ऐश्वर्य पाटेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऐश्वर्य पाटेकर
ऐश्वर्य पाटेकर.jpg
जन्म नाव ऐश्वर्य नामदेव पाटेकर
जन्म १४ एप्रिल, १९७७
पाटे, ता.चांदवड, जि.नाशिक
राष्ट्रीयत्व Flag of India.svg भारतीय
कार्यक्षेत्र प्राध्यापक, काव्यक्षेत्र
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, एकांकिका
प्रसिद्ध साहित्यकृती भुईशास्त्र
वडील नामदेव
आई इंदूबाई
पुरस्कार साहित्य अकादमी युवा पुरस्कार

ऐश्वर्य पाटेकर (जन्म : १४ एप्रिल १९७७) हा त्याच्या 'भुईशास्त्र' या पहिल्याच काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्यासाठीचा पहिला[१] साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला कवी आहे.

जीवन[संपादन]

ऐश्वर्य नामदेव पाटेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील पाटे या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. नामदेव आणि इंदूबाई या दांपत्याला ऐश्वर्य हा मुलगा आणि चार मुली होत्या. आपल्या वडिलांकडून आईला होणारी मारहाण आणि तिचे आक्रंदन ऐश्वर्यला लहानपणीच अनुभवायला मिळाले. शेवटी वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ऐश्वर्याला आणि त्याच्या आईला घराबाहेर काढले. आईने मोलमजुरी करून मुलांना वाढविले.[२] ऐश्वर्य पाटेकर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात असताना त्यांचे शिक्षक श्री. पवार यांनी ’प्रेरणा’ नावाचे हस्तलिहित काढायचे ठरविले. दहा वर्षे वयाच्या ऐश्वर्यने त्यासाठी स्वतः लिहिलेल्या कविता दिल्या असता त्या कविता ऐश्वर्यने लिहिलेल्या आहेत यावर शिक्षकांचा विश्वास बसला नाही, म्हणून त्यांनी त्या कविता नाकारल्या होत्या. पाटेकरांचे माध्यमिक शिक्षण काझीसांगवी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लासलगाव आणि नाशिक येथे झाले. एम.ए., बी.एड., एम.फिल. पदव्या मिळाल्यावर पाटेकर इ.स. २००४ पासून निफाड तालुक्यातील काकासाहेबनगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मराठीचा व्याख्याता म्हणून लागले. तेथे असताना ऐश्वर्य पाटेकर यांनी ’भुईशास्त्र’ हा काव्यसंग्रह लिहिला.

आपण लिहिलेल्या कविता त्यांनी आनंद यादव, शंकर वैद्य, म.सु. पाटील अरुणा ढेरे, इंद्रजित भालेराव, द.ता. भोसले, लक्ष्मीनारायण बोल्ली, पुरुषोत्तम पाटील आदी साहित्यिकांना पाठवल्या व त्यांच्या प्रतिसादावरून पाटेकरांना आपल्या कवितांतील गुणदोष उमजले.

लेखन[संपादन]

ऐश्वर्य पाटेकर यांचा भुईशास्त्र हा कवितासंग्रह आहे. शिवाय ’कवितारती’, आणि ’अनुष्टुभ’ यांसारख्या अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.

ऐश्वर्य पाटेकर यांच्या आत्मकथनात्मक कादंबरीची प्रकरणे ’ॲग्रोवन’च्या अंकात दर रविवारी प्रकाशित होतात.

जू[संपादन]

साहित्य अकादमीचा युवा साहित्यिकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या ऐश्‍वर्य पाटेकर यांचे हे आत्मकथन आहे. छोट्या खेड्यात राहणाऱ्या आणि आईने अफाट कष्ट करून वाढवलेल्या पाटेकर यांनी आपला बालपणातला संघर्ष तर इथे सांगितला आहेच, पण आईने किती हाल सोसले आणि तरीही मुलाला शिकवून मोठे करायचे हा निर्धार कसा पूर्ण केला, तेही सांगितले आहे. हे पुस्तक सकाळ प्रकाशनने प्रकाशित केले आहे.


ऐश्वर्य पाटेकरने लिहिलेला भुईशास्त्र हा कवितासंग्रह जानेवारी, २०११ ला श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केला. 'भुईशास्त्र'तील कविता संवादी, सात्त्विक, आणि स्वाभाविकपणाची लक्षणे असणारी आणि संतांच्या परंपरेशी जोडलेली आहे.[३] या यंग्रहाची एकूण रचना ऐश्वर्यने 'दृष्टान्तपाढे', 'वृषभलीळा', 'भुईशास्त्र', 'गर्भओवी' आणि 'हुर्दुकटीपा' या विभागात केलेली आहे. दृष्टान्तपाढे या संग्रहाच्या प्रारंभीच्या कविता विभागात कष्टकरी-शेतकरी वर्गाच्या सर्व प्रकारच्या अवस्था आणि अवकळा मांडलेल्या आहेत. वृषभलीळा या विभागाअंतर्गत समाविष्ट पाटेकरच्या कविता शेतकऱ्यांचा जिवलग बैल या विषयावर आहेत. भुईशास्त्र या विभागात विभागलेल्या कविता वारकरी संस्कार व्यक्त करणाऱ्या आहेत तर आईवरच्या कवितांचा हुर्दुकटीपा हा विभाग जास्त प्रभावी आहे. ऐश्वर्यच्या जीवनाचे, जगण्याचे संस्काराचे सारे सार हुर्दुकटीपेतच सामावलेले आहे.

‘भुईशास्त्रा’तील आदिम मातृसत्ताक संस्कृतीच्या अस्पष्ट खुणा[संपादन]

शेतीचा लागलेला शोध हा मानवी संस्कृतीचा स्थापनेतील प्रारंभ बिंदू होय. शेतीचा शोध हा एका स्त्रीने लावला याबद्दल सर्व अभ्यासक सहमत आहेत. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या स्थापनेत तिचा मुख्य सहभाग स्पष्ट होतो. या संस्कृतीच्या प्रारंभावस्थेत संस्कृतीची प्रमुख म्हणून स्त्रीच होती. प्रारंभीच्या मातृसत्ताक कृषिसंस्कृतीत “शिकार करणारा (hunter and food gatherer) पुरुष हा तिच्या आश्रयाने नांदत होता.

”१ : प्रारंभावस्थेत स्त्रीला प्रतिष्ठा होती, कारण स्त्री आणि भूमी यांच्यातील गर्भधारणक्षमतेबद्दल मानव भांबावलेल्या अवस्थेत होता. स्त्रियांची ही सर्जनशीलता बघून स्त्रियांबद्दल त्याच्या मनात आदर आणि भीती या दोन्ही भावना निर्माण झाल्या असाव्यात, कारण मातृसत्ताक कृषिसंस्कृतीमध्ये बर्याच कृषिदेवता ह्या स्त्रीरूपी होत्या. स्त्री हे विश्वनिर्मितीचे,सृजनाचे केंद आहे.उगमस्थान आहे.तिच्यात अलौकिक आणि विलक्षण यातुशक्ती आहे अशी त्यांची श्रद्धा होती.

”२ : डॉ. रा.चिं. ढेरे एक निरीक्षण नोंदवतात की खननयष्टी (डीगिंग स्टिक) च्या साह्याने स्त्रीने शेतीला सुरुवात केली.या कालावधीत समाजजीवनात स्त्रीचे स्थान महत्त्वाचे होते. कारण अगदी प्राथमिक अवस्थेत उत्पादनाची शक्यताच नसल्याने श्रमविभागणीचा प्रश्नच निर्माण झालेला नसावा.पुरुषांकडे विशिष्ट असे काम नव्हते. स्त्रीकडे मात्र मुलांची जोपासना नैसर्गिक रीत्या असल्याने या श्रमाविभागणीला पूर्व प्राथमिक अवस्थेत स्त्रीचे स्थान अधिक मोलाचे होते.

”३ : “लोकायत परंपरेने वामाचारात स्त्रीला प्राध्यान्य दिले होते. स्त्री हीच विश्वाची माता आहे असेही या परंपरेत मानले गेले.

”४ : संस्कृतीच्या निर्मितीत कृषीच्या शोधाचा वाटा महत्त्वाचा आहे. हा कृषीचा शोध सहजासहजी लागलेला शोध नाही. काळाच्या निरीक्षणांतून आणि प्रयोगांतून स्त्रियांनी प्राथमिक अवस्थेतील शेतीचा शोध लावून भटकंतीला कंटाळलेल्या मानवाला स्थिरता मिळवून दिली. म्हणून त्या काळात समाजजीवनात स्त्रियांना उच्चपदस्थ भूमिका मिळाली असावी. एखाद्या गटाची व जमातीची संपत्ती नव्या पिढीच्या हातात देण्याचे काम स्त्रिया करीत असत.सर्व प्राचीन समाजामध्ये जो मातृदेवतांचा पंथ दिसतो.त्यातून स्त्रीची उच्च भूमिका दिसते.

”५ : संस्कृती निर्माणात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या स्त्रीचे नंतरच्या काळात अवमूल्यन झाले. संस्कृतीच्या प्रधानावस्थेकडून ती दुय्यम अवस्थेकडे फेकली गेली. स्त्रीचे हे अवमूल्यन “सीमान द बूव्हा’ एक मानवी जीवनातील इतिहासातील पायरी व टप्पा समजतात.

”६ : मुळात हे अवमूल्यन खननयष्टीच्या शेतीकडून नांगराने केल्या जाणाऱ्या कृषीकडे जी वाटचाल झाली तिच्यामुळे घडले असे रा.चिं.ढेरे मत नोंदवतात. नांगराकडे कृषीची जी वाटचाल झाली ती पुरुषसत्तेच्या प्रस्थापनेची नांदी ठरली.शेती(क्षेत्रासत्ता, क्षेत्रप्रतिष्ठा) संपून,तिच्या जागी कृषी (म्हणजे कर्षसत्ता) स्थिरावली. जोवर खननयष्टीच्या साह्याने स्त्रीकरवी शेती होत होती, तोवर निसर्गाशी/सृष्टीशी आमौपम्यवृतीचा अनुभव घेतला जात होता. परंतु कर्षसत्तेत भूमी आणि तिच्याशी समरूपता साधणारी स्त्री केवळ भोगवस्तू बनली, भोगवासना बनली.

”७ : नांगराच्या साह्याने शेतीला प्रारंभ झाला.या अवस्थेत स्त्री शारीरिक असमर्थतेमुळे नांगराच्या अधिक कष्टाच्या शेतीपासून दूर झाली. पुरुषाने कृषिव्यवस्था आपल्या हाती घेतली. मुळातील मातृप्रधान संस्कृती नष्ट होत गेली. आर्यांची पुरुषप्रधान संस्कृती सर्वत्र वर्चस्व निर्माणकर्ती झाली. मुळातील नैसर्गिक, आदिम अशी मातृसंस्कृती नष्ट होऊन नंतरच्या काळात स्त्री पुरुषाची गुलाम बनली. मनुस्मृतीने तिच्या अभिव्यक्तीचे, अविष्काराचे स्वतंत्र्य नाकारले.आणि तिचे अस्तित्व गौण ठरवले.

एके काळाची ही मातृप्रधान संस्कृती नष्ट झाली असली, तरी कोणतीही संस्कृती ही पूर्णतः कधीच नष्ट होत नसते. तिच्यातील काही अवशेष हे नंतरच्या पिढ्यांत अभौतिक संस्कृतीचे घटक म्हणून टिकून राहतात. आदिम मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा या सजीवाशेष रूपाने लोकगीते, लोककथा, उखाणे, म्हणी, विधिविधानाच्या रूपाने साहित्यात टिकून राहतात. भारतामध्ये अगदी अलीकडेपर्यंत आसाममधील खासी जमातीमधील आणि त्रावणकोर कोचीन मधील नायर जमातीमध्ये मातृसत्ताक समाजपद्धती अस्तिवात होती.

”८ : सातवाहन राजवटीतील राज्यकर्ते आपल्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावत, याकडे मातृसत्ताक संस्कृतीचा एक अवशेष म्हणून बघायला हवे. मराठी साहित्यामधून मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा शोधता येतात.

ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘भुईशास्त्र’(२०११) या काव्यसंग्रहातून आदिम अशा मातृसंस्कृतीच्या काही अस्पष्ट खुणा दिसून येतात. काव्यसंग्रहाच्या शीर्षकातच ‘भुई’ हा मातृप्रतिमेचा आदिबंध सांगणारा शब्द आहे. मुळात भूमी आणि स्त्री यांच्यातील एकरूपता हे मातृसत्ताक संस्कृतीचे एक महत्त्त्वाचे वैशिष्ट्य होते. “भूमी आणि स्त्री यांची एकरूपता माणसाच्या मनोविश्वात भूमीच्या सर्जनशीलतेचा आणि स्त्रीच्या सर्जनशीलतेचा अनुभव माणसाने परस्पर भाषेत मांडला आहे.कधी भूमीला स्त्री मानून तिच्यावर स्त्रीचे निसर्गधर्म आरोपित केले आहेत, तर कधी स्त्रीला भूमी मानून तिच्यावर भूमीचे निसर्गधर्म आरोपित केले आहेत.

”९ : पाटेकरांच्या ‘भुईशास्त्र’या काव्यसंग्रहातून ‘ स्त्री’चे, स्त्रीच्या भावजीवनाचै, सामाजिक स्थानाची आणि तिच्यावरील सांस्कृतिक वर्चस्वाची अनेक रूपे व्यक्त झाली आहेत. या संग्रहातील रूपांमध्ये ‘माय आणि भुई’ ह्या दोन रूपांतील साध्यर्म्य वौशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या कवितेतील स्त्री ही पुरुषप्रधान व्यवस्थेत दुय्यम स्थानावर फेकली गेलेली आहे. पुरुषीव्यवस्थेशी संघर्ष करणारी आणि आपली मातृसत्ताक जीवनपद्धती जपू बघणारी स्त्री या कवितेत ‘आई’च्या रूपाने जाणवते. मातृसत्ताक कृषिव्यवसायावर हळूहळू पुरुषांचे वर्चस्व प्रस्थापित होत गेले आणि स्त्रीच्या स्थानाचे अवमूल्यन होत गेले, ह्या गोष्टींचा संदर्भ पाटेकरांच्या ‘मुंगीचिया विवरी’या कवितेत जाणवतो. “आईने पेरलं वावर/स्वतःच्या हातानं/उगवून आल्यावर म्हणाली/एवढा हिर्वा हिर्वा/हिर्वा हिस्सा माझा/माझ्या एकटीचा/नेमकी तितकंच/तेवढंच हिर्वं तिच्या भरताराच्या डोळ्यात खुपलं/आईच्या हिर्व्या हिस्स्याचं जाळीत झालं..

”१० हा संदर्भ स्त्रीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचा आहे. मूळ मातृसत्ताक संस्कृती ज्या पुरुषी कावेबाजीतून नष्ट झाली तोच गनिमी कावा कवितेतील भ्रताराकडून केला गेला आहे. आदिम मातृप्रधान संस्कृतीत स्त्रीच्या हातातून शेती ज्या पद्धतीने काढून घेतली व स्त्रीला दुय्यम स्थानावर आणले तो आदिम संस्कृतीतील सांस्कृतिक स्थित्यंतराचा संदर्भ संस्कृति-इतिहासाची पुनरावृत्ती करतो.

मातृसत्ताक संस्कृतीमध्ये पुरुषाला फारसे मह्त्वाचे स्थान नव्हते.पित्याचा कुळाशी फारसा संबंध नव्हताच.आर्य संस्कृतीत मात्र ‘पिता’हा सर्व कुटुंब व्यवस्थेचा प्रमुख आणि समाज व्यवस्थेत आदराचे स्थान प्राप्त झालेला होता. त्यामुळे ऐश्वर्य पाटेकर यांच्या कवितेतील वेगळ्याच बापाची प्रतिमा बघून ह्या प्रतिमेवर काहींनी आक्षेप नोंदवले आहेत. आपल्या संस्कृती विचारात पाटेकरांनी चितारलेली बापाची प्रतिमा बसत नाही असे आक्षेपकर्त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांच्या कवितेतील बापाची प्रतिमा ही आदिम मातृसत्ताक संस्कृती सदर्भातून आलेली आहे. मातृसत्ताक समाजात पुरुषाचा पित्याच्या कुळाशी संबंध जवळ जवळ नसतोच. चिनी भाषेत कुळवाचक शब्दाचा अर्थ ‘ स्त्री पासून’ जन्मलेला असा होतो. अतिप्राचीन काळातील मातृसत्तकाचा हा अवशेष असावा. ‘खासी’ टोळ्यांमध्ये from the women sprang the clan’ असा वाक्प्रचार आहे. मुलाचा वंश आईवरून ठरतो. पिता हा केवळ निमित्तकारण म्हणून जन्मदाता (begetter) होय,’स्त्रीला’भेट देणारा परका पाहुणा एवढेच त्याचे स्थान!

”११ : पाटेकरांच्या कवितेतली बाप ही प्रतिमाही यापेक्षा वेगळी नाही. म्हणून बापाची ओळख सांगताना कवी म्हणतो-“आईनं बोट दाखवलं तुझ्याकडे/म्हणून तुला बाप समजतो/बाकी काय खुणा आहे तुझ्या/तू माझा बाप असल्याच्या माझ्यात.'

”१२ : ही बापाची ओळख पुरुषप्रधान संस्कृती रक्षकांना खटकणारी आहे.मात्र कवीच्या भावविश्वात आदिम मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा ह्या निमित्ताने स्पष्ट झाल्या आहे. कवितेतील बापाच्या प्रतिमा ‘पितृत्व’आदिबंधाच्या विरोधाभासी आहे.पित्याचा किंवा बापाचा आदिबंध पाऊस,मार्गदर्शक,सावली या प्रतिमातून व्यक्त होतो.मात्र येथे बापाची प्रतिमा –“ठणक बेंबीच्या देठीला/मशागतीतून मागे राहिलेलं धसकट/खसकन खुपसलं पायात/हाच तो बाप,ज्यानं मोडला आईचा खोपा/छाकट्या छिनालगवश्या बाईसाठी.

”१३ : मातृसंस्कृतीत कुटुंब व्यवस्थेची प्रमुख म्हणून स्त्रीच मुख्य होती.याचा संदर्भ भुईशास्त्रात दिसतो. “पिकाच्या मधोमध पोहचलो/जगून राठ झालेल्या शरीराचं/भूरभूरलं जावळ/ह्याच त्या माझ्या चार बहिणी/आईच्या जात्यापाळच्या ओवीतल्या चार गावच्या बारवा/अन मी मधी जोंधळा हिरवा.

”१४ : या लोकगीत आणि संकेतांच्या जवळ जाणाऱ्या कवितेत बापाचे स्थान मुळीच दिसत नाही.कारण बापानं “गोमाशी झटकावी इतक्या सहजतेने/झटकून फेकलं नातं.'

”१५ : किंवा “रानभर चरणारी चंद्रीगाय/संध्याकाळी माझ्याच गव्हाणीत आपसूक येऊन/उभी राहते खुंट्याशी बिनदाव्याची/तू तर कधीच वळाला नाहीस/माझ्या घराकडं.

’’१६ : कवितेतल्या बाप प्रतिमेनेकधीच पितृत्व स्वीकारले नाही.बाप म्हणून ज्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य असतात, त्या त्याने कधीच पूर्ण केल्या नाही स्त्रीला भेट देणारा एक परका पाहुणा किंवा ‘बिगेटर’या भूमिकेपलीकडे तो कधीच गेला नाही. मातृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुष हा “In- Jawai; he neither lives not eats in his wi्ि्ेe’s house, but visites it only other dark.ह्या पुरताच मर्यादित राहिला.

”१७ : मातृसंस्कृतीत पुरुषाला स्त्रीच्या गर्भधारणेच्या प्रक्रियेतील आपली ताकद आणि योगदान माहीत नसल्याने, तो तंत्र आणि यातू या दोहोमध्ये भांबवलेल्या अवस्थेत होता, असे निरीक्षण विद्युत भागवत यांनी नोंदवलेले आहे.

”१८ : पाटेकरांच्या कवितेतील बापाच्या प्रतिमा ह्या संस्कृतिक क्षेक्षात न बसणाऱ्या अशा आढळून येतात. कारण मातृसंस्कृतीत पुरुषाला महत्त्वाचे स्थान नाही. स्त्रीच्या नात्यातील माणसांच्या दृष्टीने तो अगदी परकाच मानला जातो. केवळ ‘बिगेटर’ या शब्दानेच ते त्याचा उल्लेख करतात. एकेकाळी अज्ञात असलेले निर्मिती किरीयेतील पुरुषाचे स्थान ज्ञात झाल्यावर त्याला ‘बिगेटर’हे स्थान तरी लाभले. परंतु व्यावहारिक जीवनात कुटुंबाच्या दृष्टीने त्याला मुळीच स्थान नसल्याने तो केवळ ‘उदासीन’ परका पाहुणाच राहिला.

”१९ : ‘भुईशास्त्र’ या ऍश्वर्य पाटेकर यांच्या संग्रहातील बापाची प्रतिमा यापेक्षा वेगळी नाही. या काव्यसंग्रहभर बापाची प्रतिमा ‘nagetive’(नकारात्मक) स्वरूपाची राहिली आहे, कारण ‘भुईशास्त्र’ ह्या संग्रहात आदिम मातृसत्ताक संस्कृतीच्या अस्पष्ट खुणा स्पष्ट झाल्या आहेत.

ऐश्वर्य पाटेकर यांचे लेखन[संपादन]

 • भुईशास्त्र (कवितासंग्रह)
 • मी माझ्यात माझं अख्खं गाव घेऊन फिरतो आहे (कवितासंग्रह)
 • ’कवितारती’, आणि ’अनुष्टुभ’ यांसारख्या अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.
 • ऐश्वर्य पाटेकर यांच्या आत्मकथनात्मक कादंबरीची प्रकरणे ’ॲग्रोवन’च्या अंकात दर रविवारी प्रकाशित होतात.

प्रसिद्ध कविता[संपादन]

 • गव्हाच्या ओंबीत बाजरीचे दाणे
 • भाकर आणि आई
 • मास्तर

ऐश्वर्य पाटेकर यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

| दुवा = http://72.78.249.125/esakal/20110309/4673146371843796485.htm | title = कवी ऐश्‍वर्य पाटेकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार | प्रकाशक =सकाळ | भाषा = मराठी |archiveurl=http://archive.is/iuwT |archivedate=२६ फेब्रुवारी २०१४ }}</ref>[५] -

 • पुणे येथील प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्रमंडळातर्फे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी पुरस्कार. (इ.स. २०१२)
 • रा. ना. पवार साहित्य पुरस्कार[६] - सोलापूर येथील रा.ना. पवार प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी. (इ.स. २०११)
 • संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार [७] - वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे. (इ.स. २०१२)
 • सुजाता पाबरेकर स्मृती पुरस्कार
 • आनंद जोर्वेकर स्मृती पुरस्कार[८] - (इ.स. २०००)
 • कवी गोविंद पुरस्कार - सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचेकडून (इ.स. १९९९)
 • संजय कोरंबे स्मृती पुरस्कार - जालना (इ.स. १९९९)
 • रेव्हरंड टिळक पुरस्कार - नाशिक (इ.स. २००९)
 • त्यांच्या ’बाप’ या कथेस इ.स. २००० साली सकाळच्या दिवाळी अंक कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता.
 • त्यांनी 'रघु गुळवे अर्थात बडबड भारूड' आणि 'आदी' या एकांकिकाही लिहिलेल्या आहेत. 'रघु गुळवे अर्थात बडबड भारूड'ला इ.स. २००३ साली झी मराठी आयोजित एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचा एकांकिका महाकरंडक तर 'आदी'ला इ.स. २००३ सालीच सर्वोत्कृष्ट लेखकासाठीचा सायबा करंडक मिळालेला आहे.

संदर्भ- 1-ढेरे रामचंद्र चिंतामण,’श्री आनंदनायकी’, पद्मागंधा प्रकाशन पुणे, पहिली आवृत्ती,२००२,पृ.९४.

2-लोहीया शैला, ‘भूमी आणि स्त्री’, गोदावरी प्रकाशन ओरंगाबाद, जुलै २०००, पृ.१७.

3-गाडगीळ स.रा., ‘लोकायत’,लोकवाड्‍मय गृह प्रा,लि.मुंबई, दुसरी आवृत्ती.१९९४,पृ.६८.

4-तंत्रैव,पृ.२४.

5-विद्युत भागवत, ‘ स्त्री सामाजिक विचार’,डायमंड पब्लिकेशन पुणे, पहिली आ.२००८,पृ.१११.

6-तंत्रैव,पृ.१११.

7-ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.९४.

8-गाडगीळ स.रा.,उनि.पृ.७२.

9- ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.९३.

10-पाटेकर ऐश्वर्य, ‘भुईशास्त्र’,शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर,प्र. आ. २०११,पृ.४६.

11-गाडगीळ स.रा. उनि.पृ.१३१.

12- पाटेकर ऐश्वर्य, उनि.पृ.49.

13- तंत्रैव,पृ.41.

14- तंत्रैव,पृ.42.

15- तंत्रैव,पृ.49.

16- तंत्रैव,पृ.49.

17- गाडगीळ स.रा.,उनि.पृ.131

18- ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.111

19- गाडगीळ स.रा.,उनि.पृ.131 .

[९]

 • मुंगीचिया विवरी

संकीर्ण[संपादन]

इ.स. २००० साली झी मराठीच्या घर कवितांचे या दोन भागांच्या कार्यक्रमात ऐश्वर्य पाटेकरांचा सहभाग होता.

देशमुख, डॉ. केशव सखाराम. कवितारती. p. ४०.</ref>

पहा : Indian Young Writers

संदर्भ आणि नोंदी[संपादन]