नरहरी सोनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संत शिरोमणी नरहरी महाराज[संपादन]

संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास- कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांचा जन्म इ.स.१३१३च्या आसपास पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी, आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला असते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.[१]


महाराजांच्या शिव-भक्ती विषयी थोडक्यात[संपादन]

विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती, यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे.[२]

झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।

नरहरी महाराजांचा जन्मच हरि-हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर पुढील पिढी मात्र अजूनही हा वाद मिटवू शकली नाही. त्यांचे चरित्र ज्या धुंडीसुत मालु यांनी लिहिले. त्यांनी मालुतारण या त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या (अप्रकाशित) ग्रंथात नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव उदावंत सोनार होते असे असे म्हटले आहे. उपनावावरून ते लाड होते असे म्हणता येईल तसेच 'भक्ती कथामृत' या ग्रंथातदेखील ते लाड असल्याचे म्हटले आहे.

'हेमकारक पवित्र रामाजी नाईक l जेणे पूर्ण ब्रम्हा यदुकुलतोलक सख्य अत्यंत अाराधिला l' 'सुवर्णकार कर मिरत उपनाम ज्यांचे उदावंत प्रेमावडी भक्ती लाड म्हणवित पंचगौरी जाणत l रामाजी नाईक याती सोनार परी श्रीहरीचा परमप्रियकर l पुढे भक्त नरहरी सोनार तथा वंशी जानत ll२९ll'

[३]

चित्रपट[संपादन]

 • नरहरी सोनार यांच्या जीवनावर कटिबंध नावाचा मराठी चित्रपट आहे. त्याचे संपादन रमेश औटी यांनी केले आहे. निर्मिती संजय जाधव यांची आहे.
 • नरहरी-नरहरी ( चित्रपट ) (निर्माते - वासुदेव शाश्वत अभियान)
 • संत नरहरि सोनार - मराठी भक्तिपूर्ण फिल्म (निर्माते - समीर देशमुख, किरण रोंडे)

पुस्तके[संपादन]

 • श्री संत नरहरी सोनार चरित्र (लेखक - प्रा.बाळकृष्ण लळीत) [४]
 • संत नरहरी सोनार (डाॅ. मनोहर रोकडे)

पुण्यतिथी[संपादन]

परळी वैजनाथ येथे आणि अन्य ठिकाणी माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो.

अभंग[संपादन]

नरहरी सोनारांया नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' हे अभंग विशेष प्रसिद्ध आहेत.[५]

नरहरी सोनारांचे अभंग**

         **१ देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार |
           देह बागेसरी जाणे | अंतरात्मा नामसोने |  
           त्रिगुणाची करून मूस | आत ओतिला ब्रम्हरस | 
           जीव शिव करुनी फुंकी | रात्रन्‌दिवस ठोकाठाकी | 
           विवेक हातवडा घेऊन | कामक्रोध केला चूर्ण |
           मन बुद्धीची कातरी | रामनाम सोने चोरी |
           ज्ञान ताजवा घेऊन हाती | दोन्ही अक्षरे जोखिती |
           खांद्या वाहोनी पोतडी | उतरला पेंल थंडी |
           नरहरी सोनार हरीचा दास | भजन करा रात्रन्‌दिवस |      
         **२ काय तुझी थोरी वर्णू मी पामर |
           होसी दयाकर कृपानिधी ||
           तुझ सरशी दया नाही आणिकासी | 
           असे हृषीकेशी नवल एक |
           जन हो जोडी करा नाम कंठी धरा |
           जणे चुके फेरा गर्भवासी ||
           नरदेही साधन समता भवभक्ती | 
           निजध्यास चित्ती संतसेवा ||
           गरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे |
           नरहरी राहे एक चित्ते |
          **३ पापांचे पर्वत मोठे मोठे झाले |
            शरीर नासले अधोगती ||
            जन्मांतरी केले अवघे व्यर्थ गेले |
            देह नासले हो क्षणामाजी ||
            जिणे अशाश्वत देह नाशवंत |
            अवघे सारे व्यर्थ असे देखा ||
            काही नाही दान काही नाही पुण्य |
            जन्मासी येऊनी व्यर्थ जाय ||
            परोपकार काहीनाही केला देवा |
            सद्गुरु केशवा ह्रदयी घ्यावा ||
            सारामध्ये सार नाम असे थोर |
            ह्रदयी निरंतर नरहीरीच्या ||

संदर्भ[संपादन]