Jump to content

नाताळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ख्रिसमस या पानावरून पुनर्निर्देशित)
नाताळ
अधिकृत नाव नाताळ (ख्रिसमस)
इतर नावे ख्रिसमस डे, बडा दिन
साजरा करणारे ख्रिश्चन, अन्य अख्रिस्ती [][]
प्रकार ख्रिस्ती
दिनांक २५ डिसेंबर
वारंवारता वार्षिक
नाताळसाठी सजवलेला ख्रिस्तजन्माचा देखावा (क्रिब) व ख्रिसमस वृक्ष
ख्रिसमस ट्री

नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.[] काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.[][] ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.[] जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.[] त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.[] यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.

येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व

[संपादन]
Eastern Orthodox icon of the birth of Christ by St. Andrei Rublev, 15th century

ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ बायबलच्या लूक व मत्तय या दोन्ही शुभवर्तमानात ( Gospel) मध्ये ख्रिस्तांच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. त्यानुसार त्याचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी एका गोठ्यात झाला. संत लूकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहेमच्या यात्रेचा वृत्तान्त दिलेला आहे.[] असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजूबाजूचे सर्व मेंढपाळ त्यांची स्तुती करत होते. तसेच संत मॅॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी इजिप्तला गेले.

रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.[१०]

या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराॅल असे म्हणतात.[११]

प्राचीनत्व

[संपादन]

प्राचीन ख्रिस्ती संप्रदायाचा विचार करता हिवाळ्यातील सण, विशेषतः त्या काळातील संक्रमण विचारात घेतां युरोपातील पेगन (निसर्गपूजक किंवा अनेक देवतांना माननारे) संस्कृतीत विशेष प्रचलित आणि लोकप्रिय असावेत असे दिसते. याचे कारण म्हणजे या काळात शेतीशी निगडित कामे तुलनेने कमी असल्याने निवांतपणा असे आणि हवामानही आल्हाददायक असे. नाताळ सणाशी जोडल्या गेलेल्या आधुनिक प्रथांचा उगम येथेच असावा.[१२] यामध्ये भेटवस्तू देवाणघेवाण, आनंद जल्लोष करणे, झाडाचे सुशोभीकरण आणि सजावट तसेच गरजूंना दान याचा समावेश होतो.

इतिहास

[संपादन]

चार्ल मेगन या राजाचा राज्याभिषेक २५ डिसेंबर इ.स. ८०० या दिवशी झाला. त्या दिवसापासून हा विशिष्ट दिवस साजरा करण्याचे महत्त्व विशेष वाढले असे दिसते. मध्ययुगाच्या काळातच या दिवसाला सुट्टीचे महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. या काळात नाताळ हा एक सार्वजनिक उत्सव बनला. भेटवस्तू देणे हे त्यावेळी मालक-सेवक यांच्यापुरतेच मर्यादित होते. १७व्या शतकात या दिवशी गायन, वादन, नृत्य, सहभोजनाचा आस्वाद अशा गोष्टी या दिवशी आनंदाचा भाग म्हणून केला जाऊ लागल्या. १७व्या शतकातच काही विशिष्ट समाजगटाने या सणावर बंदी आणल्याचेही दिसून येते.

इसवी सन १ ८ २ २ मध्ये लेखक क्लेमंट क्लर्क मूर यांनी आपल्या मुलांच्या मनोरंजनासाठी एक गीत लिहिले. त्यात त्य्यांनी लहान मुलांना भेटवस्तू देत असलेल्या संत निकोलस यांचे चित्रण केले . या कवितेला लोकप्रियता प्राप्त झाली . यामध्ये सांता ही व्यक्तिरेखा उत्साही , आनंद देणारी आहे असे वर्णन केले आहे जे आजही पहावयास मिळते .

भेटवस्तू देण्याची प्रथा

[संपादन]
सांता क्लॉज लहान मुलांना भेटवस्तू देताना

भगवान येशूंच्या जन्माचा स्मरणउत्सव साजरा करण्याचा विविध प्रथा–पद्धती स्वतंत्रपणे विकसित झाल्याचे दिसून येते. या प्रथांना येशूजन्मपूर्व काळातील साजरा होणाऱ्या पगान संस्कृतीच्या शीतकाळातील अयनदिवसांच्या उत्सव साजरे करण्याचे संदर्भ जोडलेले दिसतात.[१३] पगान जमातीने कालांतराने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. भेटवस्तूंची देवाणघेवाण हा त्यातीलच एक भाग.

नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देण्यात येतात.

नाताळ शुभेच्छा ध्वनी

[संपादन]

शुभेच्छापत्रे

[संपादन]
नाताळची शुभेच्छापत्रे

नाताळची शुभेच्छापत्रे कुटुंबातील सदस्य आणि आप्त, स्नेही यांना पाठवली जातात. पारंपरिक पत्रांमध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात.[१४] काही पत्रांमध्ये बायबल मधील विचार, कविता इत्यादीचा समावेश असतो. बर्फाने व्यापलेला प्रदेश, नाताळबाबा, त्याची गाडी, ख्रिसमस ट्री अशी विविध चित्रे यामध्ये असतात. पहिले व्यावसायिक नाताळ शुभेच्छापत्र इ.स. १८४३ मध्ये सर हेन्री कोल यांनी बनवले. आता ही पद्धत जगभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली दिसून येते.

नाताळचा गोठा : (Christmas Crib) :

नाताळच्या दिवशी ख्रिस्ती लोकात गोठा तयार करण्याची परंपरा रूढ आहे. बेथलेहेम गावातील ज्या गरीब गोठ्यात प्रभू येशूने जन्म घेतला त्याचे स्मरण म्हणून ख्रिस्ती लोक हा गोठ्याचा देखावा उभारतात. ख्रिस्तमंदिरात गोठा उभारण्याची प्रथा १२२३ मध्ये उदयास आली. संत फ्रांसिस असिसिकर हा या प्रथेचा जनक होय. इटली मधील एका ख्रिस्तमंदिरात त्याने १२२३ च्या नाताळ सणात त्याने आपल्या सहकाऱ्यासमवेत बेथलेहेम सारखा एक गोठा बनविला. त्यात येशूबाळ, मरिया, योसेफ यांच्या मूर्तींबरोबरच जिवंत जनावरे ठेवण्यात आली होती. भाविकांमध्ये या गोठ्याचे आकर्षण खूपच वाढले आणि अल्पावधीतच नाताळच्या दिवशीगोठा बनविण्याची ही प्रथा जगभर सुरू झाली.

या वर्षी म्हणजे २०२३ साली या परंपरेला ८०० वर्ष पूर्ण झाली आहेत

(संदर्भग्रंथ :  झेप येशूची २००० वर्षाकडे   लेखक : फादर हिलरी फर्नांडिस)

ख्रिसमस ट्री

[संपादन]
साऊथ कोस्ट प्लाझा मॉलमधील ख्रिसमस ट्री (नाताळ वृक्ष)

नाताळचा सूचिपर्णी वृक्ष हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. ख्रिसमस ट्री असे संबोधन प्रथम इ.स. १८३५ मध्ये झालेले आढळते. आधुनिक काळातील या वृक्षाची सजावट हा भाग जर्मनीत उदय पावल्याचे समजतात. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजवितात. काही ठिकाणी विशेषतः प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.

नाताळबाबा (सांताक्लॉज)

[संपादन]
संत निकोलस

साताक्लॉज किंवा संत निकोलस हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात. पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत मानले जाते की चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना नाताळच्या आदल्या रात्री सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.[१५]

सांताक्लाॅजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती असे केले जाते. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही याच्यासोबत असते. अमेरिका आणि कॅनडा या देशांत ही व्यक्तिरेखा १९व्या शतकापासून विशेष लोकप्रिय आहे.[१६]

Jingle Bells (Calm) (Kevin MacLeod) (ISRC USUAN1100188)
जिंगल बेल्स गीत

नाताळ सणाशी संबंधित गीते आणि संगीत हा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात या संगीताचा उगम रोममध्ये झाला असे मानले जाते. १३व्या शतकाच्या आसपास स्थानिक भाषेमध्ये नाताळची गाणी म्हणण्याची पद्धती विकसित झाली असावी. इंग्लिश भाषेत नाताळची गाणी प्रथम इ.स. १४२६मध्ये गायली गेली. जॉन ऑडले याने अशी २५ गीते संकलित केली जी गाणी म्हणणाऱ्या गायकांचा एक समूह घरोघरी जाऊन अशी गाणी म्हणत असे. या गाण्यांमध्ये भगवान येशू यांच्या जन्मापासून ते आनंद साजरा करण्याचे विविध विषय समाविष्ट असतात. ‘लहान मुलांमध्ये मंजुळ घंटानाद करीत सांता येत आहे’ (Jingle Bells... Santaclause is coming along...) हे गीत विशेष लोकप्रिय आहे.[१७]

भारतातील नाताळ

[संपादन]

नाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात.[१८] भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% (१.२४ कोटी) आहे. तरी नाताळला भारतात ही सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्ये व हिंदू घरांमध्येही ख्रिसमस साजरा केला जातो.

विविध देशांमध्ये

[संपादन]

नाताळ हा सण आफ्रिका, आग्नेय आशिया, युरोप, अमेरिका अशा जगभरातील सर्व खंडांमध्ये व विविध देशांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. बर्फ पडत असलेल्या प्रदेशात शुभ्र नाताळ (White Christmas) उत्साहाने साजरा होतो. लहान मुले आवर्जून बर्फाचे तात्पुरते बाहुले तयार करतात. त्यांना (Snowman) स्नो-मन म्हणले जाते.

युरोपातील ख्रिसमस बाजार

[संपादन]

हे बाजार साधारणतः नाताळच्या आधी चार आठवडे रस्त्यांवर सुरू होतात. दर आठवड्याच्या शेवटी हे बाजार भरतात. या कल्पनेची सुरुवात जर्मनीत मध्ययुगात झाली. डेट्रेन शहरात १४३४ मधे सुरू झाले. आता हे बाजार युरोपात अधिक लोकप्रिय झाले आहेत. विशेष ठिकाणच्या म्हणजे न्यूर्नबर्ग, फ्रंकफर्ट, कोलोन, व्हिएन्ना या ठिकाणचे असे बाजार लोकप्रिय आहेत. ऐतिहासिक ठिकाणे, संग्रहालये अशा ठिकाणी हे बाजार भरतात. काही बाजार हे मध्ययुगीन, बोहेमिअन, पोलिश अशा विषयांवर आधिरित हे बाजार असतात. येशूशी संबंधित देखावेही असतात. पारंपरिक सोललेले, रोस्टेड बदाम, पिझ्झा, वाईन, केक असे पदार्थ, रोषणाईचे साहित्य यांची बाजारात रेलचेल असते. मेणबत्त्या, लाकडी वस्तू, स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी असतात. जत्रेचे स्वरूप या बाजारांना असते. स्थानिक संस्कृतीचा परिचयही या बाजारांमधून होतो.[१९]

खाद्यपदार्थ

[संपादन]

नाताळच्या दिवशी काही भाविक उपवास करतात. तथापि सणाच्या आनंदानिमित्ताने वाईन, फळे घातलेला विशेष नाताळ केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे आणि अंड्यांचे,आणि मांसाहारी खास पदार्थ आवर्जून केले जातात.[२०]

हे सुद्धा पहा

[संपादन]

नाताळ बाजार

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "क्रिस्टमस" (PDF).
  2. ^ "In the U.S., Christmas Not Just for Christians" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "नाताळ – २". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2021-12-23 रोजी पाहिले.
  4. ^ ख्रिसमस "मेरियम - वेबस्टर" Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्लिश भाषेत). ६ ऑक्टोबर २००८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "द कॅथॉलिक एनसायक्लोपेडिआ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "नाताळ सण" (इंग्लिश भाषेत). 2008-12-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ डिसेंबर २००८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "Why December 25th". ०१ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "पोल: इन अ चेंजिंग नेशन, सॅंटा एंड्यूअर्स (जनमत: देशातल्या बदलत्या वातावरणातही सांताक्लॉज टिकून आहे)" (इंग्लिश भाषेत). ४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link).
  9. ^ "Biblical literature." Encyclopædia Britannica. Encyclopædia Britannica. Encyclopædia Britannica, 2011. Web. January 22, 2011.
  10. ^ Augustine, Sermon 192.
  11. ^ Lee, Compiled by Morgan. "These Christmas Carols Bring Joy to the Whole World". ChristianityToday.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-23 रोजी पाहिले.
  12. ^ Crabtree, Vexen. "The True Meaning of Christmas Paganism, Sun Worship and Commercialism". http://www.humanreligions.info/christmas.html. 13.12.2019 रोजी पाहिले. line feed character in |title= at position 30 (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  13. ^ "The unexpected origins of popular Christmas traditions". CBS NEWS. 25.12.2018. 13.12.2019 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ Collins, Ace (2003). Stories Behind the Great Traditions of Christmas (इंग्रजी भाषेत). Harper Collins. ISBN 978-0-310-24880-4.
  15. ^ Giovanelli, Janet (2020-10-13). The True Story of Santa Claus: The History, The Traditions, The Magic (इंग्रजी भाषेत). Simon and Schuster. ISBN 978-1-951274-42-9.
  16. ^ Krulwich, Robert. "How Does Santa Do It?". ABC News. Retrieved December 25, 2015.
  17. ^ Moore, Kimberly (November 29, 2011). "A Brief History of Holiday Music". Psychology Today. Retrieved October 22, 2017.
  18. ^ "भारतात नाताळ" (इंग्रेजी भाषेत). TheHolidaySpot.com. 2016-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 4, 2016 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  19. ^ भाटवडेकर श्रद्धा,लोकसत्ता (मुंंबई) आवृृत्ती,लोकभ्रमंंती,दिनांंक १३ डिसेंंबर २०१७, बुधवार
  20. ^ Mama's Box - Online Spanish food Shop. "The definitive guide to Spanish Christmas food, in 20 delicious & easy recipes". Archived from the original on 2015-12-11. Retrieve

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत