गोंधळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे या शुभ समयी आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेवतात.

या कार्यक्रमामध्ये गोंधळी लोक सर्व देवतांचे नाव घेतात.त्यांना गोंधळास येण्याचे आवाहन करतात. या कार्यक्रमामध्ये सर्वाना अन्न दान केले जाते.

महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात किर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेली आहे. विशेषत: तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.

अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा व कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकड्या गोंधळ' असे म्हटले जाते.

आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलावले असेल तेथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.

उदा.
अंबे जोगवा दे जोगवा दे
माय माझ्या भवानी जोगवा दे ।


हे जसे भक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे-

मी मिरचीचे भांडण ।
एका रोज खटखटीन जी ॥
मिरची अंगी लईच ताठा ।
म्हणतिया मी हाई तिखटजी ॥

असे विनोदी गीतही सादर केले जाते.

उदा.
रत्नागिरी ज्योतिबा ।
गोंधळा या हो ।
तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो।
पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो ।


असे गीत गाऊन आमंत्रित केले जाते. त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सर्वसाधारणपणे रात्री ९ च्या सुमारास सुरु झालेला गोंधळ पहाटेपर्यंत सुरू असतो. यासाठी कुठलाही रंगमंच लागत नाही. घरापुढील आंगण, ओटा चालतो. रंगभूषा आणि नेपथ्यही नसते. संत साहित्यात देखिल गोंधळाचा उल्लेख आढळतो. संत एकनाथांनी -

द्वैत सारूनि माळ मी घालिन।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन।
भेदरहित वारीस जाईन।


असा जोगवा मागितला.


असा हा गोंधळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळते.

बाह्य दुवे[संपादन]