मल्लखांब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे.

कसरतींचा mall

कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते.

इतिहास[संपादन]

मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते. परंतु लिखित स्वरूपात हा फारसा आढळत नाही. रामायणकाळात हनुमंतानी मल्लखांबाचा शोध लावला असे सांगितले जाते. सोमेश्वर चालुक्याने सन ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांब खेळाचे वर्णन आढळते. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवे कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात आढळते. पेशव्यांनी देशभरात कुस्तीचे आखाडे सुरू केले. या आखाड्यांमध्येच त्यांनी मल्लखांबांचीही स्थापना केली.

गुराखी समाजात मलखांबाचे महत्त्व मोठे आहे. मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना २९ जानेवारी १९८१ रोजी उज्जैन, मध्यप्रदेश येथे झाली. ही राष्ट्रीय संघटना मल्लखांब फेडेरेशन (regd.) इंडिया या नावाने ओळखले जाते. तेव्हापासून आजपर्यंत भारतातील २९ राज्यांच्या राज्य संघटनांची नोंदणी झालेली आहे. प्रतिवर्षी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते.

कुस्तीच्या कामी मल्लखांबाचा उपयोग कसा व किती होतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल; पण त्याशिवाय नुसता व्यायामाचा प्रकार म्हणून देखील मल्लखांब फार वरच्या दर्जाचा मनाला जातो. या व्यायामापासून आरोग्याचा चांगला लाभ होतो.यातील कौशल्ये करताना निरनिराळ्या प्रकारे शरीर वाकवून करायची असल्याने शरीराच्या आतील इंद्रियांच्या क्रिया सुधारतात. शरीराच्या सर्व भागातील स्नायूंना उत्तम प्रकारे ताण पडून ते मजबूत होतात. या कौशल्यांमुळे शरीर लवचिक राहते.या शारीरिक कौशल्यांत पुष्कळ वेळा, खाली डोके वर पाय अशा स्थितीत राहावे लागते, त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते व आरोग्य चांगले राहते. थोडक्यात, आपल्या असे लक्षात येते, की शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मल्लखांब उपयुक्त आहे.

बाळंभट देवधर[संपादन]

दुसऱ्या बाजीरावाच्या काळातील मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर (जन्म : इ.स. १७८०; - इ.स. १८५२) यांचे नाव घेतले जाते. मुळच्या साताऱ्याच्या परंतु सध्या पुणेस्थित मनीषा बाठे यांनी ‘एक होता बाळंभट’ नावाचे बाळंभटांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात मल्लखांबाचा इतिहासही आला आहे. बडोदा येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा ३रा खंड इ.स. १९३२मध्ये प्रकाशित झाला. या खंडात बाळंभट देवधरांचे मल्लखांबाचे आद्यगुरू म्हणून उल्लेख आहे. महाराष्ट्राबाहेर उज्जैन आखाडा, झांशीग्वाल्हेर आखाड्यांचे स्मृतिअंक आणि वाराणसी येथील व्यायाम नावाच्या मासिकात बाळंभटांपासून सुरू झालेली व्यायाम परंपरा आणि मल्लखांब यांचा उल्लेख आहे. गुजराथमध्ये आजही मल्लखांब असलेले आखाडे आहेत.

मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. बाळंभट देवधरांच्या या चरित्रपुस्तकात मल्लखांब खेळासंबंधात चार पिढ्यांचा इतिहास आला आहे. इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी ‘एक होता बाळंभट’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. बडोदा, मिरज आणि वाराणसी येथे सापडलेले ग्रंथ, कागदपत्रे, आखाड्यांची इतिवृत्ते यांच्या आधारे हा चरित् ग्रंथ लिहिणे शक्य झाले.

==स्वरूप==मल्लखांबावरील कसरतींचे एकूण १६ गट मल्लखांबावरील कसरतींचे एकूण १६ गट पडतात. या प्रत्येक गटामध्ये अनेक उपप्रकार आहेत. या मूलभूत गटांचा थोडक्यात परिचय पुढे दिला आहे :

(१) अढी : मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार. मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन व शरीर उलटे करून पोट मल्लखांबांच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला ‘अढी घालणे’ असे म्हणतात. या अढ्यांतून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्नभिन्न प्रकार आहेत. अढ्यांचे एकंदर ९० च्या वर प्रकार आहेत. उदा., साधी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्याचा उपयोग कुस्तीत होतो. तसेच अश्वारोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नासयू बळकट होतात.

(२) तेढी : मल्लखांब विविध प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबास विळखा घालण्याच्या प्रक्रियेस ‘तेढी घालणे’ असे म्हणतात. तेढीनंतर अढी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल इ. ठिकाणच्या स्नायूंना व्यायाम होतो. उदा., साधी तेढी, बगलेची तेढी, एकहाती तेढी इत्यादी.

(३) बगली : मल्लखांब बगलेत निरनिरळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्यास ‘बगली’ असे म्हणतात.

(४) दसरंग : मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली यांसारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे याला ‘दसरंग’ असे म्हणतात. हा ‘दस्तरंग’ (दस्त म्हणजे कोपरापुढील हात) शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्या अढीचा वा तेढीचा दसरंग त्याप्रमाणे त्याचे नाव असते. उदा., साधा दसरंग, एकहाती दसरंग इत्यादी.

(५) फिरकी : मल्लखांबावर दसरंग करीत असताना हाताची व पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाण्याच्या क्रियेला ‘फिरकी’ असे म्हणतात. फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत.

(६) सुईदोरा : सुईमध्ये दोरा ज्याप्रमाणे ओवतात, त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला ‘सुईदोरा फिरणे’ असे म्हणतात. ह्याचेदेखील अनेक प्रकार आहेत.

(७) वेल : हाताच्या व पायाच्या विशिष्ट पकडीच्या सहाय्याने,त्या पकडी सतत बदलत हळूहळू वर चढत जाणे, या क्रियेला ‘वेल’ असे म्हणतात. झाडावर वेल जशी नागमोडी चढत जाते, त्याचप्रकारे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. उदा., साधीचा वेल, मुरडीचा वेल, नकीकसाचा वेल इत्यादी.

लाकडी स्तंभ[संपादन]

मल्लखांब हा सागवानी किंवा शिसवीच्या लाकडाचा स्तंभ. याची उंची सुमारे साडेआठ फूट असते. हा खांब दंडगोलाकार, सरळ, गुळगुळीत व वर टोकाच्या बाजूला निमुळता असतो. या प्रकाराला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत पक्का बसवलेला असतो.

टांगते मल्लखांब[संपादन]

हा मलखांबाचा हलता प्रकार आहे. छताला अडकवून खाली लोंबत असलेल्या सुती दोरखंडाचा वापर मल्लखांबासारखा केला जातो. हा दोर वीस फूट लांब असतो. या सुताच्या दोराला नवार पट्टीचे आवरण केलेले असते. त्यामुळे दोरावर पकड करणे सोपे जाते.

वेताचा मल्लखांब[संपादन]

दोराऐवजी वेताचा वापर करूनमल्लखांब बनविलेला असतो.

जुन्या काळचे प्रसिद्ध मल्लखांबपटू व प्रचारक[संपादन]

  • सरदार अनंत हरी खासगीवाले - पुणे
  • कासमभाई - पुणे
  • कोंडभटनाना गोडबोले
  • गजाननपंत टिळक - वडोदरा
  • गणेश सखाराम वझे मास्तर - पुणे
  • गोविंदराव तातवडेकर - वडोदरा
  • जुम्‍मादादा - वाराणसी
  • टके जमाल - वाराणसी
  • दामोदरगुरू मोघे - वडोदरा
  • दामोदर बळवंत भिडे - सातारा
  • धोंडो नारायण विद्वांस - वडोदरा
  • नारायणगुरू देवधर
  • बाळंभटदादा देवधर - दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा काळ (पहिला ‘आखाडा’ वाराणसी येथे स्थापन केला.)
  • भाऊराव गाडगीळ - पुणे
  • प्रा. माणिकराव
  • रंगनाथ वाटोरे - वडोदरा
  • रामचंद्र हरनाथ पेंटर - ग्वाल्हेर
  • लक्ष्मण नारायण सप्रे - वडोदरा
  • वसंत बळवंत कप्तान - वडोदरा
  • विष्णू मार्तंड डिंगरे - उज्जैन
  • हरी महादेव तथा तात्यासाहेब सहस्रबुद्धे - बडोदा

मल्लखांबाचा प्रसार करणाऱ्या संस्था[संपादन]

  • अकोला जिल्हा मलखांब संघटना
  • परभणी जिल्हा मल्लखांब संघटना
  • अखिल भारतीय निमंत्रित मलखांब स्पर्धा
  • आंतरशालेय मलखांब स्पर्धा
  • कोल्हापूर जिल्हा हौशी मल्लखांब संघटना
  • नाशिक जिल्हा मलखांब संघटना
  • प्रबोधन मल्लखांब स्पर्धा
  • भाऊसाहेब रानडे नवोदित मलखांब स्पर्धा
  • मल्लखंब निवड स्पर्धा
  • मल्लखांब जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा
  • महाराष्ट्र राज्यस्तरीय मिनी स्पर्धा
  • मॉरिशस विश्व मलखांब स्पर्धा
  • मुंबई उपनगर जिल्हा मलखांब संघटना
  • मुंबई महापौर चषक
  • रत्‍नागिरी जिल्हा मल्लखांब संघटना
  • सबज्युनिअर मलखांब स्पर्धा
  • सांगली जिल्हा हौशी मल्लखांब संघटना
  • सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन
  • साने गुरुजी आरोग्य मंदिर सांताक्रुझ (प.), मुंबई
  • हौशी मलखांब संघटना
  • मल्लिकार्जुन मल्लखांब संघटना, मलठण, ता,शिरूर जि पुणे

हे सुद्धा पहा[संपादन]

पुस्तके[संपादन]

  • म म मल्लखांबाचा महाराष्ट्राचा - श्रीनिवास हवालदार
  • व्यायाम ज्ञानकोश भाग ३ (दत्तात्रेय करंदीकर, बडोदा )
  • एक होता बाळंभट (लेखिका मनीषा बाठे)

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत