गोंदिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख गोंदिया शहराविषयी आहे. गोंदिया जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?गोंदिया

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: bhatnagari

'

—  शहर  —
गोंदिया शहर
गोंदिया शहर
गोंदिया शहर
Map

२१° २७′ ००″ N, ८०° १२′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१८ चौ. किमी
• ३०० मी
हवामान
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

३६ °C (९७ °F)
• ४५ °C (११३ °F)
• ९ °C (४८ °F)
प्रांत Vidarbha
जिल्हा गोंदिया
लोकसंख्या
घनता
१,५०,००० (2011)
• ८,३३३/किमी
भाषा मराठी, हिंदी
स्थापना 1may 1999
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +४४१६०१
• +०७१८२
• MH-३५

गोंदिया' शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग (इंग्लिश: Rice mills) व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे

इतिहास[संपादन]

राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळात आर.व्ही. रसेल यांनी ‘गॅझेटियर’ मध्ये केला आहे.[ संदर्भ हवा ] त्या काळात आजसारखी राज्ये आणि त्यांच्या सीमाही नव्हत्या पण, ठरावीक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख शेजारी राज्यातील सावलीतच वाढत गेली. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यापूर्वी हा परिसर सी.पी.ॲॅंड बेरारमध्ये येत होते. त्या काळापासूनच गोंदिया शहरचे संबंध शेजारच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशशी वाढत गेले. ते आजतागायत सुरू आहेत. त्यामुळे या शहराला हिंदी भाषेने ग्रासले असून या शहराची ओळखही महाराष्ट्रातील हिंदीभाषक शहर म्हणूनच आजही कायम आहे.

येथील बोली भाषेला झाडीबोली या नावाने संबोधले जाते.

पूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकिर्दीत कामठा, फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवन, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत. त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. जुना गोंदिया, फुलचूर व र्मुी येथे ग्रामीण वसाहत झाल्यानंतर इंग्रजांनी शहरापर्यंत वसाहत करून व्यवसाय वाढवण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डाची रचना आली. त्यावेळची प्राथमिक शाळा रेलटोली (वर्ष १९१६) आणि ॲंग्लो व्हर्नाकुलर मिडल स्कूल म्हणजेच आजचे मनोहर म्युन्सिपल हायस्कूल (१९१८) सुरू झाले. परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले.

गोंदियाला अतिप्राचीन अशा हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय.

या शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. त्यांना आश्रयही दिला. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हातात सामावलेल्या आहेत. शहर छोटे आणि मनमिळाऊ संस्कृतीमुळेच या शहराला कधीही दंगलीचे गालबोट लागले नाही. मोहन महाराज पेढेवाले व लालजी भाईच्या समोस्याचे दुकान, नक्काभाई सोनी, धन्नालाल मोहनलाल तिवारी हे स्टीलचे दुकान, खिल्लुमल तालेवाला, दिल्ली हॉटेल हे एकेकाळी शहरातील प्रसिद्ध ठिकाणे होती. आज यासारखी दुकाने वाढली असली तरी त्यांची महिमा अजूनही जशीच्या तशीच असून ही दुकाने त्यांच्या वारसदारांच्या हाती आहेत. १८७७ मध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद नागपूरहून रायपूरला बैलगाडीने जात होते, तेव्हा त्यांचा पहिला समाधी दरेकसा गुहेजवळ झाला.

नगरपरिषद[संपादन]

गोंदिया नगर परिषदेची स्थापना सन १९२०मध्ये करण्यात आली आणि येथूनच पुढे गोंदिया नगर परिषदेची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला १०असलेल्या नगरसेवकांची संख्या आता ४०वर पोहोचली आहे.

१ एप्रिल १९२०मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सेठ रामप्रताप लक्ष्मण अग्रवाल यांना मिळाला, तर पहिले मुख्याधिकारी म्हणून जी.व्ही. काने यांनी काम पाहिले. गोंदिया शहराची तेव्हा लोकसंख्या केवळ २०हजार होती. मात्र आज शहराची लोकसंख्या १ लाख २०हजार ६३२ वर पोहोचली आहे. आधी नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या २०हजार असल्याने तेव्हा न.प. मधील नगरसेवकांची संख्या १०होती. यानंतर जसा जसा शहराचा विस्तार होत गेला व लोकसंख्या वाढत गेली, तशी तशी नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्यात आली. त्यामुळे सन २0११ मध्ये नगरसेवकांची संख्या ४०वर पोहोचली असून आधीच्या ४०वॉर्डांचे रूपांतर आता नवीन प्रभाग पद्धतीत याचे १०प्रभागांत विभाजन झाले आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ १८ स्क्वेअर कि.मी.आहे. सन १९४९ मध्ये शहराचा विस्तार सी.पी. ॲंन्ड बेरारअंतर्गत करण्यात आला होता. तेव्हापासून आजवर शहराचा विस्तार करण्यात आला नाही.

नगर परिषदेत आतापर्यंत २०नगराध्यक्ष झाले असून १३ वेळा प्रशासकांनी न.प.चे कामकाज सांभाळले आहे. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान स्व. मनोहरभाई पटेल यांना मिळाला. त्यांच्यापाठोपाठ रामनाथ आसेकर यांनी ११ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर सर्वांत कमी काळ नगराध्यक्षपदी सविता इसरका राहिल्या.सध्याचे नगराध्यक्ष श्री अशोक इंगळे हे आहेत जे पहिल्यांदाच प्रत्यक्ष पद्धतीने निवडून आले. अर्थात शहरातील मतदारांनी प्रत्यक्ष निवडून दिले.

भूगोल व हवामान[संपादन]

गोंदिया शहर महाराष्ट्रात अगदी ईशान्येकडे आहे.

  • गोंदिया शहराचे इतर प्रमुख शहरांपासूनचे अंतर
शहर अंतर(किमी)
मुंबई ९६५
कोलकोता १००१
दिल्ली १२२१
बंगलोर १२३५
हैद्राबाद ६२४
चेन्नई ११३४
रायपूर १७२
जबलपूर २२७
भोपाळ ५१८
नागपूर १५०

शिक्षण[संपादन]

गोंदिया शहर शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणक्षेत्रात विणलेले जाळे हा विसाव्या शतकातील लक्षणीय बदल म्हणावा लागेल. जगत शिक्षण संस्था, दिवं देवाजी बुद्धे शिक्षण संस्था, पंजाबी शिक्षण संस्था अशी गोंदियात अनेक संस्था जन्माला आल्या आणि त्यांनी त्यांच्या कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली. गोंदियाचे हे संचित आहे. जुन्या नावाजलेल्या काही शाळांची पार रया गेली. जुन्या काळातील जे.एम. हायस्कूल, हिंदी टाऊन प्राथमिक शाळा, सुभाष प्राथमिक शाळा, लोकोशेड प्राथमिक शाळा, धन्नालाल मोहनलाल नगरपालिका प्राथमिक शाळा, माताटोली प्राथमिक शाळा, मरारटोली प्राथमिक शाळा या शाळांना आता विद्यार्थी मिळेनासे झालेले आहेत. विकासांच्या गतीत फोफावलेली कॉन्व्हेंट संस्कृतीने त्यांची जागा घेतली आहे. विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळते ती विवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरुनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल आदी शाळांना मिळत आहे.

काही महत्त्वाच्या शिक्षण संस्था[संपादन]

  • जगत शिक्षण संस्था
  • दिवं देवाजी बुद्धे शिक्षण संस्था,
  • पंजाबी शिक्षण संस्था
  • गोंदिया शिक्षण संस्था

गोंदिया शिक्षण संस्थाची स्थापना स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांनी ८ डिसेंबर १९५८ला गोंदिया येथे केली. गोंदिया शिक्षण संस्था विदर्भात नावाजलेली संस्था आहे. गोंदिया शिक्षण संस्थेचे मुखे उद्देश :

  • उच्च शिक्षणासाठी कॉलेजेस सुरू करणे
  • पुस्तके आणि नियतकालिकांचे प्रकाशन करणे
  • विद्यार्थांसाठी राहण्यासाठी वसतीगृहाची व्यवस्था करणे.

काही महत्त्वाच्या शाळा[संपादन]

विवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरुनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, सावरी

नामांकित संस्था[संपादन]

  • नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट.

पर्यटनस्थळे[संपादन]

नागरा[संपादन]

गोंदियाच्या उत्तरेला जवळच प्राचीन गाव नागरा आहे. येथील एका टेकडीचे उत्खनन केल्यानंतर प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आढळले. नागनाथपासून नागेश्वर बनलेला आहे. नागराजमुळे या गावाचे नाव नागरा पडले. ही हेमाडपंथी लोकांची वस्ती असावी, असे मानले जाते. येथील एका टेकडीचे खोदकाम केल्यावर हेमाडपंथी शिवमंदिर, नंदी व हनुमानाची मूर्ती मिळाली. हे मंदिर १२ व्या शतकातील आहे आणि १६ खांबांवर विना जोडणीने बनलेले आहे. ते काळ्या दगडाचे आहे. मंदिरात गणेश-पार्वती व नागदेवताची मूर्ती आहे. शिवमंदिरात यज्ञाकरिता खड्डय़ाचे खोदकाम करताना एक भुयार आढळले. त्याजवळच काही काळात बनवलेली सिद्ध योगी महात्माची समाधी आहे. मंदिराच्या सभागृहाला कालांतराने कोच लावून आकर्षक बनवण्यात आले आहे.

नागझिरा[संपादन]

नागझिरा महाराष्ट्रातील एक जुनं अभयारण्य आहे. एकोणीसशे सत्तरमध्ये या वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत घेतलेल्या काळजीमुळे आज नागझिऱ्याचं जंगल खऱ्या अर्थानं फोफावलेलं आहे आणि भारतातील एक उत्कृष्ट अभयारण्य म्हणून ओळखलं जात आहे. या अरण्याचं क्षेत्र सुमारे १५३ कि.मी. असून, हे अरण्य दक्षिण उष्णकटिबंधीय, शुष्क पानगळीचं जंगल आहे. येथील घनदाट वृक्षराजीमध्ये कमालीचं वैविध्य आहे. यामध्ये साग, ऐन, बीजा, साजा, तिवस, धावडा, हलदू, अर्जुन, बेहडा, तेंदू, सेमल, जांभूळ, चारोळी, आवळा, कुसुम अशी उंचच उंच वाढणारी आणि घनदाट पानोरा असणारी झाडं आहेत. गुळवेल, पळसवेल, कांचनवेल, काचकरी, चिलाटी अशा वेलींच्या प्रजाती वृक्षांना लगटून फोफावलेल्या आहेत. विविध प्रकारचे बांबू आणि वेगवेगळे गवत यांच्यामुळे भूभाग आच्छादित असतो. त्यामुळेच हे जंगल सर्व प्रकारच्या वन्य पशू-पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच ठरते. विविध प्रकारचे वन्य पशू, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि फुलपाखरं इथं पाहायला मिळतात. सस्तन प्राण्यांपैकी वाघ, बिबटे, रानगवे, सांबर, चितळ, नीलगाय, अस्वल, चांदी अस्वल, रानकुत्रे, डुक्कर, चौसिंगा, तरस, कोल्हा, लांडगा, साळिंदर, उडणारी खार, खवल्या मांजर इत्यादी प्राणी इथं मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात.

लोकजीवन व संस्कृती[संपादन]

मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे, गोंदियात घरी जरी मराठी बोलत असले तरी गोंदियाच्या बाजारात फिरल्यावर ही बाब लक्षात येते. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. शहरातील इतर भाषा इंग्रजी आहे. शहरात गुजराती आणि सिंधी लोकवस्ती उल्लेखनीय प्रमाणात आहे, त्यामुळे गुजराती आणि सिंधी ह्या भाषांचा पण वापर होतो.

इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार गोंदिया शहराची नागरी लोकसंख्या २,००,००० पर्यंत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे शहरात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही. शहराची वाडती लोकसंख्या लक्षात घेऊन विभिन्न ठिकाणी पाण्याच्या ४ टाक्या निर्माण करण्याचे काम चालू आहे. गोंदियाला सध्या(इ.स.२०१२) विजेच्या भारनियमनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव कमी झाला आहे.

गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. त्यातल्या त्यात दुर्गापूजेच्यावेळी तयार करण्यात येणारे देखावे बघण्यासारखे असतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात. 'मारबत व बडग्या' या मिरवणूक प्रकार गोंदियात होतो. पोळा व तान्हा पोळा हे सण उत्साहात होतात. एकेकाळी पतंग उडवण्याचा शौक सामूहिकपणे सध्याच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर साजरा व्हायचा. स्टेडियम उभारणीच्या पूर्वी या पटांगणावर चटईच्या पत्र्यांचा आडोसा लावून फुटबॉल व हॉकीचे राज्यस्तरीय सामने खेळले जायचे. मात्र, त्यांना आता स्टेडियम असूनही ग्रहण लागले आहे.

नेहरू चौकाजवळील कार्नरवर दर रविवारी होणाऱ्या देशी कुस्तीच्या दंगलीने शहरातील बरेच पहेलवान घडवले. शहरातील एकमात्र प्रसिद्ध बापूजी व्यायाम शाळा तिची ओळख जपण्याकरिता धडपडत आहे. त्याची जागा आता स्टेपअप जिम, गोल्डन जिम, अशा आधुनिक साहित्यांनी सुसज्ज जिमने घेतलेली आहे.

नाटय़क्षेत्रातही गोंदियाचे योगदान उल्लेखनीय ठरावे. स्वातंत्र्यपूर्वकाळात कन्हारटोली परिसरातील भवभूती रंग मंदिर, गुर्जर क्षत्रिय समाजवाडी आदी उभारण्यात आले. हिंदीभाषिक लोकांची वाढती लोकसंख्यामुळे या नाटय़गृहात होणाऱ्या मराठी नाटकांना अवकळा आली. बदलत्या काळासोबत हे शहर सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस समृद्ध व प्रगल्भ होत गेले. शास्त्रीय गायन, साहित्य संमेलने, विविध कार्यक्रमांची रेलचेल सतत वाढत गेली. यात प्रामुख्याने हातभार लावला तो दिवं. मनोहरभाई पटेल, दिवं. शंकरलाल अग्रवाल यांनी.

प्रमुख स्थळे[संपादन]

1)नवेगाव राष्ट्रीय उद्यान , नवेगाव 2)सुभाष गार्डन , गोंदिया 3)नागझिरा अभयारण्य काचारगड, हाजरा फॉल

अर्थव्यवस्थाू[संपादन]

वाहतूक व्यवस्था[संपादन]

मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळत असली तरी अद्यापही हे शहर मागासलेलेच गणले जाते. गोंदियाजवळील भाग वन आणि निसर्गसंपदेने परिपूर्ण नटलेला आहे. या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या शहराची दोन भागात विभागणी होते.

गोंदिया

रेल्वे[संपादन]

गोंदिया रेल्वे स्थानक मुंबई-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असून महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथूनच सुरू होतात.

रस्ते वाहतूक[संपादन]

विमान वाहतूक[संपादन]

गोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. मध्यंतरीच्या काळात, स्वातंत्र्यानंतर या धावपट्टीचा वापर बंद झाला होता. अलीकडे राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे बिरसी धावपट्टीचा विकास करून परीक्षणाचे काम शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे १९८८ पासून २००५ पर्यंत सोपवले होते. त्या काळात एम.आय.डी.सी.तर्फे केवळ हवाई धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पाहिली जात. त्यावेळेस या धावपट्टीवर लहान व मध्यम आकाराचे नॉन-इस्ट्रुमेंटल विमान केवळ दिवसाच उतरू शकत होते. अलीकडे म्हणजे जानेवारी २००६ च्या सुरुवातीपासून बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३२१.५४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले. त्यासाठी ही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली. सध्या प्राधिकरणातर्फे बिरसी विमानतळाचा विकास वेगाने सुरू आहे. तसेच, या परिसरात नव्याने एर ट्राफिक कंट्रोलची उभारणी करण्यात आली असून तेथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. यामुळे आता अन्य विमानतळाप्रमाणे बिरसी येथे रात्रीसुद्धा विमानाची ये-जा होऊ लागली आहे.

विश्रामगृह व हॉटेल्स[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाहेरील दुवे[संपादन]

गोंदिया.कॉम Archived 2007-03-11 at the Wayback Machine.

Book "Journey of Swami Vivekananda to Raipur and His First Trance"