Jump to content

निलज बुद्रुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?निलज बु.
Nilaj Bk
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: निलज बुज
—  गाव  —
मुख्य प्रवेशद्वार निलज बु.
मुख्य प्रवेशद्वार निलज बु.
मुख्य प्रवेशद्वार निलज बु.
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३.३३४ चौ. किमी
जवळचे शहर तुमसर, भंडारा
विभाग नागपूर
जिल्हा भंडारा जिल्हा
तालुका/के मोहाडी
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२०११ (१७३१) (२०११)
१,००१ /
८२.३८ %
• ९०.२५ %
• ७७.१२ %
भाषा मराठी
प्रथम सरपंच मारोती जगन्नाथ उरकुडे
सचिव/ग्रामसेवक
सरपंच लिलाधर नागो कांबळे
ग्रामपंचायत स्थापना १९५९
संसदीय मतदारसंघ भंडारा-गोंदिया
विधानसभा मतदारसंघ तुमसर-मोहाडी
शासकीय संघटना ग्रामपंचायत कार्यालय, निलज बु.
पोलिस ठाणे हद्द करडी (भंडारा)
न्यायालय दिवाणी व फौजदारी न्यायालय, मोहाडी
जिल्हा परिषद क्षेत्र करडी (भंडारा)
पंचायत समिति क्षेत्र देव्हाडा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१९०५
• +०७१९७
• एम एच-३६

महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात निलज बु. (Nilaj Bk) हे गाव आहे. तुमसर-साकोली राज्य महामार्ग क्रमांक ३५६ वर हे गाव वसलेले आहे. निलज बु. ला निलज बुज, निलज बुजरूक किंवा निलज बुद्रुक या नावाने ओळखले जाते. हे गाव वैनगंगा नदी काठावर वसले आहे. गावात शेतकऱ्यांची संख्या ही इतर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत अधिक आहे.[१]

लोकसंख्या

[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार निलज बु. गावाची एकूण लोकसंख्या १७३१ असून त्यापैकी ८६५ पुरुष तर ८६६ महिला आहेत. निलज बु गावात ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या १९७ आहे जी गावाच्या एकूण लोकसंख्येच्या ११.३८% आहे. निलज बु गावाचे सरासरी लिंग गुणोत्तर १००१ आहे जे महाराष्ट्र राज्याच्या सरासरी ९२९ पेक्षा जास्त आहे. २०११ च्या जनगणनेनुसार निलज बु. चे बाल लिंग गुणोत्तर १०५२ आहे, जे महाराष्ट्राच्या सरासरी ८९४ पेक्षा जास्त आहे.[२]

साक्षरता प्रमाण

[संपादन]

महाराष्ट्राच्या तुलनेत निलज बु. गावात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. २०११ च्या जनगणनेनुसार निलज बु. गावाचा साक्षरता दर महाराष्ट्राच्या ८२.३८% च्या तुलनेत ८३.७०% होता. निलज येथे पुरुष साक्षरता ९०.२५% आहे तर महिला साक्षरता दर ७७.१२% आहे.[२]

जातीचा घटक

[संपादन]

निलज बु. गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या (SC) ३.५८ % तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या (ST) एकूण लोकसंख्येच्या ०.३५% आहे. याशिवाय इतर मागासवर्गीय घटक (OBC) प्रवर्गातील नागरिक गावात राहतात.[२]

शासकीय इमारती

[संपादन]

१)ग्रामपंचायत

२)तलाठी कार्यालय[३]

३)प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

४)संत साईबाबा सार्वजनिक वाचनालय

५)जय गुरुदेव पाणी वापर सहकारी संस्था

६)विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था

७)व्यायामशाळा (जिम)

८)बस स्टॉप

९)महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलशुद्धीकरण प्रकल्प

१०)सार्वजनिक गाळे

ग्रामपंचायत

[संपादन]
२०२२ साली कार्यकाल संपलेले निलज बु येथील ग्रामपंचायत पदाधिकारी

भारतीय संविधान आणि पंचायती राज कायदा व मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५[४] अन्वये निलज बु.[५] येथे १९५९ साली ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रथम सरपंच ८ एप्रिल १९५९ पासून ते १७ मार्च १९६४ दरम्यान मारोती जगन्नाथ उरकुडे होते. निलज बु. ग्रामपंचायतीच्या प्रथम महिला सरपंचा सुशिला ताराचंद डोळस या होत्या. ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत २००३ साली महादेव गोपाळा पचघरे सरपंच असताना त्यांच्या कार्यकाळात बांधण्यात आली होती.[६]

सरपंचांची यादी

[संपादन]
अ.क्र. सरपंचाचे नाव कार्यकाल पासून कार्यकाल पर्यन्त
१. मारोती जगन्नाथ उरकुडे ०८/०४/१९५९ १७/०३/१९६४
२. हरीराम मारोती बान्ते ०२/०६/१९६९ २५/०७/१८७१
३. हरीराम लंगडा बुधे २६/०६/१९७१ २०/०८/१९८१
४. नत्थू परसराम कांबळे २१/०८/१९८९ ३१/०१/१९९२
५. काशिराम सखाराम ठवकर २५/०१/१९९३ २५/०१/१९९७
६. महादेव गोपाळा पचघरे १२/११/१९९७ ११/११/२००२
७. महादेव गोपाळा पचघरे १२/११/२००२ ११/११/२००७
८. सुशिला ताराचंद डोळस १२/११/२००७ ११/११/२०१२
९. महादेव गोपाळा पचघरे १२/११/२०१२ २०/१०/२०१५
१०. किशोर भोजराम माटे २१/१०/२०१५ ११/११/२०१७
११. स्वर्णा प्रल्हाद गाढवे[७] १२/११/२०१७ ११/११/२०२२
१२. लिलाधर नागो कांबळे

आरोग्य

[संपादन]

निलज बु. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या केंद्राला आरोग्यवर्धिनी केंद्र असेही म्हटले जाते. गावातील व परिसरातील नागरिक येथे आरोग्य सुविधा घेण्याकरिता येतात. हे रुग्णालय पूर्णपणे शासकीय आहे. इथे दररोज वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व योगशिक्षिका सेवा देण्यासाठी येत असतात. या रुग्णालयात स्त्री- प्रसुती विभाग आहे.

शिक्षण

[संपादन]

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, निलज बु.

[संपादन]
मुख्य प्रवेशद्वार : जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा निलज बु.

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, निलज बु. या शाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९४६ मध्ये झाली. शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषद भंडारा आणि स्थानिक संस्था करते. कधीकाळी परिसरातील ग्रामीण भागात महत्वाची शाली म्हणून या शाळेची ओळख होती. हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात आहे. शाळेमध्ये १ ते ७ पर्यंतचे वर्ग आहेत. शाळा सह-शैक्षणिक आहे आणि त्यात पूर्व-प्राथमिक विभाग संलग्न नाही. या शाळेत मराठी हे शिक्षणाचे माध्यम आहे. शाळेपर्यंत सिमेंटचा पक्का रस्ता उपलब्ध आहे. या शाळेतील शैक्षणिक सत्र एप्रिलमध्ये सुरू होते.[८]

शाळेला शासकीय इमारत आहे. त्यात शिक्षणासाठी ७ वर्गखोल्या आहेत. सर्व वर्गखोल्या चांगल्या स्थितीत आहेत. त्यात अशैक्षणिक उपक्रमांसाठी इतर २ खोल्या आहेत. शाळेमध्ये मुख्याध्यापक/शिक्षकांसाठी स्वतंत्र खोली आहे. शाळेला पक्की सीमा भिंत आहे. शाळेला विद्युत जोडणी आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याचा स्रोत हातपंप आहे आणि तो कार्यरत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने आरओ उपलब्ध करून दिले आहे. शाळेत मुलांचे व मुलींची शौचालय असून ते कार्यरत आहेत. शाळेला खेळाचे मैदान आहे. शाळेचे वाचनालय असून लायब्ररीत ४८४ पुस्तके आहेत. शाळेला अपंग मुलांसाठी प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी रॅम्पची उपलब्ध आहेत. शाळेत शिकवण्यासाठी आणि शिकण्याच्या उद्देशाने भेट मिळालेले संगणक आहेन पण शाळेत संगणक अनुदानित लर्निंग लॅब नाही. शाळेच्या आवारात माध्यान्ह भोजन तयार करून विद्यार्थ्यांना वितरित केले जाते.[८]

शासकीय कर्मचारी

[संपादन]
शासकीय कर्मचारी व त्यांची नावे
अ. क्र. शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्याचे नाव
१. तलाठी[३] कार्तिक हरिश सिरसकर
२. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत मोहतुरे
३. ग्रामसेवक (ग्रामपंचायत सचिव)[९]
४. मुख्याध्यापक सलाम शेख
५. कृषी सहाय्यक देवेंद्र वाडीभस्मे
६. परिचारिका तुरकर
७. योग शिक्षिका बांडेबुचे
८. ग्राम रोजगार सेवक हिवराज कनपटे
९. पोलीस पाटील रिक्त
१०. ग्रामपंचायत शिपाई संजय बांते
११. अंगणवाडी सेविका सिता पचघरे व रंजना बांते
१२. आशा सेविका (ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिविस्ट) वर्षा खोकले व पौर्णिमा गाढवे
१३. शिक्षक जाधव, ईखार, साकुरे
१४. तलाठी कोतवाल[३] भारत रोडगे
१५. अंगणवाडी मदतनीस

धार्मिक स्थळे

[संपादन]
 1. श्री विठ्ठल-रखमाई मंदिर, निलज बु.
 2. नाग मंदिर व श्री शेषराव महाराज व्यसनमुक्ती मंदिर निलज बु.
 3. श्री हनुमान मंदिर (वैनगंगा काठावर), निलज बु.
 4. मातामाई मंदिर (वैनगंगा काठावर), निलज बु.
 5. संत कबीर विज्ञान आश्रम (वैनगंगा काठावर), निलज बु.
 6. श्री हनुमान (पाटील) मंदिर, निलज बु.
 7. श्री हनुमान मंदिर (कनपटे)
 8. ध्वज पैठा
 9. शिव मंदिर (पुजारी)
 10. गौतम बुद्ध प्रतिमा
 11. प. पू. परमात्मा एक सेवक मानव मंदिर

श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर

[संपादन]

या मंदिराच्या उभारणी निलज बु. येथील दोन विठ्ठलभक्त वारकरी ह.भ.प. स्व. धर्माजी बडगे महाराज व ह. भ.प. बकारामजी देवगडे महाराज यांनी केली आहे. हे दोन्ही विठ्ठलभक्त "वारी चुको न दे हरी ।।" या संतांच्या शब्दाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे दरवर्षी न चुकता वारीला जायचे. एकदा पंढरपूरची वारी करून येतांना त्यांनी विठ्ठलाच्या संकेतप्रमाणे विठ्ठलरखुमाईची एक मूर्ती घेऊन गावात आले. गावात आल्यानंतर त्या दोघांना या मूर्तीला स्थापना स्व. मारोतीजी माटे यांच्या शेतात केली. याच मंदिरात पुढे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने येथे ह.भ.प. धनराज गाढवे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात येते.

नाग मंदिर व श्री शेषराव महाराज व्यसनमुक्ती मंदिर

[संपादन]

दशकभरापूर्वी मोहाडी तालुक्यातील निलज बु. येथील नागमंदिरात बुलढाणा जिल्ह्यातील शिरपूर येथील व्यसनमुक्तीचा संदेश देणारे शेषराव महाराज आले होते. त्यांनी गावातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या बऱ्याच लोकांना व्यसनमुक्तीचा संदेश देऊन व्यसन सोडविले. या सर्व प्रकारानंतर मंदिराची ख्याती दूरवर पोहोचली व येथे मोठ्या प्रमाणात नागरिक व्यसनातून मुक्त होण्याकरिता येऊ लागले. विशेषतः दारूच्या आहारी गेलेल्यांना दारू सोडण्यास मानसिक शारीरिक व आध्यत्मिक दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे ठरते. या ठिकाणी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील २९ व ३० तारखेला व्यसनमुक्ती मेळावा घेतला जातो. या व्यतिरिक्त नागपंचमी निमित्तानेही भाविक या ठिकाणी हजेरी लावतात.

श्री हनुमान मंदिर (वैनगंगा काठावर)

[संपादन]

निलज बु. येथील हनुमंताची मूर्ती प्राचीन काळापासून आहे. ग्रामदैवत म्हणून हनुमंताला पूजेचा पहिला मान आहे. पूर्वी निलज बुज. हे गाव वैनगंगेच्या काठावर वसले होते. तेव्हा नदीकाठावर हनुमंताचे मंदिरही होते. परंतु, दरवर्षी वैनगंगेला मोठा पूर येत असल्यामुळे लोकांचे नुकसान होत होते. त्यामुळे गावातील प्रमुख व्यक्तींनी मिळून गाव नदी काठापासून दूर वसविली. परंतु, हनुमंताचे मंदिर जुन्याच ठिकाणी राहिले. येथे दरवर्षी हनुमान जयंतीच्या निमित्ताने ह.भ.प. धनराज गाढवे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात येते.

मातामाई मंदिर (वैनगंगा काठावर)

[संपादन]

श्री हनुमान मंदिराच्या शेजारी मातामाईचे मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या पुरातन निर्गुण शिळा आहेत. येथे दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने प्रसादाचे वितरण करण्यात येते. श्रद्धेने गावातील महिला देवीला पाणी वाहून पूजा करतात.

संत कबीर विज्ञान आश्रम (वैनगंगा काठावर)

[संपादन]

वैनगंगा नदी काठावर संत कबिरांचे आश्रम आहे. येथे कबिरांचे अनुयायी मुक्कामी राहतात. या आश्रमात बाहेरून भाविक आत्मिक शांतीसाठी येतात.

सण-उत्सव व संस्कृति

[संपादन]

मस्कऱ्या गणेशोत्सव

[संपादन]

निलज बु. येथे पारंपरिक गणेशोत्सवाच्या नंतर मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली जाते. गावातील हौशी तरुणांनी मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ स्थापन करून १९८३ पासून गणपती स्थापनेला सुरुवात केली. गावात सर्वप्रथम स्व. कवडू बडगे यांच्या अंगणात गणपतीची स्थापना करण्यात आली होता. गावात पुढील पाच वर्षे ही परंपरा अविरत सुरू होती. नंतर काही तत्कालीन आर्थिक व राजकीय कारणांमुळे ३ वर्षे गावातील मस्कऱ्या गणेशोत्सवाला खंड पडला. त्यानंतर गावातील काही युवकांनी पुढाकार घेऊन १९९१ मध्ये पुन्हा मस्कऱ्या गणपतीची परंपरा सुरू केली व ही परंपरा आजही सुरू आहे. मस्कऱ्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने गावात रांगोळी स्पर्धा, दांडपट्टा, संगीत नाटक, तमाशा, कव्वाली, भजन-कीर्तन स्पर्धा, विविध मैदानी खेळांचे आयोजित करण्यात येते. पूर्वी गणेशोत्सवात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. या निमित्ताने मुलांना आपल्या अंगातील कलागुणांचे प्रदर्शन करून शाब्बासकी मिळत होती. यामुळे गावात अनेक कलाकार नावारूपास आले..[१०]

निलजची मंडई

[संपादन]
भाऊबीजेच्या निमित्ताने झाडीपट्टीतील उपकार संगीत हे संगीत नाटक सादर करताना निलज बु. येथील कलावंत

दिवाळीच्या निमित्ताने निलज बु. येथे भाऊबीजेच्या निमित्ताने पहिलीच्या मंडईचे आयोजन करण्यात येते. निलज बु येथे भाऊबीजेच्या दिवशी व त्रिपुरारी पौर्णिमरच्या नंतर मंडईचे आयोजन करण्यात येते. गावात या निमित्ताने जत्रेचे वातावरण पहायला मिळते. तस बघितलं तर गावात दिवाळी उत्सवाची खरी मजा ही मंडई उत्सवाची असते.[११]

गावात मंडई निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये नाटक, तमाशा, दंडार, गोंधळ, कव्वाली, आमदंगल आणी आंबट शौकीनांसाठी लावणीचा आड डान्स हंगामा आयोजित केला जातो. या निमित्ताने गावातील युवक गावात नाटक सादर करतात.[११]

इतर सेवा

[संपादन]
 • स्व. पारबताबाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्था
 • स्व. पारबताबाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्था धान खरेदी केंद्र
 • वंचळा दुग्ध डेअरी
 • सूर्या दुग्ध डेअरी
 • सार्वजनिक सभागृह
 • सेतू केंद्र
 • भारतीय स्टेट बँक - ग्राहक सेवा केंद्र

क्रीडा

[संपादन]

गावातील मुलांना खेळण्यासाठी शाळेच्या शेजारी (सोनारा वावरात) मोठे त्रिकोणी मैदान आहे. या मैदानात शाळेतील विद्यार्थ्यांना व गावातील मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध आहे. मुलं इथे क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लगोरी, रनिंग, इतर खेळ खेळतात. पूर्वी याच मैदानात दसऱ्याला रावण दाहनाच कार्यक्रम आयोजित केला जायचा. पूर्वी गावातील जेष्ठ नागरिक बैलगाडा शर्यतीत (पट) भाग घ्यायचे. गावातील युवक दरवर्षी कबड्डी सामन्यांचे आयोजन करतात.[१२]

गावातील खाद्यसंस्कृती

[संपादन]

गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी राहत असल्याने स्थानिकांची खाद्यसंस्कृती शेतीशी निगडित आहे. गावातील लोकांच्या नाश्त्याच्या पोहे, उपमा, उसळ, तळला भात यांसारखे पदार्थ असतात. तर जेवणात ऋतूनुसार अन्नपदार्थ बदलत असतात. जेवणात प्रामुख्याने भात, पोळी, विविध प्रकारच्या भाज्या असतात. गावात दुधाचे मुबलक प्रमाणात उत्पादन होत असल्याने दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ जेवणात असतात. नवीन तांदळापासून तयार होणाऱ्या 'आक्ष्या', 'कोसल्या', मुठे, धापुडे (थालीपीठ), घिऊर व इतर पदार्थ हिवाळा ऋतूत बनवले जातात.

बाजारपेठा

[संपादन]

गावापासून ३ किलोमीटर अंतरावर देव्हाडा बु. हे बुधवारी भरणारे आठवडी बाजार आहे. या व्यतिरिक्त गावापासून ५ किलोमीटर अंतरावर करडी येथे सोमवारी भरणारे आठवडी बाजार आहे. नव्याने सुरू केलेले मोहगाव येथे रविवारी भरणारे आठवडी बाजारही लोकांच्या आवडीचे आहे. शेतकऱ्यांना शेतातील होणारे उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर अथवा धान खरेदी केंद्रांवर विकावे लागते.  कोणालाही मोठी वस्तू खरेदी करायची असल्यास त्याला गावापासून १२ किलोमीटर अंतरावर तुमसर शहरात जावे लागते. अनेक लोक मोठ्या खरेद्यांसाठी भंडारा, गोंदियानागपूर या शहरांचा ही आसरा घेतात. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने खरेदी केलेला समान गावात थेट घरपोच मिळतो.

दळणवळण

[संपादन]

रस्ते

[संपादन]

निलज बु. गावाच्या हद्दीतून तुमसर-देव्हाडा बु- करडी -साकोली राज्यमार्ग क्रमांक ३५६ (SH-356) जातो. या राज्यमार्गापासून ते गावापर्यंत दीड किलोमीटरचा ग्रामीण मार्ग क्रमांक ४३ आहे. गावापासून ३ किलोमीटर अंतरावर रामटेक-तिरोडा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-७५३ (NH-753) आहे. हा राष्ट्रीय महामार्ग देव्हाडा बु. चौकात साकोली राज्यमार्गाशी जुळतो.

रेल्वे सेवा

[संपादन]

गावापासून ८ किलोमीटर अंतरावर तुमसर रोड (देव्हाडी) रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून हावडा, मुंबई, पुणे, अमृतसर, चेन्नई, दिल्ली इतर मार्गांच्या रेल्वेगाड्या सहज उपलब्ध आहेत.

बस सेवा

[संपादन]

गावाच्या हद्दीतील साकोली - तुमसर राज्यमार्गावर बस स्टॉप आहे. या बस थांब्यावरून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तुमसर, साकोली, पालांदुर, करडी, कोका, मुंढरी, साठी बस उपलब्ध आहेत. तिरोडा, गोंदिया किंवा भंडारा शहरात जायचे असल्यास करडी किंवा देव्हाडा बु. चौकातून बस बदलावी लागते.

ऑटो सेवा

[संपादन]

आधी तुमसर ते करडी दरम्यान टम-टम (डुक्कर) ऑटो चालायचे. सध्या बस स्टॉप वरून जवळच्या अंतरासाठी ओमनी अथवा ई-रिक्षा उपलब्ध असते.

बैलगाडी

[संपादन]

शेतकरी बहुल गाव असल्याने गावातील शेतकरी शेतावर जाणे-येणे करण्यासाठी बैलगाडीचा वापर करतात. निलज बु. गावात आजही बैल आहेत. शेतावरील पीक आणणे, शेतावर खत पोहचवणे, गुरांचे वैरण घरी आणणे इत्यादी कामांसाठी बैलगाडी सोयीची ठरते.

दुचाकी

[संपादन]

गावातील अनेक घरी दुचाकी असून ती चालवणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.

सायकल

[संपादन]

निलज बु. येथील बरेच लोक सायकल चालवताना नजरेस पडतात.

ट्रॅक्टर

[संपादन]

गावात ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात असून यांचा वापर शेती व मालकीसाठी केला जातो.

कृषी

[संपादन]

देशाप्रमाणे निलज बु. हे कृषी प्रधान गाव आहे. गावात ९०% पेक्षा जास्त नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. गावात भात (धान किंवा तांदूळ), ऊस, गहू , पावटा (पोपट), जवस, लाखोरी, हरभरा (चना), तूर, मसूर, मुग, इत्यादी पिके घेतली जातात. यासोबतच निवडक शेतकरी फळशेती करतात. प्रामुख्याने वैनगंगा नदीच्या काठावर पेरूबोरीची बाग आहेत. येथील पेरू राष्ट्रीय महामार्गावर विक्रीसाठी ठेवले जातात. त्यासोबतच वैनगंगा नदी पात्रात उन्हाळ्यामध्ये काकडी, टरबूज, खरबूज इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

भातशेती (धान)

[संपादन]
निलज बु. परिसरात यंत्राद्वारे धानाची (भात) मळणी

निलज बु व परिसरात 'सिहार' प्रकारची मृदा असल्याने येथे भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भात शेतीच्या सिंचनासाठी विहीर, बोरवेल, नदीचे पाणी व तलावाच्या पाण्याचा वापर केला जातो.[१] धानाच्या विक्रीसाठी धान खरेदी केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे नेले जाते. अनेकदा पाऊस व चक्रीवादळामुळे निलज बु. येथील धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते.[१३][१४]

फलोत्पादन

[संपादन]

निलज बु. गावाच्या बाहेर वैनगंगा नदी काठावरचा पट्टा गाळाच्या मातीचा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पेरू व बोरीच्या बागा आहेत. कधी काळी येथील पेरू नावानेच विकले जायचे. आजही येथील पेरू राष्ट्रीय महामार्गावर विक्रीसाठी ठेवले जातात.

निलज बु. परिसरात असलेल्या मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड युनिट-४ देव्हाडा बु.साखर कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन घेतले जाते. गावाशेजारी साखर कारखाना असल्याने गावात ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. सिंचनाच्या साहाय्याने वेगवेगळ्या जातीचे ऊस येथे पिकवले जाते व गळीत हंगामात साखर कारखान्याला विकले जाते.[९]

भाजीपाला शेती

[संपादन]

गावातील बहुसंख्य शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात. यात प्रामुख्याने वांगे, टमाटर, मिरची, शेंगा, कोथिंबीर, लाल माठाची भाजी, मेथी भाजी, चवळी भाजी, गवार शेंगा आणि भाजीचा शेतात लावला जातो.

सिंचन

[संपादन]

महाराष्ट्र राज्यातील उपसा सिंचन प्रकल्प सौरऊर्जेवर चालविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा उपसा सिंचन प्रकल्प भंडारा जिल्ह्यात प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने निलज बु. येथे या प्रकल्पासाठी १४ ऑगस्ट २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर सुमारे १०० हेक्टर शेतजमिनीला लाभ मिळेल.[१५]

येथे वैनगंगा नदीकाठावर ही प्रस्तावित उपसा योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. गावात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कालव्यांची निर्मिती आधीपासूनच करण्यात आली आहे. त्यामुळे येथे नव्याने कालवे निर्माण करण्याची गरज पडणार नाही. या योजनेतून लघु पाटबंधारे विभागाच्या तलावाचे पूनर्भरण करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी शासनाने १ कोटी ५५ लक्ष रुपयांच्या निधीला मान्यता दिली होती. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येणार. प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाणीवापर संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. तसेच दुरुस्तीचा खर्च हा शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे.[१५][१६]

खनिज संपत्ति

[संपादन]

निलज बु. परिसरातून वाहणाऱ्य वैनगंगा नदीत मोठ्याप्रमाणात शुभ्र वाळू (रेती) उपलब्ध आहे. येथील वाळू नागपूर शहरात बांधकामासाठी नेली जाते.[१७][१८][१९]

दिवाबत्तीची सोया

[संपादन]

निलज बु. गावात दिवाबत्तीची सोय महावितरणच्या माध्यमातून करण्यात येते. महावितरण करडी उपकेंद्र अंतर्गत गावात विद्युत पुरवठा होत असतो. कृषी फिडरसाठी वेगळी वाहिनी टाकण्यात आलेली आहे. शेतीसाठी ८ तास वीज पुरवठा देण्यात येतो. गावातील पथदिव्यांचे नियोजन ग्रामपंचायत कार्यालय करते.

जवळची गावे

[संपादन]

मोहगाव, करडी, देव्हाडा बु., नरसिंह टोला, निलज खुर्द, नवेगाव बु., मुंढरी खुर्द, मुंढरी बु., पांजरा, पालोरा, जांभोरा, जांभळापाणी, मनोरा, इत्यादी[६][१८]

संदर्भ

[संपादन]
 1. ^ a b माझा, हरीश मोटघरे, एबीपी (2022-03-09). "वाईन विकण्याची परवानगी द्या, भंडाऱ्यातील शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र". marathi.abplive.com. 2022-12-18 रोजी पाहिले.
 2. ^ a b c "Nilaj Bk Village Population - Mohadi - Bhandara, Maharashtra". www.census2011.co.in. 2022-12-18 रोजी पाहिले.
 3. ^ a b c Navarashtra (2022-04-14). "Bhandara | २६ गावांचा डोलारा ४ तलाठी व २ कोतवालांच्या खांद्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष तातडीने पदे भरण्याची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)". Navarashtra. 2022-12-18 रोजी पाहिले.
 4. ^ "ग्रामपंचायत". विकिपीडिया. 2022-12-08.
 5. ^ "करडी जि. प. क्षेत्रातील आगामी ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार -" (इंग्रजी भाषेत). 2022-11-01. 2022-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-19 रोजी पाहिले.
 6. ^ a b "Nilaj Bk Village in Mohadi (Bhandara) Maharashtra | villageinfo.in". villageinfo.in. 2022-12-18 रोजी पाहिले.
 7. ^ "कोरोनाच्या धास्तीत या ग्रामपंचायतला लागले कुलूप...सांगा बरे शेतकऱ्यांची कामे कशी होणार?". eSakal - Marathi Newspaper. 2022-12-19 रोजी पाहिले.
 8. ^ a b "Z.P. UPPER PRIMARY SCHOOL NILAJ (BUJ) - Nilaj (bu), District Bhandara (Maharashtra)". schools.org.in (इंग्रजी भाषेत). 2022-12-19 रोजी पाहिले.
 9. ^ a b "View Article". epaper.esakal.com. 2022-12-18 रोजी पाहिले.
 10. ^ "मस्कऱ्या गणपतीने दिली या गावाला ओखळ...३५ वर्षांपासूनची परंपरा..वाचा सविस्तर". eSakal - Marathi Newspaper. 2022-12-18 रोजी पाहिले.
 11. ^ a b "Bhandara : मंढईची रेलचेल; गोड-आंबट शौकीनांसाठी पर्वणी". eSakal - Marathi Newspaper. 2022-12-18 रोजी पाहिले.
 12. ^ "Sakal Epaper". epaper.esakal.com. 2023-01-12 रोजी पाहिले.
 13. ^ "साहेब वाईन विक्रीस परवानगी द्या; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचे उद्धव ठाकरेंना पत्र". Maharashtra Times. 2022-12-18 रोजी पाहिले.
 14. ^ author/lokmat-news-network (2022-03-10). "'शेती परवडत नाही, दारु विकू द्या' भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची अजब मागणी". Lokmat. 2022-12-18 रोजी पाहिले.
 15. ^ a b "निलजमध्ये राज्यातील पहिला सौरउर्जा सिंचन प्रकल्प". Maharashtra Times. 2022-12-18 रोजी पाहिले.
 16. ^ "निलज बु येथे राज्यातील पहिला सौरउर्जा सिंचन प्रकल्प" (PDF).
 17. ^ author/lokmat-news-network (2021-03-09). "निलज बुज रेतीघाट विरोधात शिवसेनेचा हल्लाबोल". Lokmat. 2022-12-18 रोजी पाहिले.
 18. ^ a b "करडी परिसरात रेती चोरीला उधान". www.tarunbharat.net. 2022-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-19 रोजी पाहिले.
 19. ^ "भंडारा : रेती तस्करांनी केली निलज बु. गावातील पांदण रस्त्याची दुरवस्था; चिखलमय रस्त्याने शेतकरी त्रस्त". Loksatta. 2023-08-01. 2023-08-01 रोजी पाहिले.