श्रावण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा आगेममागे श्रवण नक्षत्र असते त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.सूर्य जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर श्रावण सुरु होतो. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची परंपरा आहे. " श्रावण मासी , हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे " या काव्य रचनेतून श्रावण मासाचे वर्णन केले आहे. ही कविता बालकवी यांची आहे.

श्रावण महिन्यातील सण[संपादन]

या दिवशी नागांची पूजा केली जाते.

  • श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.

नारळी पौर्णिमा' हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी समुद्र किनारी राहणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.या दिवशी महाराष्ट्रातले कोळी व इतर समुद्राशी निगडित व्यवसायांतील लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते.ज्या मराठी घरांत रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्या मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात. याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात.ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू,शिव,सूर्य इ.देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री पुरुष ती पोवती हातात बांधतात.याच दिवशी श्रवण नक्षत्र असेल तर ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात.या तिथीला श्रावणी असे नाव आहे.


श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात.कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला.या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात.श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.

  • पिठोरी अमावास्या/ पोळा

या महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे.संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात.याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी लोक पोळा नावाचा सण साजरा करतात.हा सन बैलांसंबंधी असून , या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.[१]

व्रते[संपादन]

नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षे श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहतात आणि मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. श्रावणी शुक्रवारी देवीचे पूजन आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ मास मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना  व गोर गरिबांना भोजन देतात.देवस्थानातही  या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.[२]

श्रावणी सोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे . नवविवाहिता शिवामुठाचे व्रत घेतात व मुठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. खरे महिलांचे व्रत पण सर्वानीच अंगिकारले तर काय हरकत आहे ? श्रावणातील प्रत्येक सोमवारी भटकेश्वराचे पूजन करूया .भटकेश्वराचे मंदिर आहे. यमगरवाडी या पारधी समाजाच्या गावी. काही वर्षा पासून तिथे भटकेश्वराचे शिव मंदिर बांधून पूजा-अर्चा होत आहे . महाशिवरात्रीला येथे जत्रा भरते. तर या भटकेश्वराच्या नावाने अशी प्रत्येक धान्याची शिवामूठ घरोघरी साठविण्यात यावी. यातून भटके- विमुक्तांची नवी पिढी शिकून सवरून स्वाभिमानाने जगू शकेल. त्यासाठी ही शिवामूठ गावागावात जमा करून ती यमगरवाडीच्या आश्रम शाळेकडे पाठविण्याचे व्रत, दायित्व साऱ्या शिवभक्तांनी घ्यायला हवे. श्रावणी सोमवारची खुलभर दुधाची कहाणी हेच शिकविते. सगळ्यांना संतुष्ट करायचे आणि मगच देवतार्चन करायचे.प्रत्येक सोमवारी या निमित्ताने कष्ट करून शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्याला /विद्यार्थीनीला जेवायला बोलावता येईल. श्रावणात एकभुक्त राहण्याचे व्रत घेण्याची प्रथा आहे. कारण या काळातील हवामानामुळे पचन मंद गतीने होते . आरोग्यकारक अशी ही प्रथा आहे. तसेच शहरी भागात बैठे काम करणाऱ्या बंधू- भगिनींना एक भूक्ततेचे व्रत घेऊन वजनावर नियंत्रणही ठेवता येईल. एका वेळेस हलके अन्न खाऊन दुसऱ्या वेळेस जेवणासाठी लागणारे धान्य वा धन गरजूंसाठी देणे हे व्रत किती चांगले ! व्रत म्हणजे व्रतवैकल्ये! वैकल्यांचा अर्थ विकलता ! म्हणजे बारीक होणे . स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे . [३]

भारतात अन्य ठिकाणी[संपादन]

उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा ,रक्षाबंधन ,जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्वाचे मानतात.झुलन जत्रा हा दोलोत्सव आहे.पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्या संबंधी गीते गातात.हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो.कृष्ण जन्माच्या दुस-या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात.[४]

चित्रदालन[संपादन]


हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  श्रावण महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्याWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  2. भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  3. लेखक- य .शं. लेले (लेखक हे धर्माशास्राचे अभ्यासक असून त्यांच्या अभ्यासातून त्यांनी त्यांचे विचार मांडले आहे .) विवेक २६ ऑगस्ट २००७
  4. भारतीय संस्कृती कोश खंड नववा