Jump to content

राणी लक्ष्मीबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मणिकर्णिका तांबे या पानावरून पुनर्निर्देशित)
स्वातंत्र्यलक्ष्मी बुंदेलखंड सम्राज्ञी अखंड सौभाग्यवती वज्रचुडेमंडित श्रीमंत राजमाता झांशी विरांगना श्री महाराज्ञी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर जू देवी महाराज

मर्दानी झांशीची राणी विरांगणा लक्ष्मीबाई
टोपणनाव: मनिकर्णिका, मनू, बाईसाहेब, छबिली
जन्म: नोव्हेंबर १९, १८३५
काशी, भारत
मृत्यू: १७ जून, १८५८ (वय २२)
ग्वालियर, मध्य प्रदेश
चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके: ग्वाल्हेर
धर्म: हिंदू मराठी
वडील: मोरोपंत तांबे
आई: भागिरथीबाई तांबे यमुनाबाई तांबे
पती: श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर
अपत्ये: दामोदर राव नेवाळकर,
आनंदराव नेवाळकर (दत्तकपुत्र)


विरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच (झांशीची राणी लक्ष्मीबाई), (नोव्हेंबर १९, १८३५ - जून १७, १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.

झांशीची राणी यांची तत्कालीन राजमुद्रा:

रानी‌ लक्ष्मीबाई सवंत १९१० ( फारसी व‌ उर्दू ) भाषेत. हिंदी व‌ मराठी अर्थ "राणी लक्ष्मीबाई वर्ष १८५४"

नवीनतम राजमुद्रा जयते : श्रीमंत रितेशराजे ठाकूर व‌ कवीवर्य मनिष अहिरे द्वारा निर्मित २०२२

||स्वराज्यरक्षिनी‌ फिरंगमर्दीनी||राज्ञी लक्ष्मी जयते विरांगणी||‌‌‌‌ |‌|शस्रधारिनी समर भवानी||गंगाधर भार्या झांशी सम्राज्ञीनी||

 ‌‌   || स्वा‌‌तंत्र्यलक्ष्मी ||

बिरूदावली

[संपादन]

१० जून १८५७ रोजी राणी लक्ष्मीबाई स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडची सम्राज्ञी झाल्या आणि झाशीच्या राज‌दरबारात महाराणी लक्ष्मीबाईंचे नाव गुंजले. ज्याला गारद किंवा बिरूदावली म्हणले जाते. जेव्हा जेव्हा झाशीची राणी शाही पोशाखात विशेषतः महाराष्ट्रीय नऊवारी साडी, खांद्यावर शेला किंवा‌ निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगरखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या तेव्हा त्यांना ही बिरुदावली दिली जायची.

प्रस्तुत बिरुदावली ही महाराणी लक्ष्मीबाईंची नवीनतम बिरुदावली आहे. ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाईंचे विशेष गुण आणि राजवैभवाचे चित्रण करण्यात आले आहे.

झाँसी राज दरबार बिरुदावली १८५७-५८

सावधाSSSSSन

तांबे वीरकन्या

नेवाळकर राजलक्ष्मी

बुन्देलखण्ड

धराधरीश्वरी

राजराजेश्वरी

सिंहासनाधीश्वरी

अखंड लक्ष्मी अलंकृत

न्यायालंकारमंडित

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत

राजनितिधुरंधर

झाँसी की महारानी

अखंड सौभाग्यवती

वज्रचुडेमंडित

श्रीमंत

राजमाता

विरांगणा

श्री रानी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर जू देवी

की जय हो जय हो ।

बालपण

[संपादन]

महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे भट्ट. ते रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. साताराच्या धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामींनी तांबेना सेवेत रुजू करून घेतले होते. मूळपुरूषाची समाधी मंदिराच्या परिसरात आहे. नंतर काही मंडळी दक्षिणेकडे गेली, कोट, कोलधे , खेडकुळी या भागात राहिली. तर कृष्णाजी, बळवंतराव, मोरोपंत आणि सदाशिव हे पुणे , काशी, बिठूर आणि झाशी ला वास्तव्यास राहिले. आज काही वंशज नागपूर व साताऱ्यात आहे. तांबेचा पानिपत युद्धात ही सहभाग होता.

राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे १९ नोव्हेंबर १८३५ झाला.

जन्मतिथी : श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १८९२ श्रीनृप शालिवाहन शक १७५७ मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १६१ कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी वार गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर १८३५ रात्री ३.४० काशी, वाराणसी, उत्तर प्रदेश.

तांबे व्यवसायानिमित्त पुणेसातारा येथे स्थायी झाले. तर नेवाळकर मुळनिवासी कोट ग्राम, रत्‍नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली व कालांतराने झाशी संस्थानची सुभेदारी दिली. इ.स. १८१८ नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झाशी वंशपरंपरागत घेऊन "महाराजा" ही पदवी धारण केली.

कार्य

[संपादन]

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्त्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व महाराणी लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. महाराणी लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी धोरणीपणाने लष्करी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

१९ मे इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे झाशी नरेश श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.

दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग राणी लक्ष्मीबाईंनी स्वत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.

महाराज गंगाधरराव नेवाळकर व महाराणी लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. २१ नोव्हेंबर इ.स. १८५३ मध्ये महाराज गंगाधररावांचे निधन झाले.

झाशी संस्थान खालसा

[संपादन]

ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झाशी खालसा झाल्यावर राणी लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.

झाशीचा किल्ला

नारी सेना दुर्गा दल

[संपादन]

१८५३ साली महाराणी लक्ष्मीबाई यांनी‌ महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी‌ राजमहालाच्या अंगणात महिला सेना तयार केली. ह्या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. १८५७-५८ च्या स्वातंत्र्य युद्धात ह्या नारी सेनेने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

नारी सेनेचे मुख्य सेनानी‌

राणी लक्ष्मीबाई - मुख्य अध्यक्ष

झलकारीबाई कोळी - महिला सरसेनापती

जुही देवी‌ - महिला तोफ संचालक

मोतीबाई - महिला‌ तोफ संचालक व गुप्तचर

काशीबाई कुनवीण - महिला तोफ संचालक व तलवारबाज

मुन्दरबाई खातून सुल्तान - महिला तोफ संचालक, अश्वरोही, तलवारबाज आणि धनुष्यबाण वीर

सुंदराबाई (सुंदर) - महिला तोफ संचालक व तलवारबाज

मानवतीबाई हैहयवंशी - महिला सैनिक

मालतीबाई लोधी - महिला सैनिक

ललिताबाई बक्षी - महिला सैनिक

इ.स. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध व हुतात्मा

[संपादन]

इ.स. १८५७चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले.

अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.

दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस निःशस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्याया ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज,नालदार,भवानीशंकर,कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. "गौसखान" याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.

शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.[]

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे "खुदाबक्ष आणि गौसखान" इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हणले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’

झाशी पराभवानंतर ३ एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावास पाठीशी बांधून किल्यावरू खादी उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच , काल्पी पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांबरोबर ३०-३१ मे १८५८ रोजी ग्वाल्हेरला आल्या. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ कोटा की सराय येथे येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा सारंगी नावाची घोडी घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. फुलबाग येथे बाबा गंगादास यांच्या मठात तात्या टोपे, रामचंद्र राव देशमुख, काशीबाई कुनविन, गुलमोहम्मद, बांदा नवाब बहादुर अली द्वितीय आणि युवराज दामोदर राव यांनी मुखाग्नी दिली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

इ.स. १७ जून १८५८ (शालिवाहन शक १७८० जेष्ठ शु. सप्तमी) रोजी संध्याकाळी विरांगणा राणी लक्ष्मीबाई स्वर्गसिधारी गेल्या.

१८ जूनला इंग्रज सरकारने राणी लक्ष्मीबाईंना मृत घोषित केले. आणि म्हणून आज पर्यंत १८ जूनला त्यांची पुण्यतिथी साजरी होते.

१९ जून १८५८ रोजी वर्तमान पत्राद्वारे भारत व जगभरात राणी लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूची‌ बातमी पसरली. युद्धकाळातील सर्व इंग्रज अधिकाऱ्यांचे महाराणी व्हिक्टोरिया द्वारे सन्मानित करण्यात आले. तसेच झांशी सह व ग्वाल्हेरचे अधिकार पुन्हा जियाजीराव शिंदे उर्फ सिंधिया यांस देण्यात आले.

मृत्यूतिथी : श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १९१५ श्रीनृप शालिवाहन शक १७८० मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १८४ जेष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी वार गुरुवार दिनांक १७ जून १८५८ कोटा की सराय, फुलबाग, ग्वाल्हेर,मध्य प्रदेश.

विशेष, असली चित्र आणि दामोदरराव वंश

[संपादन]

ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या. ``* रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।।

  • खूब लड़ी मर्दानी वो तो झॉंसी वाली रानी थी। ..कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान

राणी लक्ष्मीबाईंचे असली चित्र

राणी लक्ष्मीबाईंच्या सावत्र आई चिमनाबाई खानवलकर उर्फ यमुनाबाई मोरोपंत तांबे यांच्यानुसार १८५० व १८५७ साली आग्रा येथून एक चित्रकार आलेला त्याने राणी लक्ष्मीबाईंचे काही चित्र काढले.

१) इ.स. १८५० साली महाराजा गंगाधरराव यांच्या आदेशावरून हस्ती दंताच्या फलकावर वधूवेषातील राणी लक्ष्मीबाईंचे चित्र काढले. हे चित्र इ.स. १८६१ साली इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात ठेवले गेले. कालांतराने ह्या चित्राचे फोटो मागवून राणीचे भाचे गोविंदराव तांबे यांनी महाराष्ट्रीय शैलीत चित्र काढून घेतले. हे चित्र आज ही महाराष्ट्रातील नेवाळकर व तांबे कुटुंबाकडे रत्‍नागिरी येथे आहे. इ.स. २०२१ व इ.स. २०२२ साली ह्या चित्राला रंगविण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी समाजसेवक राणी झाशी इतिहासकार कुमार रितेशराजे ठाकूर यांनी केले.

२) इ.स.१८५७ साली नोव्हेंबर महिन्यात राणी लक्ष्मीबाईंचे प्रसिद्ध सारंगी नावाच्या सफेद घैडीवर बसलेले चित्र रेखाटले गेले. ते आज इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात आहे.

३) इ.स.१८६१ साली रतन कछवाहा नावाच्या झाशी राजचित्रकाराणे इंदूरच्या धनाढ्य बलिया सरदार यांच्या सांगण्यावरून एक काल्पनिक चित्र रेखाटले. त्यात राणी लक्ष्मीबाई ह्या ढाल व तलवार हाती घेतलेल्या योद्धा रूपात आहेत.

४) राणी लक्ष्मीबाईंचे सर्वत्र सिंहासनावर बसलेले चित्र पसरवले जाते. खर तर हे चित्र राणी लक्ष्मीबाईंचे नसून मराठा तंजावर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय यांची कन्या राजकुमारी मुक्तांबाबाई राणीसाहेब छत्रपती यांची आहे. मुळचित्र हे इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात उपलब्ध आहे.

झाशीच्या राणीवर लिहिली गेलेली ऐतिहासिक पुस्तके, कादंबऱ्या, काव्ये, चरित्रे, चित्रपट, नाटके

[संपादन]
  • The Queen of Jhansi (मूळ इंग्रजी. लेखिका महाश्वेता देवी) हिंदी भाषांतर : सागरी सेनगुप्ता व मंदिरा सेनगुप्ता
  • खूब लड़ी मर्दानी : झांसी की रानी (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, २०१९; प्रमुख भूमिका - अनुष्का सेन, विकास माणकताला)
  • झाशी : १८५७ - लेखक अविनाश वासुदेव पुराणिक
  • झॉंसीकी रानी : दूरचित्रवाणीवरील मालिका. हिचे १८-८-२००९ ते १९-६-२०११ या काळात ४८० भाग (एपिसोड्‌स) प्रसारित झाले होते.
  • झाशीची रणचंडी : कादंबरी : लेखक पोपटराव भसे
  • झाशीची राणी, ताराबाई मोडक, माधव जुलियन - चरित्रे तीन पुस्तके एकत्रित (ललितकला शुक्ल, १९९६)
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक दा.वि. कुलकर्णी
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वि.श्री. जोशी
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई’ : लेखक म.स. भावे
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखिका प्रतिभा रानडे
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वृंदावनलाल वर्मा
  • झाशीची वाघीण : लेखक भास्कर महाजन
  • झाशी राणी लक्ष्मीबाई : हिंदी पु्स्तक. लेखक : रामप्रसाद एन.एस.
  • झाशीची राणी : झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब ह्यांचे चरित्र : लेखक दत्तात्रेय बळवंत पारसनीस
  • मर्दानी : झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या जीवनावरील कादंबरी, लेखक : विद्याधर गोखले
  • मर्दानी रणरागिणी ... : आत्मकथा स्वरूपातील ललित पुस्तक, लेखिका मंदा खापरे
  • मनकर्णिका - दि क्वीन ऑफ झाशी (हिंदी चित्रपट, २०१७, दिग्दर्शक - केतन मेहता). या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी तात्या टोपेंचे काम केले आहे.
  • स्वोर्ड्‌स अँड स्केप्टर्स (हाॅलिवूडचा इंग्रजी चित्रपट, २०१८) (लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत, इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे) (हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये निघाला आहे.)
  • वीज म्हणाली धरतीला (नाटक : लेखक वि.वा. शिरवाडकर)
  • वीरांगना लक्ष्मीबाई : हिंदी पुस्तक. लेखक : रामाश्रय सविता
  • समरसौदामिनी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी, लेखक भा.द. खेर
  • सोहराब मोदी यांनी इ.स. १९५६ मध्ये 'झॉंसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्‍नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत (टेक्निकलर) चित्रपट होता.

राणी लक्ष्मीबाईंचे पुतळे, रस्ते, चौक, गावे आणि स्थानक

[संपादन]
  • ग्वाल्हेर येथील पवित्र समाधी स्थळ व अश्वारूढ पुतळा.
  • काशी वाराणसी येथील काशी नगरातील भदैनी गावात राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मस्थळ.
  • नवी दिल्ली येथे 'रानी झांसी मार्ग'
  • पुणे येथे छत्रपती संभाजीराजे उद्यानाजवळ जंगली महाराज मार्गावर 'राणी झांशी चौक' व 'अश्वारूढ पुतळा'
  • नागपूर येथे बर्डी मार्ग येथे 'झांशी राणी चौक' व 'पुतळा'
  • नागपूर येथे "राणी झांशी" नावाचे मेट्रो स्थानक
  • मुंबई येथील शीव/सायन स्थानकाजवळ बेस्ट बसचे "राणी लक्ष्मीबाई चौक"
  • बोरीवली‌‌ येथे 'झाशीची राणी लक्ष्मीबाई जॉग्रेस पार्क'
  • मालाड येथे 'राणी लक्ष्मीबाई मैदान व भाजी मंडई'
  • राहुरी येथे 'राणी झांशी कंपाऊंड', ओसीपीएम स्कूल
  • झांसी येथील 'वीरांगना‌ लक्ष्मीबाई झाँसी जंक्शन' नावाचे भारतीय रेल्वे स्थानक
  • कोट रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट गाव. हे नेवाळकरांचे मुळगाव. आणि महाराणी लक्ष्मीबाई ऐतिहासिक स्मारक पर्यटक स्थळ म्हणून घोषित. राणी लक्ष्मीबाई यांचे सासर म्हणून गावाला संबोधित.
  • पारोळा जळगावातील राणी लक्ष्मीबाई यांच्या नेवाळकर कुटुंबांची जहागीर. सध्या तांबे घराणे स्थायी.
  • कोलधे रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोलधे हे गाव राणी लक्ष्मीबाईंच्या तांबे कुटुंबाचे मुळगाव आहे‌. येथे आज ही तांबे घराण्यातील वंशज आहे.गावास राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर म्हणून संबोधले जाते.
  • धावडशी सातारा जिल्ह्यातील हे गाव. काही काळ‌ तांबे येथे वास्तव्यास होते म्हणून ह्या गावाला राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर म्हणून संबोधले जाते.
  • पळशी झाशी बुलढाणा जिल्ह्यातील हे एक गाव.

राणी लक्ष्मीबाईंचे नाव दिलेल्या संस्था

[संपादन]
  • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पिरंगुट (पुणे)
  • रानी लक्ष्मीबाई शाळा-समूह (लखनौ)
  • लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठ (ग्वाल्हेर)
  • महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालय (झांशी)
  • राणी लक्ष्मीबाई मध्यवर्ती शेतकी विद्यापीठ (झांशी)
  • राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय उद्यान (अंदमान-निकोबार)
  • सुभाष चंद्र बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या नावाने "राणी झाँसी" एक रेजिमेन्ट होती.
  • इ.स. १९५७ साली भारत सरकारने छापून प्रसिद्ध केलेल्या दोन पोस्टाच्या तिकिटांवर राणी लक्ष्मीबाईची छबी होती.
  • राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ (महाराष्ट्र)
  • रानी लक्ष्मीबाई सेना गुजरात नावाने महिला सशक्तीकरण करणारी संघटना. अखिल‌ विश्व‌ केसरिया परिषद राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमंत रानी नमामि पंड्या द्वारे संचालित.
  • राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), जळगाव.
  • राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), रत्‍नागिरी

राणी लक्ष्मीबाईच्या नावाचे पुरस्कार

[संपादन]
  • उत्तर प्रदेश सरकारचा रानी लक्ष्मीबाई पुरस्कार (कुस्तीविद्येत प्रवीण असलेल्या साक्षी मलिक यांना हा पुरस्कार मिळाला आहे.)
  • भारत सरकारचा राणी लक्ष्मीबाई स्त्री-शक्ती पुरस्कार
  • मध्यप्रदेश सरकार वीरता दाखविणाऱ्या स्त्रीला ’वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते. माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या बच्छेंद्री पाल यांना हा पुरस्कार मिळाला होता. (इ.स. २०१३)

हे सुद्धा पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्वान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ३९. ISBN 978-81-7425-310-1.