तमाशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ (प्रयोग) गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.

तमाशातील वाद्य[संपादन]

तमाशा हा एक लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रात परंपरेने प्रचंड लोकप्रिय असून त्यातली लावणीगायन आणि लावणीनृत्य विशेष लोकप्रिय आहेत. तमाशातले महत्त्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि तुणतुणे. भारूड, गोंधळ, पोवाडा (१३ व्या शतकात होऊन गेलेला शारंग देव याने प्रथम पोवाड्याची बांधणी केली होती.) सारंगी, बासरी अशीही काही वाद्य महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. अशी अनेक मराठी लोकसंस्कृतीची भरजरी रूपे महाराष्ट्रात पहायला मिळतात. मृदंग, वीणा, तंबोरा, झांज हे वारकरी लोकपरंपरेतले वाद्य असून सनई, चौघडा, तुतारी हे राजकीय परंपरेतले वाद्य आहेत. ढोल, तुणतुणे, पावरी, खंजिरी, सांबळ, थाळी, किंगरी आदी आदिवासी परंपरेतून आलेले आहेत.

 • मराठवाड्यातील लोककला आणि लोकनाट्याची परंपरा:-*

मराठवाड्याला लोककला आणि लोकनाट्याची समृद्ध परंपरा आहे.कीर्तन, भजन, भारुड, वासुदेव, जागरण, गोंधळ, बहुरूपी, सोंगे इत्यादी लोककला प्रकार मराठवाड्यातील प्रमुख लोककला प्रकार आहेत. ग्रामीण नाटकात ग्रामीण जीवनाचे चित्रण करताना लोककला हा रंगभूमीचा फॉर्म अधिक जवळचा असल्याने लोकनाट्य अंगाने अनेक लेखकांनी नाटके लिहिली आहेत. प्रा.चंद्रकांत भालेराव यांनीही वगनाट्य लिहिली आहेत. इश्काच्या पायी बुडाले, हे त्यांचे एक उत्कृष्ट वगनाट्य .गणेश स्तवन करणारा गण न वापरता त्यांनी जनगणनायक अर्थात रसिकांनाच नमन केले आहे. चंद्रसूर्याचा वग अर्थात काळ्या दगडावरची रेघ ,नाक दाबलं तोंड उघडलं अर्थात झालं गेलं विसरून जा, असे तमाशाच्या वगाप्रमाणे दोन दोन नाव असलेली वगनाट्य प्रा.भालेराव यांनी लिहिली आहेत.लोककलेचा मानबिंदू असणारे थोर संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकरंगभूमीवर विपुल लेखन केले आहे. लोकनाट्य म्हणताच त्याचे नाव घेणे अपरिहार्य ठरते. ते म्हणजे हरहुन्नरी कलाकार लेखक शाहीर विश्वास साळुंखे . शाहीर साळुंखे यांनी भरपूर वगनाट्य लिहिली. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांवर, भ्रष्टाचार कसा होतो, सामान्य माणसाची कशी लुबाडणूक होते हे दर्शवणारे अनेक प्रयोग केले. त्यांचे पैशाला अनेक वाटा, झगडा लोकनाट्य प्रचंड गाजली. राजकारण, समाजकारण अंधश्रद्धा असे अनेक विषय हाताळले. शाहीर साळुंके यांनी झगडा हे नाट्य दलित प्रश्नावर लिहून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. सगळ धाब्यावर बसवलं, खाली डोकं वर पाय, कॉलर ताठ बायका साठ अशी अनेक वगनाट्य शाहिरी विश्वास साळुंखे यांच्या नावावर आहेत. लोककलावंत, संशोधक, अष्टपैलू व्यक्तीमत्व डॉ. रुस्तुम अचलखांब यांचे नाव लोकरंगभूमीवर कोरले गेले आहे ते त्यांनी सादर केलेल्या गाढवाचं लग्न, आंबेडकरी शाहिरीचे रंग, आणि रंगबाजी या कलाकृतींमुळे बेबंद नगरी हे डॉ. देवदत्त म्हात्रे यांचे एक राजकीय विडंबन असलेले लोकनाट्य होय. गाढवानं वाचली गीता हे सूर्यकांत सराफ यांचे प्रसिद्ध लोकनाट्य आहे. टेम्भुर्णी येथील मूळचे असणारे आणि सध्या मुबंई लोककला अकादमीचे प्रमुख असणारे लोककलेचे संशोधक डॉ. गणेश चंदनशिवे लोककला सातासमुद्रापार पोचवत आहेत. गोंधळमहर्षी राजाराम कदम गोंधळी यांनी गोंधळाला प्रतिष्ठा मिळवून दिली. भारुडरत्न निरंजन भाकरे, खंजिरीवादक भारूडकार मीरा उमाप लोकप्रबोधन करीत आहेत. शाहीरमहर्षी अंबादास तावरे, शाहीर सुरेश जाधव, शाहीर प्रवीण जाधव, शाहीर अरविंद घोगरे, शिवकर्तनकार डॉ. गजानन महाराज व्हावळ लोकप्रबोधन करीत आहेत. लोककलेचे अभ्यासक डॉ. राजू सोनवणे, डॉ. ज्ञानेश्वर उंडनगावकर, डॉ. गहिनीनाथ वळेकर, डॉ. शिवाजी वाघमारे, योगेश निकम चिकटगावकर, विकास एडके आदी मंडळी लोकरंगभूमीवर कार्यरत आहेत.

गण[संपादन]

गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. तमाशाचा खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून तमाशाचा सरदार म्हणजे मालक हे आवाहन करतो, सर्व साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवतात आणि सुरत्ये ध्रुपदाचा अंतिम सूर झेलून उंचावर नेतात.

गौळण[संपादन]

गण संपल्यावर काही काळ ढोलकी व कडे यांचे वादन होते. ढोलक्याची लय पुरेशी अंगात भिनल्यावर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते आणि मग गौळण. गौळणींचा विषय असतो श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला. नर्तकी या गोपी होतात आणि त्यांच्यामध्ये वयस्कर असणारी एक ‘मावशी‘ असते. या गोपी मथुरेला दूध, दही, लोणी वगैरे घेऊन जात असतात आणि वाटेत श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी किंवा पेंद्या त्यांना अडवतो. या पेंद्याचे काम करणारा बहुधा सोंगाड्या (हास्य कलाकार) असतो. या वेळेस या दोन पक्षांमध्ये जे विनोदी संवाद होतात ते ऐकून प्रेक्षक खदखदून हसतात. पौराणिक काळाला आधुनिक संदर्भ देऊन केलेला ह्या गौळणी हास्य व शृंगार रसाने ठासून भरलेल्या असतात.

फार्स[संपादन]

एकेकाळी ग्रामीण भागातील मनोरंजनाचा हुकमी एक्का असलेला तमाशा व त्यातील गण, गौळण, बतावणी आणि फार्स काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी त्यांचे दस्ताऐवजीकरण करण्याचे मोलाचे काम सोपान खुडे यांनी ‘तमाशातील फार्सा’ हे पुस्तक लिहून केले आहे. ‘तमाशातील फार्सा’ विषयीची त्यांनी दुर्मिळ अशी माहिती जुन्या जाणत्या तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेऊन मिळवली आहे. या पुस्तकामध्ये ‘फार्सा’बरोबरच लेखकाने गण, गौळण, रंगबाजी, मुजरा, बतावणी आणि वगाविषयी माहिती देऊन, शाहीर पठ्ठे बापूराव, रामा-नामा लबळेकर, सखाराम कोऱ्हाळकर, दत्तोबा तांबे, तुकाराम खेडकर, जगताप पाटील-पिंपळेकर, काळू-बाळू कोल्हापूरकर, दादू इंदुरीकर, किसन कुसगावकर, दगडोबा कोऱ्हाळकर आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या अल्प परिचयाबरोबरच त्यांनी त्यांच्या तमाशात सादर केलेल्या बतावणी फार्साचे काही नमुनेही सदर पुस्तकात दिलेले आहेत. पुस्तक पुण्याच्या देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर यांनी लिहिलेले फार्स विविध तमाशा फड मालकांनी संपूर्ण महाराष्ट्रात सादर करून लोकप्रिय केले. मोमीन कवठेकर यांनी लिहिलेला 'लंका कोणी जाळली !' हा फार्स खूप प्रसिद्ध होता आणि 1980 मध्ये मुंबईत झालेल्या तमाशा लेखकां च्या स्पर्धेत या फार्सला प्रथम क्रमांकाचे 'छोटू जुवेकर पुरस्कार' मिळाला होता.

सवालजवाब[संपादन]

मंचावर जर दोन फडांचे (तमाशामंडळांचे) तमासगीर एकाच वेळी असतील तर त्यांच्यांतील सरसनीरस ठरवण्यासाठी त्यांच्यामधे आपाआपसात सवालजवाब होतात. बहुधा पौराणिक कथांवर आधारलेले कूटप्रश्न एकमेकांना काव्यांतून विचारून त्यांची उत्तरे ओळखण्याचा हा कार्यक्रम असतो.

रंगबाजी[संपादन]

मंचावर होणारे शृंगारिक लावण्यांचे सादरीकरण म्हणजेच रंगबाजी. मंचावर एकापेक्षा अधिक फडांचे तमासगीर असतील तर त्या रंगबाजीला संगीतबारी म्हणतात. याबरोबरच गायक विविध प्रकारची लोकगीते सादर करतात. ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन कवठेकर यांनी लिहिलेली बरीच गीते ही दत्त महाडिक पुणेकर यांनी संगीतबद्ध करून आपल्या कार्यक्रमांतून सादर केली[१]. मोमीन कवठेकर लिखित आणि आजही लोकप्रिय असणारी काही लोकगीते :

 • “सारं हायब्रीड झालं... ”
 • “हे असंच चालायचं... ”
 • “खरं नाही काही हल्लीच्या जगात... ”
 • “फॅशनच फॅड लागतंय गॉड... ”
 • “लंगडं.. मारताय उडून तंगडं!”
 • “लई जोरात पिकलाय जोंधळा... ”
 • “मारू का गेनबाची मेख…”
 • “बडे मजेसे मॅरेज किया…”
 • “महात्मा फुल्यांची घेऊन स्फूर्ती, रात्रीच्या शाळेला चला होऊ भरती”

वग[संपादन]

वग म्हणजे नाट्यरूपाने सादर केलेली कथा. या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा असतात. या कथांमधील संवाद लिखित नसून पात्रांनी ते केवळ स्वतःच्या बुद्धीने म्हणायचे असतात. अधूनमधून समयसूचकतेने शेरे मारणारा सोंगाड्या इथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. सोंगाड्यामुळेच वगाद्वारे सांगितल्या जाणाऱ्या कथावस्तूला चांगली रंगत येते. सोंगाड्या हा उत्कृष्ट नकलाकार असतो. तो हजरजबाबी असावा लागतो. तो प्रेक्षकांची करमणूक तर करतोच पण त्याचबरोबर समोर घडणारे प्रसंग ही खरेखुरे नसून नाटकी आहेत याची जाणीव करून देणे, त्या प्रसंगाची आधुनिक काळाशी सांगड घालणे, सद्य जीवनावर भाष्य करणे, प्रतिष्ठितांचा दंभस्फोट करणे आणि प्रसंगी सादर होत असलेल्या नाटकाचे विडंबन करणे ही कामेही तो करीत असतो. आपल्या लेखणीने तब्बल पाच दशके तमाशा सृष्टीला वगनाट्य आणि लावण्या पुरवणारे ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर लिखित खालील वगनाट्ये ही महाराष्ट्राच्या पसंतीस पडली:[२]

 • इष्कानं घेतला बळी
 • तांबडं फुटलं रक्ताचं
 • बाईने दावला इंगा
 • सुशीला, मला माफ कर
 • भंगले स्वप्न महाराष्ट्राचे
 • भक्त कबीर

अण्णाभाऊ साठे हे एक झपाटलेले लेखक होते. अवतीभोवती पसरलेले अफाट दु:ख, दारिद्रय व अज्ञान हेच त्यांच्या चिंतनाचे व लेखनाचे विषय होते. त्यांचे साहित्य विपुल आहे. त्यांचे तेरा कथासंग्रह, तीन नाटके, चौदा लोकनाट्ये, पस्तीस कादंबर्‍या, दहा पोवाडे आणि एक प्रवासवर्णन असे एवढे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या सात कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले आहेत. केवळ वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी हे साहित्य निर्माण केले.

अण्णा भाऊ हे स्वत: रंगकर्मी होते. त्यांनी केवळ नाट्यलेखनच केले नाही; तर रंगमंचावरील सादरीकरणदेखील केले. अण्णा भाऊंनी वग नाटकांमधूनही स्त्रीप्रश्नाला मध्यवर्तीत्व देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वगनाट्य भांडवलदारी समाजरचनेत भरडल्या जाणार्‍या गरीब-शेतमजूरांच्या प्रश्नांची उकल करणारे आहेत.

अण्णाभाऊंच्या वगनाट्यात पोटतिडीक आहे. त्यांची वर्गसंघर्षाची जाणीव सखोल व उत्कट होती. त्यांचा आवाज हा दलित शोषितांचा आवाज होता. दलित हा शब्द त्यांनी व्यापक अर्थाने वापरला आहे. जो जो शोषित व पीडित तो तो दलित! समाजाच्या तळागाळातला माणूस हा त्यांच्या साहित्याच्या विषय होता. तो त्यांच्या वगनाट्य-कथा-कादंबर्‍याचा नायक होता. अन्यायाच्या शृंखला तोडण्याचे आवाहन त्यांच्या वगनाट्यात आहे. अण्णा भाऊंना मार्क्सचे तत्त्वज्ञान प्रिय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला विद्रोह त्यांना लढण्याची प्रेरणा देत होता. घाव घालून जग बदलण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी या दोन महामानवांकडून घेतले होते. देशातील धनदांडग्यांनी, जातदांडग्यांनी व धर्मदांडग्यांनी ज्यांचे शोषण केले त्या दलितांच्या बाजूने ते ठामपणे उभे होते. शोषकांवर व त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर त्यांची लेखणी आघात करते. कामगारांच्या लढ्यात तिने प्रेरकाचे काम केले. कामगारांच्या लढ्याने त्यांच्या मनात विश्वबंधुत्वाची भावना निर्माण केली होती.

तमाशा कलावीर शाहिरीत आणून अण्णांनी जशी प्रचारकार्याला गती दिली तशी शाहिरी परंपरेला लोकनाट्याची अक्षय किमया दिली. ‘ देशभक्त घोटाळे', ‘खापऱ्या चोर’, ‘पुढारी सापडला’, ‘शेठजीचे इलेक्शन’ आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात लोकप्रिय झालेले ‘माझी मुंबई’ अशी अनेक लोकनाट्य-वगनाट्य लिहून सादर केली.

जुन्या काळी गाजलेले वग[संपादन]

 • उमाजी नाईक
 • तंट्या भिल्ल
 • मिठाराणी
 • मोहना-छेलबटाऊ
 • शेठजीचे इलेक्शन
 • देशभक्त घोटाळे
 • खापऱ्या चोर
 • पुढारी सापडला

उल्लेखनीय तमासगीर आणि त्यांचे फड[संपादन]

गुलाबबाई संगमनेरकर:- लोककलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना महाराष्ट्र शासनाने २०१९-२० या वर्षीचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. तमाशाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कलेवर श्रद्धा ठेवून तमाशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुलाबबाई यांनी लहानपणीपासूनच लावणी नृत्यकलेत स्वतःला झोकून दिले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली. गुलाबबाई संगमनेरकर सुरुवातीला राधाबाई बुधगावकर पार्टीत काम करत होत्या.अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे . बबूताई शिर्डीकर, सुगंधाबाई सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले. दुर्लक्षित राहिलेल्या या कलाप्रकारावर उदरनिर्वाह चालविताना गुलाबबाईंना त्याचा अभ्यास, शास्त्रीय व कलात्मक दर्जा ओळखून यशवंतराव चव्हाण, जयश्री गडकर, यशवंत दत्त यांसारखे चाहते लाभले. त्यांचे कार्यक्रम मुंबई-दिल्ली दूरदर्शनहून प्रसारित करण्यात आले होते. त्यांनी परदेशी पर्यटकांसमोर ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यात सहभाग घेतला. आपल्या अभिनय व नृत्य कलेने त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ लोककलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना यंदाचा (२०२०) तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. रुपये पाच लाख, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो . त्या मराठी तमाशा परिषदेच्या सदस्य आणि पुण्यातील लावणी विकास संघाच्या मानद अध्यक्ष आहेत. गुलाबबाई संगमनेरकर यांचे तमाशा क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.

तमाशातील अजरामर नाच्या :- गणपत पाटील

मराठी नाटय-चित्रपट अभिनेते मा.गणपत पाटील यांचा जन्म १९१९ साली कोल्हापूर येथे झाला.

तमाशापटांतील ’नाच्या’च्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अश्या परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.

दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले. त्या सुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली. चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले. मा.गणपत पाटील यांचे २३ मार्च २००८ रोजी निधन झाले.

गणपत पाटील यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीवर ' रंग नटेश्वराचे' हे पुस्तक लिहिले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर यांनी तब्बल ५० वर्षे तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक आणि समाजोपयोगी साहित्य पुरवले. लावणी, गण, गवळण, पोवाडे, सवाल जवाब आणि वगनाट्य अशा सर्व प्रकारच्या लेखांतून त्यांनी भरीव असे योगदान दिले. महाराष्ट्र सरकारने त्यांना २०१८-१९ सालच्या "तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित केले आहे[३].

उल्लेखनीय तमाशा मंडळे[संपादन]

 • आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ
 • काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ
 • दत्ता महाडिक लोकनाट्य तमाशा मंडळ
 • पांडुरंग मुळे यांच्यासह आविष्कार मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ
 • भिका-भीमा लोकनाट्य तमाशा मंडळ
 • मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ
 • मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ
 • रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ
 • विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ
 • शिवराम बोरगावकर यांच्यासह बाबुराव बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ
 • हरिभाऊ बडे-नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ.

तमाशा या विषयावरील मराठी पुस्तके[संपादन]

 • तमाशा : कला आणि जीवन (डॉ. सुनील चंदनशिवे)
 • वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर - ( डॉ. संतोष खेडलेकर)
 • कलावंतांच्या आठवणी (बी.के.मोमीन कवठेकर)
 • गाभुळलेल्या चंद्रबनात (डॉ. विश्वास पाटील)
 • तमाशातील सोंगाड्या (भि.शि. शिंदे)
 • तमाशातील स्त्री कलावंत : जीवन आणि समस्या (डॉ. साधना बुरडे)
 • तमाशा लोकरंगभूमी (रुस्तुम अचलखांब)
 • तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा (योगीराज बागूल)
 • रंग नटेश्वराचे (गणपत पाटील)
 • रांगडी गंमत सोंगाड्याची (सोपान खुडे) 1. ^ "विविधा : दत्ता महाडिक पुणेकर - Dainik Prabhat". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2020-10-14 रोजी पाहिले.
 2. ^ "बशीर मोमीन (कवठेकर)". Maharashtra Times. 2020-10-14 रोजी पाहिले.
 3. ^ "बी. के. मोमीन कवठेकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-14 रोजी पाहिले.