही अत्यल्प असतो. यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण अत्यल्प असते. अपसारी चक्रवातांत उच्च थरांतील अतिशीत हवा खालील भूपृष्ठावर उतरत असते. उत्तरोत्तर ती शुष्कोत्तर व उष्णतर होत जाते. मेघनिर्मितीचे सामर्थ्य तिच्यात नसते. त्यामुळे हिवाळी गोलार्धात मॉन्सूनमुळे पडणारा भूखंडावरील पर्जन्य अल्पतम असतो. अपसारी चक्रवाताच्या पूर्वेकडील अतिबाह्य सीमेतून निघणारी हवा ईस्ट इंडीजवर, लगतच्या पश्चिम पॅसिफिक महासागरातील बेटांवर आणि उत्तर हिंदी महासागरातील बेटांवर ईशान्य दिशेने आक्रमण करते. ही हवा समुद्रावरून दीर्घ गतिमार्गाने येत असल्यामुळे तीत भरपूर जलांश शिरलेला असतो. त्यामुळे ह्या भागाला हिवाळ्यात बराच पाऊस मिळतो. ईशान्येकडून किंवा पूर्वेकडून येणाऱ्या या वातप्रवाहाचा काही भाग दक्षिण भारतीय द्वीपकल्प व श्रीलंकेपर्यंतही येऊन थडकतो. हिवाळ्यात या भारतीय क्षेत्रावर पाऊस पडण्याचे मुख्य कारण म्हणजे आशियाई अपसारी चक्रवाताच्या बहिर्सीमा भागातून निसटलेली शुष्क हवा समुद्रावरील दीर्घ मार्ग आक्रमिल्यामुळे आर्द्रतायुक्त होते व ती ईशान्य किंवा पूर्व दिशेने या क्षेत्रावर आक्रमण करते हेच होय.

आशिया खंडात आणखी एक मॉन्सून वाऱ्यांचे क्षेत्र आहे. त्यात मध्यपूर्व आशिया, पूर्व भूमध्यसमुद्र आणि अती आग्नेयी यूरोप यांचा समावेश केला जातो. उन्हाळ्यात या क्षेत्रावर सातत्याने भूमिखंडावरून येणारे शुष्क तप्त वारे उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे वाहत जातात. हिवाळ्यात याच क्षेत्रावरील प्रचलित पवनदिशा जवळजवळ दक्षिण-उत्तर अशी असते.

आशिया खंडावर मॉन्सून वाऱ्यांचा प्रभाव ज्या लक्षवेधी प्रमाणात दिसून येतो त्या प्रमाणात जगातील इतर भूखंडांवर व्युत्क्रमी मॉन्सूनसम वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत नाही. उत्तर अमेरिकेत उन्हाळ्यात कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर सातत्याने वायव्येकडून वारे वाहणे, मेक्सिकोच्या आखातातून उन्हाळ्यात उष्णार्द्र हवा आत शिरून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्यवर्ती व पूर्वेकडील भागांपर्यंत पोहोचणे व मार्गात आलेल्या प्रदेशांवर विस्तृत प्रमाणावर पर्जन्य पडणे आणि त्याच क्षेत्रावर हिवाळ्यात उत्तरेकडील शुष्क व अतिशीत हवेचे आगमन होऊन वेगळ्याच प्रकारचे हवामान निर्माण होणे यांसारख्या आविष्कारांच्या स्वरूपात मॉन्सूनसम वाऱ्यांचे परिणाम प्रत्ययास येतात. अटलांटिक महासागराच्या बहुतेक किनारपट्टीवर प्रचलित वाऱ्यांशी दिशा उन्हाळ्यात नैर्ऋत्य व हिवाळ्यात वायव्य अशी बदलत असते. दक्षिण आशिया खंडावरील वाऱ्यात आढळून येणारे ऋतुकालिक दिशा-व्युत्क्रमित्व उत्तर अमेरिकेतील प्रचलित वाऱ्यांत आढळत नाही. ते नुसते परिवर्तन असते.