Jump to content

गंगाधरराव नेवाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झाँसी नरेश महाराधिराज श्रीमंत महाराज गंगाधरराव नेवाळकर बाबासाहेब (४ एप्रिल १७९७ - २१ नोव्हेंबर, १८५३: झांसी, उत्तर प्रदेश) हे मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार / महाराजा होते. इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या सेनानी राणी लक्ष्मीबाई या त्यांच्या पत्नी होत्या.

जन्म

[संपादन]

झांशी येथे ४ एप्रिल १७९७ साली महाराजा शिवराव‌ भाऊ नेवाळकर आणि महाराणी पद्माबाई साहेब यांचे पोटी जन्म झाला. महाराज गंगाधरराव हे त्यांचे धाकटे पुत्र‌ होय. कृष्णराव, रघुनाथराव तृतीय आणि नंतर गंगाधरराव अशी त्यांची अपत्ये होती.

कुटुंब

[संपादन]

कृष्णराव, रघुनाथराव‌ तृतीय यांच्या नंतर इंग्राजांनी‌ गंगाधररावास झांशी नरेश म्हणून सिंहासनी‌ बसविले. त्यामुळे घरातील‌ नातेवाईक राणी सखुबाई, राणी जानकीबाई, राणी लछ्छोबाई, चंद्रकृष्णराव, अली बहादुर झांसी असे सर्व‌ आप्तेष्ट राजा गंगाधररावांचे शत्रू झाले.

राज्याभिषेक

[संपादन]

रघुनाथराव तृतीय यांच्या निधनानंतर झांशी सिंहासनाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी निपुत्रिक पत्नी राणी जानकीबाई व वेश्या लछ्छोबाई पुढे आल्या. तर झांशी संस्थानाच्या मोठ्या महाराणी सखुबाई आपल्या नातू कृष्णरावास घेऊन सिंहासनावर बसण्याच्या तयारीत होत्या. परंतु इंग्रज सरकारने रघुनाथराव यांच्या लहान भावाला गंगाधररावांना उत्तराधिकारी मानले. आणि १८३८ साली श्रीमंत गंगाधरराव यांना झांशी संस्थानचे महाराज म्हणून नियुक्त केले. परंतु त्यांच्या पत्नी महाराणी रमाबाईंच्या निधनानंतर गंगाधररावांना नाममात्र राजा घोषित केले. राज्याचे अधिकार इंग्रज सरकाराकडे होते.

१९ मे १८४२ रोजी मनिकर्णिकाशी विवाह होताच इंग्रजांनी राज्याचे सर्व अधिकार महाराजांना परत दिले.

विवाह

[संपादन]

महाराज गंगाधररावांच्या पहिल्या पत्नी महाराणी रमाबाई यांचे निधन‌ झाले. संस्थानाच्या उत्तराधिकारासाठी महाराजांचा दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला. राज पुरोहित तात्या दिक्षित हे स्थळ शोधत कानपूरला गेले. तेथे बिठूर ( ब्रम्हावर्त ) येथे बाजीराव पेशवे द्वितीय यांचे सेवक मोरोपंत तांबे यांच्या शूरवीर कन्या मनिकर्णिका ह्यांच्याशी पत्रिका जुळवणी केली. पत्रिका जुळताच विवाह ठरला. मनिकर्णिका बिठूरहून झांशीला आल्या. आणि मराठा गणेश मंदिरात मराठी कऱ्हाडे ब्राह्मण पद्धतीने १९ मे १८४२ रोजी विवाह संपन्न झाला. विवाह वेळी मनिकर्णिका ७ वर्षांची तर महाराज गंगाधरराव ४५ वर्षांचे होते.‌विवाह नंतर महाराज गंगाधरराव यांनी मनिकर्णिका यांना ४० गावे आणि १० सालंकृत हत्ती भेट दिले. मराठी परंपरेनुसार मनिकर्णिकाचे नाव "राणी लक्ष्मीबाई" असे ठेवले.

पुत्ररत्न

[संपादन]

राणी लक्ष्मीबाईंचे पहिले १८५१ साली जन्मले व ते मुल अवघ्या तीन महिन्यांत दगावले. म्हणून महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांनी पारोळ्याचे जहागीरदार चुलत बंधू वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव नावाच्या मुलाला २० नोव्हेंबर १८५३ रोजी दत्तक घेतले. व त्याचे नाव‌ आपल्या मृत मुलाच्या नावावर दामोदर राव असे ठेवले.

राजा राणीचा संसार

[संपादन]

झांशीचे राजे श्रीमंत महाराज गंगाधरराव नेवाळकर बाबासाहेब हे खुप मोठे खवय्ये होते. लग्नानंतर राणी रमाबाई आणि नंतर महाराणी लक्ष्मीबाई स्वतः त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत असत. मराठी ब्राह्मण संस्कृतीनुसार अनेक प्रकारची लोणची, चटण्या, स्वादिष्ट पदार्थ तयार केले जात. त्यांच्यासाठी श्रीखंड तयार करण्यासाठी विशेष कौशल्य आवश्यक होते. अनेक मराठी स्त्रिया राणी लक्ष्मीबाईंच्या देखरेखीखाली स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ बनवत असत.

कलाप्रेमी व पुस्तकालय

[संपादन]

महाराजा गंगाधरराव‌ हे कलाप्रेमी होते. त्यांची स्वतःची रंगशाळा‌ होती.‌ त्यात ते स्वतः नाटक, नृत्य, रासलिला, रामलिला, नळ दमयंती स्वयंवर, मेनका आणि विश्वामित्र. नाटक आणि तांडव करीत असत. तसेच त्यांचा वाचनाचा छंद होता. भारतातील दुसरे मोठे पुस्तकालय महाराजा गंगाधरराव यांच्या महालात होते.

निधन व समाधी

[संपादन]

दत्तकविधीच्या दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर १८५३ रोजी ५६ वर्षांच्या महाराज गंगाधरराव यांची प्रकृती अचानक खालावली. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. महाराणी लक्ष्मीबाईंनी झांशीतील सर्व राजवैद्यांना बोलावले. सर्व प्रकारची औषधे दिली गेली, पण महाराजांची प्रकृती खालावतच राहिली. महाराणींनी झांशीतील सर्व पंडितांना महालात बोलावून महाराजांसाठी महामृत्युंजय मंत्र आणि हवन सुरू केले. झांशीच्या लोकांनीही महाराजांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत देवी महालक्ष्मी आणि गणेश मंदिरांमध्ये अखंड दिवे लावले.

दुपारी ३ वाजता झांशीमध्ये शांतता पसरली. महालावरील भगवा ध्वज खाली उतरवण्यात आला. ब्रिटिश अधिकारी महालात येऊ लागले. घाबरलेले आणि चिंतेत असलेले झांशीची रयत महालाच्या प्रवेशद्वारावर जमली. जमावाला रोखण्यासाठी महालाचे दरवाजे बंद करण्यात आले. सैनिकांनी आपापली जागा घेतली. झाशीच्या अतिरिक्त सैन्याने महालाची आणि झाशी शहराची सुरक्षा अधिक मजबूत केली. दरम्यान, महालाच्या आत राणी लक्ष्मीबाईंच्या आक्रोशाचे पडसाद उमटत होते. अश्रूंच्या कल्लोळामुळे राणी हताश झाल्या होत्या. पण जनतेला कशाचीच कल्पना नव्हती. गर्दी वाढतच होती आणि सैनिकांनाही ती नियंत्रणात ठेवता येत नव्हती. त्याच वेळी, राणीचे वडील, मोरोपंत तांबे, किल्ल्याच्या तटबंदीवर आले आणि त्यांनी जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, "झांसीवासीयांनो... शांतता राखा. आपले महाराजा गंगाधर राव यांचे निधन झाले आहे. आपण सर्वांनी राणीची काळजी घेतली पाहिजे." हे ऐकून संपूर्ण जनता रडू लागली. महालात महाराजांचे पार्थिव एका मखमली आसनावर ठेवण्यात आले. राणीने स्वतः त्यांच्या शरीराला चंदनाचा लेप लावला. महाराजांना सुगंधी तेल, अत्तर आणि राजवस्त्रे परिधान करण्यात आली. सर्व विधी महाराष्ट्रीय पद्धतीने पार पाडण्यात आले. महाराजांच्या पार्थिवावर एक हातफूल आणि झाशीचा राजध्वज ठेवण्यात आला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राजदरबारात ठेवण्यात आले.

महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी झाशी आणि कालपी आयुक्तालयाचे ब्रिटिश अधिकारी, बिठूरचे राजे, बनपूरचे राजे, काशीचे राजे, दतियाचे राजे, मोठचे राजे, चिरगावचे राजे, तसेच बुंदेलखंडचे श्रीमंत जमीनदार व ठाकूर अनुपस्थित होते. झाशीचे लोक महाराजांच्या चरणी पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहत होते.

दरम्यान, दासींनी महाराणी लक्ष्मीबाईंच्या अंगावरील दागिने काढले, त्यांच्या कपाळावरील टिळा पुसला आणि त्यांना पांढरी साडी नेसवून महाराजांच्या शेजारी बसवले. ती नाजूक, अठरा वर्षांची महाराणी तिथे एखाद्या विधवेसारखी उभी होती.

सायंकाळी ५ वाजता, ब्रिटिशांनी आपल्या सैन्यासह शाही थाटात महाराजांना आदरांजली वाहिली. झाशीच्या सैनिकांनी महाराजांना आदरांजली अर्पण केली. २१ तोफांची सलामी देण्यात आली. आणि महाराजा गंगाधर राव यांच्या अंतिम यात्रेला सुरुवात झाली. शाही हत्ती आणि घोड्यांनी महाराजांना सलामी दिली. महाराजांची अंतिम यात्रा शाही थाटात पार पडली.

किल्ल्यातील लाल बागेत महाराजांची चिता पेटवण्यात आली. महाराजा गंगाधर राव यांचे पवित्र शरीर चितेवर ठेवण्यात आले. युवराज दामोदर राव यांच्यासमवेत मोरोपंत तांबे यांनी सर्व विधी पार पाडून चिता पेटवली. आणि ५६ वर्षांचे झांशीचे महाराज श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर बाबासाहेब पंचमहाभूतांमध्ये विलीन झाले.

काही काळाने महाराणी लक्ष्मीबाई साहेब यांनी त्या ठिकाणी भव्य समाधी बांधली. समाधीला आज "महाराज गंगाधरराव की छत्री" असे म्हणतात.

अन्य

[संपादन]